चौदा मुलांची आई कुमारिका तर खचित नसेल, पण आजकाल कांही सांगता येत नाही. अमेरिकेत अशी एक आई आहे, पण ती स्त्री सौभाग्यवती आहे, की विधवा , की घटस्फोटिता, की अविवाहिता याबद्दल गूढ आहे. पण तो मुद्दा या लेखाचा विषय नाही. एका विलक्षण घटनेबद्दल ज्या क्रमाने जशा प्रकारच्या बातम्या येत गेल्या त्या खूपच मनोरंजक होत्या. त्याबद्दल या ठिकाणी मी लिहिणार आहे.
"अष्टपुत्रा सौभाग्यवती भव।" असा आशीर्वाद आपल्याकडे पूर्वीच्या काळी सगळ्या मुलींना देत असत. आजकालचे 'कुटुंबनियोजन' किंवा त्यापूर्वी होत असलेले 'संततीनियमन' सुरू होण्यापूर्वीच्या काळात एकदा घरातला पाळणा हलायला लागला की तो सारखा हलतच रहायचा. त्यामुळे एका कुटुंबात आठ दहा मुले असणे त्या काळात स्वाभाविक वाटत असे. "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव।" या आशीर्वादात ती मुलगी आणि तिचा पती या दोघांनाही उदंड आयुष्य लाभो हा आशीर्वाद अंतर्भूत असायचा. पुढे कालमानानुसार 'अष्टपुत्रा'चे 'इष्टपुत्रा' झाले, 'हम दो हमारे दो' चा जमाना आला. आजकाल आपापल्या क्षेत्रांत सर्वोच्चपद गांठायच्या शर्यतीत लागले असतांना त्यात मुलांना सांभाळण्याच्या कामाचा अडसर यायला नको आणि हातात पडत असलेल्या पैशाचा पुरेपूर उपभोग घ्यायला मिळावा असा विचार करून कांही जोडपी 'डिंक्स (डबल इनकम नो किड्स)' राहतात. पश्चिमेकडे विवाहसंस्था आता जवळ जवळ मोडकळीला निघाली आहे. तिकडे अनेक लोक एकेकटेच राहतात, कांही जोडपी लग्न केल्याशिवाय एकत्र राहतात, तर कांही ठिकाणी दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया जोडीने राहतात. या सगळ्या कारणांमुळे नवजात अर्भकांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे आणि लोकसंख्येचे सरासरी वयोमान तरुण न राहता प्रौढत्वाकडे झुकत चालले आहे, हा एक समाजधुरीणांच्या चिंतेचा विषय झाला आहे. ही पार्श्वभूमी पाहता महिनाभरापूर्वी आलेली एक बातमी भयंकर धक्कादायक होती.
अमेरिकेतल्या एका इस्पितळात एका बाईने एकाच वेळी तब्बल आठ मुलांना जन्म दिल्याची ती बातमी होती. तिच्या पाठोपाठ आलेल्या बातम्या अधिकाधिक धक्कादायक होत्या. हा नवा जागतिक विक्रम नव्हता कारण यापूर्वीसुध्दा १९९८ साली अशी घटना घडून गेली होती म्हणे. पण आठ दिवसांनी ही आठही मुले जीवंत राहिली तेंव्हा त्या गोष्टीचा नवा जागतिक विक्रम झाला. आपल्याकडे एका कुटुंबात आठ दहा मुले असत असली तरी अशा दहाबारा कुटुंबात एकादे जुळे जन्माला यायचे. त्यामुळे गांवात किंवा ओळखीच्या माणसात जुळ्या भावंडांची एकादी जोडी निघत असे. तिळे हा शब्द फक्त ऐकला होता आणि चार, पांच, सहा पिल्ले कुत्र्यामांजरांनाच होत असत. एका महिलेल्या पोटी आठ मुलांनी एकदम जन्म घेणे ही गोष्ट कल्पनातीत होती.
लॉस एंजेलिस शहराच्या बेलफ्लॉवर उपनगरातल्या कैसर पर्मनेंटे मेडिकल सेंटरमध्ये कॅलिफोर्नियामधील एका महिलेने एकाच वेळी आठ बालकांना जन्म दिला. अपेक्षित प्रसूतीसमयाच्या नऊ आठवडे आधी म्हणजे गरोदरपणाच्या सातव्या महिन्यातच तिच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करून या मुलांना या जगात आणले गेले. अर्थातच त्यांची पूर्ण वाढ झालेली नव्हती. त्यांची वजने अर्धा किलो ग्रॅमपासून दीड किलोग्रॅमपर्यंत होती. डॉक्टर्स, नर्सेस आणि सहाय्यकांच्या ४६ जणांच्या मेडिकल टीमने या शस्त्रक्रियेत भाग घेतला. अपुरी वाढ झालेल्या या बालकांना ऊष्णपेटीत ठेऊन कृत्रिम श्वासोच्छ्वास वगैरे अत्याधुनिक वैद्यकीय मदतीच्या सहाय्याने सांभाळण्यात आले. सोनोग्राफीच्या परीक्षेनुसार त्या डॉक्टरांना सातच मुले दिसली होती आणि एका वेळी सात अशक्त अर्भकांची व्यवस्था करून त्याची रंगीत तालीमसुध्दा घेतली गेली होती. पण अचानक आठव्या मुलाने ट्याँहाँ करून डॉक्टरांची त्रेधा तिरपीट उडवली. त्यांनी केलेल्या अद्भूत आणि ऐतिहासिक कामगिरीचे रसभरीत वर्णन या बातमीत केले गेले होते.
आजकाल माणसाने निसर्गाच्या व्यवहारात हस्तक्षेप करून नरजन्माचा दर कमी केला असल्यामुळे त्यावर निसर्गाने अशा प्रकारे सूड घेतला असावा असे अनेकांना वाटले. पण नैसर्गिक रीतीने इतके गर्भ राहणे हे ज्ञात असलेल्या वैद्यकीय शास्त्रानुसार केवळ अशक्य आहे असे मत व्यक्त करून नक्कीच हे काम अनैसर्गिक अशा कृत्रिम गर्भधारणेमुळे शक्य झालेले असणार असे मत एका तज्ञाने व्यक्त केले. त्यावर कायद्यानुसार असे करणे गैर आहे असा अभिप्राय एका कायदेपंडिताने दिला. आदल्या दिवशी ज्या डॉक्टरांच्या कौशल्याची तोंडभर स्तुती झालेली होती त्यातल्या सर्वांनी "हे बेकायदेशीर कृत्य आमचे नाही. या बाई आमच्याकडे आल्या तेंव्हाच गरोदर होत्या आणि आम्ही त्यांना पोटातली कांही बालके कमी करण्याचा वैद्यकीय सल्ला दिला होता, पण त्यांनी तो न ऐकल्यामुळे आम्हाला हे दिव्य करावे लागले आणि आता यातल्या प्रत्येक बालकाची यथायोग्य काळजी घेणे हा आमचा धर्म आहे." असे सांगून कानावर हात ठेवले.
इस्पितळातील व्यवस्थेचा इतका तपशील देणार्या तिथल्या चालकांनी या आठ मुलांच्या मातेबद्दल चकार शब्दसुध्दा सांगितला नव्हता. "आमच्याकडे येणार्या पेशंट्सची वैयक्तिक माहिती आम्ही कोणालाही देत नसतो. ते आमच्या नीतीमत्तेत बसत नाही." वगैरे मोठा तोरा त्यांनी दाखवला होता. पण अमेरिकेतले वार्ताहर शेरलॉक होम्स आणि आर्थर कॉनन डायल वगैरेंनी केलेल्या सगळ्या युक्त्या कोळून प्यालेले असतात. कांहीतरी लपवले जात आहे हे पाहताच ते आपली हेरगिरी सुरू करतात. त्यांनी खटपटी लटपटी करून बरीचशी व्यक्तीगत माहिती मिळवली आणि हप्त्याहप्त्याने तिला प्रसिध्दी दिली.
आठ बालकांची जन्मदात्री असलेली ही 'मुलगी' आपल्या आईच्याच घरात रहात आहे असे आधी बाहेर आले. त्यानंतर लगेच ही अल्लड वयातली 'मुलगी' नसून चांगली तिशीतली 'बाई' आहे आणि तिला आधीची सहा मुले आहेत अशी सुधारणा त्यात करण्यात आली. ज्या देशात शालेय शिक्षण संपताच मुले आपापली वेगळी रहायची व्यवस्था पहायला लागतात आणि आजीआजोबा व नातवंडे सहसा एकत्र रहातच नाहीत, तिथे सहा नातवंडांसह आपल्या प्रौढ झालेल्या पोरीला संभाळणार्या त्या मुलांच्या आजीचे धन्य वाटले. आता तर त्यात आणखी आठ जणांची भर पडणार आहे. शिवाय तिचा नवरा घरजावई बनून कसा
काय राहिला आहे याची शंका आली. कदाचित त्याच्या जुलुम जबरदस्तीमुळे त्या बिचार्या महिलेवर चौदा मुलांची माता होणे भाग पडले असेल असेही वाटले. कांही कट्टरपंथी लोक आजही धर्माच्या किंवा पंथाच्या नांवाने कुटुंबनियोजनाला कडवा विरोध करतात. "आम्हाला मात्र 'हम दो हमारे दो' आणि 'त्यांच्या'साठी 'हम पाँच हमारे पचास' करायला मोकळीक!" असा ओरडा त्यांना उद्देशून आपल्याकडे सारखा होत असतो. या बाबतीतसुध्दा असा धर्मांधपणा तर कारणीभूत नसावा ना? असेही कांही लोकांना वाटले.
पण नंतर उजेडात आलेली माहिती खरोखर दिग्मूढ करणारी होती. ती म्हणजे या चौदा मुलांच्या आईचे लग्न झालेले आहे किंवा नाही हेच नक्की माहीत नाही. सध्या तरी ती आपल्या नवर्यासोबत रहात नाही एवढे निश्चित आहे. संततीनियमनाला प्रतिबंध घालणार्या धर्मातसुध्दा अनौरस प्रजा निर्माण करण्याची परवानगी नाही. कांही देशात तर अशा कुमारी मातेला दगडांनी ठेचून मारण्याची सजा फर्मावली जाते असे म्हणतात. तेंव्हा पुरुषाचे अत्याचार किंवा धर्मांधता अशी जुन्यापुराण्या युगातली कारणे या घटनेच्या मुळाशी बहुधा नसावीत असे वाटते. पण या मुलांच्या पालनपोषणासाठी कोठून तरी तिला पैसे मिळतात असा शोध कोणीतरी लावला. नक्की कोणाकडून ते मात्र जाहीर झाले नाही. ही माता अशिक्षित अडाणी, आदिवासी वगैरे नसून बालसंगोपनशास्त्रात चांगली पदवीधर आहे आणि पदव्युत्तर अभ्यासासाठी तिने आपले नांव नोंदवले आहे. ती सध्या कसली नोकरी वगैरे मात्र करत नाही असे दिसते. तिची आईच तिच्या मुलांना सांभाळते आणि ते तिला चांगलेच जड जाते. तिचे वडील नक्की कसला व्यवसाय करतात आणि कुटुंबाला किती सहाय्य करतात हे गुलदस्त्यात आहे, पण ते धनाढ्य तरी नाहीत असेच दिसते.
त्यांना ही एकुलती एक मुलगी होती आणि तिलाही बहुधा आपल्या आईवडिलांचा पुरेसा सहवास मिळाला नसावा. त्यामुळे एकाकीपणाची भावना तिच्या मनात खूप खोलवर रुजली आणि तिने स्वतःला चांगली डझनभर पोरे होऊ द्यायची असे ठरवले म्हणे. तिला मुलांचा हा सोस (ऑब्सेशन) असला तरी तिच्या जननेंद्रियात कांही कमतरता असल्यामुळे नैसर्गिक रीतीने मातृत्व प्राप्त करणे तिला शक्य नव्हते. तिच्या मनात मातृत्वाची इच्छा किशोरावस्थेतच निर्माण झाली होती, पण सात आठ वर्षे प्रयत्न (?) करूनही ती फलद्रूप न झाल्यानंतर तिने कृत्रिम गर्भधारणेचा मार्ग निवडला म्हणे. त्याचाही तिला एक प्रकारचा छंदच लागला असावा. तिने सहा मुलांना जन्म तर दिलाच, शिवाय कृत्रिम गर्भधारणा करून निर्माण केलेले अनेक भ्रूण साठवून ठेवले होते. त्यांचे एकसाथ आरोपण केल्यामुळे ही आठ जुळी मुले एकत्र जन्माला आली असावीत असा तर्क व्यक्त केला जात आहे. ही एक कायदेशीर बाब असल्यामुळे कोणीही त्याबद्दल स्पष्ट वक्तव्य करायला तयार नाही.
२६ जानेवारीच्या मुहूर्तावर ही आठ बालके जन्माला आली. या बातमीने अमेरिकेत तर कहर उडवला होता. दर तासातासाला प्रसिध्द होणार्या बुलेटिनमध्ये त्याची खबरबात येत होती. अमक्या मुलाने पहिला नैसर्गिक श्वास घेतला, तमक्या मुलाने दुधाचा पहिला घोट गिळला, आणखी कोणी पापण्या किलकिल्या केल्या अशा प्रकारे त्यांची होत असलेली प्रगती सांगितली जात होती. नैसर्गिक अवस्थेत ती मुले जगू शकलीच नसती, पण कृत्रिम उपचारांच्या सहाय्याने त्यांचे संगोपन केले जात होते. समाजावर अशा प्रकारचा किती बोजा टाकावा हा प्रश्न विचारला जात होता. तसेच समाजाने तरी तो कां म्हणून उचलावा असा दुसरा उपप्रश्न त्याच्याशी संलग्न होता. आठ दहा दिवस ही चर्चा चालली आणि थांबून गेली.
त्या आईबद्ल जी माहिती प्रसिध्द झाली आहे त्यानुसार तिचे नांव नादिया ऊर्फ नॅटाली डेनिझ सुलेमान ऊर्फ दाऊद ऊर्फ गुटिरेझ असे आहे. तिच्या वडिलांचे नांव एडवर्ड दाऊद सुलेमान तर आईचे नांव अँजेला व्हिक्टोरिया सुलेमान असे दिले जाते. दहा वर्षांपूर्वीच ते एकमेकांपासून वेगळे झाले आहेत म्हणे. नादियाच्या यापूर्वीच्या सहा मुलामुलींची नांवे एलिजा मकाई, अमीरा यास्मिन, जोशुआ जेकब, ऐडन, केलिसा ऐरिएल आणि कॅलेब कै अशी असून त्या सर्वांची आडनांवे सॉलोमन आहेत. पण या नव्या आठ मुलांच्या जन्मानंतर कोणी सॉलोमन नांवाचा गृहस्थ त्यांचे पितृत्व स्वीकारायला पुढे आलेला दिसत नाही. आधीच्या मुलांचा जन्म डेव्हिड सॉलोमन नांवाच्या इस्रायली माणसाच्या बीजांपासून झाला असे सांगण्यात येत असले तरी असा माणूस खरोखर अस्तित्वात आहे तरी किंवा नाही याबद्दल अनेक लोकांना शंका आहे.
या मुलांच्या बापाच्या नांवाचा अधिकृत पत्ता नाहीच, पण त्यांना त्यांची नांवेसुध्दा कोणी न ठेवल्यामुळे इस्पितळात त्यांना ए, बी, सी, डी, ई, एफ, जी,एच अशा मुळाक्षरांनी ओळखले जात होते. आता त्यांना नोहा, मलिहा, इसाइया, नाजिया, मकाई, जोशिया, जेरेमिया आणि जोनाह या नांवांनी स्वतःची ओळख दिली गेली आहे. त्यांचे संगोपन कसे आणि कुठे होणार आहे वगैरे अनेक गोष्टी भविष्याच्या पडद्याआड आहेत. आपले नातेवाईक, मित्र आणि चर्च (?) कडून पुरेशी मदत आपल्याला मिळेल असे तिने एका प्रसारवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले म्हणे. सध्या मिळत असलेल्या अमाप प्रसिध्दीमुळे वृत्तवाहिन्या आणि प्रकाशन व्यवसायिकांनी त्या चौदशपुत्री मातेला घेरा घातला आहे. तिच्या नांवाने एक वेबसाईट उघडण्यात आली असून वाचकांनी उदारपणे तिला सर्व प्रकारे मदत करावी असे आवाहन त्यात करण्यात आले आहे. तिच्या कुटुंबाचे कायमचे कल्याण होईल इतकी गडगंज संपत्ती तिला दिली जाण्याची शक्यतासुध्दा आहे. त्याच्या बदल्यात कदाचित तिच्या अष्टपुत्रांचे जिकडे तिकडे प्रदर्शन केले जाईल.
आतापर्यंत या गोष्टीत इतकी वळणे आली आहेत की भविष्यात तिने कुटुंबनियोजनाचा प्रसार करण्याचे काम हातात घेतले तरी त्यात आश्चर्य वाटायला नको.
No comments:
Post a Comment