या वर्षी नवरात्रात ज्या आप्तांच्याकडे जाण्याचा आमचा बेत होता त्यांचे पूर्वज पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याचे सरदार होते. बाळाजी विश्वनाथांप्रमाणे ते कोकणातून पुण्याला आले होते आणि शिंदे होळकरांच्या सैन्यातून दिग्विजयासाठी उत्तर हिंदुस्थानात गेले होते. तिकडल्या मोहिमांमध्ये त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या मोबदल्यात त्यांना त्या भागात (सध्याच्या मध्यप्रदेशात) काही जहागिरी, वतने वगैरे मिळाली होती. पुढे शिंदे, होळकर, गायकवाड आदि मोठ्या मराठा सरदारांनी ब्रिटीशांबरोबर तह केले आणि ते सारे ब्रिटीशांचे मांडलीक राजे झाले. या संस्थानिकांच्या दरबारातल्या सरदार मंडळींना एवढा बहुमान मिळाला नव्हता तरी त्यांच्या जहागिरी, वतने, जमीनी, वाडे वगैरे मालमत्ता शाबूत राहिली होती. याशिवाय ब्रिटीश सरकारकडून त्यांना सालाना तनखा मिळत असे. तसेच समाजामध्ये ते सरदार या सन्मानपूर्वक उपाधीने (सरदारजी नव्हे) ओळखले जात असत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात सामाजिक समतेचे वारे वाहू लागले आणि अनुपस्थित भूमीधारकांना आपल्या जमीनीवर ताबा ठेवणे कठीण होत गेले. काळाची गरज पाहून या कुटुंबातील लोकांनी इतस्ततः असलेली मालमत्ता विकून टाकली आणि ब-हाणपूरचा वाडा, टिमरनी येथील गढी आणि शेतजमीनी यांवर आपले लक्ष केंद्रित केले.
यांच्या पूर्वजांच्या काळापासून ब-हाणपूरच्या वाड्यात अंबाबाईच्या मूर्तीची उपासना केली जाते. अंबेजोगाई येथील योगेश्वरीमातेचा या मूर्तीमध्ये वास आहे अशी या कुटुंबातील आबालवृध्द सर्वांची नितांत श्रध्दा आहे. घरातील कोणत्याही महत्वाच्या कार्याला आरंभ करण्यापूर्वी तिचा आशीर्वाद घेतला जातो तसेच कार्यसिध्दी झाल्यावर तिचे दर्शन घेऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या कारणासाठी बाहेरगावी गेलेली मंडळीसुध्दा हा प्रघात पाळत आली आहेत. तसेच लग्न करून सासरी नांदत असलेल्या माहेरवाशिणीसुध्दा काही प्रमाणात तो पाळतात. हे सारे अत्यंत भक्तीभावाने होत असल्यामुळे देवीच्या सभोवताली असलेले वातावरण पूर्णपणे मंगलमय वाटते. त्यात दांभिकतेचा किंवा व्यापारीकरणाचा अंशसुध्दा आलेला नाही.
ब-हाणपूरच्या वाड्यात या देवीसाठी प्रशस्त असे देवघर बांधलेले होते. त्याशिवाय नवरात्राच्या उत्सवासाठी एक मोठा दिवाणखाना होता. सुरेख नक्षीकाम केलेले खांब आणि कमानी, कडीपाटाच्या छपराला टांगलेल्या हंड्या झुंबरे यांनी तो छान सजवलेला होता. घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या मूर्तीची स्थापना या दिवाणखान्यात केली जात असे आणि त्यानंतर दस-यापर्यंत तिचा उत्सव तिथे चालत असे. रोज पहाटेच्या वेळी देवीला जाग आणण्यासाठी ताशा सनई नगा-याचा मंगल नाद करण्यापासून त्याची सुरुवात होत असे. त्यानंतर स्नान करून शुचिर्भूत झाल्यावर देवीची साग्रसंगीत शोडषोपचार पूजा केली जात असे. हा विधी चांगला दोन अडीच तास चालायचा. देवीला शोडष पक्वांन्नांचा नैवेद्य दाखवला जाई. त्यानंतर जेवणावळी सुरू होत आणि दुपार टळून जाईपर्यंत त्या चालत असत. नवरात्रीच्या उत्सवासाठी कुटुंबातील एकूण एक लोक आणि अनेक जवळचे आप्त या वेळी तिथे आवर्जून येत असत. त्यामुळे घराला एकाद्या लग्नघराचे स्वरूप येत असे.
कालांतराने या कुटुंबाच्या ब-हाणपूरच्या शाखेतल्या पुढील पिढीमधील मुलांनी ब-हाणपूरहून पुण्याला स्थलांतर केले. त्यानंतर देवीची पूजाअर्चा करायला तिथे कोणीच उरले नाही. तेंव्हा सर्वानुमते अंबाबाईच्या मूर्तीला ब-हाणपूरहून टिमरनीला नेण्यात आले. तिथल्या वाड्यामधल्या बैठकीच्या खोलीचे रूपांतर देवघरात करण्यात येऊन देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या देवघरात केली गेली. तेंव्हापासून नवरात्रीचा उत्सव टिमरनीच्या वाड्यात साजरा केला जाऊ लागला. पूर्वीपासून परंपरागत पध्दतीने चालत आलेला हा उत्सव अजूनही जवळजवळ तशाच रूपात साजरा केला जात आहे. रोज सकाळी मंत्रोच्चारांसह साग्रसंगीत पूजा, त्यानंतर सुग्रास अन्नाचा नैवेद्य, जेवणाच्या लांबलचक पंगती, संध्याकाळ झाल्यानंतर घरातल्या सर्वांनी देवीसमोर बसून तिची अनेकविध स्तोत्रे म्हणणे, बराच वेळ चालणारी आरती, रात्रीची जेवणे झाल्यानंतर पुन्हा भजनांच्या गायनाने संगीतसेवा वगैरेमुळे दहा दिवस घर देवीमय झाले असते आणि एक प्रकारच्या चैतन्याने भारलेले असते. अष्टमीच्या रात्री शिजवलेल्या भाताच्या उकडीपासून महालक्ष्मीची प्रतिमा तयार करून तिची वेगळी पूजा केली जाते आणि घागर फुंकण्याचा विधी केला जातो.
पूर्वीच्या काळात रूढ असलेल्या सोवळेओवळे वगैरेच्या चालीरीती आता कालबाह्य झाल्या असल्यामुळे विस्मृतीत गेल्या आहेत. शहरात वाढलेल्या मुलांना त्यांचा गंधही नसतो. अजूनही नवरात्राच्या काळात मात्र या घरात त्या कटाक्षाने पाळल्या जातात. पूजाअर्चा करण्यासाठी देवघरात प्रवेश करणा-या पुरुषांसाठी रेशमाचा कद आणि महिलांसाठी नऊवारी लुगडे, लहान मुलींसाठी परकर पोलके हा ड्रेसकोड अजूनही शक्यतोंवर पाळला जातो. नव्या पिढीतली मुले मुली जास्तच हौसेने यात सहभागी होतात. सकाळी उठून लवकर स्नान करणे वगैरे मात्र त्यांना समजाऊन सांगावे लागते.
यापूर्वीही काही वेळा मी या उत्सवात सहभागी झालो होतो. पाटरांगोळी केलेल्या भोजनाच्या पंगतीमध्ये केळीच्या पानात आग्रह करकरून वाढलेले मनसोक्त सुग्रास जेवण केले होते, जेवण चालू असतांना इतरांबरोबर नवा संस्कृत श्लोक (मुद्दाम पाठ करून) मोठ्याने म्हंटला होता. स्तोत्रपठण, आरत्या, मंत्रपुष्प, भजन आदींमध्ये आठवेल तेवढा आणि जमेल तेवढा सहभाग उत्साहाने घेतला होता. या सर्वांमध्ये मिळणारा वेगळ्या प्रकारचा आनंद उपभोगला होता. नोकरीत असतांना जास्त रजा मिळणे शक्य नसल्यामुळे नवरात्रोत्सवातल्या एक दोन दिवसाकरताच भोज्ज्याला शिवून आल्याप्रमाणे जाणे होत होते. या वर्षी चांगला आठवडाभराचा कार्यक्रम योजला होता, पण योग नव्हता.
. . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment