Thursday, October 28, 2010

नव(ल)रात्री - भाग ३

दोन वर्षांपूर्वी म्हणजे २००८ साली सर्वपित्री अमावास्येच्या रात्री आम्ही दोघांनी मुंबईहून विमानाने प्रस्थान केले आणि घटस्थापनेच्या दिवशी सकाळी नेवार्क विमानतळावर उतरून अमेरिकेच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले. आमच्या दृष्टीने एका अर्थाने हे सीमोल्लंघनच होते. नवरात्र संपून दस-याच्या मुहूर्तावर करण्याऐवजी आम्ही ते नवरात्राच्या सुरुवातीलाच केले होते. आमचे दुसरे पाऊल अजून अधांतरीच होते. अमेरिकेच्या इमिग्रेशन ऑफीसरने परवानगी दिल्यानंतर आम्हाला अमेरिकेत प्रवेश मिळणार होता. काँटिनेंटल विमान कंपनीच आम्हाला पुढे अॅटलांटाला नेणार होती, पण आमचे सामानसुमान पुढे पाठवण्यात अर्थ नव्हता. आम्ही नेवार्कलाच ते उतरवून घ्यावे आणि इमिग्रेशन क्लीअरन्स मिळाल्यानंतर पुन्हा कंपनीकडे सुपूर्द करावे अशी आज्ञा झाली. इतर प्रवाशांबरोबर आम्ही बॅगेज क्लीअरन्सच्या विभागात जाऊन पोचलो.

भारतातल्या आणि युरोपातल्या विमानतळांवर मी जे बॅगेजचे कन्व्हेयर बेल्ट पाहिले होते त्यांचे एक शेपूट बाहेर गेलेले असायचे आणि त्यावर व्यवस्थित मांडून ठेवल्याप्रमाणे आमचे सामान आत येतांना दिसायचे. नेवार्कला मात्र वेगळेच दृष्य पहायला मिळाले. एका विशाल हॉलमध्ये अनेक लहान लहान वर्तुळाकार बेल्ट गोल गोल फिरत होते. कोणत्या विमानातले बॅगेज कोणत्या बेल्टवर येणार हे दाखवणारे मोठे तक्ते होते. त्यात आमचा नंबर पाहून त्या वर्तुळापाशी गेलो. त्याच्या मधोमध एक घसरगुंडी होती आणि डोक्यावर असलेल्या फॉल्स सीलिंगच्या आडून सामान येऊन छपरामध्ये असलेल्या एका पोकळीतून बदाबदा त्या घसरगुंडीवर पडून ते बेल्टवर येत होते. त्यात अनेक बॅगा उलटसुलट होत होत्या. आपले सामान दुरूनच पटकन ओळखू येण्यासाठी आम्ही बॅगांच्या वरच्या अंगाला मोठमोठी लेबले चिकटवली होती, पण ती काही दिसत नव्हती. काही लोकांना आपल्या बॅगा अचूक ओळखता येत होत्या, त्यांनी त्या पटकन काढून घेतल्या. इतर लोक अंदाजाने एक बॅग उचलून घेत होते आणि ती त्यांची नसल्यास तिला सुलट करून पुन्हा बेल्टवर ठेवत होते. या सस्पेन्समध्ये थोडा वेळ घालवल्यानंतर आम्हाला आमचे सर्व सामान मिळाले. ते नसते मिळाले तर काय करायचे हा एक प्रश्नच होता, कारण आम्हाला तर लगेच पुढे अॅटलांटाला जायचे होते, बॅगांची वाट पहात नेवार्कला थांबायची कसली सोयच नव्हती. विमानातून आपले सामान न येण्याचा अनुभव आम्ही लीड्सला जातांना घेतला होता, पण त्यावेळी आम्ही सामानाविनाच निदान घरी जाऊन पोचलो होतो. त्यावेळी अर्ध्या वाटेत थांबायची गरज पडली नव्हती.

