Sunday, April 20, 2008

श्रीराम जयराम

मला समजायला लागल्यापासून अगदी रोजच रामाचे नांव या ना त्या कारणाने कानावर पडतच आले आहे. पाहुण्यांचे स्वागत किंवा बोलण्याची सुरुवात "रामराम"ने होते. कधी कधी हा मनाविरुध्द केलेला 'जुलुमाचा रामराम' असतो. निरोप घेतांना पुन्हा "अमुचा रामराम घ्यावा " असे म्हणतात. कामाचा पसारा फार झाला तर त्याचा 'रामरगाडा' होतो आणि बरेच वेळा 'रामभरोसे' रहावे लागते. एकादी अनपेक्षित किंवा कल्पनातीत घटना पाहिली की इंग्रजाळलेले लोक 'ओ गॉड!' म्हणतात, तसे आमच्याकडे वेगळ्या पट्टीमध्ये 'राम राम' किंवा 'रामा रामा' म्हणतात. असंभव या मालिकेतले दीनानाथ शास्त्री सारखे "श्रीराम श्रीराम" म्हणत किती छान उसासे सोडत असतात! रोज सकाळी 'राम राम पाटील' नवनवे विषय घेऊन आपल्या भेटीला येतात. रामराव, रघू, रामप्रसाद, रामअवतार, रामनाथन, रामदुराई यासारखे रामाचे नांव धारण केलेले आपल्या ओळखीतले कोणी ना कोणी हटकून भेटतच असे. निवृत्तीनंतर माझा जनसंपर्क कमी झाला असला तरी टी.व्ही. पहाणे वाढले आहे. त्यामुळे प्रत्यक्षातली माणसे भेटली नाहीत तर पडद्यावरली पात्रे दिसतात.

रामाचा उल्लेख असलेली शेकडो लोकप्रिय मराठी आणि हिंदी गाणी आहेत. 'रामा रघूनंदना', 'रघुनंदन आले आले', 'उठी श्रीरामा पहाट झाली', 'विजयपताका श्रीरामाची', 'कौसल्येचा राम बाई', यासारखी मराठी आणि 'रामचंद्र कह गये सियासे', 'रामा रामा गजब हुई गवा री', 'रामजीकी निकली सवारी', 'राम करे ऐसा हो जाये', 'हरे कृष्ण हरे राम' यासारखी हिंदी गाणी यातले एकादे तरी गाणे अधून मधून कानावर पडते. त्याशिवाय 'रामका गुणगान करिये' आणि 'रामरंगी रंगले' वगैरे शास्त्रीय संगीतातली भजने आहेतच. लहानपणी भेंड्या खेळतांना 'र' हे अक्षर आले की फार चांगले वाटायचे, कारण रामाची अनेक गाणी तर आहेतच शिवाय रामाच्या श्लोकांनी भरलेला रामरक्षेचा मोठा रिझर्व्ह स्टॉक असल्यामुळे हरण्याची चिंता नसायची.

माझ्या लहानपणच्या बहुतेक मित्रांना रामरक्षा तोंडपाठ असायची. सगळ्या मुलांनी रोज संध्याकाळी शुभंकरोती झाल्यावर परवचे आणि रामरक्षा म्हणायची त्या काळी पध्दतच होती. त्यामुळे मला रामरक्षा वाचायला येण्यापूर्वीच ऐकून ऐकून पाठ झाली होती. त्यातल्या संस्कृत शब्दांचा अर्थ समजण्याचा प्रश्नच नव्हता. किंबहुना त्यांना कांही अर्थ असतो किंवा असायला हवा असा विचारही तेंव्हा मनाला शिवत नव्हता. पुष्कळ पुढल्या काळात संस्कृत आणि इतर भाषाविषयांचे शिक्षण घेतल्यानंतर त्यातला थोडा थोडा अर्थ समजू लागला आणि विविध अलंकार लक्षात येऊ लागले.

सुरुवातीचाच "ध्यायेदाजानुभावं धृतशरधनुष्यं बध्दपद्मासनस्थं।" हा श्लोक (समजला तर) साक्षात रामचंद्राची मूर्ती डोळ्यासमोर उभी करतो. आम्हाला मात्र त्यातली कमी अधिक होणारी लय तेवढी मजेदार वाटायची. या श्लोकातली जोडाक्षरे आणि विषेषतः धृतशरधनुष्यं, नवकमलमिलल्लोचनं असे शब्दप्रयोग न अडखळता म्हणता आले की बोलण्यातला बोबडेपणा संपला अशी स्पष्ट उच्चाराची एक तऱ्हेची परीक्षा होती. "शिरोमे राघवः पातु भालं दशऱथात्मजः। कौसल्येयो दृषौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती।" या श्लोकात डोके, कपाळ, कान, नाक, डोळे वगैरेंचे रक्षण करण्यासाठी रामाची जी वेगवेगळी नांवे घेतली आहेत त्यातून त्याचे कुल, आई वडील, बंधु, गुरू वगैरेंची माहिती होते. "स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः।" म्हणजे दिव्य अस्त्रांनी भरलेला भाता खांद्यावर बाळगणारा राम माझ्या खांद्याचे रक्षण करो आणि शिवधनुष्य भंग करणारा राम माझ्या बाहूंचे रक्षण करो या ओळी किती समर्पक आहेत? "सुग्रीवेश कटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभू" वगैरेमधून रामाच्या भक्तांचे उल्लेख येतात. रामरक्षेतील या श्लोकांमधून रामाच्या चरित्रातील वेगवेगळ्या गोष्टी तर समजतातच, शरीरशास्त्राचीसुध्दा थोडी तोंडओळख होते. शास्त्रविषय शिकवण्याची किती मजेदार रीत होती ना?

"रामो राजमणिःसदा विजयते रामम् रमेशम् भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।
रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोस्म्यहम्।
रामे चित्तलयःसदा भवतु मे भो राम मामुध्दर।।"

या श्लोकात प्रथमा ते सप्तमी या सात विभक्ती आणि संबोधन बरोबर क्रमाने येतात. त्यामुळे "रामः रामौ रामाः .. प्रथमा " पाठ करतांना विभक्तींचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी हा श्लोक सोयीचा होता. शार्दूलविक्रीडित या वृत्तात असल्यामुळे हल्ली हा श्लोक मंगलाष्टकांच्या स्वरूपात काना वर येतो. खाली दिलेल्या एका श्लोकात रामायणाचे सार दिले आहे.
आदौ राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगम् कांचनम् ।
वैदेहीहरणम् जटायुमरणम् सुग्रीवसंभाषणम् ।।
वालीनिर्दलनम् समुद्रतरणम् लंकापुरीदाहनम् ।
पश्चाद्रावणकुंभकर्णहननम् एतद् हि रामायणम् ।।

रामायणावर आधारलेल्या असंख्य उत्तमोत्तम कृती आहेत. गदिमांच्या गीतरामायणाचे वर्णन थोडक्यात करताच येणार नाही. त्यावर तर एक स्वतंत्र लेखमालाच लिहावी लागेल. तुलसीदासाच्या रामचरितमानसाचे पारायण नवरात्राचे नऊ दिवस चालते. त्याबरोबरच अभिनय करून रामलीलेमधून रामायणातले प्रसंग रंगमंचावर उभे करतात. खरे तर आपले जीवन रामाने इतके व्यापलेले आहे की जेंव्हा एकाद्या गोष्टीत अर्थ किंवा स्वारस्य नसेल तर "त्यात राम नाही" असे म्हणतात. एरवी सगळीकडे राम भरलेलाच असतो!

No comments: