हा माझ्या ब्लॉगचा आठशेवा भाग आहे. ही मजल गाठतांना श्रीगजाननाचे स्मरण करून या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी ही लेखमाला सुरू करत आहे. येत्या काही दिवसात वर्तमानपत्रांमध्ये छापून येणा-या किंवा पूर्वी येऊन गेलेल्या लेखांमधली मला नवीन असलेली वैशिष्ट्यपूर्ण किंवा मनोरंजक माहिती त्यात देण्याच्या प्रयत्नाची ही सुरुवात आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
'गणपती', 'गणेश', 'गणाधीश', 'गणाधिप' वगैरे गजाननाची नावे आणि 'गणित' हे शब्द 'गण' या मूळ शब्दांपासून उद्भव पावलेले आहेत. तेंव्हा त्यांच्यात घनिष्ठ संबंध असणारच. भगवान विष्णूने दहा अवतार घेतले, त्यातल्या रामावतारात एकपत्नीव्रत पाळले तर कृष्णावतारात सोळा हजार एकशे आठ स्त्रियांशी विवाह केला, शंकराची बारा ज्योतिर्लिंगे, चार शक्तीपीठे, नवदुर्गा आदि इतर काही अंक सुध्दा देवाधिकांशी संबंधित असले तरी एकट्या गणपतीचा संबंध अनेक अंकांबरोबर जोडला जातो. 'एकदंत' हे त्याचे एक नाव आहे, तर ऋध्दी आणि सिध्दी या त्याच्या दोन पत्नी त्याच्या अंकावर (मांडीवर) बसल्या असल्याची चित्रे पहायला मिळतात. 'अकार', 'उकार' आणि 'मकार' हे तीन स्वर मिळून 'ओंकार' हे गणपतीचे आद्य रूप बनते. गणपतीचा जन्म माघी चतुर्थीला झाला आणि त्याच्या नावाचा उत्सव भाद्रपद चतुर्थीला धूमधडाक्याने साजरा केला जातो, शिवाय प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात विनायकी चतुर्थी आणि वद्य पक्षात संकष्टी चतुर्थीला गणपतीची आराधना केली जाते. त्याच्या बहुतेक प्रतिमा चतुर्भुज ( चार हातांच्या) असतात. काही कलाकार त्याला दोन किंवा आठ हात काढतात, तर पाच मुखे आणि दहा हात असलेल्या दशभुजा मूर्तीही असतात. पश्चिम महाराष्ट्रामधील मोरेश्वर, बल्लाळेश्वर, गिरिजात्मज, वरदविनायक, विघ्नेश्वर, चिंतामणी, महागणपती आणि सिध्दीविनायक या अष्टविनायकांचा महिमा अपरंपार आहे. नारद विरचित संकटनाशन गणेशस्त्रोत्रातील त्याची बारा नावे आहेत
१. वक्रतुंड, २. एकदंत, ३. कृष्णपिंगाक्ष, ४ गजवक्त्र, ५. लंबोदर, ६. विकट. ७.विघ्नराजेंद्र, ८.धूम्रवर्ण, ९. भालचंद्र, १०.विनायक, ११. गणपती आणि १२. गजानन
तर गणेशद्वादशनामस्तोत्रातील बारा नावे आहेत.
१.सुमुख, २.एकदंत, ३.कपिल, ४.गजकर्णक, ५.लंबोदर, ६.विकट, ७. विघ्ननाश, ८. विनायक, ९.धूम्रकेतू, १०.गणाध्यक्ष, ११.भालचंद्र १२.गजानन
दहापर्यंतचे आकडे हातांच्या बोटावर मोजता येतात. थोडेसे त्याच्यापुढे जाऊन बारापर्यंत मोजता येईल, पण 'एकवीस' हा अंक समजण्यासाठी दोन्ही हात आणि दोन्ही पायांची बोटे मिळूनसुध्दा पुरी पडत नाहीत. क्वचित एकाद्या माणसाच्या हाताला किंवा पायाला सहावे बोट असले तर त्याला एकवीस बोटे असतात. असा माणूस गणपतीचा प्रिय असणार. एकवीस हा आकडा त्याचा फारच आवडता समजला जातो. एकवीस दुर्वांची जुडी करून त्याला वाहतात. काही लोक अशा एकवीस जुड्या गणपतीला वाहतात. त्याच्या अत्यंत प्रिय अशा एकवीस मोदकांचा नैवेद्य त्याला दाखवतात, गणपतीअथर्वशीर्षाची एकवीस आवर्तने करतात. एकवीस या आकड्याचा अर्थ समजण्यासाठी मात्र गणिताची तोंडओळख असणे आवश्यक असते.
पुराणकालीन भूगोलानुसार सप्तस्वर्ग, सात मृत्यूलोक आणि सात पाताल मिळून या विश्वाची रचना झालेली आहे. या सर्व म्हणजे एकवीस लोकांमध्ये गणेश उपस्थित असल्यामुळे किंवा त्या सर्व लोकांचा तो स्वामी असल्यामुळे २१ या आकड्याला महत्व आहे.
पुढे दिलेले २१ महाविनायक (ते बहुधा पुण्यामधले असावेत.) नवसाला पावतात अशी त्यांच्या भक्तजनांची श्रध्दा आहे. १.श्रीदशभुजलक्ष्मीगणेश, २.सुवर्णगणेश, ३.चिमण गणपती, ४.श्रीराम सिध्दीविनायक, ५.आंग्रेकालीन, ६.श्रीधुंडीविनायक. ७.एकवीस गणपती, ८.देवदैवज्ञ गणपती, ९.विघ्नहर्ता, १०.आपट्यांचा बाळ, ११.मराठेंचा गणपती, १२.पार्वतीनंदन, १३.ग्रामदैवत, १४.श्री पुष्टीपती, १५.सिध्दीरूपी श्री, १६.पंचमुखी श्री, १७.शिलाहारकालीन, १८.गणपती घाट, १९.दाते गणपती, २०.गणेश पंचायतन आणि २१.शमी विघ्नेश
विष्णूप्रमाणे गणपतीची सुध्दा एकशे आठ नावे आहेत, त्यांची यादी मी मागे दिली होती. गणेशसहस्रनामेसुध्दा असतील. सगळे देव एकच आहेत असे धरले तर त्यातली बहुतेक नावे समाईक असतील. गणेशाच्या इतक्या नावांचा जप करणा-या लोकांची संख्या कमी कमी होत चालली आहे. त्यांना वेगळे विशिष्ट असे नाव नसल्यामुळे ते 'नामशेष' झाले असेही म्हणता येणार नाही. ते 'एक्स्टिंक्ट' होत चालले आहेत असेच म्हणावे लागेल.
गणपतीची बत्तीस निरनिराळी रूपे आहेत आणि प्रत्येकाची खास वैशिष्ट्ये आहेत असे कालच्या वर्तमानपत्रात वाचले. ही रूपे आहेत,
१.बाल गणपती, २.तरुण गणपती, ३.भक्ती गणपती, ४.वीर गणपती, ५.शक्ती गणपती, ६.द्विज गणपती, ७.सिध्दी (दाता) गणपती, ८.उच्छिष्ट गणपती, ९.विघ्न (हर्ता) किंवा विघ्नेश्वर गणपती, १०. क्षिप्र गणपती, ११.हेरंब गणपती, १२.लक्ष्मी गणपती, १३.महा गणपती, १४.विजय गणपती, १५.नृत्य गणपती, १६.ऊर्ध्व गणपती, १७.एकाक्षर गणपती, १८.वरद गणपती, १९.त्रयाक्षर गणपती, २०.क्षिप्राप्रसाद गणपती, २१.हरिद्र गणपती, २२.एकदंत गणपती, २३.सृष्टी गणपती, २४.उद्दंड गणपती, २५.ऋणमोचन गणपती, २६.धुंडी गणपती, २७.द्विमुख गणपती, २८.त्रिमुख गणपती, २९.सिंह गणपती, ३०.योग गणपती, ३१.दर्गा गणपती आणि ३२.संकटहार गणपती.
यातली सुखकर्ता आणि दुखहर्ता अशी 'सिध्दीदाता' व 'विघ्नहर्ता' ही रूपे जास्त लोकप्रिय आहेत. 'बाल' रूप सुपीकता दर्शवतो, 'क्षिप्र' गणपती इच्छा पूर्ण करणा-या कल्पवृक्षाची फांदी हातात घेऊन बसलेला असतो आणि 'लक्ष्मी' गणपती समृध्दी प्रदान करतो.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)
1 comment:
खूप सुंदर माहिती🙏🙏
Post a Comment