आमचे सामान गोळा करून आम्ही इमिग्रेशन काउंटरकडे गेलो. त्या ठिकाणी बरीच मोठी रांग होती, तिच्यात जाऊन उभे राहिलो. आमचे पासपोर्ट आणि व्हिसा आम्ही स्वतः फॉर्म भरून, तासन् तास रांगांमध्ये उभे राहून आणि आवश्यक असलेली सारी कागदपत्रे दाखवून मिळवले होते आणि पुन्हा पुन्हा त्यातला तपशील तपासून घेतला होता. त्यामुळे त्यात कसलीही उणीव निघण्याची भीती नव्हती. गरज पडली तर दाखवण्यासाठी ते सारे दस्तावेज आम्ही आपल्या हँडबॅगेत ठेवले होते. केंद्र सरकारपासून महापालिकेपर्यंत सर्वांना द्यायचे सर्व कर वेळेवर भरले होते, आमचे वाईट चिंतणारा कोणी आमच्याविरुध्द कागाळी करेल अशी शक्यता नव्हती. त्यामुळे आम्हाला चिंता करण्याचे कारण नव्हते, पण एक दोन ऐकीव गोष्टींमुळे मनात थोडीशी धाकधूक वाटत होती.

माझ्या एका मित्राच्या अमेरिकेत राहणा-या मुलीकडे गोड बोतमी होती. या प्रसंगी तिला धीर देण्यासाठी, तिची आणि होणा-या बाळाची नीट काळजी घेण्यासाठी तिच्याकडे जायला तिची आई आतुर झाली होती. पहिल्या बाळंतपणासाठी मुलीने माहेरी जायचे अशी आपल्याकडली पूर्वापारची पध्दत आहे. आजकालच्या जगात काही कारणामुळे ते शक्य नसेल तर मुलीच्या आईने काही दिवस तिच्याकडे जाऊन राहणेही आता रूढ झाले आहे. आपल्या मुलीकडे अमेरिकेत जाण्यासाठी केवळ पुरेसेच नाही तर चांगले भरभक्कम कारण आपल्याकडे आहे अशी त्या माउलीची समजूत होती, पण तिला परवानगी मिळाली नाही. दुसरे एक गृहस्थ मुंबईतल्या धकाधुकीमुळे हैराण झाले होते. त्यांची म्हातारपणाची काठी, त्यांचा मुलगा, अमेरिकेत ऐषोआरामात रहात होता. कांही दिवस त्याच्या आधाराने रहावे, सर्व आधुनिक सुखसोयींनी युक्त असलेल्या त्याच्या निवासस्थानाचा अनुभव आणि उपभोग घ्यावा अशा विचाराने ते अमेरिकेला जायला निघाले. त्यांनाही जाता आले नाही. हे ऐकल्यानंतर आमच्या घरी आम्ही सुखी आहोत, अमेरिकेतली नवलाई पाहून परत जाणार आहोत असे आम्ही मुलाखतीत सांगितले होते. तेच पुन्हा सांगायचे होते, फक्त त्यासाठी योग्य शब्दांची जुळवाजुळव करत होतो.

आमचा नंबर ज्या काउंटरवर आला त्या जागी कोणी खडूस तिरसिंगराव माणूसघाणे नव्हता. एका सुहास्यवदना ललनेने गोड हंसून आमचे स्वागत केले. "अमेरिकेत पहिल्यांदाच आला आहात ना?" असे विचारून "जा, मजा करा (एंजॉय युवरसेल्फ)" असे म्हणत एक चिटोरे आमच्या पासपोर्टमध्ये ठेवले आणि ते जपून ठेवायला सांगितले. आम्ही अमेरिकेत किती दिवस राहू शकतो ते त्यावर लिहिले होते आणि त्यापूर्वी अमेरिकेहून परत जातांना विमानतळावर ते परत द्यायचे होते. घटस्थापनेच्या दिवशी अंबाबाईनेच आपल्याला या रूपात दर्शन दिले अशी मनात कल्पना करून आणि तिचे आभार मानीत आम्ही पुढे सरकलो.

. . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: