Friday, October 01, 2010

यंदाच्या गणेशोत्सवातील आणखी काही आगळ्या गोष्टी



लालबागच्या राजाच्या उत्सवासाठी या वर्षी दक्षिण भारतातल्या प्राचीन मंदिराची सजावट केली होती, पण यात फारसे नाविन्य वाटणार नाही कारण दरवर्षी कुठल्या ना कुठल्या प्रसिध्द देवालयाच्या प्रतिकृती केलेल्या पहायला मिळतात. या वर्षीचे खास वैशिष्ट्य म्हणायचे झाले तर या गणपतीमंडळाचा गेल्या ७५ वर्षांचा इतिहास पुस्तकरूपाने प्रसिध्द केला गेला. गणपतीच्या दर्शनासाठी येणा-या अनेक लोकांनी भक्तीभावाने हे पुस्तक विकत घेतले असणारच. गेली काही वर्षे वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर या राजाचे जे दर्शन घडते त्यातल्या मूर्तीचा आकार सारखाच वाटतो. लालबागचा राजा फोटोवरून ओळखता यावा
इतका ओळखीचा झाला आहे. पुण्यातला दगडूशेट हलवाई गणपतीसुध्दा जेंव्हापासून प्रसारमाध्यमात प्रामुख्याने दिसायला लागला आहे, त्याच्या रूपात काही फरक पडलेला नाही. पण लालबागचा राजा मात्र पहिल्यापासून असा एकाच रूपात येत नव्हता. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीनुसार तो वेगवेगळी रूपे घेऊन साकारला आहे. १९४६ सालच्या उत्सवात सिंहाच्या पाठीवर पाय ठेऊन उभारलेल्या नेताजी सुभाषचंद्रांच्या रूपात तो दिसतो, तर १९४८ साली महात्मा गांधीजींच्या रूपात. १९४७ साली स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात तो दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर पंडिकजींच्या रूपात बैलगाडी चालवत होता.

गणेशोत्सवाच्या निमित्याने येणा-या दर्शकांचे लक्ष वेधून घेणा-या जाहिराती लावण्याची कल्पना कोणाच्या सुपीक मेंदूतून निघाली कोण जाणे, पण सिमेनाची पोस्टर्स लावण्याची सुरुवात लालबागच्या राजापासूनच झाली. त्याचसोबत सिनेकलावंतांनी प्रत्यक्ष लालबागला येऊन या राजाचे दर्शन घेण्याला सुरू केल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी येणा-या लोकांची गर्दी होऊ लागली. तो नवसाला पावतो अशी श्रध्दा उत्पन्न झाली आणि मग दर्शनोत्सुकांची गर्दी वाढता वाढता वाढत उच्चांक करू लागली आणि तिचे नियोजन करण्याचे कामही वाढत गेले. लालबागला सुरू झालेले जाहिरातबाजीचे लोण मात्र कानाकोप-यापर्यंत पोचले आणि त्यात कशाची जाहिरात करावी याचा नेम राहिला नाही. एक दोन वर्षांखाली जिकडे तिकडे माणिकचंद दिसत असे. या वर्षी मात्र तंबाखू, मद्य आदि व्यसनांना उत्तेजन देणा-या द्रव्यांची जाहिरात करायची नाही असा निर्बंध पाळला गेला असे दिसले.

आंतर्जालावर नवे व्हर्च्युअल जग निर्माण झाले आहेच, त्याची वाढ तर पटीने होत चालली आहे. गणरायाचा यात प्रवेश होऊन त्याने आपले स्थान निर्माण करणे ओघाने आले. अनेक उत्सव मंडळांनी या वर्षी आपापल्या वेबसाइट्स उघडल्या आणि वर्गणी गोळा करण्यापासून बाप्पांचे दर्शन, पूजा आरती वगैरे दाखवण्यापर्यंत सेवा प्रदान केली. या वर्षीचा उत्सव आता संपून गेला आहे, पण पुढच्या वर्षी आधीपासून तयारी केलीत तर संगणकीय मूषकाच्या पाठीवर दोन बोटांनी टिचक्या मारत जगभरातल्या गणेशाच्या उत्सवांची चित्रे पहात विहरण करता येईल तसेच गांवोगांवच्या किंबहुना देशोदेशींच्या गणपतींची विविध रूपे पहाता येतील. ज्यांना संगणकाची एवढी आवड नाही अशा लोकांनासुध्दा लालबागचा राजा आणि प्रभादेवीचा सिध्दीविनायक यांच्या आरत्या घरबसल्या पाहम्याची सोय वाहिन्यांनी केली होती आणि काही भक्तगण या वेळी टाळ्या वाजवत त्या आरत्यांमध्ये सहभागी होत होते.

लोकसत्ता या दैनिकाने गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये एक लेखमालिका सादर केली होती. जपान, चीन, श्रीलंका, जावा, बाली, कंपूचिया, व्हिएटनाम आदि परदेशांमध्ये निरनिराळ्या नावाने आणि रूपांमध्ये पूजल्या जाणा-या गजाननाची माहिती दिली होती. सुप्रसिध्द अष्टविनायकांची माहिती देणा-या लेखमालिका दरवर्षीच येतात. या वर्षी एका जाहिरातीमध्ये ती दिली होती, तर दुस-या एका जाहूरातदाराने आरत्या आणि मंत्रपुष्प दिले होते. या निमित्याने महाराष्ट्रातल्या खेडोपाडी असलेल्या अप्रसिध्द पण जागृत समजल्या जाणा-या काही देवस्थानांची माहिती या काळात प्रसिध्द झाल्यामुळे वाचायला मिळाली.

हिंदुस्थान टाइम्स हे दिल्लीचे वर्तमानपत्र मुंबईमध्ये जम बसवू पहात आहे. त्याने या वर्षी एक आगळा प्रयत्न केला. मोबाइल फोनवर एसएमएस देणा-या वाचकांमधून लकी डॉ काढून भाग्यवान विजेत्यांना हॅलिकॉप्टरमधून गणपती विसर्जनाची दृष्ये दाखवण्यात येतील अशा अर्थाच्या मोठमोठ्या जाहिराती रोज छापून येत होत्या. ही संधी फक्त ७ ते १२ वर्षे वयोगटामधील मुलामुलींना उपलब्ध होती. प्रत्यक्षात असे दर्शन घडवण्यात आल्याची बातमीही आली.

No comments: