Saturday, August 08, 2009

बालकवी ठोंबरे

बालकवींचा अगदीच त्रोटक परिचय श्रावणमासी या मागील लेखात करून दिला होता. त्यांच्याबद्दल आणखी कांही माहिती देण्यासाठी वेगळा भाग लिहिणे मला आवश्यक वाटले. ते खानदेशातले होते. खानदेश हा प्रदेश सुपीक जमीनीचा म्हणून ओळखला जातो. तिथे कापसाचे उत्पादन होते असे शाळेत शिकल्यासारखे आठवते. आजकाल त्या भागातून रेल्वेने जातांना अनेक ठिकाणी केळ्याच्या बागा दिसतात. पण खानदेशात एकादे निसर्गरम्य प्रेक्षणीय असे ठिकाण असल्याचे मात्र कधी ऐकले नाही. शंभर वर्षांपूर्वी कदाचित परिस्थिती वेगळी असेल. अशा खानदेशातच त्र्यंबक बापूजी ठोंबरे लहानाचे मोठे झाले. बालपणापासूनच त्यांना कविता रचण्याची आवड होती आणि तिथल्या निसर्गापासून त्यासाठी त्यांना स्फूर्ती मिळत होती.
सन १९०७ मध्ये जळगांवला महाराष्ट्रातले पहिले कविसंमेलन भरले होते. तो बोलपटांचा जमाना नसल्यामुळे गीतकार हा पेशा अजून जन्माला आलेला नव्हता. मुद्रण, प्रकाशन, वितरण वगैरेचा फारसा विकास झालेला नसल्यामुळे कवितासंग्रह काढून ते विकून त्यातून खूप पैसे मिळण्याची शक्यता कमीच होती. त्या काळी प्रसिध्द होत असलेल्या वाङ्मयिन नियतकालिकांमध्ये त्या छापून येक असत. त्यामुळे कविता करणे ही एक मनातली हौस किंवा आंतरिक ऊर्मी असे आणि सुस्थितीत असलेले त्या काळातले प्राध्यापक, अधिकारी, न्यायाधीश, दिवाण, रावसाहेब, रावबहाद्दूर अशी प्रतिष्ठित मंडळीच कवी म्हणून ओळखले जात असत. खानदेशातल्याच अशिक्षित बहिणाबाईंनी अप्रतिम काव्यरचना केली होती, पण त्यांच्या हयातीत त्यांना प्रसिध्दी मिळाली नाही. तत्कालीन समाजातल्या मान्यवर मंडळींनीच जळगावच्या त्या कविसंमेलनात भाग घेतला असणार. त्या काळात टेलीफोन, ई-मेल वगैरे कांही नव्हते. पत्रोपत्रीच सगळे ठरवून माहितीतल्या कवींना आमंत्रणे केली असतील आणि जीआयपी रेल्वेच्या ज्या एक दोन गाड्या त्या काळी धांवत असतील त्यातून ही मंडळी जळगावला जाऊन पोचली असतील. तरीसुध्दा पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, इंदूर वगैरे दूर अंतरावरील ठिकाणांहून शास्त्री, पंडित, कवी आणि रसिक श्रोते मंडळी आली होती. जवळपास राहणा-या स्थानिक लोकांनी गर्दी केली होतीच.
एकंदर २३ कवी या संमेलनात आपले काव्यवाचन आणि गायन करणार होते. त्यातच एक १७ वर्षाचा मुलगा अचानक मंचावर चढला आणि त्याने थेट सभेचे अध्यत्र कर्नल डॉ.कीर्तीकर यांचेजवळ जाऊन त्यांना आपले मनोगत तिथल्या तिथे रचलेल्या चार ओळीतून ऐकवले. ते ऐकून सर्वानुमते त्यालाही मंचावर येऊन आपल्या कविता सादर करायची अनुमती दिली गेली. त्याने म्हणजे त्र्यंबकने सर्व रसिक श्रोत्यांना आपल्या शीघ्रकवित्वाने स्तिमित केले. रीतीप्रमाणे त्याचाही सत्कार झाला तेंव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अध्यक्षांनी त्याला बालकवी ही उपाधी दिली आणि त्यानंतर ते त्याच नांवाने ओळखले जाऊ लागले.
त्यानंतर त्यांनी अनेक सुंदर रचना केल्या. त्यात निसर्गसौंदर्याची अत्यंत रसिकतेने केलेली वर्णने आहेतच, कांही कवितामध्ये एक सकारात्मक जीवनदृष्टी आहे. माझे गाणे या कवितेत ते लिहितात,
ही प्रेमाची, ही शांतीची, विश्वमंगलाची, सौभाग्याची तार तशी ही, ही जगदैक्याची.
"निरध्वनी हे, मूक गान हे" यास म्हणो कोणी, नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी.
सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले, माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले ।।
ते असेही सांगतात,
सुंदरतेच्या सुमनावरले दंव चुंबुनि घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे ।।
जगात जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद पसरलेला आहे हे सांगतांनाच ते पुढे लिहितात,
स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे, आनंदी आनंद गडे ।।
त्यांच्या गाण्यात सौंदर्य होते, तत्वज्ञान होते, त्यातल्या शब्दांना नादमाधुर्य असायचे. त्यामुळे चांगल्या संगीतकारांच्या हातात पडल्यावर त्यांना अवीट गोडी प्राप्त झाली. सुमारे नव्वद ते शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या कवितांनी पन्नास वर्षांपूर्वी माझ्या मनावर मोहिनी घातली होती. तीस पस्तीस वर्षांपूर्वी त्यातली कांही गाणी स्वरबध्द केली गेली आणि आजसुध्दा ती ऐकली जात आहेत, यावरून त्यांचे काव्य कसे अजरामर आहे याची कल्पना येईल.
अशा या बालकवींना आणखी आयुष्य लाभले असते तर त्यांनी आणखी किती अद्भुत काव्यरचना लिहून ठेवले असत्य़ा कोणास ठाऊक. मराठी सारस्वताच्या दर्दैवाने त्यांना अल्पायुष्यातच, वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी काळाने ओढून नेले.

3 comments:

Anonymous said...

काका,

खांदेशात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे.
सातपुडा पर्वत रांगेमध्ये सिताखई ची दरी, अश्वत्थाम्याचे आणि मोगरादेवी चे मंदीर आहे.
शहाद्याला (उनपदेव) गरम पाण्याचे झरे आहेत.

Anand Ghare said...

माहितीबद्दल मी आभारी आहे. अशा अप्रसिध्द जागांबद्दल बाहेर फारशी माहिती नसते. तोगणगावला जाण्याच्या आणि तिथे रहाण्याच्या काय सोयी आहेत हे समजले तर ज्यांना गिरिभ्रमणाची आवड असेल आणि ते साध्य असेल त्यांना एक नवीन जागा पाहता येईल.

priyanka patil said...

छान माहिती धन्यवाद !