Saturday, July 18, 2009

न्यू जर्सी ते न्यूयॉर्क

प्रत्येक देशाची कांही प्रतीके असतात. भारताचा ताजमहाल, इंग्लंडमधले लंडनचे बिगबेन घड्याळ, फ्रान्सचा आयफेल टॉवर वगैरे. यांपेक्षाही भव्य, सुंदर आणि आकर्षक वास्तू नंतर बांधल्या गेल्या असल्या तरी या ऐतिहासिक काळातील प्रतीकांची जागा त्या घेत नाहीत. याचप्रमाणे न्यूयॉर्कमधला स्वातंत्र्यदेवीचा पुतळा हे तेथील सर्वाधिक प्रसिध्द प्रेक्षणीय स्थळ आहे. ते पाहिल्याखेरीज अमेरिकेची वारी केल्यासारखे वाटत नाही. म्हणूनच आगामी हिंवाळ्याचा विचार करता अमेरिकेला पोचताच आधी स्वातंत्र्यदेवतेचे दर्शन घेण्याचा बेत आम्ही केला. शनिवारी न्यूजर्सीला पोचून तिथे मुक्काम करायचा आणि रविवारी जिवाचे जमेल तेवढे न्यूयॉर्क करून सोमवारी तिकडचा इतर भाग पाहण्यासाठी प्रस्थान करायचे असा सर्वांच्या सोयीचा बेत ठरला. त्यानुसार आम्ही शनिवारी न्यूजर्सीमधल्या पार्सीपेन्नी या गांवाला पोचून थोडा आराम केला. त्या वेळेला हवेत चांगलाच गारवा असला तरी वातावरण प्रसन्न होते. अंगावर भरपूर गरम कपडे चढवून संध्याकाळी गावात एक फेरफटका मारला. आभाळात थोडे ढग दिसत असले तरी त्यांनी त्या वेळी दोन शिंतोडेसुध्दा उडवले नाहीत.

न्यूयॉर्कमध्ये फिरण्यात जास्तीत जास्त वेळ घालवावा म्हणून घड्याळात गजर लावून भल्या पहाटे उठून बसलो. घट्ट बंद केलेला दरवाजा, जाड कापडाच्या पडद्यांआड झांकलेल्या खिडक्या आणि कृत्रिम उबदार हवेचा पुरवठा यामुळे घराच्या बाहेर काय चालले आहे याचा पत्ता लागत नव्हता. तरी सुध्दा बाहेर चाललेले निसर्गाचे संगीत ऐकू येत होते. दरवाजा थोडासा किलकिला करून पाहिले तर बाहेर जोराचा पाऊस पडत होता, झाडांची पाने वा-याने नुसती सळसळत नव्हती, ती फडफडत होती आणि थंडगार हवेचा जो धारदार झोत दाराच्या फटीतून आत आला तो सगळ्या गरम कपड्यांना पार करून थेट हाडांपर्यंत जाऊन पोचला आणि त्यांना त्याने गोठवून टाकले. या असल्या भयानक हवेत आम्ही कसले उघड्यावर फिरणार होतो? पटकन दरवाजा लावून घेतला आणि उबदार पांघरुणात घुसलो.

आमची झोप तर चाळवलेली होती. वेळ घालवण्यासाठी टेलिव्हिजन लावला. तिकडचे कोणतेच चॅनल ओळखीचे नव्हते, त्यामुळे रिमोटशी चाळा करत राहिलो. त्यातले एक चॅनेल फक्त 'वेदर' ला वाहिलेले होते. त्यात अमेरिकेतील शहरे, संस्थाने, निरनिराळे देश आणि पृथ्वीच्या पाठीवरील सगळ्या ठिकाणचे हवापाणी क्रमाक्रमाने दाखवत होते. ते पाहतांना जगाच्या नकाशाची उजळणी होत होती. न्यूयॉर्कला त्या वेळी पाऊस पडत असला तरी दिवसभर तेथील हवामान फक्त ढगाळ राहील आणि पावसाच्या एक दोन सरी कदाचित पडतील असे भविष्य ऐकून धीर आला. आजकाल वातावरणाचा अंदाज हा तिकडे विनोदाचा विषय राहिलेला नाही आणि उपग्रहांवरून घेतलेली ताजी छायाचित्रे दाखवत असल्यामुळे त्यांच्या अंदाजावर विश्वास बसतो. तरीही आमच्या उत्साहावर बाहेरच्या पावसाचे थंडगार पाणी पडत असल्यामुळे शरीराच्या हालचाली संथगतीनेच होत होत्या. हळूहळू सकाळची आन्हिके आटोपली, बाहेर हॉटेलात ब्रेकफास्ट घ्यायचा आधीचा बेत बदलून घरीच नाश्ता केला. त्यातला एक एक पदार्थ तोंडभर तारीफ करत चवीने खाल्ला. तोंपर्यंत पाऊस पूर्णपणे थांबला होता आणि ऊन पडले नसले तरी बाहेर चांगला उजेड झाला होता. त्यामुळे अंगात उत्साह आला. सगळे लोकरीचे कपडे अंगावर चढवले, दिवसभरात लागू शकणा-या अत्यावश्यक गोष्टी झोळ्यात भरून घेतल्या आमि न्यूयॉर्कदर्शनाला निघालो.

न्यूजर्सी स्टेटच्या त्या भागातून न्यूयॉर्ककडे जाणारा एकच रूट आहे. अतिजलद गतीने जाणा-या वाहनांसाठी मोठमोठे महामार्ग आहेत, त्यावरून बसेस जात नाहीत. दाट वस्तीतून जाणा-या एका मध्यम आकाराच्या रस्त्याने गांवोगांवच्या प्रवाशांना गोळा करत ही न्यूयॉर्कची बस जाते. पार्सिपेन्नीच्यातारूंसाठी असलेला थांबा आमच्या निवासस्थानापासून सुमारे दोन किलोमीटर दूर होता. अमेरिकेतले लोक एवढे लांब अंतर पायी चालण्याचा विचारसुध्दा मनात आणत नाहीत. बहुतेक जागी रस्त्याच्या कडेला फुटपाथही नसतात. त्यामुळे बाजूला सुसाट वेगाने वाहने जात असतांना त्या रस्त्यांच्या कडेने चालण्याची आमची हिंमत झाली नसती. वाशीत असतो तसा ऑटोरिक्शांचा सुळसुळाट तिकडे नसतो. हे वाहन एकाद्या प्रदर्शनात पहायला ठेवले असले तरच तिथे कदाचित दिसेल. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर भरपूर टॅक्सी दिसत असल्या तरी पारसीपेन्नीहून तिकडे टॅक्सीने जाणे परवडण्याच्या पलीकडे होते. एक तर त्यासाठी आधी फोन करून टॅक्सीवाल्याची अॅपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि त्याचे भाडे विमानाहून जास्त असते. त्यामुळे सौरभने आपली कार काढली आणि आमचा प्रवास सुरू झाला.

या भागातल्या रस्त्यांवरील बहुतेक बसस्टॉप्सच्या मागे एक पार्किंग लॉट असतो. शहरात कामासाठी जाणारे बरेच लोक या 'पार्क अँड राइड' सेवेचा लाभ घेतात. रविवारचा दिवस असल्यामुळे त्यांची गर्दी नव्हती, त्या दिवशी बाहेर पडलेले बहुतेक प्रवासी हे आमच्यासारखे पर्यटकच असावेत. आम्ही गेलो त्या बसस्टॉपपाशी एक फुटबॉलचे मैदान आहे. आम्ही तिथे पोचण्याच्या आधीच कांही उत्साही मंडळींनी तिथल्या चिखलात चेंडूबरोबर लाथाळी सुरू केली होती. तो सामना नसल्यामुळे खेळाडूंचे गणवेश आणि शिटी फुंकत पळणारे रेफरी नव्हते, तसेच प्रेक्षकही नव्हते. त्यामुळे पार्किंग लॉटमध्ये भरपूर रिकामी जागा होती. पावसाची सर आलीच तर झाडांच्या आडोशाने बसस्टॉपपर्यंत धावत जाता यावे या दृष्टीने सोयिस्कर अशी जागा पाहून सौरभने आपली गाडी उभी केली आमि आम्ही बसस्टॉपवर आलो.

तिथे आमच्याखेरीज आणखी चारपांचच लोक असतील. बस शेजारच्याच गांवातून निघाली असल्यामुळे जवळ जवळ रिकामी होती. हे अपेक्षित असले तरी पाहून हायसे वाटले. तिकडे बसमध्ये कंडक्टर नसतोच. बसमध्ये चढण्या व उतरण्यासाठी पुढच्या बाजूने एकच दरवाजा असतो. बस थांबल्यानंतर ड्रायव्हर तो उघडतो, आत आलेल्या प्रवाशांना तोच तिकीटे देतो आणि बसल्या जागेवरून एक बटन दाबून दरवाजा करून बस सुरू करतो. तिकीट देण्यासाठी एक यंत्र होते. बहुतेक प्रवासी त्यात आपले क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वॅप करून स्वतःच आपले तिकीट काढतात. त्यामुळे ड्रायव्हरकडे फारसा गल्ला नसतो आणि मोठी नोट दिल्यास पैसे परत न मिळण्याची शक्यता असल्यामुळे तिकीटाची नेमकी रोख रक्कम देणे शहाणपणाचे असते. हे सगळे पहात आम्हा आत चढलो आमि अक्षरशः लहान पोराप्रमाणे धांवत जाऊन खिडकीजवळच्या जागा पकडल्या. पुढील दोन तीन स्टॉप्सनंतर मात्र बसमधली सर्व आसने भरली गेली आणि त्यापुढे आलेल्या प्रवाशांना उभे रहावे लागले.

आमची बस एस्टी किंवा बेस्टच्या बशींपेक्षा थोडी चांगली होती, पण व्होल्होइतकी आरामशीर नव्हती. तासभराच्या प्रवासासाठी ठीक होती एवढेच. रस्त्यांवर दुतर्फा दुकाने, घरे, बगीचे, चर्चेस वगैरे दिसत होते. अशा प्रकारच्या इमारती याआधी पाहिलेल्या असल्या तरी पुन्हा पाहतांना मजा वाटत होती. मध्येच एकादा उड्डाणपूल किंवा भुयार लागत असे. भुयारातून बाहेर पडल्यानंतर वेगळेच दृष्य दिसत असे. दूरवर गगनचुंबी इमारतींचे जंगल दिसायला लागल्यानंतर आपण न्यूयॉर्कला पोचलो असल्याचे लक्षात आले. थोड्याच वेळात आमची बस एका प्रचंड इमारतीच्या पोटात घुसून उभी राहिली. ती जमीनीच्या खालून तिथे गेली की उंचावरून थेट दुस-या तिस-या मजल्यावर गेली तेसुध्दा त्या घाईत समजले नाही. सगळ्या प्रवाशांच्या पाठोपाठ आम्ही सुध्दा उतरलो. ते अख्खे बसस्टेशन एका महाकाय इमारतीच्या पोटात असल्यामुळे आम्ही नेमके कुठे आहोत ते कांही समजत नव्हते.

No comments: