Sunday, August 23, 2009

आधी वंदू तुज मोरया


गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया


कुठल्याही महत्वाच्या कामाचा शुभारंभ आपण गणपतीच्या स्तवनाने करतो. पूर्वीच्या काळात 'श्रीगणेशायनमः' लिहून मुलांची अक्षर ओळख होत असे. बालमानसशास्त्र वगैरेचा विचार करून आता 'गमभन' ने सुरुवात केली तरी त्यात सर्वात पहिल्यांदा 'ग गणेशाचा'च येतो. सर्व मंत्रांची सुरुवात ओंकाराने होते. इतर देवतांच्या पूजेच्य़ा आधी गणपतीची पूजा केली जाते. कुठल्याही पोथीचे वाचन श्रीगणेशायनमः ने सुरू होते. अशा प्रकारे सर्व धार्मिक कृत्यात तसेच इतर महत्वाच्या प्रसंगी गजाननाला अग्रपूजेचा मान मिळतो.ही प्रथा पूर्वीपासून चालत असावी. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाची सुरुवात ओं नमोजी आद्या या गणेसस्तवनाने सुरू केली होती. विठ्टलभक्त संत तुकाराम, आणि रामाचे परमभक्त समर्थ रामदास यांनी सुध्दा गणपतीची स्तुती करण्यासाठी सुंदर रचना केल्या आहेत.


असे असले तरी जसे एकादे यंत्र सुरू होऊन व्यवस्थितपणे चालायला लागले की त्याचे स्टार्ट बटन किंवा सर्किट बाजूला राहते, त्याप्रमाणे एकादी मोठी पूजा करतांना सुरुवातीला गणेशपूजा झाल्यानंतर शेवटी आरतीच्या वेळेपर्यंत गणेशाची आठवण रहात नाही. उत्तर आणि दक्षिण भारतात बहुतेक सर्व देवतांच्या मंदिरात प्रवेशद्वारावरती किंवा एकाद्या कोनाड्यात गणपतीची प्रतिमा असते. अशा प्रकारे तो सगळीकडे उपस्थित असतो, पण खास गणपतीची प्रसिध्द मंदिरे मुख्यतः महाराष्ट्रात दिसतात. प्रसिध्द अष्टविनायक पुण्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात आहेत. त्याखेरीज पुळ्याचा गणपती, दिवेआगरचा सोन्याचा गणपती, पुण्यातला कसबा गणपती, मुंबईचा सिध्दीविनायक वगैरे देवस्थानांच्या ठिकाणीही भक्तांची गर्दी असते.
कोकणातून बाळाजी विश्वनाथ भट पुण्याला आले आणि त्यांना पेशवेपद मिळाले. पुढील सुमारे शंभर वर्षाच्या काळात मराठ्यांच्या साम्राज्याची धुरा पेशव्यांकडे होती. गणपती हे पेशव्यांचे कुलदैवत होते आणि त्याच्या कृपाप्रसादानेच त्यांची भरभराट झाली अशी श्रध्दा असल्यामुळे पुणे शहरात आणि त्याच्या परिसरात गणेशाच्या उपासनेला महत्वाचे स्थान प्राप्त झाले. पेशव्यांनी त्यांच्या शनिवारवाडा या निवासस्थानात गणेशोत्सव सुरू केला आणि तो धामधुमीत चालवला. पटवर्धन, रास्ते, मेहेंदळे आदि कोकणातली काही कुटुंबे पेशव्यांबरोबर पुण्यात आली आणि सरदारपदापर्यंत त्यांची प्रगती झाली. त्यांनीसुध्दा आपापल्या वाड्यात आणि संस्थानात गणपतीची सुरेख मंदिरे बांधली आणि त्याची भक्तीभावाने उपासना केली. पण हे सगळे मुख्यतः व्यक्तीगत पातळीवर चालायचे आणि त्यांच्या खास मर्जीतले लोकच त्यात सहभागी होत असत.
पुण्यातच राहणा-या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचे महत्व ओळखून त्याला सार्वजनिक रूप दिले आणि त्या निमित्याने लोकसंग्रह सुरू केला. भारतीय लोकांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही असे इंग्रजांचे धोरण असल्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला नाही आणि पौराणिक गोष्टींच्या आधाराने भारतीयत्वाचा विचार पसरवणे लोकमान्यांना शक्य झाले. त्यांनी सुरू केलेला उत्सव लोकप्रिय होत गेला आणि आता तर गणेशोत्सव ही महाराष्ट्राची एक ओळख झाली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यात आणि परदेशातसुध्दा अनेक ठिकाणी तो उत्साहाने साजरा होत आहे.
आज गणेशचतुर्थीच्या दिवशी श्रीगजाननाला शतशः सादर प्रणाम.

No comments: