Monday, March 16, 2009

संत एकनाथ


"दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई।।"
"नणंदेचं कारटं किरकिर करतं, खरूज होई दे त्य़ाला ।सत्वर पाव गं मला, भवानी आई, रोडगा वाहिन तुला ।।"
"विंचू चावला, विंचू चावला, काय मी करू? कुणाला सांगू?"
"वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।"
वरील रचना एका संताने लिहिल्या असतील असे या ओळी वाचून कदाचित कोणाला वाटणार नाही. पण त्या एका महान संतानेच रचलेल्या आहेत, त्यांचे नांव संत एकनाथ! सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या एकनाथ महाराजांनी लोकांना आवडतील, त्यांच्या सहज लक्षात राहतील असे आकर्षक मुखडे रचून पुढे त्या कवनांमध्ये अध्यात्माचे दर्शन घडवले आहे. उदाहरणार्थ याच भारुडांच्या खालील ओळी पहा.
"एका जनार्दनी समरस झाले, पण तो रस येथे न्हाईमला दादला नको ग बाई !"
"कामक्रोध विंचू चावला । तम आंगासी आला ॥ ....ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा ।सत्वगुण लावा अंगारा । विंचु इंगळी उतरे झरझरा ॥सत्य उताऱ्या येऊन । अवघा सारिला तमोगुण ।किंचित राहिली फुणफुण । शांत केली जनार्दनीं ॥"
संत एकनाथांनी फक्त भारुडांचीच रचना केली नाही, त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा अपार आहे, पण त्यांनी रचलेली भारुडे इतकी अप्रतिम आहेत की चारशे वर्षांनंतर आजसुध्दा ती लोकांना भुरळ पाडतात आणि भारुड म्हंटल्यावर सर्वात आधी एकनाथांचेच नांव डोळ्यासमोर येते.
संत एकनाथांनी लिहिलेले "माझे माहेर पंढरी। आहे भीवरेच्या तीरी ।।", आणि "काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल। " हे अभंग पं.भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीमधले प्रमुख अभंग आहेत. श्री.राम फाटक यांनी त्यांना अप्रतिम चाली लावून संगीतबध्द केले आहे. नव्या पिढीतले संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके आणि गायक सुरेश वाडकर यांनी मिळून तयार केलेल्या ध्वनिफितीमध्ये "ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो", "गुरु परमात्मा परेशु", "रुपे सुंदर सावळा गे माये", " माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद", "येथोनी आनंदू रे आनंदू, कृपासागर तो गोविंदू रे" हे अत्यंत अर्थपूर्ण अभंग आहेत. अलीकडच्या काळात निघालेल्या उत्कृष्ट ध्वनिफितींमध्ये या ध्ननिफितीचा उल्लेख होतो. या अभंगातील शब्दरचना पाहताच सुंदर सोप्या शब्दात उपमा, रूपक आदि अलंकारांचा उपयोग करून त्यांनी भक्तीमार्गाचे सुगम तत्वज्ञान किती सुरेख मांडले आहे हे ध्यानात येईल.
संत एकनाथ हे संस्कृत भाषेचे आणि त्यातील धर्मशास्त्रांसंबंधित ग्रंथांचे प्रकांड पंडित होते, पण त्यांनी संत ज्ञानेश्वरांकडून प्रेरणा घेऊन ते ज्ञान मराठी भाषेत आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. अठरा हजार आठशे ओव्या रचून त्यांनी भागवत पुराणच मराठी भाषेत आणले. ते एकनाथी भागवत या नांवाने प्रसिध्द आहे. गोष्टीरूप असल्यामुळे तो खूप लोकप्रिय आहे आणि त्याची पारायणे नियमितपणे जागोजागी होत असतात. त्यांनी भावार्थ रामायणाच्या २५००० ओव्या रचल्या होत्या. तरीही ते काम अपूर्ण राहिल्यामुळे त्यांच्या शिष्याने ते पुरे केले. या खेरीज त्यांनी रुक्मिणी स्वयंवर, प्रल्हाद विजय, आनंदलहरी वगैरे अनेक रचना करून ठेवल्या आहेत.
सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या भावार्थ दीपिकेत, म्हणजे आज ज्ञानेश्वरी या नांवाने ओळखल्या जाणा-या ग्रंथात अनेक पाठभेद निर्माण झाले होते. एका पोथीवरून दुसरी पोथी लिहितांना त्यात चुका झाल्या होत्या आणि ज्ञानेश्वरांच्या नांवाने त्या पुढच्या पिढीला दिल्या जात होत्या. संत एकनाथांसारखा विद्वानच अधिकारवाणीने त्या दुरुस्त करू शकत होता. एकनाथांनी त्या ग्रंथांच्या प्रतींचे अतिशय काळजीपूर्वक वाचन करून एक निर्दोष प्रत तयार केली आणि तिला प्रमाणग्रंथ समजून यापुढे तिच्याच प्रती काढल्या जाव्यात यासाठी तिचा प्रचार केला. संत एकनाथांच्या प्रयत्नांमुळेच संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले गीताज्ञान पुढील काळातील जनतेपर्यंत शुध्द रूपात पोचायला मदत झाली.
संत एकनाथांच्या जीवनाबद्दल खूप कांही सांगण्यासारखे आहे ते पुढील भागात लिहीन. आज एकनाथषष्ठी या त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना शतशः साष्टांग दंडवत.

No comments: