Wednesday, March 04, 2009

अँड्रोकल्स आणि सिंह




ही प्रसिद्ध गोष्ट सर्वांनाच माहीत असेल. अँड्रोकल्स नांवाचा गुलाम मालकाच्या तावडीतून निसटून जंगलात पळून जातो. तिथे त्याची गांठ एका जखमी सिंहाशी पडते. अँड्रोकल्स जखमी सिंहाच्या पायात रुतलेला कांटा काढून त्याला वेदनेतून मुक्त करतो. त्यानंतर त्या दोघांची गट्टी जमते. पुढे अँड्रोकल्स पकडला जातो आणि गुलामगिरीतून पळाल्याबद्दल त्याला देहदंडाची शिक्षा दिली जोते. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याला रोममधील सर्कस मॅक्सिमसमध्ये ग्लॅडिएटर बनवून रानटी सिंहाच्या तोंडी दिले जाते. योगायोगाने रानात त्याचा मित्र झालेल्या सिंहालाच पकडून सर्कसमध्ये सोडण्यात आलेले असते. तो सिंह अँड्रोकल्सला लगेच ओळखतो आणि एकाद्या पाळीव कुत्र्याप्रमाणे त्याचे हांतपाय चाटून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. अक्राळ विक्राळ सिंहाचे हे प्रेमळ रूप पाहून सर्व प्रेक्षक तर थक्क होतातच, पण ही लढाई पहायला आलेल्या रोमच्या सम्राटालाही त्याचे कौतुक वाटते आणि तो अँड्रोकल्सची शिक्षा माफ करून त्याची गुलामगिरीतूनसुद्धा मुक्तता करतो. अँड्रोकल्स आणि सिंह त्यानंतर सुखाने व सन्मानाने राहू लागतात.

दोन वर्षांपूर्वी पाहिलेल्या एका व्हीडिओ क्लिपचा दुवा अचानक हाती आला. आजही ती क्लिप यू ट्यूबवर उपलब्ध आहे. ती पाहतांनी अँड्रोकलची जुनी गोष्ट आठवली. आजच्या युगातील एक महिला जंगलातल्या एका आजारी सिंहाचे प्राण वाचवते आणि त्याला एका वन्यपशुसंग्रहालयात पाठवते. कालांतराने जेंव्हा ती
तिथे जाऊन त्याला भेटते तेंव्हा त्या सिंहाला झालेला अत्यानंद या व्हडिओत पहाण्यासारखा आहे. हा व्हिडिओ खालील दुव्यावर पहायला मिळेल.
http://www.youtube.com/watch?v=TYh96USnzY0

No comments: