आठ तारखेला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो. आता आपण म्हणजे कोण? स्वतःपासूनच सुरुवात करायची झाली तर आज मी आपली नेहमीचीच सारी कामे नेहमीसारखी केली, माझ्या पत्नीनेही तसेच केले. केर काढणे, लादी पुसणे, भांडी घासणे, स्वयंपाकपाणी वगैरे कामासाठी लावलेल्या कामवाल्या बाया येऊन आपापली कामे करून गेल्या. त्यांनी जागतिक महिला दिनाबद्दल कांही ऐकलेच नसावे, ते ही एका दृष्टीने बरेच झाले म्हणा, नाही तर त्या निमित्याने त्यांनी हक्काची सुटी मागून घेतली असती. तसे झाले असते तर बहुतेक मध्यमवर्गीय घरातल्या गृहिणींवर त्यांच्या जागतिक दिनाच्या दिवशी जास्तच कामाचा बोजा पडला असता. भारतातील नव्वद टक्के पुरुषांनी आपण होऊन घरातल्या कामाचा भार स्वतः उचलला नसता आणि उरलेल्या दहा टक्क्यापैकी नऊ टक्के लोकांच्या बायकांनी आपापल्या नवर्यांना घरकामाला हात लावू दिला नसता. त्यांना ते जमणारच नाही, ते त्यात नसता गोंधळ करून पसारा वाढवून ठेवतील याबद्दल त्या पत्नींची खात्री असते. अखेरच्या एक टक्का घरातल्या महिलांना आपले काम हेच आपले जीवनसर्वस्व वाटत असल्यामुळे इतके महत्वाचे काम एका अप्रशिक्षित पुरुषांवर सोपवणे त्यांना कल्पनेतसुध्दा शक्य नसते. थोडक्यात सांगायचे झाले तर या महिला दिनी महिलांना विश्रांती देऊन पुरुषांनी त्यांची सारी कामे केली असे दृष्य कांही मला तरी कुठे दिसले नाही.
माझ्या रोजच्या जीवनात नाही म्हणायला अगदी किंचितसा फरक पडला. वर्तमानपत्रे, टी.व्ही. आणि इंटरनेट या तीन्ही प्रसार माध्यमांमधून किंचित वेगळ्या प्रकारच्या गोष्टी वाचायला आणि पहायला मिळाल्या. माझ्या अंदाजाप्रमाणे अशा प्रकारच्या बातम्या, चर्चासत्रे किंवा लेख यांमध्ये महिलावर्गाला तितकासा रस नसतो. त्यामुळे त्यांच्यापैकी किती जणींनी ते कार्यक्रम लक्ष देऊन पाहिले असतील किंवा त्याचे वृत्तांत गंभीरपणे वाचले असतील ते सांगता येणार नाही. पण जेवढे माझ्या वाचनात आले, पहायला मिळाले त्यावरून कांही ठिकाणी सभा झाल्या, कुणाला पुरस्कार प्रदान केले गेले, कांही सन्माननीय कर्तबगार स्त्रियांनी आपापले अनुभव सांगितले, इतर स्त्रियांना स्फूर्ती दिली, मार्गदर्शन केले, वगैरे कार्यक्रम कांही ठिकाणी झाले.
पूर्वी एका महिलादिनाच्या दिवशी मराठी ब्लॉग विश्वामध्ये भ्रमण करतांना कांही चांगल्या व मनोरंजक कविता आणि लेख वाचायला मिळाले होते. माफीचा साक्षीदार या कवीने "स्त्री म्हणजे आईची वत्सलता, लेकीची अल्लडता, धरणीची पोषकता, सरितेची निर्मलता, वेलीची नाजुकता, कुसुमाची मोहकता, भक्तीची आर्जवता, शक्तीची व्यापकता, छायेची शीतलता, मायेची उत्कटता, लक्ष्मीची मंगलता व अंबेची सात्त्विकता" असे तिचे सुरेख गुणगान केले होते तर लगेच खोडसाळ या दुसर्या कवीने स्त्री म्हणजे "आईचा पाठीत धपाटा, लेकीचा खरेदी-सपाटा, छायेचे तासागणिक बदलणे, जायेचे तासन्तास बडबडणे, अश्रुंची बळजोरी, पुरुषांची कमजोरी" इत्यादि गंमती सांगत त्या कवितेचे मजेदार विडंबन केले होते.
बडबड्या स्नेहलने एक विचार प्रवर्तक लेख लिहून असा निष्कर्ष काढला होता की "चांगल्या कामाची दखल नेहमीच घेतली जाते. त्याचे कौतुक करताना लोक मग अशा अमूक दिवसाची वाट बघत नाहीत. महिला पुढे असतील, स्वतंत्र असतील तर समाजाची मान्यता मिळणारच आहे... त्यासाठी आजच्या दिवशी आम्हीच आमचा सत्कार करून घ्यायची गरज नाही. जे साध्य झालंय तो मॅचचा पहिला बॉल आहे, अजून पूर्ण ५० षटकं खेळायची आहेत. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन कसे चालेल?"
स्वप्ना यांनी जागतिक महिला दिनानिमित्त 'स्त्री भ्रुणहत्या' ह्या विषयावर कविता लिहून "इतकी दगडी झालीयेत का मनं ?" हा प्रश्न विचारून "तिला'जगू दिले'याचा आनंदही न होण्याइतकी..नक्कीच एवढी दगडी नाही झालीयेत मनं.." असे उत्तरही दिले होते. त्यांनीच जागतिक महिला दिनाच्या इतिहासाची संक्षिप्त माहिती देऊन "तू" या नांवाची एक स्फूर्तीदायक कविता लिहिली होती. त्यात अखेरीस एक सकारात्मक संदेश दिला आहे की,
"विधात्याची नवनिर्माणाची कलाकृति तू, एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा साजरा कर तू..
उठ चल,यशाच्या शिखरांची तुला साद॥ऐक तू, 'स्त्री' म्हणून जन्मलीयेस,'व्यक्ती' म्हणूनही जग तू॥"
बेधडक यांनी आपल्या (उपरोधिक) शैलीमध्ये सद्यःपरिस्थितीचे वाभाडे काढीत "देवा रे! पुढची हज्जार वर्षे तरी आम्हाला बायकांचा जन्म नको … आम्ही या पुरूषांच्या जन्मात अत्यंत सुखी आहोत." असे लिहिले होते. ते करतांना जागतिक महिला दिनी त्यांना बैलांच्या पोळ्याची आठवण झाली. तसेच "तुमचा नवरा तुमच्याबरोबर H4 व्हिसा घेऊन तुमच्याबरोबर अमेरिकेला यायला तयार होईल कां?, नोकरी सोडून मुलांची काळजी घ्यायला घरी राहील कां?, तुमच्यासाठी दोन भाकर्या थापेल कां?, तुमच्याबरोबर आदिवासींच्या पाड्यात जाऊन समाजसेवा करेल कां आणि घरजावई होऊन तुमच्या आईवडिलांच्यासोबत रहायला तयार होईल कां?" असे पांच प्रश्न विचारून "बघा! या प्रश्नांची उत्तरे तुमचे यजमान काय देणार ते! त्यांची विकेट उडली नाही तर जरूर सांगा! कारण असे प्रश्न ऐकल्यावर आम्ही आमच्या पत्नीला कधी आवाज चढवून, कधी प्रेमाने रूंजी घालून तर कधी न ऐकल्यासारख करून धुडकावून लावलं असतं." असे पुढे म्हंटले होते.
यामागील उपरोधिकता लक्षात घेऊनसुद्धा मला हे दोन्ही मुद्दे अप्रस्तुत वाटतात. "ढोर, गंवार, सूद्र, पसु, नारी ये हैं ताडनके अधिकारी " असे वाक्य संत तुलसीदासांनी रामचरितमानसातल्या एका पात्राच्या तोंडी घातले आहे. ते त्यांचे सरसकट स्त्रीजातीबद्दलचे व्यक्तीगत मत नाही हे त्यांनी इतर अनेक जागी स्त्रीत्वाचा जो गौरव केला आहे त्यावरून स्पष्ट होते. आजच्या जगात मात्र अत्यंत प्रतिगामी लोक अजून तसे म्हणतील. पोळ्याचा सण बैल कांही स्वतःहून साजरा करीत नाहीत, तो त्यांचे मालक साजरा करतात, पण जागतिक महिला दिन महिला स्वतः साजरा करतात हा महत्वाचा फरक त्या दोन्हीमध्ये आहे. तसेच आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये किती महिला वर दिलेले पांच प्रश्न आपल्या नवंर्याना विचारू शकतील याचीच आधी शंका आहे. ज्या घरांमधील महिला आधीच इतक्या सक्षम झाल्या असतील त्या प्रकारच्या घरांमधील अनेक नवरे तसे केल्याने कुटुंबाचा फायदा होत आहे असे त्यांना दिसल्यास, त्याचे होकारार्थी उत्तर सहज देतील असे मला वाटते. यातील एकेक प्रश्नाला होकारार्थी उत्तर देऊन सुखी संसार करीत असलेल्या वेगवेगळ्या लोकांची उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे तशा प्रकारच्या प्रश्नांना नकारार्थी उत्तर देऊन नवर्यापासून दूर राहणे पसंत करणार्या कित्येक स्त्रियासुद्धा समाजात दिसतात. त्यामुळे याचा जागतिक महिला दिवस पाळण्या न पाळण्याशी संबंध नाही.
स्त्री व पुरूषांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक जडणघडणीमध्ये निसर्गानेच फरक ठेवले आहेत. त्याशिवाय माणसा माणसातही फरक असतात. त्यामुळे कुणाला कोणते काम आवडते, जमते, झेपते तर दुसर्या कुणाला दुसरे एकादे काम आवडते, जमते, झेपते. त्या दोघांनी एकाच प्रकारच्या कामात एकसारखेच नैपुण्य किंवा स्वारस्य दाखवणे जरूरीचे नाही. त्याशिवाय "बळी तो कान पिळी" हाही एक निसर्गनियम आहे. त्यामुळेच सबळ निर्बळांवर जुलूम करू शकतात. पुरूषांकडून स्त्रियांवर होत असलेली जुलुम जबरदस्ती, अन्याय हा त्यातला फक्त एक भाग आहे. कांही पुरूष दुसर्या पुरूषांवरसुद्धा अनन्वित अत्याचार करतात तसेच कांही स्त्रिया दुसर्या स्त्रियांवर अन्याय करतांना, त्यांच्यावर वर्चस्व गाजवतांना सर्रास दिसतात. कवी यशवंत देव यांनी लिहिलेल्या एका प्रसिद्ध विडंबनगीताप्रमाणे "पत्नीची मुजोरी, तिची नित्य सेवा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा" असा टाहो फोडणार्या गांजलेल्या नवर्यांच्यासुद्धा संघटना निघालेल्या आहेत. मला त्यातील कशाचेही समर्थन करावयाचे नाही, फक्त या कठोर वस्तुस्थितीची इथे जाणीव करून देत आहे. या गोष्टी अनादिकालापासून चालत आलेल्या आहेत व अनंत कालापर्यंत चालत राहणार आहेत. त्यावरील उपायांचा शोध व त्यापासून स्वतःचा बचाव करण्याचे प्रयत्नही असेच चालू असल्याने त्याच्या स्वरूपात कालानुसार बदल होत जातो एवढेच. यालाच जीवन असे नांव आहे.
आपण एखादा दिवस साजरा करतो तेंव्हा त्या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेतो एवढेच. सण साजरा केला की लगेच त्यासंबंधीचे सर्व प्रश्न सुटले असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे स्त्रियांना, पुरूषांना, मुलांना, समाजातील सगळ्याच घटकांना सन्मानाचे स्थान मिळावे, त्यांचे जीवन सुखी व्हावे यासाठी प्रयत्न चालूच ठेवावे लागणार आहेत. त्यातल्या कोणाच्या सन्मानार्थ एक दिवस साजरा करायचा असे ठरवले तर तसे करावे व त्यापासून जर थोडा फार फायदा होत असेल तर तो होऊ द्यावा असे माझे मत आहे.
आज साजरा जालेल्या या वर्षीच्या महिलादिनानिमित्य उद्याच्या भागात.
No comments:
Post a Comment