Monday, March 03, 2008

बोलू ऐसे बोल (भाग १)

केयूरा न विभूषयन्ति पुरुषं माला न चंद्रोज्ज्वलाः । न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः । वाण्यैका समलङ्करोति पुरुषं या संस्कृतार्धायते । क्षीयंते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ।।
असे एक संस्कृत सुभाषित आहे. स्नान करून चंदनाचा लेप लावणे, हातात फुलांचा गजरा आणि गळ्यात चंद्रासारखी उज्ज्वल मोत्यांची माळ परिधान करणे, केसात मोराच्या पिसाचा तुरा खोवणे वगैरे शृंगारामुळे पुरुषाला खरी शोभा येत नाही. त्याचे बोलणे हे त्याचे खरे आभूषण आहे असे सुभाषितकारांनी त्यात म्हंटले आहे. आताच्या काळात सांगायचे झाले तर सूट बूट आदि "एक नूर आदमी तर दस नूर कपडा" चढवून, केसांचा कोंबडा करून, पॅरिसचे परफ्यूमचा स्प्रे घेऊन भपकेबाज केलेले व्यक्तिमत्व कदाचित प्रथमदर्शनी छाप पाडेल पण एकदा बोलणे सुरू झाले की जो माणूस बोलण्यात चतुर असेल तोच बाजी मारेल. पण हे सर्व फक्त पुरुषांसाठी झालं.
स्त्रियांची गोष्ट जरा वेगळी आहे. सौंदर्य प्रसाधन किंवा खेडवळ भाषेत नट्टा पट्टा हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचाच एक अविभाज्य भाग असतो. दोन तीन वर्षाची चिमुरडी पोर सुद्धा वारंवार आरशात पाहून स्नोव्हाईटच्या सावत्र आईप्रमाणे त्याला "सांग दर्पणा कशी मी दिसते" असे विचारत असते. स्त्रियांच्या जागतिक सौदर्य स्पर्धा होतात, वैयक्तिक पातळीवर एकमेकींशी तुलना होतच असतात. शहरात जागोजागी त्यांच्यासाठी सौंदर्यवर्धन केंद्रे (ब्यूटी पार्लर्स) असतात आणि बहुतेक जणी चेहरा सजवण्याचे आपले साहित्य नेहमीच बरोबर बाळगतात. पण यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे वाग्देवीचे वरदान त्यांना जन्मतःच मिळते. या बाबतीत तिने स्त्रीवर्गाच्या बाजूने पक्षपात केला आहे असे दिसते. कुठल्याही विषयावर किंवा कुठल्याही विषयाशिवायसुद्धा बहुतेक महिला तासनतास बोलत राहू शकतात. हे मी टीका करण्याच्या उद्देशाने लिहिलेले नाही, कौतुकाने लिहिले आहे.
खरेच मला कधी कधी त्यांचा हेवा सुद्धा वाटतो कारण माझी गोष्ट मात्र बरोबर याच्या उलट होती. मुखस्तंभ, मुखदुर्बळ वगैरे विशेषणे मला लहानपणी मिळायची. आता लोक तोंडावर मितभाषी, अबोल म्हणतात आणि पाठीमागे शिष्ट नाहीतर तुसडा म्हणत असतील. असतो एकेकाचा स्वभाव त्याला काय करणार? पण माझ्या आईला मात्र माझी फार काळजी लागली होती. इतर मुलांसारखा कांगावा, कागाळ्या आणि आक्रस्ताळेपणा करणे सोडाच पण साधी तक्रार करण्यासाठी किंवा काय पाहिजे ते मागून घेण्यासाठीसुद्धा तोंड न उघडणा-या या मुलाला निष्ठुर जग कच्चे फाडून खाईल अशी भीती तिला वाटायची. त्यामुळे मला बोलके करण्याचे तिचे प्रयत्न सतत सुरू असायचे. कधी ती मला शेजारच्या रखमाकाकूकडे एक निरोप देऊन पाठवून द्यायची. मी धांवत धांवत जाऊन "आईनं तुम्हाला गुरुवारी शेवया करायला बोलावलं आहे." असं सांगून उड्या मारीत परत येऊन जाई. आई विचारायची, "काय रे, काकू काय म्हणाल्या?" त्यांनी कांही म्हणायच्या आतच मी परत आलो आहे हे तिला समजायचं. मग ती सांगायची, "त्यांना वेळ आहे कां ते विचार आणि त्यांचं उत्तर मला येऊन सांग."
मी अनिच्छेनेच पुन्हा एकदा जाऊन "आत्ता मी तुम्हाला सांगितलं ना की आईनं गुरुवारी बोलावलंय् म्हणून? मग तुम्हाला वेळ आहे की नाही ते आईनं विचारलंय्." असं कांही तरी तुसडेपणाने विचारायचा. त्याकडे लक्ष न देता आवाजात मोठा गोडवा आणत त्या विचारायच्या, "हा बघ मी तुझ्यासाठी वाटीत लाडू काढून आणला होता. आधी बस, तो खाऊन घे बाळा." खरं तर त्यांनी केलेला लाडू मला फार आवडायचा, पण एक कडंग लाडू खायला घालून तो खाऊन होईपर्यंत त्या सतरा प्रश्न विचारून आमच्याकडे कोण कोण आले गेले, ते काय म्हणाले वगैरे चौकशा करणार आणि ते सगळं तिखटमीठ लावून गांवभर करणार हे ओळखून मी उत्तर द्यायचा, "काकू, माझा एक दांत हलतो आहे, त्यामुळे आज मला लाडू खाता येणार नाही, पण तुम्हाला वेळ आहे की नाही ते सांगा ना!"
माझी आई बरेच वेळा मला बाजारातून चार वस्तू घेऊन यायला पाठवायची. जातांना नीट चौकशी करून सगळं सामान आणायला बजावून सांगायची. "त्यात कसली चौकशी?" या माझ्या प्रश्नावर ती सांगायची, "अरे, यात कोणकोणचे प्रकार आहेत? त्यांच्या किंमती काय आहेत? हा माल कधी आला? नवीन माल कधी येणार आहे? वगैरे सगळं विचारून, पाहून घेऊन, नंतर आपल्याला काय पाहिजे ते सांगायचं असतं, नाहीतर ते लोक कांहीही आपल्या गळ्यात बांधतात." अर्थातच त्या काळी आजच्यासारखी लेबले लावून पॅकबंद माल विकायला ठेवण्याची पद्धत नव्हती. मी आज्ञाधारकपणे चार वस्तूंची नांवे आणि चार प्रश्न लक्षात ठेवून घेत असे. त्या वयात स्मरणशक्ती जरा बरी होती, त्यामुळे आतासारखी चिठो-यावर ते लिहून न्यायची गरज पडायची नाही. बहुतेक वेळी मी आणलेले सामान बरोबरच असे. त्यातूनही कधी गुळाचा दर्जा जरा कमी असला तर, "राहू दे, आपण आमटी भाजीत घालून संपवून टाकू." आणि तो जास्तच महागडा व उच्च दर्जाचा असेल तर, "या संकष्टीला आपण मोदकांचा नैवेद्य करू" असे कांहीतरी आई पुटपुटे, पण मला कांही बोलायची नाही कारण मी लगेच ते निमित्त करून "आपल्याला कांही तो बाजार बिजार जमत नाही." असे म्हणून मोकळा होऊन जाईन ही भीती होती, आणि मला बाजारात पाठवण्यामागे बाजारातून वस्तू आणायचा तिचा मूळ हेतू नसायचाच.
क्वचित कधी एकादा अगदीच टाकाऊ आणि निरुपयोगी पदार्थ आणलाच तर ती कांही न बोलता मला त्या दुकानात घेऊन जायची आणि दुकानदाराला सांगायची, "तुम्ही बहुधा चुकून कांही वेगळाच पदार्थ आज पाठवला आहे हो. अगदी समजा की या मुलानं वेगळं कांही तरी मागितलं तरी आम्ही नेहमी कुठलं सामान घेतो ते तर तुम्हाला माहीतच आहे ना? तुमच्याकडे काय आज पहिल्यांदा सामान घेतोय्?" दुकानदार निमूटपणे तो पदार्थ बदलून द्यायचा. येता येता मी म्हंटलं, "आई पण?" माझे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच ती विचारायची, "यात त्याची कांही चूक नाही असंच तुला म्हणायचंय ना? अरे मला ते माहीत आहे आणि त्यालाही हे माहीत आहे. त्यालाच माल बदलून द्यायला आपण सांगितलं असतं तर त्यानं उगीच नखरे दाखवले असते, वेळ घालवला असता आणि उपकाराचं ओझं आपल्या डोक्यावर चढवलं असतं. तसलं कांही झालं नाही, आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळाली आणि आपण त्याचंही कांही नुकसान केलेलें नाही. मग झालं तर. आपण काय बोलतो यापेक्षा सुद्धा त्यामागचा उद्देश आणि त्याचे परिणाम महत्वाचे असतात." आईने दिलेली हीच शिकवण तीस चाळीस वर्षानंतर एका पंचतारांकित हॉटेलामधील वातानुकूलित सभागृहात एका आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त व्यवस्थापन तज्ञाच्या तोंडून ऐकायला मिळाली तेंव्हा मलाच मनांत हंसू आलं.

असाच एक थोडासा मोठा बुजरा मुलगा एकदा आईने सांगितले महणून अनिच्छेने एका पार्टीला जायला निघाला. त्याच्या आईनं समजावलं, "जरा चार लोकात मिसळ, बहुतेक लोक क्रिकेटची मॅच किंवा पिक्चरबद्दल बोलत असतात, त्यात आपणही हृतीकनं काय छान काम केलंय्? नाहीतर तेंडुलकरनं अशी सैंचुरी मारली वगैरे ठोकून द्यायचं. तुला तर त्यातलं सगळं लेटेस्ट माहीत असतंच. आणि बायकांच्या बरोबर तर तुला कांही प्रॉब्लेमच येणार नाही, जे काय बोलायचं ते त्याच बोलतील. तू आपला "वा!वा!", "छान" म्हणत रहा. त्यातूनच वाटलं तर "लग्न झालं कां? किती मुलं आहेत?" वगैरे चौकशी केली की झालं." तो मुलगा "वा!वा!, छान छान" असे घोकत घोकत पार्टीला गेला.
दारावरच त्याच्याच वयाच्या एका मुलीने त्याचे स्वागत केलं. आपल्या मैत्रिणींची वाट पहात ती एकटीच उभी होती. ओळख करून देण्यासाठी आपले आणि आपल्या आईवडिलांचं नांव त्याने सांगितल्यावर तो चांगल्या घरातला मुलगा आहे हे तिला समजले. दिसायलाही तो गोरा गोमटा होता. त्याच्याशी थोडे सूत जमले तरीही फारशी कांही हरकत नाही अशा विचारानं आपल्या मैत्रिणी येईपर्यंत त्याच्या बरोबर संभाषणाचा धागा धरून ठेवावा असे तिला वाटले. पांच दहा मिनिटं हवापाण्यावर बोलण्यात गेली. तो आपला "हं हूं वा!वा! छान" वगैरे म्हणत होता. शेवटी "तुला कांहीच बोलायचं नाही आहे का?" असे तिनेच विचारलं. तो लगेच म्हणाला, "तुझं लग्न झालंय कां?". हा भोळासांब दिसणारा मुलगा एकदम थेट मुद्यावर आला हे पाहून ती चाटच पडली. छानशी लाजून तिने खाली मुंडी घालत आपली मान नाजुकपणे हलवली. त्याने लगेच दुसरा प्रश्न विचारला, "तुला किती मुलं आहेत?". आता मात्र तिचा एकदम भडका उडाला. आपली कांही तरी चूक झाली असे त्यालाही वाटलं. तो दुसरीकडे गेला.
एक मध्यमवयीन बाई एका गृहस्थापुढे आपल्या सुखी संसाराची पोथी वाचत होती, त्या गृहस्थाने त्याला हाक मारून बोलावून घेतले आणि त्याला तिच्या ताब्यात देऊन संधी मिळताच कुणाच्या तरी हांकेला ओ देण्याचं निमित्त करून ते तिथून सटकले. आपल्या मुलाचा अभ्यास, त्याचे खेळ, गिर्यारोहणाचा छंद, मुलीचं गाणं, नृत्यकला, चित्रकला, दोघांच्या खाण्यापिण्यातल्या आवडी निवडी, नखरे वगैरेचे पुराण चालू होते. कांही वेळाने त्यालाही "हं हूं वा!वा!छान" म्हणायचा कंटाळा आला. त्यानं आता प्रश्नांचा क्रम बदलून दुसरा प्रश्न आधी विचारला, "तुम्हाला किती मुलं आहेत हो?" "म्हणजे काय? अहो दोनच ना! अभी आणि अस्मिता." तिने अभिमानाने सांगितले, "दोघंही आले आहेत ना! बघते हं मी ते कुठं आहेत ते." असे म्हणत तिने मान थोडीशी फिरवली असेल तेवढ्यात तो दुसरा प्रश्न विचारून मोकळा झाला, "तुमचं लग्न झालंय कां हो?" त्यानंतर काय झालं असेल ते सांगायलाच नको. बोलण्यामागचा उद्देश, परिणाम वगैरे थोडे लक्षात ठेवल्यामुळे माझ्याकडून असा ब्रह्मघोटाळा मात्र कधी झाला नाही.
थोडे मोठे झाल्यावर एकदा मी एका मित्राकडे गेलो होतो. तो कुठे बाहेर गेला होता त्याच्या येण्याची वाट पहात थांबलो होतो. त्याचा बारा तेरा वर्षांचा लाडावलेला मुलगा तिथेच टी.व्ही. पहात बसला होता. मी समोर पडलेले एक मासिक घेऊन चाळवत बसलो होतो. मध्येच तो मुलगा म्हणाला, "काका, मला जरा तो रिमोट द्या ना." मी डोळे वर करून पाहिले, आमच्या दोघांच्या मध्ये एक टेबल होते. त्यावर तो ठेवला होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा मासिक वाचनात गुंग झालो. तो मुलगा म्हणाला,"काका, मी तुम्हाला कांही तरी सांगितलं." मी लगेच म्हणालो, "हो. मी ते ऐकलं." "मग मला रिमोट देत कां नाही?" मी म्हंटले,"असं आहे, मी आत्ता हिमालय चढत नाही आहे की समुद्रात उडी मारत नाही आहे, दाढी करत नाही आहे आणि सायकलही चालवत नाही आहे. आता मी कुठकुठल्या गोष्टी करीत नाही आहे याची कारणं सांगू? एखादी गोष्ट करण्याला कांहीतरी कारण असतं, न करण्याला ते असायची गरज नसते." "पण मी तुम्हाला रिमोट मागितलाय ना?" "म्हणून काय झालं? अरे, माझ्याजवळ एखादी वस्तु असेल आणि मला ती द्यावीशी वाटेल तरच मी ती देईन ना? मला एखादं तरी कारण दिसायला हवं ना?" "पण हा रिमोट तर हा काय इथेच समोर पडला आहे." "हो. मी पाहिला आणि म्हणूनच तुला दिला नाही. तुझ्या जागी एखादे आजोबा असते तर मी तो उचलून आदरानं त्यांना दिला असता आणि एकादा आजारी माणूस असला तर त्याला कष्ट पडू नयेत म्हणून मदत करायच्या भावनेनं दिला असता. पण तू स्वतः पाहिजे असल्यास तो सहज घेऊ शकतो आहेस हे मला दिसतय्. मग मी तुझ्यासाठी ते काम करावं असं मला कां म्हणून वाटेल? तूच सांग." "पण माझी आई तर तिला कांहीही मागितलं की लगेच आणून देते." "त्याला एक कारण आहे. तिनं तुला लहानाचं मोठं केलं आहे. तुला स्वतःला कांही करता येत नव्हतं तेंव्हापासून तुला लागेल ते सगळं आणून द्यायची तिला संवय लागली आहे. ते करण्यात तिला एक प्रकारचा आनंद मिळतो. पण आता तू मोठा झाला आहेस. आता तुलाच आपल्या गोष्टी आपण करायला पाहिजेत. तुझी आई एक तू मागितलं म्हणून लगेच देईल. इतर लोक कशाला देतील?" आमचे हे सारे संभाषण त्याची आई बाजूच्याच स्वयंपाकघरात उभी राहून ऐकत होती. हातात एक ट्रे घेऊन बाहेर येतायेता ती पुटपुटली, "इतका मेला वाद घालण्यापेक्षा तो रिमोट देऊन टाकला असता तर काय विघडलं असतं?" मी हंसत म्हंटलं, "खरंच हो, कांही सुद्धा बिघडलं नसतं." त्या माउलीशी वाद घालण्याची माझी मुळीसुद्धा इच्छा नव्हती, कारण मला आपल्या मित्राची वाट पहात तिथे आणखी थोडा वेळ थांबायचे होते आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तिने आणलेले बशीभर कांदे पोहे चवीने खायचे होते. पण तो मुलगा उठून आपल्या हाताने रिमोट उचलून घेतांना दिसला आणि माझ्या बोलण्याचा परिणाम होतांना मला पहायला मिळाला.

(क्रमशः)

No comments: