Friday, July 31, 2009

तेथे कर माझे जुळती - भाग ५ श्रीमती गंगूबाई हंगल


मी शाळेत असतांना एकदा आमच्या लहानशा गांवात पं.भीमसेन जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला होता. त्या वेळी त्यांचे गायन ऐकायला किंवा त्यांना पहायला सारा गांव त्या जागी लोटला होता आणि सगळे लोक कशासाठी तिकडे जात आहेत ते पहायला जाऊन मीसुध्दा गर्दीतून वाट काढत मंचाच्या अगदी जवळ जाऊन बसलो होतो. हा एक अपवाद वगळला तर माझ्या लहानपणी मी शास्त्रीय संगीत कधी ऐकल्याचे मला आठवत नाही. शास्त्रीय संगीतावर आधारलेली नाटकसिनेमातली गाणी मात्र मला विशेष आवडत असत. त्यातल्या आलाप ताना तेवढ्या थोड्या ओळखीच्या होत्या. पुढे हॉस्टेलच्या मेसमधल्या रेडिओवर बहुधा रेडिओ सिलोन किंवा विविधभारती यातले एकादे स्टेशन लावलेले असायचे. एकादी मोठी घटना होऊन गेली असली तर कोणीतरी त्यावर बातम्या लावायचा. एकदा असेच आम्ही चारपाच मित्र जेवण आटोपल्यानंतर रेडिओशेजारी कोंडाळे करून बसलो होतो. स्टेशन बदलण्याच्या बटनाशी चाळा करता करता अचानक एक दमदार तान ऐकू आली. "अरे व्वा! हा कोण बुवा आहे बुवा?" आमच्यातला एकजण उच्चारला. त्यातला दुसरा 'बुवा' आमच्यातल्या एका मुलाला उद्देशून होता. त्याने शाळेत असतांना संगीताच्या एकदोन परीक्षा देण्यापर्यंत मजल मारली होती आणि अमक्या गाण्याचा तमका राग आहे वगैरे माहिती सांगून तो आमच्यावर शाइन मारायला पहात असे.
तो लगेच म्हणाला, "अरे बुवा काय म्हणतोय्स? या आपल्या गंगूबाई असणार."
आम्ही जेवढे म्हणून हिंदी वा मराठी सिनेमे पाहिले होते त्यातले 'गंगूबाई' नावाचे पात्र भांडी घासणे, लादी पुसणे आणि क्वचित कधी लावालाव्या करणे याव्यतिरिक्त आणखी कांही करतांना आम्ही पाहिले नव्हते. त्यामुळे सर्वांनात हंसू फुटले.
"अरे ए, तुला बुवा म्हंटलं म्हणून आम्हला शेंडी लावतोस का रे?" कोणीतरी विचारले. यावरून दोघांची जुंपली आणि "तुझी माझी पैज" पर्यंत गेली. अखेर "जो कोणी हरेल त्याने सर्वांना चहा पाजायचा." असा तोडगा एका हुषार मुलाने सुचवला आणि अर्थातच सर्वांनी तो एकमताने मंजूरही करून टाकला. एक कप चहासाठी सर्व मुलांनी ते गायन शेवटपर्यंत ऐकले. मेसच्या इतिहासात प्रथमच त्या रेडिओमधून शास्त्रीय संगीताचे स्वर बाहेर पडत असावेत. गायन संपल्यानंतर निवेदिकेने घोषणा केली. त्यात "अभी आप सुन रहे थे श्रीमती गंगूबाई हंगलका मधुर गायन ..." वगैरे सांगितले तेंव्हा मी आयुष्यात प्रथमच त्यांचा आवाज आणि त्यांचे नांव दोन्ही ऐकले.
लग्न करून बि-हाड थाटल्यानंतर रेडिओ, टेपरेकॉर्डर, टेलिव्हिजन वगैरे सगळ्या वस्तू यथावकाश येत गेल्या आणि त्यातून आमचे सांगीतिक जीवन सुरू झाले. यात माझा सहभाग श्रवणभक्तीपुरताच मर्यादित होता, पण आता सुगम संगीताच्या सोबतीला शास्त्रीय संगीत ऐकणे सुरू झाले आणि त्याची गोडी वाटायला लागली. हळूहळू त्याचे कार्यक्रम, मैफली वगैरेंना जाऊ लागलो. त्यामुळे त्यातले दादा लोक म्हणजे पंडित, बुवा, उस्ताद आणि खानसाहेब वगैरेंची नांवे परिचयाची झाली. रेडिओ ऐकतांना किंवा टीव्हीवर पाहतांना आभाळातल्या नक्षत्रांसारखे वाटणारे हे कलाकार टाटा थिएटर किंवा नेहरू सेंटर सारख्या ठिकाणी जमीनीवर अवतरले तरी वलयांकितच दिसतात. मात्र चेंबूरचे बालविकास मंदिर किंवा दादर माटुंगा कल्चरल सेंटरसारख्या जागी लवकार गेल्यास त्यांना अगदी दहा बारा फुटांच्या अंतरावरून पहायला मिळते. थोडा उत्साह दाखवला तर कार्यक्रम झाल्यानंतर पुढे जाऊन त्यांना चरणस्पर्श करता येतो. पं.कुमार गंधर्व, पं.भीमसेन जोशी, पं.जसराज, किशोरीताई वगैरेंच्या जोडीनेच त्या काळात गंगूबाईंचे नाव आदराने घेतले जात असे. त्यांचे गायन ऐकण्याची संधी रसिक श्रोते चुकवत नसत. या सगळ्या दिग्गजांचे गायन ऐकण्यासाठी आम्हीसुध्दा दूरदूरच्या सभागृहात जात असू.
एकदा योगायोगाने आगगाडीच्या डब्यात पं.शिवानंद पाटील आणि सौ.योजना शिवानंद या जोडप्याची भेट होऊन ओळख झाली आणि ती वाढत गेली. त्यानंतरची कांही वर्षे योजना प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही घरचे कार्य समजून हजर रहात होतो. त्या वेळी प्रमुख कलाकारांचा सत्कार तर होत असेच, त्या निमित्याने कांही अन्य आदरणीय मंडळींचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले जात असत. यामुळे अनेक मान्यवर कलाकारांना जवळून पाहण्याची, त्यांच्याबरोबर दोन शब्द बोलण्याची संधी मला मिळाली. अशाच एका प्रसंगी मी पहिल्यांदा गंगूबाईंना क्षणभरासाठी भेटलो होतो.
योजना प्रतिष्ठानतर्फे दर वर्षी पं.बसवराज राजगुरू स्मृतीदिनानिमित्य कर्नाटकातल्या एकदोन कलाकारांच्या गायन वादनाचा कार्यक्रम ठेवला जात असे. त्यात सन २००१ मध्ये श्रीमती डॉ.गंगूबाई हंगल यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. हा समारंभ बेळगांवला झाला. त्यासाठी आम्ही सारेजण आदल्या दिवशी तिथे जाऊन पोचलो. हुबळीहून गंगूबाईसुध्दा आल्या होत्या. त्यांच्या राहण्यासाठी वेगळी व्यवस्था केली असली तरी बराच वेळ त्यासुध्दा आमच्यातल्याच एक बनून आमच्यासोबत राहिल्या. घरातल्या मोठ्या माणसाच्या मायेने सर्वांची विचारपूस करत होत्या, हास्यविनोद करून खळखळून हंसत होत्या. आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या सान्निध्यात बसलो आहोत असे कोणाला वाटू देत नव्हत्या, कसल्याही प्रकारची प्रौढी त्यांच्या बोलण्यात नव्हती किंवा त्यांच्या जोरकस गायनात जो आवेश दिसतो त्याचाही मागमूस नव्हता. उत्तर कर्नाटकात घरोघरी बोलली जाते तशा साध्या सोप्या कानडी बोलीभाषेत सारे संभाषण चालले होते. मधून मधून कानडीमिश्रित मराठीसुध्दा त्या बोलायच्या. मीसुध्दा द्विभाषिक असल्यामुळे मला समजायला कसली अडचण पडली नाही. दुसरे दिवशी त्यांनी केलेले गायन तर मंत्रमुग्ध करणारे होतेच, त्या दिवशी झालेली त्यांची भेट अधिक प्रभाव पाडणारी होती.

पं.भीमसेनजी आणि स्व.आठवले शास्त्री यांच्याबद्दल लिहितांना मी त्यांच्या कर्तृत्वाबद्दल लिहिले नव्हते कारण यापूर्वी अनेक वेळा त्याविषयी लिहिले गेले आहे. गंगूबाईंच्याबद्दल माझ्या वाचनात जेवढे आले ते बहुतेक इंग्रजीत होते. मराठी भाषेतसुध्दा लेख आले असतील, त्यांना श्रध्दांजली वाहणारा अग्रलेक मी पाहिला आहे, पण कदाचित तो सर्वांनी वाचला नसल्यास वाचकांना माहिती व्हावी यासाठी त्यांच्या जीवनातल्या कांही ठळक गोष्टी नमूद करत आहे. त्या कर्नाटकातल्या धारवाड जिल्ह्यात जन्माला आल्या आणि त्यांनी जगभरातल्या श्रोत्यांची मने जिंकली असली तरी बहुतेक वेळी त्यांचे वास्तव्य हुबळी धारवाडच्या परिसरातच राहिले. गंगूबाईंच्या मातोश्री कर्नाटक संगीतात पारंगत होत्या, पण त्यांनी गंगूबाईंना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची तालीम द्यायचे असे ठरवले. किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पं.रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांचेकडून त्यांनी हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण घेतले. पण त्याच्या खूप आधी म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षीच गंगूबाईंनी बेळगाव येथे भरलेल्या काँग्रेसच्या संमेलनात स्वागतगीत गाऊन सर्वांची वाहवा संपादन केली होती. गुरूकडून घेतलेले शिक्षण त्यांनी आत्मसात केलेच, त्याला आपल्या प्रतिभेची जोड देऊन त्याचे अप्रतिम सादरीकरण केले आणि त्यातून नांवलौकिक मिळवला. त्या ज्या काळात संगीताच्या क्षेत्रात आल्या त्या काळात स्त्रियांना त्यात मानाचे स्थान नव्हते, उलट त्यांची अवहेलनाच जास्त होत असे. ते सर्व हालाहल पचवून त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि सर्व विरोधकांना व निंदकांना पुरून उरल्या.

गंगूबाईंनी जेमतेम प्राथमिक शालेय शिक्षण घेतले होते, पण त्यांना चार विद्यापीठांनी डॉक्टरेटची पदवी देऊन सन्मानित केले. एवढेच नव्हे तर धारवाड विद्यापीठात त्यांनी अनेक वर्षे संगीतावर अध्यापन केले आणि त्याच्या सिनेटच्या त्या सदस्या होत्या. अनेक संस्थांनी त्यांना पन्नासावर बिरुदावली बहाल केल्या. त्यात संगीत नाटक अकादमी या सर्वोच्च संस्थेचाही समावेश होतो. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण ही पदके दिली. एकंदर नऊ पंतप्रधान आणि पाच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला आहे.

त्यांनी काळावर जवळ जवळ मात केली होती. मी पहिल्यांदा त्यांना ऐकले तेंव्हाच त्या सत्तरीला आल्या होत्या पण आवाज खणखणीत आणि सूर अगदी पक्के होते. त्यांचे शेवटचे गाणे ऐकले तेंव्हा तर त्या नव्वदीला आल्या होत्या, तरीसुध्दा आवाजात कंप नव्हता. त्यांना अधून मधून विश्रांती देण्यासाठी त्यांच्या कन्यका कृष्णाबाई बहुतेक वेळी त्यांची साथ करत असत. त्यांच्या संगीतविश्वातल्या वारस समजल्या गेलेल्या कृष्णाबाई दुर्दैवाने त्यांच्या आधीच चालल्या गेल्या, त्या त्यांच्या वयाची पंचाहत्तरी झाल्यानंतर. त्यानंतर गेल्या कांही वर्षात गंगूबाईंचे नांव बातम्यांमध्ये येत नव्हते. एकदम त्या अत्यवस्थ असल्याचे वृत्त आले आणि त्यापाठोपाठ त्यांच्या देहावसानाचीच बातमी आली. काळ आणखी तीन चार वर्षे थांबला असता तर वयाचे शतक झळकवणारी एक थोर व्यक्ती आपल्याला पहायला मिळाली असती.

5 comments:

Anonymous said...

Shri Ghare: Assuming that you are 65 years old, Bhimsen Joshi is elder to you by 22 years. Assuming that you were 15 at the time of the first concert by him that you ever heard, he was 37 at that time. Compared to Kumar Gandharva, who was famous when barely in his teens, fame came to Bhimsenji much later. I think you can help us get some perspective on the timeline of Bhimsen's rising fame. Was he so famous in 1959, about the same time when his first classical LP was released, and was your small town so musically enlightened that everybody in a small town ('लहानशा गांवात' ... 'सारा गांव लोटला होता') rushed to hear him? Was it his popularity or the organizer's skill in attracting the loyalty of the town's populace to their event? Just how big was the crowd? I am not doubting your account, but want to place it in the context of hard figures.

Now to an actual doubt. In general, small towns find classical programmes financially unviable, and prefer a strong lighter component, like bhajans or abhang or natyasangeet. Was it a concert dedicated to pure classical music or to lighter variety to which Bhimsen, not surprisingly, adds a strong classical component which might have stayed in your memory because of its novelty? I have a hard time trying to imagine a big audience for a classical concert in those far-off days. You might have seen a YouTube clip of Mallikarjun Mansur in which he says there weren't many listeners of classical music during the first half of his career.

Anand Ghare said...

आपल्या प्रतिसादाबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आपण वर्तवलेल्या आकडेवारीत फक्त दोन तीन वर्षांचा क्षुल्लक फरक असेल. भीमसेनजींचे गायन ऐकले त्यावेळी मी किती वर्षांचा होतो हे आता मलासुध्दा आठवत नाही. त्या वेळी फक्त उत्सुकतेपोटी मी त्यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. ते खूप प्रसिध्द आहेत एवढे ऐकले होते आणि तोपर्यंत मी फक्त स्थानिक कलाकारांचेच मनोरंजनाचे कार्यक्रम पाहिलेले असल्यामुळे असा मोठा माणूस गाणी म्हणून दाखवण्यासाठी आपल्या गावाला येतो आहे हे ऐकून त्या वेळी मला थोडे नवल सुध्दा वाटले होते.

गायनाचा तो कार्यक्रम गांवातल्या एका उत्सवाच्या निमित्याने एका देवळासमोरच्या मोकळ्या जागेत झाला होता. ती जागा गच्च भरली होतीच, आजूबाजूची घरे आणि दुकाने देखील माणसांनी फुलून गेली असल्याचे दृष्य मला आठवते. माणसांची संख्या सांगणे मात्र जरा कठीण आहे. त्यासाठी सर्वांना विनाशुल्क आणि मुक्त प्रवेश होता.

भीमसेनजींनी त्या मैफिलीसाठी किती बिदागी घेतली, किंवा घेतलीच नाही, घेतली असल्यास ती कोणी दिली असेल, ते मुद्दाम या कार्यक्रमासाठी पुण्याहून जमखंडीला आले होते की आणखी कोठे जातांजातां वाटेत तिथे एक कार्यक्रम करून गेले वगैरे समजून घेण्याचे माझे वय तेंव्हा नव्हते. तो विशुध्द शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नव्हता. खरे तर
सुरुवातीचे विलंबित गायन ऐकतांना बहुतेक श्रोते जांभया देत होते. रागदारीची थोडीशी झलक दाखवून पंडितजींनी आपला गळा तापवून घेतला असावा आणि तो मोकळा झाल्यानंतर त्यांनी मराठी अभंगवाणी आणि संत पुरंदरदासादिकांची कानडी भजने गायिली तेंव्हा श्रोत्यांनी त्यांना डोक्यावर घेतले होते. माझ्यासाठी हा सगळाच एक विलक्षण
रोचक अनुभव असल्यामुळे तो आठवणीत कोरला गेला आणि पन्नास वर्षे उलटल्यानंतरसुध्दा ताजा वाटतो. त्याची सुखद आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

त्या घटनेच्या सुमारे पंधरा वर्षानंतर मी त्यांचा चाहता झालो, तोपर्यंत ते प्रसिध्दीच्या शिखराच्या जवळपास पोचले होते. त्यापूर्वीच्या त्यांच्या प्रवासाचा मी मागोवा घेतलेला नाही. ते खूप प्रवास करत होते आणि पु.ल. त्यांना गंमतीने हवाई गंधर्व म्हणत असत असे मी वाचले आहे. माझी त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष भेट मुंबईच्या विमानतळावरच झाली होती. त्याबद्दल मी डिसेंबर २००८ मध्ये लिहिलेल्या तेथे कर माझे जुळती या मालिकेच्या दुस-या भागात लिहिले होते.

स्व.कुमार गंधर्व देवासला रहात असल्यामुळे त्यांचे गायन प्रत्यक्ष एकण्याची योग दुर्मिळ वाटत असे. मला ती संधी फक्त एकदाच मिळाली. पं.भीमसेनजींचे गाणे ऐकण्याची संधी जास्त वेळा लाभली.

mannab said...

Dear Shri.Ghare,
It's not important that what you narrated in your post has to be exact with date,month & year.I enjoyed what you wrote about late gangubai Hangal. I am sure you may also have read a brief article on her written by namita Devidayal in Times of India on 22nd July 2009.
How about your memories of Kirana Gharana's Smt.Dhondutai Kulkarni, who is still alive at an age 81, but is totally neglected by our people and the Govt. I look for your views in this regard.
Thanks a lot.
Mangesh Nabar

Anonymous said...

मी भीमसेन जोशींच्या २०-२५ मैफिली ऐकल्या आहेत. दुर्दैवानी त्यांतून त्यांची 'कलेशी इमान न राखता पैसा-प्रसिद्‌धी यांच्या हव्यासापायी नको तितके कार्यक्रम ठोकून देणारा कलाकार' अशी प्रतिमा निर्माण झाली. म्हणून गंगूबाई हानगलांची जशी परमआदरणीय व्यक्ती म्हणून ओळख आहे तशी भावना भीमसेनजींबद्दल, त्यांचे गाणे मला गंगूबाईंच्या गाण्यापेक्षा जास्त आवडत असूनही, मी कधीच बाळगू शकणार आहे. ती काच कायमचीच तडकलेली राहणार. पण हा बेसूर आपण विसरून जाऊ या.

संगीतकलेत रसिकाला किती खोलवर हलवून सोडण्याची शक्ती आहे याचा पहिला साक्षात्कार मला भीमसेनांकडून अभंगांद्वारे झाला. श्रोते भारावून जाउन भीमसेनांना डोक्यावर कसे घेतात याचा मी स्वतः प्रत्यक्ष अनुभव असा घेतला, आणि पुढेही जेव्हा भीमसेन जमून गायले तेव्हा इतरांना तोच अनुभव घेताना मी थोड्या तटस्थपणे पाहू शकलो. भीमसेनजींची खरी ओळख ही एक महान ख्यालगायक हीच; पण तुलनेने क्लिष्ट अशा शास्त्रीय गायनाची समज येण्याच्या वाटेवरची सुगम गायनाची पायरीही त्यांनी सजवली. आणि याचा लाभ रसिक म्हणून आपल्यासारख्यांना आणि कलाकार म्हणून त्यांना स्वतःला तर झालाच, पण त्यांच्या गुरुभगिनींसारख्या निव्वळ शास्त्रीय संगीतालाच वाहून घेतलेल्यांनाही झाला.

गंगूबाई हानगलांविषयी काय बोलणार? मुळातच ती एक कलेशी अढळ इमान राखणारी, आणि कलेव्यतिरिक्त आयुष्यात साधेपणाचा आणि विनयशीलतेचा आचर करणारी, खयालगायनातील तेजःपुंज तपस्विनी. पण पुढे घश्याच्या शस्त्रक्रियेत आवाज़ बिघडल्यावर त्या संकटावरही त्यांनी साधनेच्या बळावर मात केली आणि त्या तेजाची झळाळी अजूनच वाढली. 'असे कलाकार पुन्हा होणार नाहीत' अशी श्रद्‌धांजली उपचाराचा भाग म्हणून बरेचदा बोलली जाते. पण गंगूबाईंच्या बाबतीत ते शब्दशः सत्य आहे.

Anand Ghare said...

मंगेशराव, आपल्या प्रतिसादाबद्दल आभार. अशा कौतुकामधूनच माझ्यासारख्या हौस म्हणून लिहिणा-याला हुरुप येतो.
धोंडूताईंचे गायन मी ऐकले आहे आणि मला त्याने प्रभावित केले होते इतके नक्की म्हणू शकेन. संगीत हे माझे कार्यक्षेत्र नाही. त्याबद्दल मला अभ्यासपूर्वक लिहिता येणार नाही.
माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या व्यक्ती (म्हणून) स्मरणात राहिल्या त्यांच्याबद्दल दोन शब्द लिहिण्यासाठी मी तेथे कर माझे जुळती ही मालिका सुरू केली.