Sunday, August 23, 2009

मूषक आणि माउस


घोडा, बैल, रेडे, उंट यासारख्या प्राण्यांना पाळीव बनवून माणसाने त्यांचा उपयोग आपली ओझी वाहण्यासाठी प्राचीन काळातच सुरू केला. राजा महाराजांकडे पाळलेले हत्तीसुध्दा असत. जगाच्या कांही भागात गाढवे आणि खेचरे यांचा उपयोग वहनासाठी केला जाऊ लागला. ध्रुवप्रदेशात स्लेज ओढण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग होतो. आकाराने त्याहून लहान असलेल्या मांजरीचे पालन मात्र बहुतेक करून फक्त जवळ घेऊन कुरवाळण्यासाठी आणि घरात शिरू पाहणा-या उंदरांवर अंकुष ठेवण्यासाठी होते. उंदीर हा मात्र कधीच घरातला पाळीव प्राणी बनला नाही. प्रयोगशाळांमध्ये उंदीर पाळून त्यांच्यावर प्रयोग करण्यात येतात, तेवढाच याला अपवाद म्हणायचा.
त्यामुळे उंदीर हा प्राणी एक वाहन म्हणून कधीच आपल्या डोळ्यासमोर येत नाही, पण गणपतीचे वाहन मात्र उंदीर मानले जाते. मोर हा मोठ्या आकाराचा पक्षी सुध्दा गणपतीचे वाहन म्हणून ओळखला जातो. त्यावरून मयूरेश, मोरेश्वर आदि नांवे गजाननाला दिली आहेत. याचा उलगडा करण्यासाठी गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारात त्याची वेगवेगळी वाहने होती असा खुलासा केला जातो. उंदीर हे गणपतीचे वाहन कसे बनले यासंबंधी एक पौराणिक कथा प्रसिध्द आहे. मूषकराज नांवाच्या दैत्याला गजाननाने पराभूत केल्यानंतर तो शरण आला आणि त्याने गयावया करून गणपतीचे वाहन होण्याचे कबूल केले असे सांगतात.
या गोष्टीचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न कांही विद्वानांनी केला. प्राचीन काळात मूषक या नांवाने ओळखली जाणारी एक जमात होती. ते लोक चांचेगिरी करत असत. सर्व गणांचा प्रमुख असलेल्या गणाधिपाच्या नेतृत्वाखाली त्यांचा पाडाव केल्यानंतर त्यांनी शरणागती पत्करून गणपतीचे दास्यत्व स्वीकारले असा निष्कर्ष कोणा विद्वानाने काढला आहे. उंदीर हा प्राणी देखील एक उपद्रव देणारा प्राणीच समजला जातो. बिळातल्या चोरवाटेने घरात शिरून तो अन्नधान्य, कागदपत्रे, कपडेलत्ते वगैरे सगळ्यांची नासधूस करत असतो. त्यावरून तसे करणा-या मूषक जमातीचे नांव पडले असेल आणि त्यांना आटोक्यात आणणा-या गणपतीला त्याच्यावर स्वार झालेले दाखवले गेले असेल.
उंदीर हा उपद्रवी असला तरी अत्यंत चपळ आणि तल्लख प्राणी आहे. त्याला मारण्यासाठी मांजर पाळले तरी अनेक वेळी तो त्याला मुळीच दाद देत नाही. टॉम अँड जेरीच्या कारटून्समध्ये तर जेरीच्या उपद्व्यापामुळे नेहमी टॉम अगदी जेरीला आलेला दिसतो. टॉम अँड जेरी, मिकी माऊस यासारख्या कारटून्समधून उंदीरमामा लहान मुलांचा लाडका तर झाला आहेच, केसरी टूरबरोबर फिरत असतांना मोठी माणसे सुध्दा प्रत्येक प्रवासाच्या सुरुवातीला गणपतीबाप्पा मोरया च्या बरोबर उंदीरमामाकी जय चा गजर करत असत.
संगणकक्रांती आल्यापासून तर माऊस नांवाच्या आधुनिक उंदीरमामाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या माऊसला हाताशी धरून आपण काँप्यूटरकडून विविध प्रकारची कामे करून घेतोच, आंतर्जालावर भ्रमण करून विश्वरूपदर्शन करून घेऊ शकतो. हे काम कधी इतके सोपे होऊ शकेल असे पूर्वीच्या काळात स्वप्नातसुध्दा वाटले नव्हते. गणपती या बुध्दीच्या देवतेच्या उपासकांना गणपतीचे हे वाहन मनाने क्षणार्धात कुठल्या कुठे घेऊन जाते. एकाद्या शब्दावरून त्याबद्दल असलेली प्रचंड माहिती शोधयंत्रावरून आपल्याला चुटकीसरशी मिळू शकते. अशा प्रकारे या माऊसने आपल्याला ज्ञानमार्गातील नवनव्या गोष्टींच्या अगदी जवळ आणले आहे.

No comments: