आपल्या भारतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. पिढ्यानपिढ्या एका मोठ्या कुटुंबातील माणसे एकत्र रहात असत. शेती तसेच व्यवसायांमधील त्यांची उत्पन्नाची साधनेही समाईक असत. दुष्काळ व पुरासारख्या नैसर्गिक आपत्ती आणि आक्रमणे, लढाया वगैरे बाह्य कारणामुळेच त्यातील कांही लोकांना गांव सोडून जावे लागत असे. क्वचित कधी अगदीच पटेनासे झाले तर भावंडे वाटणी करून वेगळी होत किंवा कोणी घर सोडून चालला जात असे, पण होईल तोवर एकत्रच रहायचा प्रयत्न होत असे. नोकरीसाठी शहरात येऊन स्थाईक झाल्यावर तिथे जागा अपु-या पडायला लागल्या तसेच उत्पन्नाची साधने वेगवेगळी झाल्याने लोक वेगळ्या चुली मांडू लागले. कुटुंबाची मर्यादा फक्त आई वडील व मुले एवढ्यापर्यंत संकुचित झाली. विभक्त कुटुंब पद्धत आल्यानंतरही बहुतेक अविवाहित मुले अजून आपल्या आईवडिलांच्या बरोबरच राहतात. मुलाचे लग्न होऊन त्याचा नवा संसार सुरू झाल्यानंतरसुद्धा त्याचे आई वडील त्याच्याबरोबर रहात असल्याचे अनेक घरात दिसते. त्यामुळे आजी आजोबा व नातवंडे एकत्र असल्याचे दृष्य नेहमी पहायला मिळते. काका, मामा, मावशी, आत्या तसेच चुलत, मावस, आते मामे भावंडे एकमेकांबरोबर संपर्कात असतात व लग्नासारख्या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहतात. अशा प्रकारे आपले नातेसंबंध बळकट असतात.
पाश्चिमात्य देशात मात्र कुटुंबसंस्था कदाचित आपल्याइतकी मजबूत कधी नसावीच. काका, मामा वगैरे सगळे अंकल आणि काकू, आत्या वगैरे ऑंटी. सख्खी सोडून इतर सगळी भावंडे कझिन्स असा त्यांचा उल्लेख होत असे. ते फारसे एकत्र कधी रहातच नसत. दुस-या महायुद्धानंतरच्या काळात समाजात जी प्रचंड उलथापालथ झाली, धर्माचा प्रभाव नाहीसा झाला, व्यक्तीस्वातंत्र्याला महत्व प्राप्त झाले, त्यात कुटुंबसंस्था चांगलीच ढासळली आहे. मुलाला घराण्याचे नांव मिळेल तसेच मुलगा घराण्याचे नांव उज्ज्वल करेल या जुन्या संकल्पना कालबाह्य झाल्या. मुलाच्या जन्माच्या वेळी त्याच्या आई व वडिलांनी लग्न करून एकत्र रहात असण्याची गरज उरली नाही. तो मोठा होऊन सज्ञान बनेपर्यंत ते एकत्र राहतीलच याची शाश्वती नाही. तोपर्यंत ते वेगवेगळे होऊन त्यांनी निरनिराळ्या जोडीदारांबरोबर संसार थाटलेले असण्याचीही शक्यता असते. मग मुलांनी त्यातल्या कुणाबरोबर रहायचे?
आईवडिलांपासून वेगळे रहायची संवय तर त्यांना अगदी बालपणापासून लावली जात असते. त्यांना कळायला लागण्यापूर्वीच त्यांच्यासाठी वेगळी खोली सुसज्ज करून ठेवलेली असते. त्यांचे उठणे, बसणे, खेळणे, अगदी झोपणेसुद्धा या स्वतंत्र खोलीमध्ये होत असते. सज्ञान झाल्यानंतर सहजगत्या नोकरी मिळते आणि ती न मिळाल्यास सरकारकडून पुरेसा बेकारभत्ता मिळतो. त्यामुळे शालेय शिक्षण संपता संपता मुले आपली रहाण्याची वेगळी सोय करून घेतात. मात्र व्यवस्थित स्वतंत्र घर थाटण्याइतपत सुस्थिती आल्यानंतरच ते लग्नाचा विचार करतात. मी असे ऐकले की आईवडीलसुद्धा मुलाला भेटायला येतात तेंव्हा त्याच्या घरी पाहुण्यांसाठी वेगळी खोली असेल तर ठीक आहे, ते तिथे राहतात. ती सोय नसेल तर सरळ हॉटेलात झोपायला जातात.
कांही वर्षापूर्वी मी लंडनला गेलो असतांना दिवसभर इकडे तिकडे भटकून झाल्यावर संध्याकाळी एका भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या चार बेडरूम असलेल्या प्रशस्त बंगल्यात त्यांना भेटायला गेलो होतो. दिवसा ते घरी भेटलेच नसते. ते जोडपे मुंबईला आमच्याकडे आलेले असतांना त्यांनी आपल्या बंगल्याचे तोंडभर वर्णन करून मला आपल्याकडे येण्याचा आग्रह केला होता म्हणून मी मुद्दाम वाकडी वाट करून त्यांच्याकडे गेलो होतो. मी सातासमुद्रापलीकडून आलेला असल्यामुळे मला निदान रात्रभर वस्तीला त्यांच्याकडे रहायला सांगणे त्यांना भाग होते. त्यांची टीनेजमधली तीन मुले अजून त्यांच्याकडेच रहात होती. त्यामुळे त्यांच्या सगळ्या बेडरूम्सची वाटणी झालेली होती. माझी झोपण्याची व्यवस्था दिवाणखान्यातल्या सोफ्यावर करण्यात आली. लंडनच्या संस्कृतीमध्ये वाढलेली तीन्ही मुले वेगवेगळ्या ठिकाणी, बहुधा पबमध्ये संध्याकाळ घालवून रात्री एक एक करून परतली व आपापल्या बेडरूममध्ये जाऊन झोपली. कां कोणास ठाऊक, पण ती बहुधा सर्कसमधल्या पिंज-यात ठेवलेल्या प्राण्याकडे पहावे तसे सोफ्यावर पहुडलेल्या माझ्याकडे जाता जाता पहात आहेत असे मला राहून राहून वाटत होते. यालाच बहुतेक कल्चर शॉक म्हणत असावेत. कारण आमच्या घरी जर दूरचे पाहुणे आले तर हॉलमध्येच सगळ्यांच्या पथा-या पसरून निवांतपणे गप्पा मारल्या जातात. यात कुटुंबातील सगळ्यांची भेट होते, आपुलकी निर्माण होते वगैरे. इथे तर साधी ओळख करून घेण्याची इच्छा कोणाला झाली नव्हती. दुस-या दिवशी सकाळी मुले उठण्य़ापूर्वीच माझे महत्वाचे काम असल्याचे निमित्त सांगून मी तेथून सटकलो आणि तडक हॉटेल गाठले.
लीड्सला एका ख्रिश्चन कुटुंबात एका छोट्याशा पार्टीला जायचा योग आला. तिथे भारतीय तसेच इंग्लिश असे दोन्ही वंशांचे पाहुणे आले होते. एक सत्तरीला आलेले इंग्लिश जोडपेही होते. त्यातील बाई कुटुंबव्यवस्थेला लागलेल्या उतरंडीबद्दल खूपच जिव्हाळ्याने बोलत होत्या. त्यांची मुले कुठकुठल्या दूरच्या देशात रहात असावीत, फार क्वचितच त्यांची भेट होत असे. त्यांनी लग्ने केली होती किंवा नव्हती याची कल्पना नाही. बोलता बोलता दुसरा एक इंग्रज बोलून गेला, "आजकालच्या आईवडिलांच्या मनात आपल्या वयात आलेल्या मुलांबद्दल फक्त एकच अपेक्षा असते. ती म्हणजे त्यांनी लग्न करावे, तेही मुलाने मुलीबरोबर आणि मुलीने मुलाबरोबर."
No comments:
Post a Comment