Monday, October 18, 2010

***** कल्याणम् (भाग ६)

"अरे राकेश आणि प्रशांत, इथे आणखी एक घोटाळा होऊन बसला आहे. या इन्स्पेक्टरांच्या बरोबर एक गृहस्थ कॅमेरा घेऊन आले होते. तो त्यांचाच माणूस असेल असं मला वाटलं होतं. पण तो एक रिपोर्टर निघाला. त्यानं ही बातमी त्याच्या चॅनलवरून जगजाहीर केली आहे." वरुण खिन्नपणे म्हणाले
"आम्हा दोघांची तुलना त्यानं राघोबा पेशव्यांशी केली. आमच्या अब्रूचे पार धिंडवडे निघाले रे." किशोरने भर घातली.
"काही काळजी करू नका, तसं काही झालेलं नाही." शिंत्र्यांनी खुलासा केला.
"मग ते बातमीपत्र?"
"त्याचं प्रसारण झालेलं नाही. देशमाने माझ्यामागे यायला निघाला तेंव्हाच मी त्याला बजावलं होतं की यातलं काहीही टीव्ही चॅनलवर दाखवण्यापूर्वी माझी परवानगी घे, नाहीतर गुन्ह्याच्या तपासात अडथळा आणण्याचा आरोप तुझ्यावर लावीन."
"तुमचे खरंच खूप उपकार आहेत."
"मी हे तुमच्यासाठी केलं असं समजू नका. टीव्हीवर आलेली बातमी अप्पासाहेबांनी पाहिली किंवा कुणीतरी पाहून त्यांना सांगितली तर ज्यासाठी चिन्मयीनं आपला प्राण धोक्यात घातला ती तिची धडपड व्यर्थ ठरेल. त्यामुळे अप्पासाहेब सुखरूपपणे इथे येऊन पोचेपर्यंत मी त्याला परवानगी देणार नाही. चिन्मयी बरी होऊन गेली तर तिलाही हे आवडणार नाही. शिवाय या बातमीमधली हवा निघून जाईल आणि तोपर्यंत देशमानेंना दुसरी एकादी सनसनाटी बातमी मिळेल. या दोन चांगल्या माणसामुळे आज तुमची अब्रू वाचणार आहे. आता माझं काम झालं आहे"
असे म्हणून हवालदाराला मागे ठेऊन इन्स्पेक्टर शिंत्रे निघून जातात.


श्रीयुत व श्रीमती दाभोळकर आणि त्यांचा मुलगा ऋषभ या तीन दिशांना तोंडे असलेल्या तीघांना एकत्र आलेले पाहून सारेच आश्चर्यचकित होतात. किशोर उद्वेगाने म्हणतात, "ब्रह्मराक्षस आणि आग्या वेताळ एकत्र आला आहात? चला, आम्हाला खाऊन टाका, नाहीतर हा वाडा पाडून टाका, आम्हाला गाडून टाका. आधीच आम्ही गळ्यापर्यंत चिखलात रुतलो आहोत. आता आणखी काय फरक पडणार आहे?"
"अहो, मी आज वाईट हेतूने इथे आलेलो नाही." दाभोळकर सांगायला लागतात. "रग्गड पैसा कमावूनसुध्दा अतीलोभाने मी आंधळा झालो होतो आणि मला संपत्तीचा माज चढला होता. त्यामुळे आतापर्यंत मी खूप वाईट वागलो. वाईट वागून आणखी जितके काही मिळवण्यासारखे होते ते मिळवत राहिलो. काही गोष्टी मिळवता येत नाहीत हे ही समजलं, तसंच काही गोष्टी गमवाव्या लागल्या. आता थोडं चांगलं वागून त्या परत मिळवायचा प्रयत्न करायचं ठरवलं आहे. माझ्यामुळे तुम्हाला जो मनस्ताप झाला त्याबद्दल मी फक्त दिलगिरीच व्यक्त करू शकतो, माफी मागतो, पण तुमचं जितकं नुकसान झालं ते आधी भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वात आधी त्या खंडागळ्याकडून तुमच्या प्रेसचा संपूर्ण ताबा तुम्हाला मिळवून देईन. त्याचा विस्तार वाढवायला मदत करेन. तुमची जुनी गाडी कदाचित परत मिळणार नाही, पण नवी कोरी गाडी तुमच्या दारापाशी उभी करेन. त्या विकासनं जे पैसे तुम्हाला दिले आहेत त्याची दुप्पट परतफेड त्याला करेन."
"तो मानेल का?"
"चिन्मयीला कँसर झाल्याचं कळल्यापासून तिच्याबद्दल त्याला वाटणारी ओढ डळमळली आहे असं दिसतंय्. आजच्या दिवसात तो काही हॉस्पिटलकडे फिरकला नाही असं संजलं. आपण उगीच तिच्यावर इतका वेळ खर्च केला असं बहुधा आता त्याला वाटायला लागलंय्. चिन्मयीला त्याच्यात इंटरेस्ट नाही हे तर त्याला पूर्वीपासून माहीत आहेच. त्यामुळे बाबांची ही ऑफर तो सोडेल असं मला वाटत नाही." ऋषभने तर्क केला.
"ऋषीला सोडून ती विकासकडे कधीच गेली नसती." ऋषीच्या आई, सविताताई उद्गारल्या. " खरं तर गणेशोत्सवाच्या वेळी मनात एक बेत रचून मी तुमच्याकडे आले होते."
"पण त्या दिवशी काय झालं? देवाचा प्रसादसुध्दा न घेता तुम्ही तडकाफडकी चालला गेलात." मनूकाकू
"आधी चिन्मयीला ऋषीबद्दल विचारायचं, ती हो म्हणणारच अशी माझी खात्री होती, तिचा होकार घेतला की घरातल्या मोठ्या माणसांशी चर्चा करायची असं मी मनात योजलं होतं, पण चिन्मयीनं होकार दिला नाही आणि त्याचं कारणही सांगितलं नाही. त्यामुळे मी थोडी खट्टू झालेले होते. त्यातून जेंव्हा ती प्रसाद आणायला आत गेली तेवढ्यात स्वाती बाहेर आली आणि तिनं चिन्मयीबद्दल मला भलतं सलतं सांगितलं हो."
"काय सांगितलं?"
"की तिच्या मनात ऋषीबद्दल काही नाजुक भावना नाहीत. अशा अनेक मुलांना ती निर्दयपणे खेळवते आहे. तिच्या दृष्टीनं ही सगळी फक्त चार घटकांची मौजमजाच आहे. वगैरे वगैरे. त्यामुळे मला इथे क्षणभरसुध्दा थांबावं असं वाटलं नाही."
"खरं तर आपण जास्त काळ जगणार नाही असं चिन्मयीला वाटायला लागलं होतं. तिनं माझ्याशी जवळीक वाढवली तर नंतर मला त्याचा खूप त्रास होईल, कदाचित मी तो सहन करू शकणार नाही असं गृहीत धरून ती अलीकडे माझ्यापासून दूर दूर रहायला लागली होती. त्यामुळे तिनं आईला होकार दिला नाही. पण आमचा गैरसमज झाला." ऋषभनं भर घातली. "शिवाय तिनं ती पैजेची थाप तिच्या मैत्रिणीकडून मला ऐकवली. तिच्या अपेक्षेप्रमाणे मी चिडलो, संतापलो, पण तिचा द्वेष करू शकलो नाही."
"का?"
"मी लहानपणापासून माझ्या आईपासून दुरावलो होतो. तिचं तोंडदेखील पहायला तयार नव्हतो. चिन्मयीनं प्रचंड खटपट करून आम्हाला पुन्हा एकत्र आणलं. यातही बिब्बा घालायचा प्रयत्न प्रेमानं केला होता, मी स्वतः साथ देत नव्हतो. त्यामुळे चिन्मयीला खूप त्रास झाला होता. माझ्यासाठी तिनं तो सगळा सहन केला. फक्त एक पैज जिंकण्यासाठी कोणीही हे करणार नाही. आधी मी ऐदी होतो. व्यवसाय करायला निघालो तो सुध्दा आयत्या मिळालेल्या आजोबांच्या पैशावर. ते जमलं नाही तेंव्हा मी जाम वैतागलो होतो. चिन्मयीनं मला धीर दिला, माझी साथ केली आणि मला आपल्या पायावर उभं केलं. हे सारं मी विसरू शकत नव्हतो, पण चिन्मयीनं असं अचानक घूम जाव का केलं तेही समजत नसल्यामुळे गोंधळलो होतो. त्यात हा विकास आमच्यातले गैरसमज वाढवायचे प्रयत्न करत होता आणि स्वाती, प्रेमा आगीत तेल ओतायचं काम करत होत्या. या सगळ्यामुळे मी अस्वस्थ होतो. भविष्यकाळात मला कमी दुःख व्हावं म्हणून ती करत असलेल्या प्रयत्नांमुळे मी आज किती भरकटत चाललो आहे हे समजल्यावर चिन्मयीला आपली चूक कळली होती, पण माझ्याकडे परत येण्याचा तिचा मार्ग बंद झाल्यामुळे तिचीही घुसमट होत होती."
"हे सगळं तुला कसं कळलं?"
"चिन्मयीची आजची अवस्था पाहून कौमुदीला रहावलं गेलं नाही. हॉस्पिटलमधून ती थेट आमच्याकडे आली आणि चिन्मयीनं जे जे माझ्यापासून लपवून ठेवलं होतं ते सगळं तिनं आम्हाला खुलासेवार सांगितलं. आता आमच्या कुणाच्याही मनात तिच्याबद्दल आढी उरलेली नाही. उद्याचा विचार करून आजचा दिवस वाया घालवण्यात शहाणपणा नाही ही गोष्ट आता चिन्मयीलाही पटेल अशी माझी खात्री आहे. तिच्या गंभीर स्वरूपाच्या दुखण्यासकट मी तिचा स्वीकार करणार आहे आणि आता तिला माझ्यापासून दूर रहावेसे नक्कीच वाटणार नाही." ऋषी
"आम्ही तिला पहायला हॉस्पिटलात गेलो होतो, पण ती गाढ झोपलेली असल्यामुळे तिला उठवलं नाही आणि तडक इकडे आलो." सविताताई म्हणाल्या, "आम्ही असा विचार केला आहे की अप्पासाहेब आले की त्यांची संमती घेऊन आम्ही लगेच या मुलांचे चार हात करून टाकू आणि चिन्मयीला आमच्याकडे घेऊन जाऊ. यापुढे तिला तळहातावरच्या फोडासारखे जपू आणि या दुखण्यातून बाहेर काढायच्या प्रयत्नांची शर्थ करू."
"आम्ही डॉक्टर आयुष्मान यांच्याशी बोललो. ते म्हणाले की परदेशात अलीकडे अशा प्रकारच्या दोन तीन केसेस ब-या झाल्या आहेत. वाटल्यास चिन्मयीला तपासण्यासाठी तिकडच्या डॉक्टरांना इकडे आणू किंवा तिच्या उपचारासाठी या दोघांना तिकडे पाठवू. जे जे काही शक्य असेल ते ते करायला मागे पुढे पाहणार नाही." दाभोळकरांनी आश्वासन दिलं
"आता आम्ही निघतो. बरीच कामं करायची आहेत. अप्पासाहेब आले की लगेच कळवा हं." सविताताई निरोप घेतात.

अप्पासाहेब सुभेदार, उल्का, संपत आणि सुभेदारांच्या घरातला नोकर साहेब एकत्र प्रवेश करतात. घरातले लोक चकित होऊन पहात आहेत. संपतराव सांगतात, "यात्रा संपवून आमची बस परतीच्या वाटेला लागलेली होती. इन्स्पेक्टर शिंत्र्यांचा फोन आला. आजच्या घडामोडींबद्दल त्यांनी सांगितलं. अप्पांना घेऊन येण्यासाठी आमच्या बसचा मार्ग थोडासा बदलला आणि त्यांना घेऊनच इकडे आलो. वाटेतच या साहेबचं गावही लागलं. आपला नवस फेडून झाल्यावर परत येण्यासाठी तो बसच्या स्टँडवर उभा होता. त्यालाही बरोबर घेतलं."
अप्पासाहेब सांगू लागले, "या संपतरावांनी चाचपडत मला थोडीशी कल्पना दिली आहे. पण मला कसला धक्का सहनच होणार नाही असं तुम्ही का समजता? अरे तुम्हाला लहानाचे मोठे करतांना या आयुष्यात कितीतरी धक्के मी खाल्ले आहेत आणि पचवले आहेत. ही चिन्मयी तर इतकी वेडी आहे की मला त्रास होऊ नये म्हणून वाट्टेल ते सहन करायची तिची तयारी असते. अरे, त्रासाला, दुःखांना असं घाबरायचं नसतं. आल्या परिस्थितीला धीरानं तोंड द्यायचं. आपल्या परीनं चांगलं वागायचं. मानवतेची ज्योत आपल्या ह़दयात तेवत ठेवायची आणि तोंडानं म्हणायचं...."
"शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा। शत्रुबुध्दी विनाशाय दीपोज्योती नमोस्तुते।। " एका सुरात सारे जण म्हणतात.

......................... (समाप्त)

No comments: