Friday, April 25, 2008

लीड्सच्या चिप्स - भाग १९ - वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता


पूर्व आणि पश्चिम हे कधीच एकमेकांना भेटणार नाहीत, इतक्या त्यांच्या संस्कृती भिन्न आहेत, असे किपलिंगसाहेब सांगून गेले, पण जगाच्या पूर्व आणि पश्चिम भागात राहणारी माणसे एकमेकांना भेटतच राहिली व त्यांच्या आचारविचारात बरीच देवाणघेवाण होत गेली. कांही बाबतीत मात्र त्यांच्या वागणुकीमधील ठळक फरक तसेच राहिले. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता ही त्यातलीच एक गोष्ट आहे. आंघोळ करण्याला आपल्याकडे फारच महत्व आहे. अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्याच आंघोळीचे वेध लागतात. आंघोळ केल्याशिवाय कसलेही अन्नग्रहण न करणारी माणसे आहेत. संध्याकाळी घरी परतल्यानंतर कांही लोक पुन्हा एकदा सचैल स्नान करून देहशुद्धी करून घेतात. देह घासून पुसून स्वच्छ करणे हा आंघोळीमागील सर्वात महत्वाचा उद्देश असतो. तसेच आंघोळ करून झाल्यावर धुतलेले स्वच्छ कपडे परिधान करणे आवश्यक असते. इंग्लंडमध्ये वेगळी परिस्थिती आहे. तिथल्या थंड हवेत अंगाला घाम येत नाही. रस्त्यामध्ये धूळ नसते, त्यामुळे ती उडून अंगाला चिकटत नाही. चेहरा सोडून सर्वांग कपड्याने झाकलेले असल्यामुळे ती शरीरापर्यंत पोचतही नाही. त्यामुळे शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करण्याची गरज भासत नाही. गरम पाण्याचा शॉवर घेऊन किंवा गरम पाण्याने भरलेल्या टबात आरामात बसून शरीराला ऊब आणणे हा आंघोळ करण्यामागील मुख्य उद्देश असतो. त्यामुळे सवड मिळेल त्याप्रमाणे आठवड्यातून एखाद्या दिवशी आंघोळीची चैन केली तरी पुरते. अंगावर घातलेले कपडे फारसे मळत नाहीत, त्यांना कुबट वास येत नाही व धुतलेले कपडे लवकर वाळत नाहीत या सगळ्या कारणामुळे तेही रोजच्या रोज बदलण्याची गरज वाटत नाही.
आपल्याकडे पूर्वापारपासून पायातील चपला दाराच्या बाहेर काढून ठेवण्याची पद्धत होती. त्यानंतर अंगणामध्ये पाय स्वच्छ धुवून घरात प्रवेश करायचा रिवाज होता. कालांतराने राहती घरे लहान होत गेली व दरवाजाच्या बाहेर ठेवलेल्या चपला चोरीला जाऊ लागल्या त्यामुळे त्या घरात आणून सर्वात बाहेरील दारापाशी ठेऊ लागले. टू बीएचके, थ्री बीएचके फ्लॅट्स आल्यानंतर कांही लोकांच्या घरी पायात बूट घालून दिवाणखान्यापर्यंत येणे क्षम्य मानले जाऊ लागले. पण त्यापुढे स्वयंपाकघरात मात्र अजूनही कोणी जात नाही.
इंग्लंडमध्ये हिंवाळ्यात पायाखालील जमीन बर्फाच्या लादीसारखी थंडगार झालेली असते, कधीकधी तर त्यावर बर्फाचा थरही साठलेला असतो. त्यामुळे "पादस्पर्शम् क्षमस्वमे" म्हणण्याला ती बधत नाही. तिच्यावर अनवाणी चालल्यास ती पायच काय सारे शरीर गोठवून बधीर करून टाकते. त्यामुळे चोवीस तास पायात मोजे चढवलेले तर असतातच, पण झोपणे सोडून इतर वेळी पायातील बूटसुद्धा फारसे काढले जात नाहीत.
आपल्याकडे सचैल स्नान करून शुचिर्भूत झाल्याखेरीज कोठलेही धार्मिक कृत्य सुरू करता येत नाही. तसेच ते करतांना कसलेही पादत्राण घातलेले चालत नाही. पायातील जोडे, चपला बाहेर काढून ठेवल्याशिवाय देवळात प्रवेश करता येत नाही. दक्षिण भारतातील कांही देवळात तर उघड्या अंगानेच जावे लागते. इंग्लंडमध्ये असला कसलाच विधीनिषेध नाही. तुम्ही पारोशा अंगाने व पायातील बूट न काढता चर्चच्या कोठल्याही भागात फिरू शकता व तिथे जाऊन प्रार्थना करू शकता. गंमत म्हणजे आपण शुभकार्य करतांना डोक्यावर पागोटे किंवा टोपी घालतो तर तिकडे चर्चमध्ये आंत गेल्यानंतर डोक्यावरील हॅट काढून हातात घेतात.
पूर्वीच्या काळी घराबाहेरील अन्न खाणेसुद्धा निषिद्ध होते. त्यामध्ये स्वच्छता सांभाळण्याचा हेतू असावा असा माझा अंदाज आहे. सगळे लोक प्रवासाला जातांना आपापले जेवणखाण घरी बनवून आपल्याबरोबर बांधून नेत असत. मध्यंतरीच्या काळात ही बंधने बरीच शिथिल झाली होती. आता संसर्गजन्य रोगांच्या भीतीने पछाडले गेल्यामुळे पुन्हा एकदा लोक घरी शिजवलेल्या सात्विक व निर्जंतुक खाण्याला प्राथमिकता देऊ लागले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ठेल्यावरील पदार्थ खाणे टाळू लागले आहेत. हवेत धूळ नसली तरीसुद्धा उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे इंग्लंडमध्ये पूर्वीच बंद झाले होते. पण रोज घरी स्वयंपाक करणेही कमीच. बेकरीमध्ये किंवा मोठ्या भटारखान्यात तयार केलेल्या असंख्य प्रकारच्या खाद्यवस्तू हवाबंद पॅकिंग करून विकायला ठेवलेल्या असतात. त्या घरी नेऊन मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये तापवायच्या आणि खायच्या ही सर्वमान्य पद्धत झाली आहे. त्यात पुन्हा हस्तस्पर्शविरहित यासारखे सोवळे प्रकार असतात. भाज्या सुद्धा प्लॅस्टिकच्या पिशव्यात बंद असतात. त्यात "हिरवी (ग्रीन)" म्हणजे रासायनिक खते व जंतुनाशके न वापरता पिकवलेली भाजी. पण जमीनीतून उगवलेली ताजी भाजी पाहिजे असेल तर स्वतःचेच किचन गार्डन हवे. सर्वसामान्य लोक असले फरक करीतच नाहीत. जे कांही स्वस्त व मस्त असेल ज्याची "डील" लावली असेल त्यावर उड्या मारतांना दिसतात.
व्यक्तिगत जीवनात आपल्याइतकी शरीराची "स्वच्छता" न सांभाळणारे इंग्रज लोक सार्वजनिक जागा मात्र कमालीच्या स्वच्छ ठेवतात. रस्त्यावर थुंकणे, नाक शिंकरणे अजीबात नाही, इतर विधींचा प्रश्नच येत नाही. भटकी कुत्री नसतात. गाई बैल गावाबाहेर गोठ्यात
असतात. गोपूजनासाठी एक गाय वाघसिंह ठेवायच्या पिंज-यात घालून बंदोबस्तात आणलेली मी पाहिली. रस्त्यामध्ये तसेच सर्व सार्वजनिक जागांवर आकर्षक कचराकुंडे ठेवलेली असतात. आपल्याकडील कचरा त्यात टाकायची संवय लोकांना लालगलेली आहे. घराघरातील कचरा ठराविक प्रकारच्या काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या थैलीत घालून तमजल्यावरील एका खोलीत किंवा जवळच्या सार्वजनिक कचराकुंडात नेऊन ठेवायचा. रोज कचरा वाहून नेणारी गाडी येऊन यंत्राच्या सहाय्याने तो उचलून घेऊन जाते. रस्त्यावर दिसणारी घाण म्हणजे मुख्यतः झाडांची गळून पडलेली पाने असतात. त्यामुळे बाहेर जाऊन आल्यावर लगेच पायातील बूट काढून टाकावेत असे वाटावे इतके ते किळसवाणे वाटत नाहीत.
एकदा मी कुत्र्याला सोबत घेऊन फिरणा-या एका ललनेचे लक्षपूर्वक निरीक्षण केले. ती मुलगीसुद्धा सर्व तयारीनिशी फिरायला आली होती. तिकडच्या कुत्र्यांच्या संवयी मात्र भारतातील कुत्र्यांच्यासारख्याच आहेत. कुत्र्याने आपले काम करताच तिने शांतपणे आपल्या पिशवीतून टॉयलेट पेपरचा रोल काढला, ती जागा स्वच्छ करून ते कागद जवळच्या कच-याच्या कुंडात टाकल्यानंतर ती पुढे गेली.
भारतातील कोणतीही मुलगी हे नुसते ऐकूनच ईईईईई करेल!

No comments: