Wednesday, July 15, 2009

जन्मतारीख - भाग ५

अत्यंत दुर्मिळ असे वाटणारे कांही योगायोग आपल्याला आपल्या आजूबाजूला घडत असतांना नेहमी दिसतात व त्याचे नवल वाटते. पण संख्याशास्त्राच्या नियमांप्रमाणे मुळात ते तितकेसे दुर्मिळ नसतातच असे मी मागे एका शास्त्रीय स्वरूपाच्या लेखात त्यातल्या गणितासह दाखवले होते. या बाबतीत जन्मतारखांचे उदाहरण नेहमी दिले जाते. रोज जन्म घेणा-या मुलांची संख्या सर्वसाधारणपणे वर्षभर समानच असते असे गृहीत धरले तर आपला जन्मदिवस वर्षामधील ३६५ दिवसापैकी कधीही येऊ शकतो. म्हणजे एका विशिष्ट तारखेला तो येण्याची शक्यता ३६५ मध्ये १ इतकी कमी असते. चाळीस किंवा पन्नास माणसांचा समूह घेतला तरी त्यातील कुठल्या तरी एका माणसाची जन्मतारीख त्या विशिष्ट तारखेला येण्याची शक्यता ३६५ मध्ये ४०-५० किंवा सात आठमध्ये एक इतकीच येईल. पण अशा समूहातील कुठल्याही दोन माणसांची जन्मतारीख कुठल्या तरी एका दिवशी येण्याची शक्यता मात्र माणसांच्या संख्येबरोबर झपाट्याने वाढत जाते. तेवीस जणांमध्ये ती पन्नास टक्क्यावर जाते, चाळीस माणसात सुमारे ९० टक्के आणि पन्नास माणसात तर ९७ टक्के इतकी होते. त्यामुळेच एका वर्गातील विद्यार्थी, एका इमारतीमधील रहिवासी, लोकप्रिय नटनट्या वगैरे कोणताही पन्नासजणांचा समूह घेतल्यास त्यात एका तारखेला जन्मलेल्या दोन व्यक्ती हटकून सापडतात.


पन्नास लोकांच्या समूहात एका दिवशी जन्माला आलेल्या दोन व्यक्ती जरी निघत असल्या तरी त्या दोनमध्ये आपला समावेश होण्याची संभाव्यता नगण्यच असते. त्यामुळे आपल्या जन्मतारखेलाच जन्माला आलेल्या व्यक्ती ब-याच लोकांना कधी भेटतही नसतील. या बाबतीत मात्र मी फारच सुदैवी आहे असे म्हणावे लागेल. आधुनिक इतिहासात जगद्वंद्य ठरलेल्या विभूती हाताच्या बोटावरच मोजता येतील. त्यांच्यातल्या एका महापुरुषाच्या वाढदिवसालाच जन्म घेण्याचे भाग्य शेकडा एक दोन टक्के एवढ्यांनाच लाभत असेल. गांधीजयंतीच्या दिवशी जन्म घेऊन मला ते लाभले. पंडित नेहरूंच्यापासून मनमोहनसिंगांपर्यंत भारताचे पंधरा सोळा पंतप्रधान झाले असतील. त्यातल्या एकाचा, पं.लालबहादूर शास्त्री यांचा, जन्मदिवससुद्धा त्याच दिवशी येतो हा आणखी एक योगायोग. हे भाग्यसुद्धा चार पांच टक्क्यावर अधिक लोकांना मिळणार नाही.


माझे सख्खे, चुलत, आते, मामे, मावस वगैरे सगळे मिळून वीस पंचवीस बहीणभाऊ आहेत, ते देशभर वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत. त्यातल्या फारच थोड्याजणांची जन्मतारीख मला माहीत आहे कारण आम्ही जेंव्हा कारणाकारणाने भेटतो तेंव्हा आमच्या बोलण्यात वाढदिवस हा विषयच सहसा कधी निघत नाही. तरीसुद्धा एकदा कधीतरी हा विषय निघाला आणि चक्क माझ्या एका जवळच्या आप्ताची जन्मतारीखसुद्धा २ ऑक्टोबर आहे हे समजले. आम्ही रहात असलेल्या बिल्डिंगमध्ये माझ्या मुलांच्या वयाची जी पंधरा वीस इतर मुले होती त्यातल्या गौरवचा वाढदिससुद्धा गांधीजयंतीलाच येत असे.

या सगळ्या लोकांची जन्मतारीख एक असली तरी ते वेगवेगळ्या वर्षी जन्मलेले होते. जुळी भावंडे सोडली तर एकाच दिवशी जन्माला आलेली दोन माणसे शाळेतच भेटली तर भेटली. त्यानंतर ती भेटण्याची शक्यता फारच कमी असते. असे असले तरी मी ज्या दिवशी जन्माला आलो नेमक्या त्याच दिवशी जन्म घेतलेल्या दुस-या व्यक्तीशी माझी ओळखच झाली एवढेच नव्हे तर घनिष्ठ संबंध जुळले. खरे तर आधी संबंध जुळले आणि त्यातून पुरेशी जवळीक निर्माण झाल्यानंतर हा योगायोग समजला. त्याचे नांवदेखील मोहन हेच होते. कदाचित त्याचा जन्म गांधीजयंतीला झाला हे त्याच्या मातापित्यांच्या लक्षात आले असेल म्हणून त्यांनी त्याचे नांव मोहनदास यावरून मोहन ठेवले असणार असे कोणालाही वाटेल. पण त्या कुटुंबातील लोकांची एकंदर विचारसरणी पाहता महात्मा गांधींच्या हयातीत, त्यातही भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळात महात्माजींच्याबद्दल इतका आदरभाव त्यांच्या मनात वाटत असेल याची शक्यता मला कमीच दिसते.


अर्थातच आम्हा दोघांची जन्मतिथीसुद्धा एकच होती. मागे भारतीय आणि पाश्चात्य कालगणनापद्धतींचा तौलनिक अभ्यास करतांना माझ्या लक्षात एक गोष्ट आली होती. ती म्हणजे या दोन्ही पद्धतींमध्ये एकोणीस वर्षांचा कालावधी जवळजवळ तंतोतंत समान असतो. म्हणजे आजच्या तारखेला पंचांगात जी तिथी आहे तीच तिथी एकोणीस वर्षांपूर्वी याच तारखेला होती आणि एकोणीस वर्षांनंतर येणार आहे. हे गणिताने सिद्ध होत असले तरी ते पडताळून पाहण्यासाठी माझ्याकडे जुनी पंचांगे नव्हती. त्यामुळे मनाची खात्री होत नव्हती. त्यानंतर मी जेंव्हा महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग वाचायला सुरुवात केली तेंव्हा त्यातल्या पहिल्याच प्रकरणात या माझ्या द़ष्टीने आगळ्या वेगळ्या 'सत्याची' प्रचीती आली. एकोणीस वर्षानंतर हा योग येतो म्हंटले तर दोन माणसांची जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही गोष्टी जुळण्याची संभवनीयता सात हजारांत एक इतकी कमी आहे. तरीही मला अशा एका महान व्यक्तीची माहिती मिळाली आणि दुसरी अशी प्रत्यक्षात भेटली हा तर पांच कोटींमध्ये एक इतका दुर्मिळ योगायोग मानावा लागेल.
खरोखरच हा निव्वळ योगायोग होता की मला ठाऊक नसलेले एकादे कारण त्याच्या मागे आहे असा प्रश्न मला नेहमी पडतो.

No comments: