Tuesday, September 04, 2012

अनाग्रही सभ्य भूमिका



लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या 'वाचावे नेटके' या सदरात माझ्या या ब्लॉगची ओळख करून देतांना त्या लेखाचा मथळा 'अनाग्रही सभ्य भूमिका' असा दिला आहे. श्री.अभिनवगुप्त यांनी माझ्या लेखनामागील भूमिका इतक्या नेमक्या शब्दात पकडलेली पाहून मला त्याची थोडी गंमत आणि कौतुक वाटले. 'अनाग्रह' आणि 'सभ्यपणा' हा माझ्या नेहमीच्या वागण्यातला भाग असल्यामुळे माझ्या लेखनात तो आपोआप उतरला असावा आणि त्यातला स्थायी भाव झाला असावा. मला ते कधी वेगळे जाणवले नाही की ब्लॉग लिहीत असतांना मी मुद्दाम ठरवून ही भूमिका घेतलेली नाही. ती ठळकपणे उठून दिसेल एवढी महत्वाचीही वाटली नव्हती. त्यामुळे हा मथळा वाचतांना मला किंचित नवल वाटले. अर्थातच या अभिप्रायाशी मी सहमत आहे. ज्येष्ठ नागरिकत्व प्राप्त झाल्यानंतर कौतुक करण्याचा अधिकार मला मिळाला आहे असे मला वाटते.

"जे जे आपणासी ठावे ते सर्वाशी सांगावे" आणि "मनात येईल ते लिहून मोकळे व्हावे" या दोन खांबांच्या मुख्य आधारावर माझे ब्लॉगवरील लिखाण होत असते. त्याची वाचनीयता वाढवण्याच्या दृष्टीने रंजकता, खुसखुशीतपणा वगैरेंचे टेकू मी त्याला देत असतो. आपल्याकडे असलेली माहिती इतरांना सांगत असतांना त्यांना ती समजणे महत्वाचे असते. माझे ब्लॉग वाचणारे वाचक भिन्न भिन्न क्षेत्रांमध्ये निरनिराळ्या स्तरावर वावरणारे असतील, किंवा तसे असावेत असे गृहीत धरून सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना कळावे इतपत सोप्या शब्दात ती माहिती देण्याचा प्रयत्न मी करत असतो. ती माहिती शक्य तेवढी अचूक आणि परिपूर्ण असणे महत्वाचे असल्यामुळे ती पडताळून पाहतो. याला मर्यादा असल्यामुळे माझेकडून काही चुका होतात, उणीवा राहतात. सुजाण वाचकांनी त्या दाखवून दिल्या तर मी त्यांचे आभार मानून आपल्या लेखात दुरुस्ती करणेच योग्य असते. एकाद्या गृहस्थाचे नाव 'पाटील' आहे असे कोणाकडून कळले म्हणून मी त्याला त्या नावाने संबोधले आणि तो 'पटेल' निघाला तरीसुध्दा तो 'पाटील'च आहे असे आग्रह धरणे हास्यास्पद ठरेल. अशा वेळी जे बरोबर वाटते त्याचा आग्रह मी धरतो. माझेच सांगणे बरोबर होते असा हट्ट धरत नाही.

'मनात येईल ते' लिहितांना त्यात माझे विचार आणि मते येतात. माझ्यावर झालेले संस्कार, माझे शिक्षण, वाचन, श्रवण, मनन. चिंतन अनुभव वगैरेंच्या मिश्रणातून ते उद्भवतात. या गोष्टी प्रत्येक माणसाच्या बाबतीत निराळ्या असल्याकारणाने प्रत्येकाचे विचार आणि मते वेगळी असू शकतात. आपली मते दुस-याला पटली तर चांगलेच आहे, पण पटली नाहीत तरी त्याच्या मतांचा आदर ठेवला पाहिजे असे मी समजतो. यालाच लोकसत्तेच्या स्तंभलेखकाने 'अनाग्रह' म्हंटले असावे. आपल्याला न पटलेल्या निराळ्या मतांची टर उडवणे किंवा त्यांना तुच्छ लेखणे असे प्रकार माझ्या लेखनात नसतात. याला बहुधा 'सभ्य भूमिका' असे म्हंटले असावे. कोणाचेही विचार आणि मते ही इतर अनेक गोष्टींवर आधारलेली असल्यामुळे ती जन्मभर एकसारखीच रहावीत असे असणार नाही. आजूबाजूची परिस्थिती, माणसाचे ज्ञान आणि अनुभव यात रोज नवनवी भर पडत असते आणि विचारसरणीवर त्याचा प्रभाव पडणे आणि त्या विषयावरील मत बदलणे हे जीवंतपणाचे लक्षण आहे. त्यामुळे मी मांडलेली मते त्या वेळच्या परिस्थितीत तशी असतात आणि मी ती ठामपणे मांडतो. त्यात गुळमुळीतपणा नसतो हे लेखकाने नमूद केले आहे. ती मते त्या क्षणापर्यंतच्या अनुभवावर आधारलेली असल्यामुळे एकाद्या अनुभवाने ती पार उलटी होणार नाहीत. अनुभवांची गोळाबेरीज बदलायला वेळ लागतो. ही प्रक्रिया संथ असते. त्यामुळे त्यात ब-यापैकी सातत्य असते. माझ्या बालपणी मी कोणत्या वातावरणात रहात होतो आणि त्या कळात माझ्या समजुती व विचार कसे होते आणि त्यात कसा आणि किती बदल होत गेला हे सांगणे हा माझा आवडता छंद आहे याची प्रचीती या ब्लॉगवरील अनेक लेखांमध्ये दिसेल.

आणखी एक गोष्ट अशी आहे की कोठल्याही गोष्टीमागे असलेला कार्यकारणभाव आपण एका मर्यादेपर्यंत समजून घेऊ शकतो. त्या पलीकडे जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ तिखट व मसालेदार खाद्यपदार्थ किंवा उत्तेजक द्रवांच्या सेवनामुळे जठरामध्ये जास्त प्रमाणात आम्ल जमते आणि त्यामुळे जळजळ (हायपर अॅसिडिटी) होते हे डॉक्टरांकडून समजते, कोणती काळजी घेतली किंवा औषध घेतले तर कमी प्रमाणात आम्ल तयार होईल, तसेच कोणत्या औषधाने त्या आम्लाचे शमन होईल हे समजण्यापर्यंत आपण मजल मारू शकतो, शरीरशास्त्राचा अभ्यास केल्यास कोणत्या ग्रंथी हे काम करतात हे समजेल, पण मुळात या ग्रंथींची अंतर्गत रचना कशी असते आणि कोणत्या अन्नपदार्थामधून हे आम्ल तयार करण्याचे काम कोणत्या रासायनिक क्रियेने आणि का होते, ते कमी जास्त प्रमाणात कसे होते हे सांगणारा माणूस मला तरी अद्याप भेटलेला नाही. शरीर ठणठणीत आणि मन स्वस्थ असतांना आपली बुध्दी ज्या मर्यादेपर्यंत काम करते तिथपर्यंतसुध्दा काही वेळा आपण पोचू शकत नाही. त्या वेळी काही शारीरिक किंवा मानसिक कारणामुळे आपली बुध्दी व विचारशक्ती क्षीण झालेली असल्यामुळे वेगळे विचार मनात येतात. असे अनुभव सुध्दा येतात आणि ते मान्य करून त्यापासून बोध घेणे शहाणपणाचे असते.

श्री.अनुभव गुप्त यांनी लिहिलेल्या लेखाच्या सुरुवातीलाच माझे एक वाक्य दिले आहे. हे वाक्य मी कोणत्य संदर्भात लिहिले होते हे समजून घेणे थोडे महत्वाचे आहे. माझ्यावर येऊन गेलेल्या एका कठीण प्रसंगाबद्दल मी एक सविस्तर लेख लिहिला होता. त्याचा शेवट खाली दिलेल्या वाक्याने केला होता.

"परमेश्वराच्या कृपेने आणि शिवाय थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदीच्छा, माझी पूर्वपुण्याई आणि नशीब यांच्या जोरावर मी एका मोठ्या संकटातून सहीसलामत वाचलो असेच उद्गार त्यानंतर मला भेटलेले लोक काढतात आणि मी त्याला लगेच होकार देतो. पण खरेच हे सगळे असते का? असा एक विचार मनातून डोकावतोच!"


हा लेख मी उपक्रम या संस्थळावरसुध्दा प्रकाशित केला होता. त्यावर अनेक उलटसुलट प्रतिसाद आले. त्यातल्या एका मित्राने चांगले विश्लेषण करून झाल्यानंतर अखेर असे वाक्य लिहिले होते, "तुमच्या मनात डोकावणार्‍या विचाराने रंजन होत असेल, तर जरूर डोकावू द्यावा. विचाराने त्रास होत असेल, तर त्या विचाराला थारा देऊ नका."

त्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती, "मला विचारांचा त्रास वगैरे काही होत नाही . एकाद्या अनपेक्षित अनुभवाचे नवल वाटणे, त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया समजून घेणे, त्यावर स्वतः विचार करणे, अखेरीस पटेल तेवढे ठेऊन घेणे आणि बाकीचे सोडून देणे हा सारा शिकण्याचा भाग आहे आणि ते जन्मभर चालतच असते. अशा एका घटनेमुळे माझे वागणे बदलणार नाही."

एका संभाषणात सहजपणे आलेले हे वाक्य लेखकाला मार्गप्रदर्शक वाटले आणि त्या वाक्याला त्याने आपल्या लेखाच्या अग्रस्थानी जागा दिली यात त्याची गुणग्राहकता दिसून येते. पुन्हा एकदा त्याचे आभार.

No comments: