Saturday, October 23, 2010

नव(ल)रात्री

१.श्रृंगार, २.हास्य, ३.करुण, ४.रौद्र, ५.वीर, ६.भयानक, ७.बीभत्स, ८.अद्भुत, आणि ९.शांत असे नऊ प्रमुख रस सांगितले गेले आहेत. नवरात्री नावाच्या एका जुन्या तामिळ चित्रपटात यातील एकेका रसाचे प्रामुख्याने दर्शन घडवणारी एक घटना रोज घडत जाते, अशा घटनांची साखळी दाखवली आहे. (बहुधा) शिवाजी गणेशन या नटश्रेष्ठाने नऊ सर्वस्वी भिन्न अशा भूमिकांमधून ही रसनिष्पत्ती अप्रतिमरीत्या साधली आहे. पुढे या सिनेमाचे हिंदीकरण करण्यात आले. नया दिन नयी रात नावाच्या या चित्रपटात हरहुन्नरी आणि गुणी नट संजीवकुमार यानेसुध्दा नऊ निरनिराळ्या भूमिका छान वठवल्या आहेत. धोपटमार्गाने जाणा-या माझ्यासारख्याच्या जीवनात असे लागोपाठ नऊ दिवस एवढे नाट्य घडणे शक्य नाही. पण दरवर्षी येणारे नवरात्र एक अनपेक्षित आणि वेगळा अनुभव देऊन जाते असे मात्र योगायोगाने ओळीने गेली काही वर्षे घडत आले आहे.

यंदाच्या नवरात्रात आठदहा दिवस बाहेरगावी जाऊन फिरून येण्याचा कार्यक्रम तीन महिन्यापूर्वीच ठरवला होता आणि आयत्या वेळी मिळणार नाहीत म्हणून जाण्यायेण्याची तिकीटेही काढून ठेवली होती. त्या आठवडाभरात काय काय मौजमजा करायची याचे थोडे नियोजन करून मनातल्या मनात मांडे खाणे चालले होते. पण ते तसेच हवेत विरून गेले. घटस्थापनेच्या दोनच दिवस आधी पहाटे अचानक आम्हा दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले म्हणून शेजारच्या मुलाने दवाखान्यात नेऊन पोचवले. मला आणि पत्नीला वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये अॅड्मिट करून घेतले.

पहिल्या दिवशी तर आजार आणि त्यावरील औषधोपचार यांच्या संयुक्त प्रभावाने आलेल्या ग्लानीत मी आपल्या खाटेवर निपचित पडून होतो. दुस-या बिछान्यावरला रुग्ण बरा दिसत होता. सकाळपासून तो कोणाची तरी वाट पहात होता. दुपारच्या सुमाराला चाळिशीला आलेल्या त्याच्या दोन मुली आणि तिशीमधली भाची की पुतणी (नीस) अशा तीघीजणी मिळून आल्या. बराच वेळ त्या रुग्णाशी बोलत बसल्या. सगळी तयारी झाल्यानंतर त्याला व्हीलचेअरमध्ये बसवून बाहेर घेऊन गेल्या. संध्याकाळ उलटून गेल्यानंतरच तो आपल्या बेडवर परत आला. मेंदूचे स्कॅनिंग करण्यासाठी त्याला नेले होते असे त्याच्याकडून समजले.

त्या तीन्ही मुली एकमेकींशी आणि त्याला उद्देशूनसुध्दा फर्मास इंग्रजीत बोलत होत्या. अधून मधून एक दोन वाक्ये तो इंग्रजीतच पण ज्या टोनमध्ये बोलला त्यावरून तो कारवारी किरिस्तांव असावा अशी अटकळ मी बांधली होती. हॉस्पिटलमध्ये परत आल्यानंतर त्याने पत्नीला फोन लावून माका तुका केले तेंव्हा माझा अंदाज खरा ठरला. इंग्लिश, हिंदी आणि मराठी या तीन भाषांमध्ये मी त्याच्याशी बोलू शकत होतो, पण यातल्या कोणत्याही भाषेत त्याने सांगितलेल्या गोष्टी मला समजत तरी नव्हत्या किंवा त्यांवर माझा विश्वास तरी बसत नव्हता. त्यामुळे फारसा संवाद साधता आला नाही. एक अजब व्यक्ती भेटली एवढीच त्याची मनात नोंद झाली. त्याला व्हीलचेअरमधून नेले आणले असले तरी तसा तो बरा दिसत होता आणि त्याच्यावर कसले उपचार चाललेले दिसत नव्हते. बहुधा तपासण्या करवून घेण्यासाठी त्याला अॅड्मिट केले असावे. त्या झाल्यावर आणि त्यावरून त्याच्या आजाराचे निदान झाल्यावर त्याला घरी पाठवले.

या व्यक्तीच्या जागेवर आलेला माणूस मात्र वल्ली निघाला. जेवढा वेळ तो जागा असेल, तेवढा वेळ त्याच्या तोंडाची टकळी चाललेली असायची. त्यातून तो केंव्हा केंव्हा मला काहीतरी सांगायचा आणि केंव्हा केंव्हा स्वतःशीच पुटपुटायचा. दोन तीन वेळा नर्सने येऊन त्याला चुप रहायला सांगितले, पण बोलणे बंद झाले की तो कण्हायला लागायचा. त्याच्या विव्हळण्यापेक्षा बोलणे कानाला बरे वाटत असे. निदान ते एका कानाने ऐकून दुस-या कानाने सोडता येत असे. त्यालाही एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला काही वाटत नव्हते. त्यामुळे न ऐकलेले वाक्य काही वेळानंतर पुन्हा कानावर पडत असे आणि वाटले तर त्या वेळी ते समजून घेता येत असे. या वल्लीवर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल इतका त्याच्याबद्दलचा मालमसाला मला त्याच्याकडूनच समजला.

हॉस्पिटलमध्ये काही काम करण्याचा प्रश्नच नव्हता. आयव्हीला जोडलेल्या नळीने मी कॉटशी जखडलेला गेलो होतो. गरजेनुसार नर्सने ती तात्पुरती सोडून मोकळीक दिली तरच मी आजूबाजूला थोडा फिरू शकत होतो. त्यामुळे वेगळ्या वॉर्डमध्ये असलेल्या पत्नीला तिकडे जाऊन पाहणेसुध्दा मला शक्य नव्हते. सुदैवाने दोघांनीही आपापले मोबाईल सोबत नेले असल्यामुळे त्यावरूनच संवाद करता येत होता. उरलेला वेळ काय करायचे हा एक प्रश्न होता. ब्लॉगवर मी ज्या प्रकारचे लेखन नेहमी करत असतो, त्यासाठी काही संदर्भ पहावे लागतात, थोडे उत्खनन करावे लागते. त्याची सोय नव्हती. त्यामुळे पूर्णपणे काल्पनिक असे काय रचता येईल याचा विचार करता करता मनात एक कल्पना सुचली. त्यावर काम करतांना मजा वाटू लागली.

हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायच्या आधी टीव्हीवरील एक मालिका मी अधून मधून पहात असे. त्यातली केंद्रीय कल्पना, कथासूत्र आणि पात्रे ओळखीची झाली होती. शेवटचा जो भाग मी पाहिला होता त्यानंतर त्यात काय होणार आहे हे मला माहीत नव्हते. पण यापुढे ही मालिका जास्त ताणून धरण्यापेक्षा तिला संपवून टाकावे असे माझे मत होते. लेखकाच्या जागी मी असलो तर ती कशा रीतीने संपवता येईल आणि त्याआधी तिचे अस्ताव्यस्त पसरलेले धागे कसे जुळवून आणता येतील याचा विचार करून त्यानुसार काही नाट्यमय घटना रचल्या आणि संवाद रचू लागलो. यात एक सूत्रबध्दता असल्यामुळे ते लक्षात राहतील असे वाटले. घरी परतल्यानंतर ते टंकून सहा भागात ब्लॉगवर चढवले देखील.

चार दिवसात माझ्या प्रकृतीला आराम पडला. आयव्हीमधून (शिरेतून) औषध देण्याची गरज उरली नाही, तसेच कोणी सेवाशुश्रुषा करण्याची जरूरी उरली नाही. सगळ्या तपासण्या होऊन त्यांचे रिपोर्ट आले होते. आता हॉस्पिटलात राहण्याची आवश्यकता उरली नसल्यामुळे घरी पाठवण्यात आले. पण घर म्हणजे चार भिंतीच होत्या कारण पत्नीचा हॉस्पिटलमधला मुक्काम लांबला होता. संपर्कासाठी चेलीफोन, मनोरंजनासाठी टेलीव्हिजन आणि अनेक उपयोगांसाठी संगणक साथीला होते. तसे शेजारी येऊन चौकशी करून गेले. त्यातल्या एकाने नाश्त्यासाठी आणि दुस-याने जेवणासाठी आग्रह केला. नात्यातला एक मुलगा ऑफीस सुटल्यानंतर झोपायला आला. अशा रीतीने मी तसा माणसात होतो. पण अजून खडखडीत बरा झालो नसल्यामुळे नेहमीचे रूटीन सुरू करू शकत नव्हतो. तान्ह्या मुलाप्रमाणे आलटून पालटून थोडा वेळ झोपणे आणि थोडा वेळ जागणे चालले होते. वेळ घालवण्याची साधने हाताशी होतीच.

आमचे नेहमीचे हॉस्पिटल घरापासून दहा किलोमीटर दूर आहे. अद्याप पत्नी तिथे होती. दोन तीन दिवसांनंतर काही वेगळ्या तपासण्या करण्यासाठी तिला चाळीस किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. माझ्या अंगात पुरेसे त्राण आले नसतांनासुध्दा उसने अवसान आणून तिला भेटायला आणि तिची प्रगती पहाण्यासाठी जावे लागत होतेच, पण स्वतःला थकवा येऊ नये यासाठी विशेष काळजी घेणेही आवश्यक होते. जराशी तारेवरची कसरत होत होती. पहिल्या दिवशी मलाच आत्मविश्वास वाटत नसल्यामुळे एका शेजा-याला सोबत नेले. दुस-या दिवशी मला गरज वाटत नव्हती तरी पत्नीच्या आग्रहावरून त्याला आणले. त्यानंतर वेगळ्या आप्तांना ही ड्यूटी लावून दिली.

आजूबाजूला नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात चाललेला दिसत होता. रस्त्यात जागोजागी मांडव घातलेले होते, त्यावर रंगीबेरंगी सजावट केली होती. संध्याकाळी परततांना उशीर झाला तर विजेची आकर्षक रोषणाई दिसत होती. आतापर्यंत बहुतेक दरवर्षी मी सुध्दा त्यात भाग घेत आलो होतो. यंदा पहिल्यांदाच या गोष्टी अलिप्तपणे पहात होतो. त्यामुळे वाहतुकीला होत असलेल्या अडथळ्याबद्दल तक्रार करत होतो. या वर्षी मराठी, गुजराथी, बंगाली, उत्तर भारतीय यांतल्या कुठल्याच नवरात्राच्या मांडवात घेऊन दर्शनसुध्दा घेतले नाही.

नवरात्र संपूनही गेले. दस-याच्या दिवशी पत्नीला डिस्चार्ज मिळाला. त्या दिवशी तिला पहायला हॉस्पिटलात जाण्याची मला गरज नव्हती. विजयादशमीला सीमोल्लंघन करून गावाच्या वेशीच्या बाहेर जाण्याचा रिवाज आहे. या वर्षी मी घराच्या उंब-याच्या बाहेर पाऊल टाकले नाही. उलट दिशेने सीमोल्लंघन करून तिने गृहप्रवेश केला. असे हे या वर्षीचे एक वेगळे नवरात्र.

. . . . . . . (क्रमशः)

No comments: