Sunday, August 16, 2009

न्यूयॉर्कची सफर - १- आगमन


न्यूयॉर्क, जगातील सर्वात बलाढ्य आणि धनाढ्य देशातले सर्वात मोठे शहर! हा मान लंडन शहराकडे निदान शंभर वर्षे तरी होता. पहिल्या महायुध्दानंतर लवकरच लंडन शहराचा हा दिमाख न्यूयॉर्कने उतरवला आणि पहिला क्रमांक पटकावला. दुस-या महायुध्दानंतर त्याचे अग्रगण्य स्थान अधिकच पक्के झाले. मला समजायला लागल्यापासून न्यूयॉर्क हेच जगातले 'सर्वात मोठे' शहर आहे असेच ऐकत आलो असल्यामुळे परदेशातली जी शहरे पाहण्याची इच्छा मनात होती त्यात न्यूयॉर्कचा नंबर सर्वात वर असायचा, लंडन, पॅरिस आणि इतर शहरांची नांवे त्यानंतर येत असत. त्यातल्या लंडनला भेट देण्याची संधी खूप पूर्वी मिळून गेली. पॅरिससहित युरोपाची सहल झाली. न्यूयॉर्कला जायची संधी मात्र हुलकावण्या देत राहिली. पहायला गेलो तर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासूनच अमेरिकेला जायचे बोलणे सुरू झाले होते, पण प्रत्यक्ष योग येत नव्हता. अखेर अमेरिकेत गेल्यानंतर आणि तिथे न्यूयॉर्कच्या शेजारी असलेल्या न्यूजर्सीला पोचल्यानंतरसुध्दा खराब हवामानामुळे न्यूयॉर्कदर्शनात बाधा पडते की काय अशी शंका निर्माण झाली होती. पण वरुणराजा आणि वायुदेवता या दोघांनीही आपापल्या सामर्थ्याची थोडी चुणुक दाखवून आपले हात आवरते घेतले आणि आम्ही एकदाचे न्यूयॉर्कमध्ये दाखल झालो.


न्यूजर्सीमधल्या पार्सीपेन्नीहून निघालेली आमची आरामबस न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनच्या जवळ आल्यानंतर एका प्रचंड बोगद्यात शिरली आणि आंतूनच वाट काढत पोर्ट ऑथॉरिटीच्या भव्य इमारतीच्या पोटात दडलेल्या मुख्य बस स्थानकावर जाऊन उभी राहिली. सर्व प्रवाशांच्या मागोमाग आम्ही बाहेर पडलो. न्यूयॉर्कचे मुख्य आकर्षण असलेल्या स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याचे दर्शन सर्वात आधी घ्यायचे हे ठरलेलेच होते. पण बस स्टेशनपासून ती जागा दूर असल्यामुळे लोकलमधून तिथपर्यंत जायचे होते. विमानतळावर असतात तशा प्रकारच्या मार्गदर्शक पाट्या बस स्टेशनवरसुध्दा होत्या, पण त्या वाचून त्यांचा अर्थ उमगण्यासाठी सुध्दा थोडी स्थानिक माहिती आणि अनुभव असावा लागतो.


आरामगाडीतून आणि तेही थंड हवेत केलेल्या तासाभराच्या प्रवासानंतर कोणालाही किंचितही थकवा आला नव्हता, तरीसुध्दा प्रत्येकालाच रेस्टरूममध्ये जाऊन यायचे होतेच. अमेरिकेतल्या 'रेस्टरूम'मध्ये विश्रांती घेण्यासाठी आरामखुच्या किंवा उबदार कोच ठेवलेले नसतात. रेस्टरूमच्या पाटीवरच पुरुष, स्त्री, अपंग वगैरे चित्रे पाहून आत काय असेल याची कल्पना येते. त्याशिवाय कांही ठिकाणी तान्ह्या मुलांची डायपर्स बदलण्यासाठी खास व्यवस्था केलेली असते आणि तसे चिन्ह त्या विश्रांतीगृहाच्या फलकावर असते.


रेस्टरूमला भेट देऊन 'फ्रेश' झाल्यानंतर रेल्वे स्टेशनकडे मोर्चा वळवला. लंडनमधल्या 'अंडरग्राउंड' प्रमाणेच न्यूयॉर्कच्या 'सबवे'चे त्याहूनही मोठे आणि गुंतागुंतीचे असे प्रचंड जाळे आहे. त्यात कित्येक 'लाइनी' आहेत आणि त्यावर चारपाचशे इतकी स्टेशने आहेत. ते समजावून घेण्याइतका वेळ माझ्याकडे नव्हता आणि आमची 'गाइडेड टूर' असल्यामुळे त्याची गरजही नव्हती. सौरभच्या पाठोपाठ तो नेईल तिकडे जायचे, मध्येच कांही आकर्षक दिसले म्हणून अधेमध्ये कुठे रेंगाळायचे नाही, एवढेच आम्हाला करायचे होते. बस स्थानकातून निघाल्यावर अनेक कॉरीडॉर आणि सरकते जिने पार करून त्या इमारतीच्या आंतूनच आम्ही एका सबवे स्टेशनवर जाऊन पोचलो. पोर्ट ऑथॉरिटीची ती अगडबंब बिल्डिंग बाहेरून कशी दिसते हे कांही त्या वेळी पहायला मिळाले नाही.


आम्ही गेलो होतो त्या जागेवर ते रेल्वेस्टेशन वाटावे अशी कसलीही खूण दिसली नाही. रूळ, फलाट, प्रवासी, हमाल, स्टॉलवाले, रेल्वे कर्मचारी, तिकीटाची खिडकी वगैरेमधले कांहीसुध्दा तिथे दिसत नव्हते. एका हॉलमध्ये एका बाजूला ओळीने तीनचार यंत्रे मांडून ठेवली होती आणि समोरच्या बाजूला तीनचार यांत्रिक गेट्स होती. आमच्याखेरीज अन्य कोणी माणसेही तिथे नव्हती. बहुधा रविवार असल्यामुळे अशी परिस्थिती असावी. सौरभने त्यातल्या एका यंत्रावरची दोन तीन बटणे दाबून पाहिली, पण त्याने कांहीच प्रतिसाद दिला नाही. मनातला वैताग त्या यंत्रावर काढून दुस-या यंत्रावरची बटणे दाबून पाहिली. त्याच्या स्क्रीनवर कांही वाक्ये उमटली. त्यानंतर आणखीन एक बटण दाबून स्लॉटमधून क्रेडिट कार्ड फिरवल्यावर सरसर करीत सहा तिकीटे बाहेर आली. ती घेऊन आम्ही समोर असलेल्या गेटपाशी गेलो. एकेकाने तिथल्या बारला चिकटून उभे राहून आपले तिकीट त्या यंत्राला दाखवले की ते गेट काटकोनात फिरायचे आणि तेवढ्यात त्या माणसाने पलीकडे जायचे. त्याच्यामागे दुसरा बार येऊन ते गेट बंद होत असे. आमच्यातले पहिले दोघे यशस्वीरीत्या पार गेले, पण तिस-या आणि चौथ्या व्यक्तींच्या हातातल्या तिकीटांना पाहून ते गेट फिरलेच नाही. पाचव्या आणि सहाव्या तिकीटाने गेटाचे चक्र फिरले, पण दोघेजण अजून बाहेर राहिले होते. तक्रार करायची झाली तर ती ऐकून घ्यायला तिथे कोणीच नव्हते. त्या तिकीटाचा नंबर, स्टेशनाचे नांव, तारीख, वाळ वगैरे तपशील रेल्वे कंपनीला कळवून रिफंड मिळवण्याची व्यवस्था होती पण साडेतीन डॉलरसाठी कोणताही अमेरिकन माणूस एवढी झिगझिग करत नाही. गेटच्या पलीकडे जाण्यासाठी नवी तिकीटे काढणे आवश्यक होतेच, ती काढली आणि पुढे गेलो. आमची ही झटपट चालली असतांनाच एक अमेरिकन बाई आपल्या दहा बारा वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन आल्या, त्या दोघीही गेटच्या बारला खेटून ऊभ्या राहिल्या आणि एकाच तिकीटाचा वापर करून पलीकडे गेल्या. आमचे पैसे वाया घालवणा-या रेल्वे कंपनीला कोणी तरी गंडा घातलेले पाहून थोडे बरे वाटले आणि पुन्हा आपल्यावर अशी पाळी आली तर हा प्रयोग करून पहायचे ठरवले.


गेटच्या पलीकडच्या बाजूला प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सरकते जिने होते, त्यावरून खाली गेलो. तिथेही गाड्यांच्या वेळा दाखवणारे इंडिकेटर होते, पण ते वेगळ्या पध्दतीचे असल्यामुळे शोधायला आणि समजायला किंचित वेळ लागला. आमची गाडी आधी येणार असल्याचे त्यात दाखवले होते, पण प्रत्यक्षात विरुध्द बाजूला जाणारी गाडी आधी आल्यामुळे मनात थोडा संभ्रम झाला, पण तेवढ्यात आमच्या गाडीच्या दिव्याचा उजेड बोगद्यात दिसायला लागला. त्याच्या पाठोपाठ आमची गाडी आलीच. त्यात फारशी गर्दी नव्हती. रविवारचा परिणाम असावा, पण गाडी रिकामीही नव्हती. त्यामुळे आरामात चढायला मिळाले आणि बसायला जागासुध्दा मिळाली.


माझ्या अपेक्षेप्रमाणे त्या सबवे लाइनचे रेखाचित्र डब्यात लावलेले होते. गाडीने कोठपर्यंत प्रगती केली आहे हे त्यात दाखवले जात होते, तसेच प्रत्येक स्टेशन येण्यापूर्वी येऊ घातलेल्या स्टेशनचे नांव आणि त्याच्या पुढील थांब्याचे नांव यांची घोषणा होत होती. आमचे गंतव्य स्थानक जवळ यायला लागले त्यावेळी याशिवाय एक वेगळी अनाउन्समेंट झाली. अमक्या अमक्या स्टेशनांवर ज्यांना उतरायचे आहे त्या प्रवाशांनी गाडीच्या पुढल्या भागात बसून घ्यावे असे सांगितले गेले. त्यात आमच्या स्टेशनचे नांव असल्यामुळे आम्ही उठून डब्यातल्या डब्यात पुढे सरकलो, पण तो डबा आंतून पुढच्या डब्याला व्हेस्टिब्यूलने जोडलेला नव्हता. त्यामुळे पुढल्या स्टेशनवर खाली उतरलो आणि धांवत पळत एक डबा ओलांडून पलीकडल्या डब्यात जाऊन चढलो. हा धांवपळ कशासाठी चालली आहे यावर चर्चा चालली असतांनाच आमचे स्टेशन आले आणि आम्ही खाली उतरलो. पहातो तो त्या स्टेशनवरचा फलाट लहान आकाराचा होता आणि आमचा आधीचा डबा त्यावर आलाच नव्हता. तो बोगद्याच्या आंतच राहिला होता. परदेशातल्या रेल्वेगाडीचा डबा फलाटावर आल्याखेरीज त्याचे दरवाजे उघडत नाहीत, त्यामुळे अंधारात खाली पडायची भीती नव्हती, पण आम्ही डबा बदलला नसता तर निष्कारण पुढे जाऊन परत मागे यावे लागले असते. नेहमी प्रवास करणा-या प्रवाशांना ही गोष्ट ठाऊक असा नाहीवी, त्यामुळे आमच्यासारखी धांवपळ आणखी कोणी केलेली दिसली नाही.

आमच्याबरोबर त्या डब्यातले बहुतेक सगळे प्रवासी उतरले आणि स्टेशनाबाहेर पडल्यानंतर एकाच दिशेने चालायला लागले. ते सगळे लिबर्टी द्वीपाकडेच जाण्यासाठी आले होते.
समोरच एक मोठा बगीचा होता आणि त्याच्या पलीकडले चौपाटीसारखा शांत समुद्रकिनारा दिसत होता, त्यात तीन चार स्टीमर बोटीसुध्दा चालतांना दिसत होत्या. बागेत आंतल्या बाजूला तिकीटांची खिडकी होती. "आधीच ही जागा अनेक वेळा पाहिली असल्यामुळे आम्ही कांही पुन्हा यावेळी येणार नाही." असे सौरभ आणि सुप्रिया यांनी जाहीर केले. आम्ही त्यांना सोबत यायचा आग्रह करणारच हे माहीत असल्यामुळे त्यांनी ते आधी सांगितले नव्हते. शिवाय "त्या बेटावर अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंबसुध्दा न्यायची परवानगी नाही, गळ्यातला कॅमेरा आणि खांद्याला टांगलेली पर्स सोडली तर दोन्ही हात मोकळे ठेऊन जावे लागते, त्यामुळे दिवसभर चरण्यासाठी बरोबर आणलेले अन्नपदार्थ टाकून द्यावे लागतील आणि अव्वाच्या सव्वा भावाने ते पुन्हा विकत घ्यावे लागतील. पुन्हा ते घरच्यासारखे असणार नाहीतच. थंडी पडली तर घालण्यासाठी नेलेले जास्तीचे गरम कपडे अंगावर चढवून त्यांचे ओझे वहावे लागेल." वगैरे अनंत कारणे त्यांनी पुढे केल्यामुळे आम्ही त्यांना मागे थांबू दिले आणि तिकीटांच्या रांगेत जाऊन उभे राहिलो. त्यावेळी तिथे पन्नास साठ लोक असतील. टूरिस्ट सीजन संपला असल्यामुळे त्या दिवशी कांहीच गर्दी नाही असे सौरभने सांगितले. महिनाभरापूर्वी ते आले होते तेंव्हा तिकीटाच्या रांगेतच त्याचा तास दीड तास वेळ गेला होता. या बाबतीत आम्ही थोडे सुदैवीच होतो. साठ वर्षांपेक्षा वयाने मोठे असणा-या ज्येष्ठ नागरिकांना तिकीटात दोन डॉलर सूट असल्याचे अगदी शेवटच्या क्षणी कुठे तरी वाचले आणइ आपले दोन डॉलर वाचवले. तिकीटे काढून झाल्यावर आम्ही उभयता आणि आमचे एक आप्त जोडपे असे चौघेजण स्टीमरच्या धक्क्यावर जाऊन रांगेत उभे राहिलो.

. . . . . . . . . . (क्रमशः)

3 comments:

Anonymous said...

Chhan lekh aahe...
Pan photo takale tar anakhi maja yeil vachayala...

Anand Ghare said...

सध्या ब्लॉगस्पॉटवर चित्रे टाकता येणे बंद झाले आहे. त्यामुळे नाइलाज होत आहे.

Anand Ghare said...

चित्रांची अडचण दूर झाल्यामुळे आता ती टाकता येतील अशी आशा आहे.