Sunday, April 20, 2008

लीड्सच्या चिप्स - भाग १७ - रॉयल आर्मरीज म्यूझियम


लीड्स शहराच्या लोकवस्तीच्या मानाने तेथे जास्तच वस्तुसंग्रहालये आहेत. कदाचित बाहेरून येणा-या पर्यटकांना आकर्षित करणे हा त्यामागील एक उद्देश असेल असे ती प्रदर्शने पाहणा-या प्रेक्षकांना पाहिल्यावर वाटते. या सर्वात रॉयल आर्मरीज म्यूझियम अव्वल नंबरावर खचित येईल. आपल्या मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियमची भव्य वास्तु त्यापेक्षा आकाराने मोठी आहे. ग्वाल्हेर, बडोदा, म्हैसूर व जयपूरच्या राजेरजवाड्यांनी केलेले संग्रह विलक्षण आहेत, पुण्याच्या राजा केळकर वस्तुसंग्रहालयात वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक गोष्टी पहायला मिळतात, इंग्लंडमधील लंडनचे टॉवर म्यूझियम तसेच बर्मिंगहॅम व एडिंबरा येथील म्यूझियम्स वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत तसेच प्रेक्षणीय आहेतच. पण या सर्व म्यूझियम्समधील सारी शस्त्रास्त्रे एकत्र आणली तरीही लीड्सच्या 'रॉयल आर्मरीज'ची सर त्यांना येणार नाही. इतर ठिकाणी फक्त ऐतिहासिक काळातील वस्तु दिसतील पण या ठिकाणी आदिमानवाने वापरलेल्या अणकुचीदार दगडापासून इराकमधील युद्धात उपयोगात आणलेल्या अत्याधुनिक अस्त्रापर्यंत सगळ्यांचे अनेक रूपात दर्शन घडते.
लीड्स येथे आयर नदी व तिच्या समांतर वाहणारा कृत्रिम कालवा या दोन्हींच्या बेचक्यात या म्यूझियमची आधुनिक ढंगाची चार मजली इमारत उभी आहे. एका कोप-यावर कांचेचा पारदर्शक टॉवर आहे. कट्यार खंजीरापासून पिस्तुल बंदुकीपर्यंत हातात धरून चालवायची शेकडो हत्यारे त्यात वरपासून खालपर्यंत आंतल्या बाजूला चोहीकडे अत्यंत कलात्मक रीतीने टांगून ठेवली आहेत. पुन्हा त्यातील प्रत्येकाचा आकार वेगळा आहे. खालून वरून किंवा कोठल्याही मजल्याला जोडणा-या मार्गिकेतून पाहिल्यास त्याच्या भव्य देखाव्याने डोळे दिपून जातात.
प्रत्येकी दोन मुख्य मजले व दोन उपमजले अशी त्या चार मजल्यांची रचना आहे. चारही मजल्यावर अनेक हॉल आहेत. प्रत्येक हॉलच्या भिंतींच्या कडेकडेने मोठमोठ्या कपाटात प्रेक्षणीय वस्तु मांडून ठेवल्या आहेत. मुख्य मजल्यांच्या हॉल्सच्या मधोमध कुठे श्रुंगारलेला हत्ती, तर कुठे उमद्या घोड्यावर आरूढ झालेला स्वार अशा भव्य प्रतिकृती उभ्या करून त्या जागी त्यावरील उपमजल्यावर भरपूर मोकळी जागा ठेवली आहे. त्यामुळे तो देखावा अधिक भव्य दिसतोच, शिवाय वरील गॅलरीतूनसुद्धा तो वेगवेगळ्या कोनातून पाहता येतो. कांही ठिकाणी मुख्य मजल्यावरील हॉलच्या मध्यभागी छोटेसे रंगमंच उभारून समोर बसून पहायला खुर्च्या मांडून ठेवल्या आहेत. त्याच ठिकाणी वरील उपमजल्यांवर मध्यभागी ठेवलेल्या मोकळ्या जागेतूनही खालच्या रंगमंचावर चालणारे नाट्य पाहता येते. अशा प्रकारे सर्व जागेचा अत्यंत कल्पकतेने उपयोग करून घेतला आहे.
इथे फक्त शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन नाही. त्यांचा उपयोग होत असताना घडलेल्या घटना इथे तितक्याच प्रकर्षाने दाखवल्या आहेत. त्यामुळे त्याला जीवंतपणा आला आहे. त्याशिवाय ठिकठिकाणी छोटीशी, फक्त दहा पंधरा माणसे बसू शकतील एवढी लहान बंदिस्त सभागृहे आहेत. विशेष घटना दाखवणारी चलचित्रे त्यांमध्ये पडद्यावर एकापाठोपाठ एक दाखवीत असतात. आपण वाटेल तितका वेळ बसून ती पहात राहू शकतो. जागोजागी कॉम्प्यूटर मॉनिटर्स ठेवलेले आहेत. त्यांच्यासमोर बसून आपल्याला पाहिजे ती दृष्यशृंखला निवडून पहात बसता येते, तसेच महत्वाच्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती वाचता व पाहता येते. एका बाजूला 'शिकार' आणि दुस-या बाजूला 'युद्ध' अशा दोन मुख्य विभागात हे म्यूझियम विभागलेले आहे.
इंग्लंडमधील कांटेरी झुडुपातून कुत्र्यांच्या सहाय्याने केलेली रानडुकराची शिकार असो, दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीतील विशालकाय मगरींची किंवा भारतीय उपखंडातील घनदाट अरण्यातील हिंस्र पशूंची असो, त्यांची दृष्ये दाखवणारे त्रिमिति देखावे किंवा प्रचंड तैलचित्रे 'शिकार' या भागात पहायला मिळतात. त्यात पुन्हा वेगवेगळ्या कालखंडात वापरात आलेली तंत्रे, तत्कालिन शस्त्रे यांची माहिती दिलेली आहे. मानवी संस्कृतीच्या विकासाबरोबरच त्याच्या हातातील आयुधांचा कसकसा विकास होत गेला याचा मागोवाही घेता येईल. अनादि काळापासून माणसाची निसर्गाबरोबर झटापट चाललेलीच आहे, तिचे सम्यक दर्शन या भागात घडते.
जगभर वेगवेगळ्या खंडात झालेल्या सर्व मुख्य लढाया 'युद्ध' विभागात दाखवल्या आहेत. त्यात कांही देखाव्यांच्या स्वरूपात आहेत तर अन्य सर्व चित्रांच्या माध्यमातून प्रदर्शित केल्या आहेत. इतिहासाचा अभ्यास करणा-या लोकांसाठी तर ही पर्वणीच आहे. इंग्लंडच्या दृष्टीने महत्वाच्या सर्व युद्धघटनांची तारखेनिशी तपशीलवार माहिती विस्ताराने दिली आहे. भारत, चीन, जपान आदि पौर्वात्य राष्ट्रांमध्ये घडून गेलेल्या ऐतिहासिक घटना, तेथील युद्धशास्त्र, प्राचीन काळातील शस्त्रे, युद्धात घालण्याचे पोषाख यांचे दर्शन घडवणारे स्वतंत्र दालन आहे. याशिवाय आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व अमेरिका खंडातील आदिम रहिवाशांची बूमरँगसारखी वैशिष्ट्यपूर्ण हत्यारेसुद्धा संग्रहात ठेवून त्यांचा उपयोग कशा प्रकारे केला जात असे याची सुंदर सचित्र माहिती दिली आहे.
दर तासातासाला होणारे लाईव्ह शोज हे या जागेचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. म्यूझियममध्ये प्रवेश करतांनाच आपल्या हातात एक कागद दिला जातो, त्यात त्या दिवशी होणारे कार्यक्रम दिलेले असतात. त्याप्रमाणे ठरलेल्या वेळी नट नट्या त्या प्रसंगाला साजेसे असे कपडे घालून रंगमंचावर येतात व वीस पंचवीस मिनिटे त-हेत-हेचे नाट्य सादर करतात. यात प्रचंड विविधता असते. मी पाहिलेल्या एका प्रसंगात अंगात चिलखत घालून व डोक्यावर चिरेटोप चढवून ढाल व तलवारीचा वापर करून दोन योध्यांनी केलेले लुटुपुटीचे द्वंद्वयुद्ध दाखवले तर सैनिकांच्या सेवेसाठी युद्धावर गेलेल्या एका परिचारिकेने पाहिलेल्या जखमी वीरांची करुण कहाणी तिच्याच शब्दात एका स्वगताद्वारे दुस-या प्रसंगात ऐकवली. यातील एका सैनिकावर तेचे मन जडलेले असल्याने ते नाट्य अधिकच भावनाप्रधान झाले होते. तिस-या खेळात इतिहासकाळातील एका सुप्रसिद्ध सेनापतीने आपल्या जवानांना उद्देशून केलेले वीररस व देशभक्तीपूर्ण भाषण सादर केले होते. कधीकधी तर इमारतीसमोरील मोकळ्या जागी घोडेस्वारांची लढाईसुद्धा दाखवतात.
युरोप अमेरिकेत कुठल्याही प्रेक्षणीय स्थळी गेलात तर तेथून बाहेर पडण्याच्या वाटेवर दोन दालने नेहमी दिसतील. त्यापैकी एकात अल्पोपाहारगृह असते आणि दुसरे म्हणजे त्या जागेच्या ठळक खुणा दाखवणा-या सॉव्हेनीयर्सचे दुकान असते. तशी ती इथेही आहेतच. रॉयल आर्मरीजमध्ये आलेला प्रेक्षक दिवसभर इथेच गुंतून राहील याची त्याच्या व्यवस्थापकांना बहुधा खात्री असावी. कारण इथे दुस-या मजल्यावरसुद्धा एक प्रशस्त फास्टफूड सेंटर आहे. म्हणजे अर्धे प्रदर्शन पाहून झाल्यावर बाहेर न जाता खाण्य़ापिण्यासाठी मध्यंतर घेऊन, ताजे तवाने होऊन उरलेला अर्धा भाग निवांतपणे पहाण्याची सोय करून ठेवली आहे. नाना प्रकारची खेळण्यातली हत्यारे, मुखवटे आणि प्रदर्शनातील वस्तू व देखाव्यांची चित्रे काढलेल्या विविध वस्तु येथील स्मरणचिन्हांच्या दुकानात मिळतात. त्यात गालिचे, वॉल हँगिंग्ज, पिशव्या, रुमाल यासारखी कापडे तर असतातच, पण लहान मुलांसाठी पेन्सिल, रबर आणि फूटपट्ट्या, गळ्यात घालायच्या माळा वा कानात लटकवायची ईयररिंग्ज, कॉफी मग, फुलदाण्या वगैरे अगदी वाटेल त्या वस्तू असतात.
त्याशिवाय येथे आणखी एक नाविण्यपूर्ण अनुभव या ठिकाणी घेता येतो. बाहेर पडायच्या वाटेवरील दालनात दोन मोठमोठ्या बंदुका माउंट करून ठेवलेल्या आहेत व त्याला दुर्बिणी वगैरे व्यवस्थितपणे लावलेल्या आहेत. त्यांच्यासमोरील बंद केबिनमध्ये टार्गेट्स ठेवलेली असतात. त्यासाठी लागणारे शुल्क भरून कोणीही त्या लक्ष्यांवर नेम धरून या बंदुका चालवण्याची नेमबाजी करू शकतो व घरी जाता जाता कधी नव्हे तो बंदूक चालवण्याचा एक वेगळा अनुभव घेऊ शकतो. त्यासाठी परवाना वगैरे काढण्याची गरज नसते.
अशी ही एक वैशिष्ट्यपूर्ण जागा आहे. इथे शस्त्रास्त्रे नुसती दाखवायसाठी मांडून ठेवलेली नाहीत तर ती कुठे, कधी व कशी बनली, त्यांची वैशिष्ट्ये कोणती, ती कुणी कुणी कोठल्या प्रसंगी वापरली, त्याचा जगाच्या इतिहासावर कोणता ठसा उमटला अशा अनेक पैलूंचे एक समग्र दर्शन घडते, एवढेच नव्हे तर इथली शिल्पे, चित्रे, सिनेमे, नाट्यछटा, कॉंप्यूटर सिम्युलेशन्स वगैरे सारे पाहिल्यावर एक आगळाच सर्वंकश अनुभव घेऊन आपण बाहेर येतो.

No comments: