Saturday, July 11, 2009

जन्मतारीख - भाग २


शालांत परीक्षा पास झाल्यानंतर शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र शाळेकडून मिळाले. त्यात माझे जन्मस्थान आणि जन्मतारीख या दोन्हींची नोंद होती. जन्मतारीख वाचल्यावर मी तर टाणकन उडालो. दोन ऑक्टोबर ! म्हणजे गांधीजयंती ! इतके दिवस मला हे कुणीच कसे सांगितले नाही? माझ्या जन्माच्या आधीच गांधीजी महात्मा झाले असले तरी पारतंत्राच्या त्या काळात त्यांच्या जन्मतारखेला कदाचित इतके महात्म्य आले नसेल. त्या दिवशी सुटी असणे तर शक्यच नव्हते. त्यामुळे ते त्या वेळेस कोणाच्या ध्यानात आलेच नसेल किंवा नंतर कधी जन्मतारखेचा विषयच न निघाल्याने हा योगायोग सगळे विसरून गेले असतील. वाढदिवसासाठी तिथीलाच महत्व असल्याकारणाने "आपली दुर्गी अष्टमीची" किंवा "पांडोबा आषाढी एकादशीचे" असल्या गोष्टींचा बोलण्यात उल्लेख होत असे, पण जन्मतारखेच्या बाबतीत तसे होत नसे.

दर वर्षी दोन ऑक्टोबरला आमच्या शाळेला सुटी तर असायचीच, शिवाय सूतकताई, सभा, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे गोष्टी शाळेत होत असत. त्यात गांधीजींच्या जीवनातल्या विविध प्रसंगावरील नाटुकल्या होत, निबंध किंवा वक्तृत्वाच्या स्पर्धा ठेवल्या जात, "ती पहा ती पहा बापूजींची प्राणज्योती । तारकांच्या सुमनमाला देव त्यांना अर्पिताती ।।" यासारख्या कविता आणि "सुनो सुनो ऐ दुनियावालों बापूजीकी अमर कहानी" यासारखी गाणी म्हंटली जात असत. त्याच दिवशी माझीसुद्धा 'जयंती' आहे हे सांगून मला केवढा भाव मिळवता आला असता ! पण आता त्याचा काय उपयोग?

शाळेत असेपर्यंत मी हॉटेलची पायरीसुद्धा चढलेली नसली तरी हॉस्टेलमध्ये गेल्यावर तीन्ही त्रिकाळच्या खाण्यासाठी मेसवरच विसंबून होतो. तिथला आचारी कुणाकुणाच्या वाढदिवसाला त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करणार? शिवाय हाताशी पंचांगच नसल्यामुळे आपली जन्मतिथी कधी येऊन गेली तेसुद्धा कळायला मार्ग नव्हता. माझी जन्मतारीख मला आता समजली होती, पण त्याचा एवढा उपयोग नव्हता. तारखेनुसार वाढदिवस साजरा करण्याचा प्रघात अजून अंगात मुरला नव्हता. माझ्या मित्रमंडळातली सगळीच मुले लहान गांवांतून आलेली होती. त्यांच्या घरी खायलाप्यायला मुबलक मिळत असले, त्यात कसली ददात नसली तरी शहरातल्या खर्चासाठी पैसे उचलून देण्यात अडचणी होत्या. त्यामुळे शिक्षण आणि जीवन यांसाठी लागणा-या आवश्यक गोष्टी मिळवता मिळवताच नाकी नऊ येत असत. चार मित्रांना सोबत घेऊन त्यांना सिनेमा दाखवणे किंवा आईस्क्रीमची ट्रीट देणे हा चैनीचा किंवा उधळपट्टीचा अगदी कळस झाला असता. अशा परिस्थितीत कोणीही 'बर्थडे पार्टी ' कुठून देणार. तोपर्यंत तसा रिवाजच पडला नव्हता. त्यामुळे फार फार तर एकाद्या जवळच्या मित्राला बरोबर घेऊन माफक मौजमजा करण्यापर्यंतच मजल जात होती.

मुंबईला बि-हाड थाटल्यानंतर मुलांचे वाढदिवस मात्र तारखेप्रमाणेच आणि हौसेने साजरे करायला सुरुवात झाली. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे रंगीबेरंगी पताका भिंतीवर लावणे, फुगे फुगवून टांगणे वगैरे करून दिवाणखाना सजवला जायचा. केकवर मेणबत्त्या लावणे, सगळ्यांनी कोंडाळे करून 'हॅपी बर्थडे'चे गाणे म्हणणे, मेणबत्त्यांवर फुंकर घालून केक कापणे इत्यादी सोपस्कार सुरू झाले. बिल्डिंगमधली आणि जवळपास राहणारी बच्चेमंडळी यायची. त्यांच्यासाठी खेळ, कोडी वगैरे तयार करायची, नाच व गाणी व्हायची. त्यानिमित्त्याने लहान मुलांच्या घोळक्यात आम्हीसुद्धा समरस होऊन नाचून घेत असू.

वीस पंचवीस वर्षाच्या काळात पुन्हा एकदा पिढी बदलली असली तरी वाढदिवसाचे हे स्वरूप जवळ जवळ तसेच राहिले आहे. त्यातील तपशीलात मात्र बराच फरक पडला आहे. पूर्वीच्या काळी लहान घर असले आणि त्यात जास्त माणसे रहात असली तरी आम्ही मुलांचे वाढदिवस घरातल्या पुढच्या खोलीतच दाटीवाटी करून साजरा करीत असू. वेफर्स किंवा काजूसारखे अपवाद सोडल्यास खाण्यापिण्याचे बहुतेक पदार्थ घरीच तयार होत असत. अगदी केकसुद्धा घरीच भाजला जाई आणि त्यावरील आईसिंगचे नक्षीकाम करण्यात खूप गंमत वाटत असे. मॉँजिनीजच्या शाखा उघडल्यानंतर तिथून केक यायला लागला. बंगाली संदेश, पंजाबी सामोसे, ओव्हनमधले पॅटिस वगैरे गोष्टी बाहेरून मागवल्या जाऊ लागल्या. तरीसुद्धा या प्रसंगाच्या निमित्याने चार लोकांनी आपल्या घरी यावे आणि त्यांनी आपल्या हातचे कांही ना कांही खावे अशी एक सुप्त भावना मनात असायची. आता ती भावना लुप्त होत चालली आहे. घरात प्रशस्त दिवाणखाना असला आणि कमी माणसे रहात असली तरी बाहेरच्या लोकांनी येऊन तिथे भिंतीला डाग पाडू नयेत, मुलांनी पडद्यांना हात पुसू नयेत आणि एकंदरीतच घरात पसारा होऊ नये म्हणून आजकाल बरेक लोक बाहेरचा हॉल भाड्याने घेतात. खाण्यापिण्याच्या वस्तू परस्पर तिथेच मागवतात आणि घरातली मंडळी देखील पाहुण्यांप्रमाणे सजूनधजून तिकडे जातात. तिथल्या गर्दीत बोलणे बसणे होतच नाही. कधीकधी तर आलेल्या गिफ्टवरचे लेबल पाहून ती व्यक्ती येऊन गेल्याचे उशीराने लक्षात येते.

आमचे स्वतःचे वाढदिवस मात्र कधी घरीच गोडधोड खाऊन तर कधी बाहेर खायला जाऊन आम्ही साजरे करीत असू. हळूहळू घरी कांही बनवणे कमी होत गेले आणि बाहेर जाण्याचे प्रमाण वाढत गेले. त्यातसुद्धा सुरुवातीच्या काळातल्या डोसा-उत्तप्पाच्या ऐवजी छोले भटूरे, पनीर टिक्का मसाला किंवा बर्गर-पीझ्झा किंवा नूडल्स-मांचूरिया वगैरे करीत सिझलर्स, पिट्टा वगैरेसारखे पदार्थ येत गेले. अलीकडच्या काळात वयोमानानुसार खाण्यापिण्यावर बंधने पडत गेली आणि स्वतः खाण्यात मिळणा-या आनंदापेक्षा इतरांना चवीने मनसोक्त खातांना त्यांच्या चेहे-यावर फुललेला आनंद पाहतांना अधिक मजा वाटू लागली आहे.
. . . . . . . . . . . . . . . . .. (क्रमशः)

No comments: