Wednesday, January 09, 2013

रक्त आणि रक्ताभिसरणाचे नियंत्रण

शरीरामधल्या रक्ताची विविध प्रकाराने तपासणी करून आणि रक्तदाब, नाडीचे ठोके वगैरे अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्याचा उपयोग रोग्याच्या शरीराची अवस्था समजून घेण्यासाठी आणि त्याच्या व्याधीचे निदान करण्यासाठी केला जातो. हे करतांना त्याच्या रक्तामध्ये काही दोष किंवा तृटी आढळल्या तर त्यावर औषधोपचार करतात. काही बाबतीत रक्ताच्या तपासणीमध्ये सगळे काही व्यवस्थित निघाले तरी व्याधीच्या निवारणीसाठी त्याच्या गुणधर्मांमध्ये थोडा बदल करणारी औषधयोजना केली जाते. रक्ताच्या गुणधर्मांचे हे नियंत्रण केंव्हा आणि कसे केले जाते याबद्दल ढोबळ स्वरूपाची सर्वसाधारण माहिती या लेखात दिली आहे.

पूर्वीच्या म्हणजे माझ्या आधीच्या पिढीच्या काळात रक्ताची तपासणी करणे सहजसाध्य नव्हते हे मी या मालिकेतल्या पहिल्या लेखात लिहिले होते. आजकाल शहरात राहणा-या लोकांच्या मुलांच्या रक्ताची तपासणी त्या मुलांच्या जन्माच्याही आधीपासून सुरू होते. मुलाची माता आणि पिता यांचे रक्तगट वेगवेगळे असतील आणि ते गट एकमेकांचे शत्रू असतील तर त्या मुलाच्या आईच्या शरीरातच मुलाच्या रक्ताच्या अँटीबॉडीज तयार होऊ लागतात आणि त्या मुलाला गर्भामध्येच त्रास सुरू होतो. त्यांचे रक्तगट माहीत असले किंवा तपासणीमधून समजले तर त्या संभाव्य धोक्याच्या निवारणासाठी आधीपासून उपचार सुरू केले जातात. पूर्वीच्या काळात ही चिकित्सा ठाऊक नसल्यामुळे काही कुटुंबांमधली मुले जन्माला येण्यापूर्वीच दगावत असत, काही वेळा मातेचाही जीव जात असे आणि त्याचा दोष त्या दुर्दैवी मातेला दिला जात असे. गर्भामधील बाळाची वाढ होत असतांना त्याच्या हृदयाचे ठोके पडणे सुरू झाले की आजकालच्या तंत्राने ते मोजले जाऊ लागतात आणि त्यावरून त्याच्या आरोग्याची माहिती मिळते. त्या बाळाच्या शरीरात होत असलेल्या रक्ताभिसरणाची माहिती डॉपलर सोनोग्राफीमधून मिळते आणि आवश्यक असल्यास त्यावर औषधोपचार केले जातात.

लहान मूल असो की मोठा माणूस, कोणालाही आलेला ताप, खोकला, अशक्तपणा वगैरेसारख्या व्याधी जास्त रेंगाळल्या तर त्याच्या रक्ताची तपासणी केली जाते. त्यात कधी हिमोग्लोबिन कमी निघते, तर कधी इसोनोफिलिया काउंट जास्त निघतो, थायरॉईडमधून निघणारे हार्मोन्स कमी किंवा जास्त सापडतात, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम वगैरेंची उणीव असते. असे अनंत दोष रक्तात सापडू शकतात. रक्तामधला अशा प्रकारचा असमतोल एक दोन दिवसात सुधारत नाही. त्यासाठी महिनाभर किंवा काही महिने औषधोपचार, पथ्यपाणी वगैरे सांभाळावे लागते. या उपचाराने रक्तामधल्या कमतरतेत सुधारणा झाली तरी आपल्याला ती थेट जाणवत नाही आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा रक्ताची तपासणी करून पहावी लागते. सुरू केलेल्या औषधाचा डोस बदलायचा किंवा औषध थांबवण्याचा निर्णय रक्ताची तपासणी करून त्यावरून घेतला जातो. काही मुलांना जन्मापासूनच असलेल्या थायरॉइड्सच्या काही आजारांत किंवा एका प्रकारच्या मधुमेहात जन्मभर औषध घ्यावे लागते. थॅलेसेमिया या आजारात जन्मभर बाहेरून रक्त द्यावे लागते. ज्यांची दोन्ही मूत्रपिंडे कामातून गेली आहेत अशा रुग्णांच्या रक्ताचे डायालिसिस करून ते शुध्द करून घ्यावे लागते. अशा प्रकारचे काही रोग पूर्वी असाध्य समजले जात. आता त्यांच्या रुग्णांच्या रक्तावर नियंत्रण ठेऊन त्या रोगांचे मॅनेजमेंट केले जाते.

आजकालची सुखासीन जीवनशैली आणि वाढता मानसिक ताण यामुळे उच्च रक्तदाब (हायपर ब्लड प्रेशर) आणि मधुमेह (डायबेटिस) या व्याधींच्या प्रमाणात असंख्यपटीने वाढ झाली आहे. मधुमेहामध्ये शरीरात तयार होणारे इन्शुलिन कमी पडल्यामुळे रक्तामधल्या साखरेचे पुरेसे ज्वलन होत नाही. यामुळे इंद्रियांना पुरेशी ऊर्जा मिळत नाही. बैठे काम करतांना ही गोष्ट कोणाच्या लक्षातही येत नाही. पण यामुळे डोळे, पाय, मूत्रपिंडे वगैरे निकामी झाल्यानंतर ते समजले तर तोवर फार उशीर झालेला असतो. त्यामुळे आता सर्वच वयाच्या लोकांनी अधून मधून आणि चाळिशी उलटून गेल्यानंतर निदान वर्षातून एकदा रक्तशर्करेची तपासणी करून घ्यावी असा सल्ला डॉक्टरच देतात. साखरेचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे या तपासणीत दिसून आले तर मधुमेहाची कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नसतांनासुध्दा खाण्यावर नियंत्रण, नियमित व्यायाम आणि तरीही गरज असल्यास औषधोपचार घेऊन ते कमी करणे आवश्यक असते. यामुळे मधुमेह कायमचा बरा झाला किंवा शरीरात तयार होणारे इन्शुलिन वाढले असे कदाचित होणार नाही, पण रक्तामधले साखरेचे प्रमाण मर्यादेत राहिले तर त्यामुळे शरीरामधल्या सर्व इंद्रियांना होणारा अपाय आपण टाळू किंवा कमीत कमी करू शकतो. शरीराची होणारी झीज भरून काढण्याची क्षमता निसर्गाने त्याला दिलेली आहे. ती वयाप्रमाणे कमी कमी होत जाते. त्यामुळे आधी फक्त व्यायामानेच भागले तर काही काळाने त्याला पथ्याची जोड द्यावी लागते, त्यानंतर नियमितपणे औषध घेणे आवश्यक होऊन बसते. या औषधांमुळे रोग बरा होत नाही, फक्त तो नियंत्रणाखाली राहतो. यामुळे रक्तामधली साखर तपासल्यावंतर ती लिमिटमध्ये दिसत असली तरीसुध्दा ही औषधे घेत रहावे लागते. सुरू झाल्यालंतर बहुधा ती कायमची मागे लागतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. काही रुग्णांच्या बाबतीत याच्या पलीकडली अवस्था येते. औषध घेऊनसुध्दा त्यांचे शरीर जास्त इन्शुलिन तयार करू शकत नाही. अशा रोग्यांना त्यांच्या रक्तात इंजेक्शनद्वारे इन्शुलिन घुसवावे लागते. नियमितपणे तपासणी करून आहार आणि इन्शुलिन यांचे प्रमाण आणि वेळा ठरवून त्या पाळाव्या लागतात. त्यात हयगय झाली की शरीराला पुरेशी ऊर्जा न मिळाल्यामुळे त्यांची दयनीय अवस्था होते. त्यामुळे मधुमेह झालेले बहुतेक लोक रक्तातल्या साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेऊन एरवी मात्र आपले आयुष्य सुखेनैव जगत असतात.    

मधुमेहाप्रमाणेच उच्च रक्तदाब हासुध्दा दुसरा गनिमी शत्रू (सायलंट किलर) आहे. लहान मुलांचे सर्व शरीरच खूप लवचिक असते. माणसाचे वय जसजसे वाढते तसा हा लवचिकपणा कमी होऊन ताठरपणा वाढत जातो, त्याची हाडे ठिसूळ होतात, मांसल भाग ताठर होतात आणि रक्तवाहिन्यासुध्दा निबर होतात. त्या लवचिक असतांना त्यातल्या रक्ताचा दाब वाढताच त्या किंचित फुगल्या की आपोआपच तो दाब कमी होत असतो. पण हा लवचिकपणा कमी झाल्यानंतर त्यांचे प्रसरण आणि आकुंचन पावणे कमी प्रमाणात होते. यामुळे उतार वयात रक्तदाबाचा विकार जडण्याची शक्यता जास्त असते आणि तो आपोआप बरा होत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातला रक्तदाब सारखा नसतो आणि तो क्षणोक्षणी बदलत असतो. त्यामुळे त्यात पडलेला लहान सहान फरक कोणाला समजतही नाही. तो फारच जास्त वाढला तर मात्र अस्वस्थ वाटू लागते आणि त्या वेळी डॉक्टरने तपासणी केल्यास तो समजतो. फार काळ तो जर तसाच राहिला तर त्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो. यामुळे लहानसहान तक्रारी न उद्भवता शरीरातल्या एकाद्या भागातल्या रक्तवाहिन्या फुटतात आणि मोठा धोका उद्भवतो. मेंदूमधला रक्ताचा पुरवठा थांबला तर पक्षघाताचा (स्ट्रोक किंवा पॅरॅलिसिस) झटका येतो आणि हृदयाच्या स्नायूंना रक्त मिळाले नाही तर त्याची क्रिया बंद पडते. हे धोके टाळण्यासाठी रक्तदाबावर नियंत्रण ठेवावे लागते. याचे नियंत्रण हा खूप गुंतागुंतीचा विषय आहे आणि यासाठी निरनिराळ्या प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. त्यातले कोणते निवडायचे आणि ते किती प्रमाणात घ्यायचे हा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरच देऊ शकतात. ही औषधेसुध्दा रोग बरा करत नाहीत, त्यावर नियंत्रण ठेवतात. यामुळे ही औषधेसुध्दा सुरू झाल्यानंतर बहुधा ती कायमची मागे लागतात.

पाण्याचा प्रवाह नळामधून वाहण्यासाठी त्याला पंपाने दाब द्यावा लागतो, हे प्रेशर पुरेसे नसेल तर नळाचे पाणी वरच्या मजल्यावर चढत नाही किंवा तोटीमधून अगदी कमी जोराने येते हा अनुभव आपल्याला असतो. आपल्या शरीरात पसरलेल्या असंख्य रक्तवाहिन्या आणि त्यांच्या सूक्ष्म अशा शाखा, उपशाखा वगैरेंमधून रक्ताचा पुरेसा प्रवाह वाहण्यासाठी हृदयाला जोर लावून रक्तावर दाब द्यावा लागतो. रक्त जर दाट असेल तर जास्त दाब द्यावा लागतो आणि ते पातळ असेल तर कमी दाब पुरतो. सशक्त माणसाचे हृदय जे सहजपणे करू शकते ते दुर्बल झालेले हृदय करू शकत नाही. याचा विचार करून ज्या लोकांना मेंदू किंवा हृदयाचे विकार होऊन गेले आहेत किंवा होण्याची दाट शक्यता आहे असा लोकांना विशिष्ट औषधे देऊन त्यांचे रक्त पातळ ठेवले जाते. शरीरातले रक्ताभिसरण सतत चालत राहिलेले असले तरी काही रोग्यांच्या हृदयात किंवा इतर एकाद्या भागातले रक्त काही काळ स्थिर (स्टॅग्नंट) राहते की काय अशी शंका डॉक्टरांना येते. शरीरात किंवा बाहेर कोठेही रक्त स्थिर राहिले की ते गोठायला सुरुवात होते. अशा प्रकारे तयार झालेली रक्ताची गाठ एकाद्या अरुंद जागेत अडकली तर तिथला रक्तप्रवाह पूर्णपणे थांबतो. असे झाल्यास अनवस्था प्रसंग उद्भवतो. हे होऊ नये यासाठी रक्ताचे गोठणे (कोअॅग्युलेशन) कमी गतीने करणारी औषधे घेऊन रक्ताचा गोठणे हा गुणधर्म जाणूनबुजून बदलला जातो. मात्र या दोन्ही औषधांमुळे ती घेणा-या रोग्यांना रक्तस्त्राव झाला तर तो लवकर थांबत नाही. तो होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करायची असल्यास ही औषधे काही काळ थांबवावी लागतात.

रक्तामध्ये विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण कमी केले तर त्यामुळेही रक्ताची व्हिस्कॉसिटी कमी होते. म्हणून रक्तदाब असलेल्या रोग्यांना कमी मीठ असलेले अळणी पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो, तसेच त्यांच्या रक्तातले जास्तीचे मीठ शक्य तितक्या लवकर रक्ताच्या बाहेर काढणारी औषधे दिली जातात. रक्तामधल्या स्निग्धपदार्थांचे प्रमाण आवश्यकतेहून जास्त झाले तर त्याचे कण शरीरातल्या काही ठिकाणच्या रक्तवाहिन्याच्या आतल्या बाजूला चिकटून बसतात. त्यामुळे त्या अरुंद होतात. पाण्याच्या पाइपांमध्ये गाळ साठला तर त्यातून वाहणा-या पाण्याला अडथळा निर्माण होतो, तसेच रक्ताच्या बाबतीत होऊन त्याचा प्रवाह कमी होतो. हे होऊ नये यासाठी रक्तामधल्या कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणारी औषधे दिली जातात. .तरीही त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे (ब्लॉकेजेस) निर्माण झाले तर ते अँजिओग्राफी करून शोधले जातात आणि अँजिओप्लास्टीने ते काढले जाणे आता शक्य झाले आहे. ही खूप खर्चिक आणि कष्टप्रद उपाययोजना असली तरी अनेक लोकांचे आयुष्य त्यामुळे वाढते.

हृदयामधून निघालेले रक्त शरीरामधील दूरपर्यंतच्या भागात जाऊन पोचण्यासाठी त्यावर पुरेसा दाब द्यावा लागतो, पण तो दाब प्रमाणाबाहेर गेला की त्यातून धोके निर्माण होतात. यामुळे औषधोपचार करून तो कमी करावा लागतो. पण अशा रीतीने कमी केलेल्या दाबामुळे रक्ताचे अभिसरण कमी प्रमाणात होते. त्यामुळे हाताची किंवा पायाची बोटे सुन्न होतात, त्यांना मुंग्या येतात, मेंदूला कमी रक्त मिळाले तर तो तल्लखपणे काम करत नाही, असेसुध्दा होते. याकडे लक्ष ठेऊन हलकासा व्यायाम, प्राणायाम वगैरेंच्या मार्गाने जास्त प्राणवायू त्या अवयवांपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न करत रहावे लागतात. शरीरातले रक्त सगळीकडे खेळवत रहावे लागते.

आयुर्वेदिक उपचार आणि योगासने यांनी उच्च रक्तदाब (हायपर ब्लड प्रेशर) आणि मधुमेह (डायबेटिस) हे दोन्ही रोग पूर्णपणे नाहीसे होतात असा दावा केला जातो. काही व्यक्तींच्या बाबतीत कदाचित तसे होत असेलही. पण अशा आश्वासनावर विश्वास ठेऊन औषध घेणे थांबवले आणि त्यानंतर जास्तच कठीण परिस्थिती उद्भवली असा अनुभव आलेले लोकही भेटतात.

शरीरामधील पेशींना आवश्यक तेवढा प्राणवायू रक्ताभिसरणामधून पुरवला जातो. शारीरिक श्रम करतांना जास्त प्राणवायूची गरज भासते. ती भागवण्यासाठी फुफ्फुसामधून जास्त वेगाने आणि जोरात श्वास घेतला जातो आणि हृदयही अधिक वेगाने काम करून दर मिनिटाला जास्त वेळा रक्ताचा पुरवठा करते. आपल्या शरीरामधल्या विशिष्ट ग्रंथी आपल्या नकळत हे काम करवून घेत असतात. धावत असतांना आपल्याला दम लागतो आणि नाडीचे ठोके जास्त पडत आहेत एवढेच पाहिल्यास समजते. थोडा वेळ विश्रांती घेताच दोन्ही क्रिया पुन्हा पूर्ववत होऊन जातात. पण या क्रियांवर नियंत्रण ठेवणा-या ग्रंथींमध्ये बिघाड झाला किंवा संसर्गजन्य रोग किंवा अॅलर्जिक रिअॅक्शनसारख्या कारणांमुळे कोणाकोणाला कारण नसतांना दम लागतो तर कोणाकोणाच्या नाडीचे ठोके जलद किंवा हळू पडू लागतात. ते फार वेळ जलद पडले तर हृदयाच्या स्नायूंना थकवा येऊ शकतो आणि फार हळू पडले तर मेंदूसहित कुठलेच इंद्रिय व्यवस्थित काम करू शकत नसल्यामुळे सर्व व्यवस्था कोलमडतात. या कारणाने नाडीचे ठोके म्हणजेच हृदयाचे स्पंदन सुव्यवस्थितपणे चालत राहणे अत्यंत महत्वाचे असते. यात घोटाळा झाला तर त्याचे लक्षपूर्वक निरीक्षण करून औषधोपचार करावे लागतात आणि काही रोग्यांच्या बाबतीत ते चालू ठेवणे आवश्यक असते. जास्तच गरज असल्यास कोणाला ऑक्सीजन सिलिंडरमधून कृत्रिम रीत्या जास्त प्राणवायू देतात, तर कोणाला पेसमेकर बसवून त्यात्या हृदयाला ठराविक वेगाने संदेश देतात. यासाठी फिजिओथेरापीचा उपयोगही केला जातो. क्वचित काही रोग्यांच्या हृदयाचे ठोके अनियमित गतीने पडू लागतात. त्यावरही इलाज केले जातात.

अशा रीतीने आपल्या शरीरामधील रक्त आणि त्याचे अभिसरण यांचे नियंत्रण करणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे बहुतेक काळ आपले शरीरच हे काम चोख रीतीने करत असते. त्यात होणारे किरकोळ बदल आपोआप ठीक होऊन जातात आणि आपल्याला ते समजतही नाहीत. पण हे करणे शरीराच्या क्षमतेच्या बाहेर गेले तर ते बदल वाढत जातात आणि त्यातून होणारे परिणाम घातक रूप धारण करू शकतात. त्यापूर्वीच ते कळणे आता वैद्यकीय तपासण्यांमधून साध्य झाले आहे. आवश्यकतेनुसार त्या करून घेतल्या आणि नियमित आहार, व्यायाम, प्राणायाम आणि औषधोपचार घेऊन रक्त आणि त्याचे अभिसरण नियंत्रणाखाली ठेवले तर आपले आयुरारोग्य वाढायला त्याची चांगली मदत होते.

No comments: