Saturday, July 11, 2009

जन्मतारीख - भाग ३


एकदा गणेशोत्सवासाठी पुण्याला गेलो होतो, पण तो संपल्यानंतर माझा वाढदिवसही तिथेच साजरा करून मुंबईला परतायचा आग्रह माझ्या मुलाने धरला म्हणून तिथला मुक्काम आणखी वाढवला. वाढदिवस कसा साजरा करायचा यावर चर्चा सुरू झाली. त्या दिवशी सर्वांनी महाबळेश्वरला जाऊन येण्याचा एक प्रस्ताव समोर आला तसेच त्या दिवशी शिरडीचा जाऊन यायचा दुसरा. महाबळेश्वरला किंवा कोठल्याही थंड हवेच्या ठिकाणी गेल्यास तिथल्या रम्य निसर्गाची सकाळपासून संध्याकाळपर्यंत बदलत जाणारी रूपे पाहून घ्यायला हवीत, तिथली अंगात शिरशिरी आणणारी रात्रीची थंडी अनुभवायला पाहिजे तसेच सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांचा उबदारपणा जाणून घ्यायला हवा, शुद्ध हवा फुफ्फुसात भरून घ्यायला पाहिजे तसेच निसर्गाचे संगीत कानात साठवून घ्यायला हवे. हे सगळे करण्यासाठी पुरेसा निवांत वेळ द्यावा लागतो. धांवत पळत कसेबसे तिथे जाऊन पोचायचे आणि भोज्ज्याला शिवल्यागत करून घाईघाईने परत फिरायचे याला माझ्या लेखी कांही अर्थ नाही. शिरडीला हल्ली भक्तवर्गाची भरपूर गर्दी असते म्हणतात. त्यात सुटीच्या दिवशी तर विचारायलाच नको. तिथेही धांवतपळत जाऊन उभ्या उभ्या दर्शन घेऊन लगेच परत फिरावे लागले असते. मला साईनाथापुढे कसले गा-हाणे गायचे नव्हते की मागणे मागायचे नव्हते. त्यापेक्षा "मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ।। " असे म्हणणे मला अधिक श्रेयस्कर वाटते.

अशा कारणांमुळे मी दोन्ही प्रस्तावांना संमती दिली नाही. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काय करायचे ते ठरवण्याचा माझा हक्क इतरांना मान्य करावाच लागला. पुण्याच्या वेशीच्या अगदी आंतबाहेरच कांही निसर्गरम्य विश्रांतीस्थाने (रिसॉर्ट्स) बांधली गेली आहेत असे ऐकले होते. त्यातल्याच एकाद्या जागी जावे, दिसतील तेवढ्या वृक्षवल्ली पहाव्यात, सोयरी वनचरे दिसण्याची शक्यता कमीच होती पण पक्ष्यांच्या सुस्वर गायनाचा नाद ऐकून घ्यावा आणि एक दिवस शांत आणि प्रसन्न वातावरणात घालवावा असा प्रस्ताव मी मांडला आणि सर्वानुमते तो संमत झाला.

दोन ऑक्टोबरचा दिवस उजाडल्यानंतर प्रत्यक्षात मात्र त्या दृष्टीने कोणीही कसलीही हालचाल करतांना दिसला नाही. "ऑफिस आणि शाळांच्या वेळा सांभाळायची दगदग तर रोजचीच असते, सुटीच्या दिवशी तरी त्यातून सुटका नको कां?" अशा विचाराने घरातले सगळे लोक उशीरापर्यंत अंथरुणात लोळत पडून राहिले. शिवाय "सुटीच्या दिवशी लवकर उठायची घाई नाही" म्हणून आदल्या रात्री सिनेमे वगैरे पहात जरा जास्तच जागरण झाले होते आणि जास्त वेळ झोपून राहण्यासाठी एक भूमिकासुद्धा तयार झाली होती. एकेकजण उठल्यानंतर त्यांची नित्याची कामेसुद्धा संथपणे चालली होती. घरकाम करणा-या बाईला याची पूर्वकल्पना असावी किंवा तिच्या घरीसुद्धा संथगतीची चळवळ (गो स्लो) सुरू असावी. माध्यान्ह होऊन गेल्यानंतर ती उगवली. ज्या वाहनचालकाच्या भरंवशावर आमचे इकडे तिकडे जाण्याचे विचार चालले होते तो तर अजीबात उगवलाच नाही. त्याने सार्वत्रिक सुटीचा लाभ घेतला असावा. वेळेअभावी रेंगाळत ठेवलेली घरातली कांही फुटकळ कामे कोणाला आठवली तसेच कांही अत्यावश्यक पण खास वस्तूंची खरेदी करायला तोच दिवस सोय़िस्कर होता. एरवी रविवारी दुकाने बंद असतात आणि इतर दिवशी ऑफीस असते यामुळे ती खरेदी करायची राहून जात होती. माझ्याप्रमाणेच माझ्या मुलालाही पितृपक्षाचे वावडे नसल्यामुळे खरेदी करण्याची ही सोयिस्कर संधी त्याने सोडली नाही.

महात्मा गांधीजींच्या जन्मदिवशी त्यांनी सांगितलेली शिकवण थोडी तरी पाळायला हवी. शिवाय वाढदिवसाच्या दिवशी शहाण्यासारखे वागायचे असे संस्कार माझ्या आईने लहानपणीच मनावर केले होते. कुठेतरी जाऊन आराम करण्यासाठी आधी घरी घाईगर्दी करायला कोणाला सांगणे तसे योग्य नव्हतेच. त्यामुळे मी आपले कान, डोळे आणि मुख्य म्हणजे तोंड बंद ठेऊन जे जे होईल ते ते स्वस्थपणे पहात राहिलो. वेळ जाण्यासाठी मांडीवरल्याला (लॅपटॉपला) अंजारत गोंजारत गांधीजयंतीवर एक लेख लिहून काढला आणि तो ब्लॉगवर चढवून दिला.

अखेर सगळी कामे संपवून आणि सगळ्यांनी 'तयार' होऊन घराबाहेर पडेपर्यंत संध्याकाळ व्हायला आली होती. यानंतर त्या रिसॉर्टपर्यंत पोचल्यानंतर काळोखात कुठल्या वृक्षवल्ली दिसणार होत्या? त्या रम्य आणि वन्य जागी रात्री खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था असते की नाही ते नक्की माहीत नव्हते. त्याऐवजी थोडा वेळ इकडे तिकडे एखाद्या बागबगीचात फिरून जेवायला चांगल्या हॉटेलात जाण्यावर विचार झाला. पण माझी पुण्याबद्दलची माहिती चाळीस वर्षांपूर्वीची होती. कॉलेजला असतांना आम्ही ज्या उपाहारगृहांना आवडीने भेट देत होतो त्यातली डेक्कन जिमखान्यावरील 'पूनम' आणि 'पूना कॉफी हाउस', टिळक रस्त्यावरील 'जीवन', शनीपाराजवळील 'स्वीट होम ' अशी कांही नांवे अजून स्मरणात असली तरी आतापर्यंत ती हॉटेले टिकून आहेत की काळाच्या किंवा एकाद्या मॉलच्या उदरांत गडप झाली आहेत ते माहीत नव्हते. आजही ती चालत असली तरी त्यांचे आजचे रूप कसे असेल ते सांगता येत नव्हते. पुण्यात नव्यानेच स्थाईक झालेल्या माझ्या मुलाच्या कानांवर तरी ती नांवे पडली होती की नाही याची शंका होती. गेल्या चार दशकांच्या काळात तिथे कितीतरी नवी खाद्यालये उघडली आणि नांवारूपाला आली असली तरी माझा मुलगा मुख्य गांवापासून दूर वानवडीला रहात असल्यामुळे त्याला याबद्दल अद्ययावत माहिती नव्हतीच. त्यातून पुण्याला आल्यावर पहिल्याच आठवड्यात आम्ही एका नव्या उपाहारगृहात जाऊन स्पॅघेटी, मॅकरोनी, सिझलर वगैरेंच्या हिंदुस्थानी आवृत्या खाऊन आलो होतो. त्यानंतर गणेशोत्सवात डेक्कन जिमखान्यावरील श्रेयस हॉलमध्ये मराठी जेवणाचा महोत्सव चालला होता. त्याला भेट देऊन तळकोकणापासून महाविदर्भापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या खास खाद्यपदार्थांचा समाचार घेऊन आलो होतो. त्यामुळे आता आणखी वेगळा कोणता प्रकार चाखून पहावा असा प्रश्न पडला. अखेरीस एका राजस्थानी पद्धतीच्या आधुनिक रिसॉर्टला भेट देण्याचे निश्चित झाले. त्याचे नांव होते "चोखी ढाणी."

. . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: