Friday, July 03, 2009

अवघे गरजे पंढरपूर


आषाढी वारीसाठी गांवोगांवातून निघालेल्या दिंड्या, पालक्या यांच्या मार्गक्रमणाविषयीचे वृत्तांत आणि त्यांची क्षणचित्रे गेले कांही दिवस वर्तमानपत्रात व दूरचित्रवाणीच्या सर्व मराठी वाहिन्यांमधून रोज पहायला मिळत होते. या सोहळ्याचा सर्वोच्च बिंदू आज देवशयनी एकादशीला गांठला गेला. हे सारे वारकरी तर पंढरपूरला पोचलेच, त्याखेरीज रेल्वेगाड्या, बसगाड्या, खाजगी वाहने भरभरून भाविकांनी पंढरपूर गांठले. यासाठी खास गाड्या तर सोटलेल्या होत्याच, पण जेवढी गर्दी डब्यांच्या आंत असेल तेवढीच गाड्यांच्या टपावरदेखील दिसत होती. सुमारे दहा लाखांवर भाविक या यात्रेला आले असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे.

या सगळ्या लोकांनी काय केले असेल? चंद्रभागेला भरपूर पाणी आलेले आहेच, त्यात डुंबून घेतल्यानंतर जेवढ्या लोकांना जमले असेल तेवढे लोक दर्शनासाठी रांगेत उभे राहिले असतील. बाकीच्या लोकांनी विठ्ठलाच्या नामाचा गजर करून भीमातीर दुमदुमून टाकले असणार. कवी अशोकजी परांजपे यांनी याचे असे सुंदर वर्णन केले आहे.
अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर ।।
टाळघोष कानी येती । ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ।
पांडुरंगी नाहले हो । चंद्रभागातीर ।।१।।
इडापिडा टळुनी जाती । देहाला वा लाभे मुक्ती।
नामरंगी रंगले हो । संतांचे माहेर ।।२।।
देव दिसे ठाई ठाई । भक्त लीन भक्तापायी ।
सुखालागी आला या हो । आनंदाचा पूर ।।३।।

पंढरीला होणारी ही यात्रा गेली सात आठ शतके इतका काळ दरवर्षी भरत आली आहे. संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या काळातील वारीचे वर्णन करतांना असे म्हंटले आहे.
कुंचे पताका झळकती । टाळ मृदूंग वाजती ।
आनंदे प्रेमे गर्जती । भद्रजाती विठ्ठलाचे ।।
आले हरीचे विनट । वीर वि़ठ्ठलाचे सुभट ।
भेणे झाले दिप्पट । पळती थाट दोषांचे ।।

त्यांचे समकालीन संत नामदेवांनीसुद्धा विठ्ठलाच्या वाऱीकरांचे सविस्तर वर्णन केले आहे. त्यांचे एकमेकांबरोबर वर्तन कशा प्रकारचे असायचे हे संत नामदेवांनी किती छान शब्दांत दाखवले आहे?
एकमेका पुढे लवविती माथे ।
म्हणती आम्हाते लागो ऱज ।।
भक्ति प्रेमभाव भरले ज्यांच्या अंगी ।
नाचति हरिरंगी नेणती लाजु ।।
हर्षे निर्भर चित्तीं आनंदे डोलती ।
हृदयी कृष्णमूर्ती भेटो आली ।।

हे सगळे महात्म्य पंढरीलाच कां आहे याबद्दल नामदेव महाराज सांगतात.
आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी।।
जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।।
संत तुकारामांनी म्हंटले आहे.
उदंड पाहिले उदंड ऐकिले। उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ।
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर। ऐसै विटेवर देव कोठे ।।
ऐसे संतजन ऐसे हरिदास । ऐसा नामघोष सांगा कोठे ।
तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे । पंढरी निर्माण केली देवे ।।

अशा या अद्वितीय नगरीला जाऊन विठ्ठलाचे भक्त किती आनंदित होतात आणि काय धमाल करतात याबद्दल तुकोबाराय सांगतात.
खेळ मांडियेला वाळवंटी ठाई। नाचती वैष्णव भाई रे।
क्रोध अभिमान केला पावटणी। एक एका लागती पायीं रे।। १।।
नाचती आनंद कल्लोळीं। पवित्र गाणे नामावळी रे।
कळिकाळावरी घातली कास। एक एकाहुनी बळी रे।। २।।
गोपीचंदन तुळशीच्या माळा । हार मिरविती गळा रे ।।
टाळमृदुंगघाई पुष्पवर्षाव । अनुपम सुखसोहळा रे ।।३।।
लुब्धली नादी लागली समाधी। मूढजन नारी लोका रे ।
पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधका रे ।।४।।
वर्ण अभिनाम विसरली जाती । एकएका लोटांगणी जाती रे ।।
निर्मळ चित्ते झाली नवनीते । पाषाणा पाझर सुटती रे ।।५।।
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे ।।
तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ।।६।।

अशा सोप्या केलेल्या पायवाटेवरून जावे असे वाटून लक्षावधी लोकांनी त्यावरून जाऊन तिचा हमरस्ता केला आणि नामस्मरणाच्या घोषाने पंढरपूरचे वातावरण दुमदुमून गेले.

1 comment:

Anonymous said...

नमस्कार,



मी सुजित बालवडकर. आज आपले संकेतस्थळ बघितले. खुप छन केले आहे.



एक सुचवु का? एवढं छान लिहिता तर ब्लॉगर का वापरता. स्वतःचे संकेतस्थळ का नाही. मी आपणाला आपले स्वतःचे संकेतस्थळ मिळवण्यात मदत करु शकतो. उदा. करीता माझे संकेतस्थळ बघा www.kavyanjali.info / www.kavitasangrah.info आणि नक्की कळवा.



आपला,

सुजित बालवडकर
ny.sujit@gmail.com