Saturday, April 05, 2008

गुढी पाडवा


गुढीपाडव्यापासून हा ब्लॉग पुन्हा नियमितपणे सुरू करायचे ठरवले आहे. या मंगल दिनानिमित्य सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा.

आज गुढी पाडवा, नव्या वर्षाची सुरुवात करून देणारा आनंददिन, सगळे लोक उत्साहाने साजरा करत आहेत. उंच गुढ्या उभारून आणि दाराला तोरण बांधून आपल्या मनातला आनंद इतरांना दिसावा, समजावा, सर्वांच्या मनात तो पसरावा असा प्रयत्न करतात. पण हा आनंद नेमका कशासाठी आणि काय म्हणून तो व्यक्त करायला पाहिजे? असा प्रश्न चिकीत्सक वृत्तीच्या लोकांना पडणारच. कित्येक निरुत्साही लोक तसे बोलून दाखवतात सुध्दा! नव्या पिढीतली मुले तर हा नववर्षदिन मानतच नाहीत अशी खंत एका पोक्त बाईंनी व्यक्त केल्याचे वृत्त आजच्या वर्तमानपत्रात वाचले.
खरेच हा आनंद असलाच तर तो कशाचा असतो? कोणी म्हणतात की या दिवशी ब्रह्म्याने विश्वाची निर्मिती केली. म्हणजे तो सगळ्या विश्वाचाच ' बर्थडे' झाला. पण त्यात एक गोम अशी आहे की तिथी, वार, तारीख, महिना वगैरे सगळ्या गोष्टी आपण फक्त पृथ्वीवरील जीवनाच्या संदर्भात बोलू शकतो. पृथ्वीपासून थोडे दूर अंतराळात गेल्यास त्यांना कांहीही अर्थ उरत नाही कारण सूर्य तिथे कधी उगवतही नाही की मावळत नाही. तो सतत आभाळात तळपत असतो. म्हणजे एकीकडे कायमची उन्हाची अतीतीव्र अशी रखरख आणि त्याच बरोबर शून्याच्याही खूपच खाली इतके अतीशीत तपमान! मग दिवस,रात्र, हिवाळा, उन्हाळा केंव्हापासून केंव्हापर्यंत आणि कसा मोजणार? संपूर्ण विश्वाचा विचार केला तर आपली पृथ्वी धुळीच्या कणाइतकीसुध्दा नाही. तेव्हा पृथ्वीवरल्या तिथीला वैश्विक महत्व देता येणार नाही.
आणखी कोणी सांगतात की या दिवशी प्रभू रामचंद्रांचे लंकेहून अयोध्येत आगमन झाले. चौदा वर्षे वनवासात गेलेल्या आपल्या लाडक्या राजाचे पुन्हा दर्शन घडणार याचा अतीव आनंद सर्व अयोध्यावासीयांना झाला असणार. त्यातून रावणासारख्या बलाढ्य आणि दुष्ट शत्रूचे पारिपत्य करून तो येणार आहे याचे विशेष कौतुक त्यांना वाटले असणार. त्यामुळे त्यांनी आनंदोत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. गुढ्या, तोरणे उभारून, कमानी वगैरे सजवून त्यांनी रामाचे स्वागत केले असणार. यानंतर रामासारखा सक्षम आणि न्यायप्रिय राजा मिळाल्यामुळे राज्यात सगळीकडे आबादीआबाद होऊन प्रजा अत्यंत सुखी होईल अशी आशाही त्यांच्या मनात निर्माण झाली असणार. त्या अपेक्षा फलद्रुप झाल्यामुळे त्याची आठवण म्हणून ते प्रजाजन दरवर्षी गुढी उभारून सण साजरा करत असतीलही. पण आता त्याचे काय प्रयोजन उरले आहे? रामावताराच्या समाप्तीबरोबरच रामराज्य देखील लयाला गेले आणि रावणापेक्षासुध्दा जास्त जुलमी व पापी राजवटी त्यानंतर इतिहासात येऊन गेल्या. तेंव्हा कधी काळी या दिवशी रामाने अयोध्येत प्रवेश केला होता या गोष्टीचे आज विशेष महत्व कोणाला वाटणार आहे? प्रत्यक्षात तसा आनंद कोणाला होतांना मला कधी दिसला नाही.
या दिवसाचे सर्वात जास्त महत्व त्या दिवसाला नसून त्याच्या आगेमागे सुरू होणा-या वसंत ऋतूला आहे. त्याआधी शिशिरामध्ये कडाक्याची थंडी असते. थंड हवेच्या प्रदेशातली झाडे बर्फाने झाकून गेली असतात. इतर ठिकाणीसुध्दा ब-याचशा झाडांची पाने या काळात गळून पडतात. वसंत ऋतूमध्ये त्यांना नवी पालवी फुटते आणि पाहता पाहता हिरव्यागार पानांनी ती मढवली जातात. चेरीसारखी झाडे फुलांनी डंवरून येतात. ते दृष्य पाहण्यासारखे असते. ट्यूलिपला फुललेली फुललेल्या बागा तर अविस्मरणीय दिसतात. आपल्याकडेही बहुतेक वनराई प्रसन्न असते. आंब्याच्या झाडाला मोहर येतो, त्याचा सुगंध चहूकडे दरवळतो आणि आणि छोट्या कै-या दिसायला लागतात. रबीच्या हंगामातली पिके डोलायला लागली असतात. त्यामुळे "वसंत वनात जनात हांसे, सृष्टीदेवी जणू नाचे उल्हासे। गातात संगीत पृथ्वीचे भाट, चैत्रवेशाखाचा ऐसा हा थाट ।।" असा आनंदी आनंद असतो.
विजेचे दिवे येण्यापूर्वीच्या काळात रात्रीच्या वेळेला फारसे महत्व असायचे नाही. फक्त निशाचरांच्या दृष्टीने तिला महत्व होते. सर्वसामान्य माणसांचा दिवस सूर्योदयापासून सुरू होत असे आणि संध्याकाळपर्यंत तो संपत असे. दिवस आणि रात्र या दोघांना मिळून सुध्दा दिवस असेच म्हणतात. त्याला वेगळे नांव दिलेले नाही. चैत्राच्या नवपल्लवीपासून निसर्गाच्या चक्राची सुरुवात समजली जात असे आणि शिशिरात गळणा-या पानाबरोबर ते चक्र संपत असे. यामुळे वर्षाची सुरुवात ही निसर्गाच्या नव्या ऋतुचक्राची सुरुवात असल्यामुळे उत्साहाचे वातावरण तयार होणारच. सूर्योदयाचा क्षण आपल्याला नेमका पाहता येतो तशी वसंताची नेमकी सुरुवात जाणवत नाही. चेरीब्लॉसमसारखा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आपल्याला दिसत नाही. यामुळे चैत्र शुध्द प्रतिपदेचा सर्वांना समजू शकेल असा दिवस या समारंभासाठी ठरवला गेला. नववर्षाची सुरुवातही त्याच दिवशी होत असल्यामुळे तेही निमित्य झाले. फलज्योतिष्यावर विश्वास बाळगणारे लोक नववर्षात ग्रहमान कसे राहील ते पाहू लागले. नवीन वर्ष सुखात जावे असे प्रत्येकाला वाटणारच. तशी प्रार्थना करणे, तशा सदीच्छा व्यक्त करणे वगैरे ओघानेच आले. या कारणांमुळे गुढी पाडव्याचा सण लोकप्रिय झाला. . . . . . . . . . . .. . . (क्रमशः)

No comments: