या वर्षी मुंबईच्या लोकांनी सहा एप्रिलला गुढी पाडवा साजरा केला तर नागपूरच्या लोकांसाठी तो सात एप्रिलला आला म्हणे. मुंबईलासुध्दा दरवर्षाप्रमाणे सकाळी उजाडताच गुढी न उभारता ती सुमारे दहा वाजता उभी करायची असे सांगितले गेले होते. हा फरक कशामुळे होत असेल असा प्रश्न मनात डोकावतोच ना? मुसलमानांच्या ईदबद्दल तर नेहमीच अनिश्चितता असते. ईदच्या सुटीचा दिवस आयत्या वेळी बदलला तर ईद आणि शनिवार रविवारच्या सुट्यांना जोडून रजा घेऊन चार दिवस बाहेरगांवी गेलेल्या लोकांची बरीच पंचाईत होते. इंग्रजी कॅलेंडरचे मात्र बरे असते. ठरलेल्या दिवशी मध्यरात्री ठरलेल्या वेळी बाराच्या ठोक्याला न्यू ईयरची सुरुवात होते म्हणजे होतेच.
ती सुध्दा जगभर सर्व ठिकाणी एका वेळेला होत नाहीच! आम्ही मध्यरात्री मुंबईत " हॅपी न्यू ईयर" चा जल्लोष करत असतो तेंव्हा जपानमध्ये पहाट झालेली असते तर युरोपमध्ये रात्रीच्या पार्टीची तयारी चालली असते. अमेरिकेतले लोक अजून ऑफीसात बसून आदल्या दिवसाची कामेच उरकत असतात. पृथ्वीचा आकार गोल असल्यामुळे तिचा सगळा भाग एकदम सूर्यासमोर येत नाही, थोडा थोडा भाग सूर्याच्या उजेडात येऊन तिथे दिवस होतो आणि त्याच वेळेस पलीकडच्या बाजूचा थोडा थोडा भाग काळोखात जाऊन तिथे रात्र होते यामुळे असे होते. आपापल्या देशातल्या घड्याळात सुसूत्रता आणण्यासाठी एक स्टॅंडर्ड टाईम ठरवली जाते. अमेरिका आणि रशिया यासारख्या अवाढव्य पसरलेल्या देशात तर वेगवेगळे टाईम झोन ठरवावे लागतात. अखेर ज्या विभागात जी प्रमाणित वेळ असेल तिच्याप्रमाणे ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता नवे वर्ष सुरू होते. तो नेमका क्षण ठरवला गेला असला तरी त्या क्षणी बाहेर निसर्गात कांही म्हणजे कांही विशेष घडत नसते. निदान साध्या डोळ्यांनी दिसण्यासारखे कांही नसते. नासाचे शास्त्रज्ञ त्यातही कांही अतिसूक्ष्म निरीक्षणे करून आपली घड्याळे कांही मिलीसेकंदाने मागेपुढे करून घेतात एवढेच!
इस्लामी पध्दतीत अमावास्येला गायब झालेला चंद्र आभाळात प्रत्यक्ष डोळ्यांना दिसल्यानंतरच प्रत्येक पुढील महिन्याची सुरुवात होते. हा 'ईदका चॉंद' किंवा ही 'प्रतिपच्चंद्ररेखा' अगदी पुसट असते आणि त्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर लवकरच चंद्रही अस्तंगत होतो. त्यामुळे कुठे तो दिसतो किंवा कुठे दिसत नाही. त्याच वेळी पश्चिमेच्या क्षितिजावर काळे ढग जमले तर तो दिसणे कठीणच! याचप्रमाणे वर्षाचा शेवटचा महिना संपल्यानंतर जेंव्हा चंद्रदर्शन होईल तेंव्हाच त्यांच्या नव्या वर्षाची सुरुवात होणार. त्यामुळे त्याचा सस्पेन्स अखेरपर्यंत कायम असतो.
आपले पंचांग तर अत्यंत शास्त्रशुध्द पध्दतीने अतीशय काटेकोरपणे तयार केलेले दिसते, मग त्यात सगळीकडे एका वेळी एक तिथी कां येत नाही? या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले आहे. तिथी ठरवण्याच्या जटिल पध्दतीमुळेच ती वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या वेळी येते. दररोज रात्रीच्या बारा वाजता तारीख आणि वार बदलण्याच्या सोप्या सुटसुटीत पध्दतीची आपल्याला इतकी संवय झाली आहे की "आज इतके वाजेपर्यंतच चतुर्थी आहे, त्यानंतर पंचमी सुरू होते." असे कोणी पंचांग पाहून सांगितलेले आपण ऐकतो, त्याचा नीटसा अर्थ कळत नाही. कधी कोणत्या तिथीचा क्षय होतो आणि एकादशी तर बहुधा नेहमीच लागोपाठ दोन दिवस असते. ते सगळे कांही शास्त्रीपंडित जाणतात असे म्हणून आपण सोडून देतो. पण आपल्याला जरी ते ठरवता आले नाही तरी समजून घ्यायला तितकेसेकठीण नाही.
ज्या काळात पंचांग तयार करण्याचे शास्त्र निर्माण झाले तेंव्हा सूर्योदयापासून दिवस सुरू होत असे व त्याप्रमाणे वार बदलत असे. चंद्राच्या निरीक्षणावरून तिथी ठरवण्याची क्रिया बरीच गुंतागुंतीची आहे. आकाशात भ्रमण करत असलेला ( किंवा तसा दिसणारा) सूर्य आणि चंद्र हे दोघे अमावास्येला एकत्र असतात. त्यानंतर चंद्र सूर्यापासून दूर जातो आणि पौर्णिमेला तो सूर्याच्या समोर येतो. हे दोघेही क्षितिजापासून किती अंशाने वर किंवा खाली आहेत हे पाहून त्यातला फरक बारा अंशाने वाढला की शुक्लपक्षातली तिथी बदलते आणि त्या उलट तो बारा अंशाने कमी झाला की कृष्णपक्षातली तिथी बदलते. हे निरीक्षण त्या काळी कसे करत असतील कुणास ठाऊक? पण वर्षानुवर्षे केलेल्या सूक्ष्म निरीक्षणातून जी सूत्रे किंवा कोष्टके त्या काळात तयार केली गेली ती इतकी अचूक आहेत की तींवरून आजही पुढील काळातले पंचांग बनवले जाते. अमावास्येच्या सुमारास हे बारा अंशाचे अंतर लवकर कापले जाते आणि पौर्णिमेच्या सुमारास त्याला जरा अधिक वेळ लागतो असे दिसते. त्याचे शास्त्रीय कारण इथे देण्याची गरज नाही. पण हा बदलण्याचा क्षण दिवसा किंवा रात्री केंव्हाही येऊ शकतो. त्यामुळे आपल्या पंचांगातली तिथी रोज वेगवेगळ्या वेळी बदलत असते. सूर्योदयाच्या वेळेस जी तिथी असते ती सर्वसाधारणपणे त्या दिवसाची तिथी मानली जाते.
आपल्या देशातसुध्दा सगळ्या जागी एकाच वेळी सूर्य उगवत किंवा मावळत नाही. मुंबईच्या पूर्वेला असलेल्या कोलकात्याला नेहमीच तो मुंबईपेक्षा तासभर आधी उगवतो आणि तासभर आधी अस्तालाही जातो. बंगलोरच्या उत्तरेला असलेल्या दिल्लीला मात्र तो उन्हाळ्यात आधी उगवून उशीराने मावळतो आणि थंडीच्या दिवसात याच्या बरोबर उलट घडते, कारण दोन्ही ठिकाणचे दिवस आणि रात्र समान नसतात. अशा प्रकारे प्रत्येक गांवाच्या अक्षांश व रेखांशाप्रमाणे तिथल्या सूर्योदयाची तसेच चंद्रोदयाची वेळ निरनिराळी असते. त्यामुळे तिथी बदलण्याच्या वेळा देखील वेगळ्या येतात.
या वर्षी एक गंमतच झाली. ६ एप्रिलच्या सूर्योदयाच्या वेळी फाल्गुन अमावास्या चालू होती, ती सकाळच्या सुमारे साडेनऊ वाजता संपली आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा सुरू झाली. पण ती देखील ७ एप्रिलच्या पहाटे सूर्योदय होण्याच्या आधीच संपून द्वितीया सुरू होते. म्हणजे या वेळेस प्रतिपदेचाच क्षय झाला! मग पाडवा कधी साजरा करायचा? अशा पेंचातून मार्ग काढण्याचा उपाय शास्त्रात दिला आहेच. त्याप्रमाणे ६ तारखेला अमावास्या संपल्यानंतर गुढी उभारायला मोकळीक दिली गेली. मुंबईच्या मानाने नागपूरला सूर्योदय लवकर होत असल्यामुळे ७ तारखेला त्या वेळेत प्रतिपदा संपत नव्हती, त्यामुळे ७ तारीखेलाच प्रतिपदा निश्चित होऊन त्या दिवशी गुढी पाडवा आला. खूप इंटरेस्टिंग आहे ना?
4 comments:
क्षितिजापासून किती अंश वर असे नसून सूर्य व चंद्र यांचेमधील अंशात्मक अंतर बारा अंशानी वाढले की चंद्राची एक कला वा एक तिथि पुढे जाते. हे अम्तर वाढणे सूर्य व चंद्र दोघांच्या गतीवर अवलंबून असल्यामुळे बारा अंशांची वाढ होण्याचा काल सारखा असत नाही. नवीन तिथि सुरू झाल्याचा क्षण सूक्ष्म गणितानेच ठरवावा लागतॊ.
प्रथम आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपला आभारी आहे.
सूर्य व चंद्र यांचेमधील अंशात्मक अंतर बारा अंशानी वाढले की चंद्राची एक कला वा एक तिथि पुढे जाते---
आपले म्हणणे अगदी बरोबर आहे.पण याचा सोप्या भाषेत अर्थ पृथ्वी व सूर्य यांना जोडणारी रेषा आणि पृथ्वी व चंद्र यांना जोडणारी रेषा यांमधील कोन असा होईल. पृथ्वीवर राहून आपण आकाशात अशा रेषा काढू शकत नाही. त्यामुळे क्षितिजाचा संदर्भ घेऊन, सूर्य व पृथ्वी आणि चंद्र व पृथ्वी यांमधील वेगवेगळे कोन मोजून आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करून हे अंशात्मक अंतर ठरवता येते. अवकाशातील सर्व निरीक्षण पृथ्वीवर राहून जसे दिसेल तसेच करावे लागते हे मी लेखात लिहिले आहे. सूर्य व चंद्र यांतील अंशात्मक अंतर थेट पाहण्यासाठी कदाचित सूर्यमालिकेच्या बाहेर जाऊन तो कोन पहावा लागेल असे मला वाटते.
हे अम्तर वाढणे सूर्य व चंद्र दोघांच्या गतीवर अवलंबून असल्यामुळे बारा अंशांची वाढ होण्याचा काल सारखा असत नाही -----
मी हेच सांगितले आहे. लेखाचा आवाका वाढू नये यासाठी शास्त्रीय कारण दिले नाही. प्रत्यक्षात सूर्य आपल्या जागचा हलत नाही. पृथ्वीच्या त्याच्याभोवतीच्या भ्रमणामुळे तसा भास होतो.
नवीन तिथि सुरू झाल्याचा क्षण सूक्ष्म गणितानेच ठरवावा लागतॊ.
अगदी बरोबर. ज्या महान विद्वानांनी या गणितांची सूत्रे मांडली त्यांच्या अचाट बुध्दीमत्तेची झेप थक्क करणारी आहे.
सूर्याने व चंद्राने अमक्या राशीत प्रवेश केला आणि त्या राशीत इतके अंश, कला, विकला इतके अंतर कापले याचा मागोवा घेण्याची गणिते आहेत. त्यांच्या आधाराने त्या दोघांमधील अंशात्मक अंतर काढता येते व बहुधा ते असेच केले जात असणार. ज्या प्रमाणे पृथ्वीवर अक्षांश व रेखांशाच्या रेघा निसर्गाने आंखलेल्या नाहीत, भूगोलाच्या अभ्यासात नेमकेपणा आणण्यासाठी शास्त्रज्ञांनी तयार केलेली ती संकल्पना आहे, त्याचप्रमाणे राशी किंवा नक्षत्रांच्या सीमारेषा आपल्याला प्रत्यक्ष आकाशात दिसत नाहीत. आकाशाच्या गोलाचे बारा समान भाग पाडून त्यांना खगोलशास्त्रज्ञांनी राशींची नांवे दिली आहेत. त्यांच्या पार्श्वभूमीवर सूर्य, चंद्र व ग्रहांचे स्थान नेमकेपणाने ठरवता येते आणि त्यांच्या भ्रमणाचा माग काढता येतो.
Post a Comment