त्या चिरस्मरणीय दिवसाला आता बरोबर तीन वर्षे होऊन गेली असली तरी तो अजून काल परवा होऊन गेल्यासारखा वाटतो. त्या दिवसाची आठवण त्या काळी लिहिलेल्याच शब्दात देत आहे.
समजा एकादा माणूस महिना दीड महिना गंभीर आजाराने अंथरुणाला खिळून आहे, त्यातून सावरतांना त्याच्या एका हाताने भिंतीला धरून हळू हळू एक एक पाऊल टाकीत बेडरूमपासून दिवाणखान्यापर्यंत धडपडत येण्याचे सुध्दा एखाद्या वर्षभराच्या बाळाने केलेल्या प्रगतिसारखे तोंड भरभरून कौतुक होते आहे, जागीच बसल्या बसल्या कांही करावे म्हंटले तर दीड महिन्यापासून त्याच्या कॉंप्यूटरनेही दगा दिला आहे, अशा परिस्थितीत त्याचा एक संपूर्ण दिवस अतिशय धामधुमीचा गेला असे होऊ शकेल? काल माझ्या बाबतीत अगदी अस्संच झालं.
कालचा दिवस थोडा वेगळा होताच, काल गुरुपौर्णिमा होती. मला जरी कोणी गुरु मानत नसले तरी काय झालं, मी तर अनेक लोकांना आपले चेले समजतो आणि जमले तर प्रत्यक्ष भेटीत नाहीतर निदान फोनवर तरी त्यांना अनाहूत सल्ले द्यायचे सत्कार्य अधून मधून करीतच असतो. पण काल मात्र या कामासाठी माझा फोनच मुळी माझ्या हाती लागत नव्हता. त्याचं काय आहे की माझ्या सौभाग्यवती परंपरांना जिवापाड जपणा-या संगीताच्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे आजी व माजी गुरु, गुरुबंधू, गुरुभगिनी, शिष्यवर्ग, कदाचित शिष्यबंधुभगिनीसुद्धा असतील, या सर्व लोकांबरोबर दिवसभर त्यांची उभयपक्षी फोनाफोनी होत राहिली. योगायोगाने कालच माझ्या धांकट्या मुलाचा वाढदिवस होता व तो दीड वर्षानंतर नुकताच सुटीवर मायदेशी आलेला. त्यामुळे या निमित्ताने त्याचे अभीष्टचिंतन करून त्याच्याबरोबर दीड वर्ष सांचलेल्या मनसोक्त गप्पागोष्टी करण्यांत आमच्या नातलगांची अहमहमिका लागलेली होती. या सर्वांकडून माझ्या तब्येतीची चौकशी सुद्धा व्हायची. त्यामुळे त्यांचेबरोबर माझेही मधून मधून फोनवर बोलणे व्हायचेच. एकूण सांगायचे तात्पर्य म्हणजे आमचा फोन दिवसभर सतत गुंतलेला होता. त्यामुळे माझे सगळेच चेले मात्र माझ्या तांवडीत न सांपडता बचावले.
माझ्या प्रकृतिअस्वास्थ्याचा विचार करतां मुलाच्या वाढदिवसाला या वर्षी आम्हा सर्वांना कुठे बाहेर जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे घरीच मेजवानी करून आपल्या परीने तो साजरा करणे क्रमपात्र होते. शिवाय अगदी घरच्यासारखे असलेले आप्तेष्ट या वेळी घरी भेटायला येणार हे नक्की होते. त्यांचे तोंड गोड करायला पाहिजे हे ओघाने आलेच. त्यामुळे सर्वांशी सविस्तर विचारविनिमय करून सर्वांच्यासाठीच चांगले स्वादिष्ट, सात्विक व पौष्टिक तसेच तबेतीसाठी सुरक्षित असे अन्नपदार्थ निवडून ते कोठकोठून मागवायचे, आणावयाचे किंवा बनवायचे याचे नियोजन केले गेले.
दीड महिना इंटरनेट न पाहिल्याने त्यासाठी बोटे शिवशिवत होती. कांहीही करून आपला संगणक कार्यान्वित करायचा आणि आपण वर्षारंभाला सुरू केलेल्या ब्लॉगवर तो मृत कॅटेगरीमध्ये घोषित होण्यापूर्वीच गुरुपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर त्यावर पुढचा भाग लिहायचाच असा निर्धार मी केला होता. त्यासाठी एका संगणकतज्ञाचा फोनवरूनच पिच्छा पुरवला होता. दोन तीन वेळा त्याचे तंत्रज्ञ येऊन पाहून गेले होते. पण दर वेळी त्यांना एखाद्या चिप किंवा कार्डामध्ये कांही ना कांही दोष आढळायचा व ते स्पेअरमध्ये आहेत कां याची चौकशी ते करायचे, कधी खोडरबर, कधी ब्लेडचे पाते तर कधी प्लायर मागायचे. शेवटी मी वैतागून त्यांच्या मालकाला झाडले आणि मी कांही कॉंम्प्यूटरचा वर्कशॉप चालवीत नाही याची आठवण त्याला करून दिली. माझ्याकडे वाटले तर माझे आयडेंटिटी कार्ड मिळेल, एखादे क्रेडिट कार्ड असेल, झालेच तर रेशन कार्ड असेल पण कॉंप्यूटराचे कार्डस मी कशाला जवळ ठेवीन? तसेच, वाटले तर अंकल चिप्स किंवा लेहर कुरकुरे शेजारच्या वाण्याकडून मागवून घेईन पण कॉंप्यूटरमधल्या मायक्रोचिप्स कशाशी खातात ते इथे कुणाला माहीत आहे?
या वेळी मात्र ते लोक हांतातल्या बॅगेत अनेक प्रकारचे सुटे भाग व विविध हत्यारे, एक नवीन की बोर्ड आणि नवे कोरे स्कॅनर कम प्रिंटर कम झेरॉक्स मशीन वगैरे सगळे घेऊन आले हे पाहून मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. मला माझ्या नोकरीमधील पहिला दिवस आठवला. त्या दिवशी मी ऑफीसच्या कॉमन हॉलमध्ये कुठेतरी टेकायला सोयिस्कर जागा मिळते कां या शोधांत होतो, पण कागदपत्रांच्या फक्त कृष्णधवल नक्कला देऊ शकणा-या एका बोजड झेरॉक्स मशीनने मात्र एक आलीशान एअरकंडीशन्ड खोली व्यापलेली होती. तिथे अनुज्ञेशिवाय कोणालाही प्रवेश सुद्धा मिळत नव्हता. त्या काळी रस्तोरस्ती कॉपियर्सचे पेव फुटलेले नव्हते आणि अशा प्रकारचे यंत्र असू शकते हेच मुळी लोकांना माहीत नव्हते. त्यामुळे आमच्या ऑफीसांत असे अद्ययावत इम्पोर्टेड मशीन आहे हे किती तरी दिवस मी फुशारकी मारून अज्ञ लोकांना सांगत होतो. आणि आज त्यापेक्षा कितीतरी सुधारलेले बहुगुणी पण छोटेसे यंत्र चक्क माझ्या घरांतल्या टेबलावर विसावणार होते. पण इतकी जय्यत तयारी करून सुद्धा शेवटी माझा दोन अडीच वर्षे जुना संगणक व ते आधुनिक यंत्र यांच्या कुंडल्या कांही जुळल्या नाहीत. सरतेशेवटी मोठ्या कष्टी मनाने मी त्या मेकॅनिकांना ते दोन्ही उचलून आपल्या कार्यशालेत नेऊन तिथेच हा घोळ सोडवायला सांगितले. पण माझ्या निर्धाराचे काय? शरीर व्याधीग्रस्त असले तरी मनाची उभारी अजून शाबूत होती. उलट ते अधिकच हट्टी झाले होते. मुलाने केवळ त्याच्या महत्वाच्या सॉफ्टवेअरच्या कामासाठी खास राखून ठेवलेला त्याचा लॅपटॉप मागून घेतला. त्या संगणकाला फक्त आंग्लभाषा अवगत होती आणि त्याला मराठी कशी शिकवावी हे मला माहीत नव्हते. त्यामुळे गुरुपौर्णिमेबद्दल इंग्रजीमध्येच चार वाक्ये लिहून काढली.
ब्लॉगवर जेमतेम चार वाक्ये लिहून होत असतांनाच पुन्हा एकदा टेलीफोन खणखणला. या वेळेस पुण्याला ऑफीसच्या कामासाठी गेलेल्या मोठ्या मुलाचे कातर आवाजातील हॅलो कानी आले. आम्ही केंव्हापासून आतुरतेने त्याच्या परतीची वाट पहात होतो. कदाचित थोड्याच वेळांत आपण पोचत आहोत, येतांना बाजारातून कांही आणायचे आहे कां असे त्याला विचारायचे असेल असे आधी वाटले. पण असा कातर आवाज कां? त्याने अतिशय अधीर स्वरांत मुंबईतील सद्यपरिस्थितीची चौकशी केली. मला कांहीच उमजेना. कारण या सगळ्या गडबडीत रोज टेलीव्हिजन समोर ठिय्या मारून बसणा-या मला या वेळेस त्याची आठवण सुद्धा झाली नव्हती व त्यामुळे घराबाहेर आजूबाजूला काय चालले होते याचे यत्किंचित भान नव्हते. लगेच सा-या जणांनी टी.व्ही.समोर धांव घेतली. कांही मिनिटांपूर्वी मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये झालेल्या बॉंबस्फोटांच्या मालिकेची ब्रेकिंग न्यूज व त्याची हृदयद्रावक दृष्ये सगळ्या चॅनेल्सवर दिसत होती.
या धक्क्यामधून भानांवर येऊन कांही उत्तर देण्याआधीच टेलीफोनचा संपर्क तुटला होता. माझा मुलगा या क्षणी कुठे आहे हे सुद्धा समजले नव्हते. त्याने कोठल्या तरी अनोळखी नंबरावरून, बहुतेक कुठल्या तरी अनोळखी गांवातील बूथवरून फोन लावला असावा असे कॉलर आयडी वर दिसणा-या आंकड्यावरून दिसत होते. त्यानंतर पुन्हा कांही त्याचेबरोबर संपर्क जुळत नव्हता. पुणे मुंबई रस्ता पश्चिम रेल्वेपासून खूपच दूर अगदी वेगळ्या वाटेला आहे हे समजत होते. पण अशी मोठी घटना एका ठिकाणी होऊन गेल्याचा धक्काच इतका जबरदस्त होता की याच वेळी इतर ठिकाणी काय काय चालले असेल याची चिंता वाटत होती. शिवाजी पार्कवर घडलेल्या एका वाईट घटनेचे ठाणे कल्याण डोंबिवलीपर्यंत उमटलेले तीव्र प्रतिसाद दोनच दिवसापूर्वी पाहिले होते. पण आता मुलाच्या परतण्याची अधीरपणे वाट पहात बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तो सुखरूपपणे घरी येऊन पोचल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.
त्या आधीच हातात टेलीफोन नंबरांची वही घेऊन मुंबईतील आप्तेष्टांना फोन लावणे सुरू झाले होते. आमचे कांही जवळचे आप्त मुंबईच्या पश्चिम उपनगरांत रहात होते तर कांहीजण कामासाठी रोज तेथे जायचे. त्या सर्वांची काळजी होती. पण बहुतेक ठिकाणी फोन लागतच नव्हते. कदाचित टेलीफोन सिस्टिम्स जॅम असतील किंवा वाहतूक बंद पडल्याने ते लोक वेळेवर घरी पोचले नसतील असा विचार करून पुढला नंबर फिरवायचा. मध्येच एकादा नंबर लागायचा किंवा दुस-या कोणाचा तरी फोन यायचा. धडधडत्या अंतःकरणाने बोलल्यावर त्याच्या कडून तिस-या कोणाची खुषाली कळायची. त्यातून थोडासा रिलीफ मिळायचा. असे करीत करीत रात्री उशीरापर्यंत आपले बहुतेक सर्व लोक सुखरूप असल्याचे कळून जीव भांड्यात पडला. देवाच्या कृपेने आपण यातून कसे थोडक्यांत बचावलो याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी कहाणी होती.
वाढदिवसाच्या घरगुती समारंभाची सगळी तयारी आधीपासून केलेली होती, सगळे खाद्यपदार्थ घरी आले होते व सारी अपेक्षित मंडळीही थोडी उशीरा कां होईना पण एकत्र जमली होती. ती येईपर्यंत त्यांची वाट पाहणे आवश्यक होतेच, समारंभ साजरा करण्याच्या मनःस्थितीत कोणीही नव्हते. पण परिस्थितीचे आकलन न झाल्यामुळे केक कांपायची घाई करणा-या बाळगोपाळांना आवर घालणे कठीण होत होते. यामुळे अखेर त्या समारंभाची औपचारिकता कशीबशी पूर्ण करून टाकावी लागली.
शेवटी झोपतांना मनांत विचार आला, "कसला हा दिवस? अनेक लोकांबरोबर शुभेच्छा, अभीष्टचिंतन यांचे आदान प्रदान व हंसत खेळत गप्पागोष्टी, अंगांत त्राण नसतांना निव्वळ उत्साहापोटी केलेली केवढी मोठी हालचाल, आशा निराशा यांचा लपंडावाचा खेळ, मन उद्विग्न करणा-या भयानक घडामोडी, हृदयद्रावक दृष्ये पाहून झालेले दारुण दुःख, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी चिंता, शेवटी त्यातून मुक्ती, आधी मोठ्या हौसेने ठरवलेला पण मन घट्ट करून कसाबसा आटोपून घेतलेला एक औपचारिक समारंभ, इतक्या सगळ्या गोष्टी एकांच दिवसांत घडाव्यात ?"
1 comment:
सुंदर शब्दांकन आहे. खरे आहे, सकाळपासून रात्रीपर्यंत किती घटना, विचार घडत गेले.काही गोष्टी कोणाच्याच हातात नसतात हेच खरे आहे.
Post a Comment