Tuesday, July 21, 2009

उद्याचे सूर्यग्रहण

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांचेविषयी लिहितांना सूर्यमालेची मांडणी दाखवण्यासाठी मी एक उदाहरण दिले होते. एका क्रिकेटच्या मैदानाच्या मधोमध लाल भोपळ्याएवढा सूर्य असला तर त्याच्या बाउंडरीलाईनवरून वाटाण्याएवढी पृथ्वी आणि तिच्यापासून वीतभर अंतरावर मोहरीएवढा चंद्र फिरत असतात असे त्या उदाहरणात लिहिले होते. जर त्या मैदानाची जमीन अंतर्धान पावली तर त्या वाटाण्यावर बसलेल्या सूक्ष्म जंतूला आपण स्थिरच आहोत असे वाटेल आणि स्टेडियमच्या पार्श्वभूमीवर तो तेजस्वी भोपळा जागचा हलतांना दिसेल, त्याचप्रमाणे मोहरीएवढा चंद्र आणि फुटाणा, बेदाणा, आवळा, लिंबू वगैरेंएवढे इतर ग्रहसुध्दा फिरतांना दिसतील. "प्रत्यक्षात तो भोपळा एका जागी स्थिर आहे आणि वाटाणा, फुटाणा इत्यादी सगळे त्याच्याभोवती फिरत आहेत" असे जर कोणी त्याला सांगितले तर त्याला ते खरे वाटणार नाही. त्या सर्वांची उंची, वजन, वेग असली नीरस माहिती कोणी सांगत राहिला तर तो कंटाळून त्याला दूर करेल. पण "तिकडे तो फुटाणा ताडताड उडतो आहे आणि त्याचे चटके आपल्याला बसत आहेत, इकडच्या बेदाण्यामुळे गोडवा निर्माण होतो आहे. त्या लिंबामुळे मैत्रीपूर्ण संबंधावर विरजण पडत असले तरी लवकरच आवळ्याभोपळ्याची भेट होणार आहे आणि त्यांची मोट बांधली की सगळे सुरळीत होईल." अशा प्रकारच्या सुरस गोष्टी त्याला आवडतील, त्या ऐकतांना त्याला दिलासा मिळेल आणि तो सांगणारा त्याला जवळचा वाटेल हे साहजीक आहे.
माणसांच्या जगातसुध्दा असेच कांहीसे होत असते. आपल्या सभोवती असलेली घरे, झाडे, शेते, डोंगर वगैरे सारे कांही नेहमी जागच्या जागी दिसते पण आकाशातले सूर्य, चंद्र आणि चांदण्या रोज इकडून तिकडे जातांना दिसतात. अनेक संशोधकांनी त्यांच्या फिरण्याचा सूक्ष्म अभ्यास करून त्यावरून कांही निष्कर्ष काढले, इतर अभ्यासकांनी त्यावर सखोल चर्चा करून ते मान्य केले आणि त्यातून खगोलशास्त्र विकसित झाले. त्यातल्या कांही ढोबळ गोष्टींचा समावेश शालेय अभ्यासक्रमात केल्यामुळे पाठ्यपुस्तकांतून ती माहिती आपल्यापर्यंत पोचली. पण कांही मुले ते धडे वाचतच नाहीत, कांही मुलांना ते समजत नाहीत, पटत नाहीत किंवा आवडत नाहीत किंवा पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर लक्षात रहात नाहीत. त्यातल्या ज्या माहितीचा पुढील जीवनात उपयोग होतो त्याची तेवढी उजळणी होते आणि बाकीची विस्मृतीत हरवून जाते. रोजच्या जीवनाचा आधार असलेला सूर्य सर्वांना चांगला परिचयाचा असतो. विजेच्या दिव्यांच्या लखलखाटाची संवय झाल्यावर रात्रीच्या काळोखातल्या आकाशाकडे फारसे कोणी पहात नसले तरी अधून मधून अवचित नजरेला पडणारा आकर्षक चांदोबाही ओळखीचा असतो, चांदण्यांच्या गर्दीतून शनी आणि मंगळ यांना शोधून काढून त्यांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करणारा इसम मला बरेच दिवसात भेटलेला नाही. पण रोज वर्तमानपत्रे आणि टेलीव्हिजनवर त्यांच्याबद्दल जे सांगितले जाते त्यावरून हे दोघेजण कुंडलीच्या एका घरातून दुसर्‍या घरात जात असतात किंवा कुठे तरी ठाण मांडून बसलेले असतात आणि असतील तेथून आपल्याला उपद्रव देत असतात अशी समजूत होणे शक्य आहे.
या विषयावर होत असलेल्या चर्चा मनोरंजक असतात. संशोधनातून सप्रमाण सिध्द झालेली तथ्ये बहुतेक लोकांना पटलेली आहेत असे वाटले तरी त्याच्या सपशेल विरुध्द अशा गोष्टीतसुध्दा तथ्य असेलच अशी सर्वसमावेशक भूमिका अनेक लोक घेतात तर कांही लोकांना त्यात फारसा रस नसल्यामुळे ते सगळ्यांच्या बोलण्याला हो ला हो करत असतात. कांही लोकांच्या मनात विज्ञानाविषयी अढी असते तर स्वधर्म, स्वराष्ट्र, संस्कृती वगैरेंना विज्ञानामुळे बाधा पोचते अशी तक्रार कांही लोक करत असतात. चांगल्या आणि सुशिक्षित लोकांच्या मनात असलेल्या विज्ञानाबद्दलच्या औदासिन्य, अनादर, संशय, द्वेष वगैरे भावनांचा विचार करून मी विज्ञानाची पुस्तके बाजूला ठेवली आणि फक्त साध्या डोळ्यांना जेवढे दिसते किंवा आपण पाहू शकतो तेवढीच या विषयावरील माहिती या लेखात द्यायचे ठरवले.
कांही सुदैवी लोकांना अंथरुणात पडल्या पडल्या सकाळी खिडकीतून सूर्योदय पहायला मिळतो, कांही लोकांना त्यांच्या अंगणातून किंवा बाल्कनीतून तो दिसतो आणि इतरांना त्यासाठी जवळच्या मोकळ्या मैदानात किंवा टेकडीवर जावे लागते. भल्या पहाटे उठून आकाशात पहात राहिले तर तिथल्या काळोखाचा गडदपणा हळूहळू कमी होत जातो, तसतशा लुकलुकणार्‍या चांदण्या अदृष्य होत जातात. आकाशात धूसर प्रकाश पसरतो त्याच्या बरोबर विविध रंगांची उधळण होतांना दिसते. अचानक एक लालसर रंगाचा फुगवटा जमीनीतून वर येतांना दिसतो आणि पाहतापाहता त्याचे पूर्ण बिंब वर येतांना दिसते. वर येतायेतांनाच त्याचा रंग पालटत असतो आणि तेज वाढत जाते. तो क्षितिजाच्या थोडा वर आल्यानंतर त्याच्याकडे पाहणे अशक्य होते. तरीसुध्दा त्यानंतर तो आकाशात वर वर चढत जाऊन माध्यान्हाच्या सुमारास माथ्यावर येतो आणि त्यानंतर दुसर्‍या बाजूने खाली उतरत जातो हे आपल्याला जाणवते. अखेर संध्याकाळ झाल्यावर सकाळच्या उलट क्रमाने तो अस्ताला जातो. हे रोजचेच असल्यामुळे आपल्याला त्यात कांही विशेष वाटत नाही आणि आपण ते पहाण्याचा मुद्दाम प्रयत्न करत नाही, पण एकादे दिवशी दृष्टीला पडले तर मात्र मंत्रमुग्ध होऊन ते अनुपम दृष्य पहात राहतो.
रोज होत असलेल्या सूर्योदय आणि सूर्यास्तात कांही फरक असतो कां ते पाहण्यापूर्वी माझ्या संवयीप्रमाणे एक उदाहरण देतो. समजा माझ्या घरासमोरील रस्त्याचा आकार चंद्रभागा नदीच्या पात्रासारखा वक्राकार आहे आणि गेटपाशी उभे राहिल्यावर समोरच्या अंगाला डाव्या आणि उजव्या बाजूच्या प्रत्येकी पाच इमारती दिसतात. रोज सकाळी एक पिवळ्या रंगाची स्कूलबस डाव्या बाजूने येते तेंव्हा तिकडच्या पाचव्या इमारतीसमोर आल्यानंतर माझ्या गेटवरून ती दिसू लागते आणि उजव्या बाजूच्या पाचव्या इमारतीच्या पुढे गेल्यानंतर ती नजरे आड जाते. त्या वेळी जर मी चालत चालत डाव्या बाजूच्या पाचव्या इमारतीपाशी आलो असलो तर मला ती दहाव्या इमारतीपाशी येताच दिसू लागेल आणि माझ्या घरापलीकडे जाताच दिसेनाशी होईल, मी जर उजव्या बाजूला तितकेच अंतर चालत जाऊन मागे वळून पाहिले तर माझ्या घरापाशी आल्यानंतर ती बस मला दिसू लागेल आणि दहाव्या इमारतीला पार करेपर्यंत ती दिसत राहील. म्हणजेच रोज त्याच मार्गाने जाणारी ती बस मी जर पाहण्याची जागा बदलली तर मला वेगवेगळ्या ठिकाणी आल्यानंतर दिसेल किंवा दिसेनाशी होईल. याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या जागी जाऊन सूर्योदय पाहिला तर क्षितिजाच्या वेगवेगळ्या भागात तो जमीनीतून वर येतांना दिसेल. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अस्ताला जातांना तो क्षितिजाला वेगवेगळ्या जागी स्पर्श करतांना दिसेल.
रस्त्यावरून येत असलेली बस आपल्याला जिथे प्रथम दिसते तिथे ती उत्पन्न होत नाही किंवा दिसेनाशी होतांना ती छूमंतर होत नाही. आपल्या नजरेला पडण्यापूर्वी कांही वेळ तसेच ती दिसेनाशी झाल्यानंतरसुध्दा कांही क्षणापुरते ती बस त्या रस्त्यावर कुठेतरी आहे असेच आपण समजतो. याचप्रमाणे सूर्य, चंद्र आणि चांदण्या जेंव्हा आपल्याला दिसत नाहीत तेंव्हासुध्दा त्या आभाळाच्या कुठल्या तरी भागात अस्तित्वात असतातच. दिवसा सूर्याच्या प्रखर तेजामुळे आकाशातल्या चांदण्या आपल्याला दिसत नाहीत आणि रात्री जेवढ्या चांदण्या आपल्याला एका वेळी दिसत असलेल्या आकाशाच्या भागात असतात तेवढ्याच त्या वेळी दिसतात. आपण ठरवून रोज एकाच जागेवरून सूर्योदय पहायचे ठरवले तर काल तो जिथे आणि जेंव्हा उगवला होता तिथेच आणि त्याच वेळी तो आज उगवला आहे असे आपल्याला वाटेल. सूर्याचे बिंब आकाशातली थोडीशी जागा व्यापते आणि त्याला जमीनीतून पूर्णपणे वर यायला थोडा अवधी लागतो. काल आणि आज यामधला फरक यांच्या तुलनेत कमी असला तर तो आपल्या लक्षात येत नाही. आपण फक्त दर रविवारी सूर्योदय पाहून त्याची नोंद ठेवायची असे ठरवले तर मात्र मागल्या रविवारच्या मानाने या रविवारी उगवण्याच्या वेळी क्षितिजावरच तो थोडा उजव्या किंवा डाव्या बाजूला सरकला असल्याचे लक्षात येईल. एकदा तो उजव्या बाजूला सरकू लागला की सहा महिने तिकडे सरकत जातो आणि त्याबरोबर उशीराने उगवत जातो. त्यानंतर त्याची उगवण्याची जागा पुढील सहा महिने डाव्या बाजूला सरकत जाते आणि तो लवकर उगवू लागतो असे चक्र चालत राहते. सूर्याच्या मावळण्याची जागासुध्दा अशीच डाव्या किंवा उजव्या बाजूला सरकत जाते, मात्र तो जेंव्हा लवकर उगवतो तेंव्हा उशीरा मावळतो त्यामुळे दिवस मोठा वाटतो आणि उशीराने उगवल्यावर लवकर अस्ताला गेल्यामुळे दिवसाचा काळ लहान होतो.
माध्यान्ही सूर्य आपल्या माथ्यावर येतो. मुंबईला दुपारी सुमारे साडेबारा वाजता तो आकाशातली सर्वात जास्त उंची गांठतो आणि त्यानंतर खाली येऊ लागतो. पण तो आपल्या डोक्याच्या अगदी बरोबर वर क्वचितच येतो. उगवतीकडे तोंड करून वर आकाशाच्या दिशेने पाहिले तर वर्षाच्या बर्‍याचशा काळात तो आपल्याला थोडा उजवीकडे दिसतो आणि थोडे दिवस तो डाव्या बाजूला कललेला वाटतो. भोपाळच्या पलीकडे ग्वाल्हेर किंवा दिल्लीला राहणार्‍या लोकांना वर्षभर रोज तो उजव्या बाजूलाच दिसतो, सकाळी उगवतांना उजवीकडे किंवा डावीकडे कुठल्याही बाजूला सरकला असला तरीसुध्दा माथ्यावर येतायेता तो फक्त उजवीकडेच झुकलेला असतो. सूर्याचे उगवण्याचे ठिकाण, माथ्यावरचा बिंदू आणि मावळण्याची जागा यांना जोडणारी काल्पनिक कमान काढली तर तो त्या दिवशी सूर्याच्या आकाशातल्या भ्रमणाचा मार्ग झाला. बादलीची कडी उचलून थोडी तिरपी धरली तर जशी दिसेल तसा त्याचा आकार असतो. रोजच्या रोज तो किंचित बदलत असतो.
आकाशातल्या सूर्याकडे लक्षपूर्वक पाहणे कठीण असते, तसेच आकाशात कसलीही खूण नसल्यामुळे त्याचा मार्ग नीटसा समजत नाही. पण सूर्याच्या भ्रमणाचे अप्रत्यक्ष रीतीने निरीक्षण करण्यासाठी एक सोपी युक्ती आहे. आपल्या अंगणात किंवा गच्चीवर जिथे दिवसभर ऊन पडते अशा जागी एक हातभर उंचीची काठी उभी करून ठेवली तर तिची सावली जमीनीवर कुठे पडते ते पाहून त्याची नोंद करणे शक्य असते. सकाळी आणि संध्याकाळी आपली सावली लांबवर पडते आणि दुपारी ती लहान होते हे सर्वांना ठाऊक असते, पण तिची दिशा बदलत असल्याचे कदाचित लक्षात येत नसेल. मी दिलेला प्रयोग करून पाहिल्यास काठीची सांवली लहान मोठी होता होतांना घड्याळाच्या कांट्या प्रमाणे त्या काठीभोंवती फिरते हे दिसून येईल. त्या आडव्या सांवलीचे टोक आणि उभ्या काठीचे टोक यांना जोडून एक काल्पनिक रेषा काढली तर सूर्याच्या मार्गाचा अंदाज त्यावरून करता येतो.
चंद्राचे तेज एवढे प्रखर नसल्यामुळे त्याचा आकाशातला मार्ग पाहणे सोपे असेल असे वाटेल. पण दिवसा चंद्र दिसतच नाही आणि रात्री जागून त्याला पहात राहणे कठीण असते. त्याशिवाय सूर्य जसा रोज सकाळी उगवतो आणि सायंकाळी मावळतो तसे चंद्राचे नाही. त्यामुळे त्याचे निरीक्षण करण्यासाठी महिनाभर सुटी घेऊन एकाद्या सोयिस्कर ठिकाणी जाऊन रहायला पाहिजे. पण आपल्याला जेवढे जमते तेवढे पाहिले तरी बरीचशी माहिती मिळू शकते. पौर्णिमेच्या दिवशी एका बाजूला सूर्य मावळत असतो त्याच सुमाराला दुसर्‍या बाजूने पूर्ण गोलाकार चंद्र उगवतो आणि रात्रभर आपल्यावर चांदणे शिंपून दुसरे दिवशीच्या सूर्योदयाच्या सुमाराला त्याच्या विरुध्द बाजूला मावळतो. फक्त याच दिवशी आपण त्याचा उदय व अस्त हे दोन्ही पाहू शकतो. त्याच्या दुसर्‍या दिवशी सूर्य अस्ताला गेला तरी चंद्राचा पत्ताच नसतो. तो सावकाशीने उगवतो आणि रात्रभर आकाशात राहून दुसरे दिवशी उन्हे वर आल्यानंतर मावळतो, पण तोपर्यंत तो अत्यंत फिकट झाला असल्यामुळे आपल्याला नीट दिसत नाही. त्यानंर रोज तो सुमारे पाऊण तास उशीरा उगवत जातो आणि आकाराने लहान लहान होतांना दिसतो. आठवडाभराने पाहिल्यास मध्यरात्रीच्या सुमारास अर्धगोलाच्या आकाराचा चंद्र उगवतो आणि उत्तररात्री प्रकाश देतो. रोज असाच उशीर करता करता आणखी चार पाच दिवस गेल्यानंतर तो सूर्याच्या पुढे असल्यासारखा वाटतो. पहाटे सूर्य उगवण्याच्या आधी उगवलेली चंद्राची कोर सूर्योदयाच्या आधी पूर्वेच्या आकाशात दिसते आणि सूर्याच्या प्रकाशात लुप्त होते. त्यानंतर सूर्य आणि चंद्र साधारणपणे एकाच वेळी उगवतात आणि मावळतात. दिवसा सूर्याच्या उजेडात चंद्र दिसत नाही आणि रात्री तो आभाळात नसतोच. त्यामुळे अवसेची काळोखी भयाण रात्र होते. त्यानंतर चंद्राच्या पुढे गेलेला सूर्य आधी मावळतो आणि त्याच्या अस्तानंतर चंद्राची रेघेसारखी कोर थोडा वेळ दिसून सूर्याच्या पाठोपाठ अस्तंगत होते. चंद्राचे उशीराने आकाशात येणे आणि जाणे चालूच असते. दिवसा तो उगवतो आणि सूर्यास्तानंतर कांही काळ आकाशात राहून मावळतो. या काळात तो आकाराने मोठा होत होत पौर्णिनेला त्याचे पूर्ण बिंब सूर्यास्ताच्या सुमाराला उगवते. हे चक्र चालत राहते. त्यामुळे पौर्णिमा सोडली तर इतर रात्री तो कधी उगवतांना तर कधी मावळतांना दिसू शकतो. तो जेवढा काळ आकाशात दिसतो त्याचे निरीक्षण करून तेवढ्या काळातला त्याचा मार्ग पाहता येतो आणि ती वक्ररेषा वाढवून त्या मार्गाच्या उरलेल्या भागाची कल्पना करता येते.
सूर्याचा आकाशातला मार्ग सूक्ष्म रीतीने रोज बदलतो तर चंद्राचा मार्ग जाणवण्याइतपत वेगाने बदलत असतो. हा मार्ग सुध्दा बादलीच्या तिरप्या कडीच्या आकाराचा असला तरी तो सूर्याच्या मार्गापासून भिन्न असतो. हे दोन्ही मार्ग एकमेकांना छेद देतात, पण सूर्य आणि चंद्र वेगवेगळ्या वेळी आकाशात येत असल्यामुळे त्यांची टक्कर होत नाही. पण कधीकधी ते दोघेही आपापल्या मार्गावरून जातांजातां एकमेकांच्या अगदी जवळ जवळ येतात. काल परवा जर कोणी पहाटे उठून आधी उगवलेला चंद्र आणि नंतर झालेला सूर्योदय पाहिला असेल तर ते दोघेही जवळ जवळ एकाच ठिकाणी क्षितिजावरून वर येतांना दिसले असतील. उद्या २२ जुलैला सकाळी उगवतांना ते दोघेही एकसाथ आणि एकाच जागेवरून उगवतील. त्यातला चंद्र आपल्याला दिसणारच नाही. लहानशा ढगाच्या आड चंद्र लपतो आणि तो ढग बाजूला झाला की चंद्र पुन्हा दिसू लागतो, त्याप्रमाणे चंद्राच्या आड गेल्यामुळे पलीकडे असलेला सूर्याचा कांही भाग झाकला जाईल. सुरुवातीला चंद्र पुढे असल्यामुळे मागून आलेल्या सूर्याचा वरचा भाग त्याच्या आड जाऊन आपल्याला दिसणार नाही. दोघेही क्षितिजापासून वर सरकत असतांना सूर्याचा वेग किंचित जास्त असल्यामुळे हळूहळू त्याचा मधला भाग दिसेनासा होईल. त्यानंतर खालचा भाग झाकला जाईल तेंव्हा वरचा भाग दिसायला लागेल आणि कांही काळानंतर चंद्राच्या बिंबाला पूर्णपणे पार केल्यानंतर सूर्याचे पूर्णबिंब दिसू शकेल. कांही ठिकाणी कांही मिनिटांकरता सूर्य पूर्णपणे झाकला जाणार आहे. वरुणराजाने मेहरबानी करून आकाशातले ढग बाजूला केले तर आपण सगळे हे दृष्य पाहू शकतो.
हे करतांना आपल्या डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते. पूर्वीच्या काळात गडद काळ्या रंगाची जाड भिंगे मिळत नसत. त्यामुळे सूर्याकडे टक लावून पहातांना डोळ्यांना इजा होण्याची शक्यता पाहता सरसकट ग्रहण पाहूच नये असे सांगितले जात असावे. आता आपण डोळ्यांची काळजी घेऊ शकतो आणि आपल्याकडल्या आभाळात ढग आले तरी दुसर्‍या ठिकाणी दिसणारे ग्रहण टेलीव्हिजनवर पाहू शकतो. उद्या दिसणारे सूर्यग्रहण या शतकातले सर्वात मोठे असल्यामुळे पाहून घ्यावे. कांही लोक तर ते पाहण्यासाठी हवेत उड्डाण करणार आहेत आणि त्यासाठी लाख लाख रुपये मोजायला तयार आहेत. आपल्याला एवढी हौस नसली तरी घरबसल्या फुकट दिसणारे हे निसर्गाचे रुपडे पहायला काय हरकत आहे ?

No comments: