Monday, January 28, 2013

लेफ्ट राइट की डावा उजवा (भाग १)

परवाच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी आपल्या राजधानीमध्ये दरवर्षीसारखा जंगी कार्यक्रम झाला. सैनिक आणि पोलिसदलांच्या अनेक तुकड्या मोठ्या ऐटीत "लेफ्ट राइट", "लेफ्ट राइट" करत परेड करतांना पहायला मिळाल्या. सर्वांचे उजवे आणि डावे पाय एका लयीत पडत असतांना आणि हात एकासारखे एक वर खाली होत असतांना त्यातून अद्भुत दृष्य निर्माण होत होते. त्यात 'उजवा' आणि 'डावा' या दोन्हींचा समान वाटा होता, किंवा त्यांच्या लयबध्द हालचालींमध्ये अणुमात्र फरक वाटत नव्हता. आपल्या जीवनात मात्र आपण नेहमी डावे, उजवे असे करत असतो. 'डावे' म्हणजे कमी दर्जाचे आणि 'उजवे' तेवढे चांगल्या प्रतीचे समजले जाते. हा फरक निसर्गानेच करून ठेवला आहे असेही त्यावर सांगितले जाते.  

असमानता किंवा विविधता तर निसर्गामध्ये सगळीकडे भरलेली असतेच. एका झाडाला हजारो पाने असली तरी त्यातली तंतोतंत सारखी अशी दोन पानेसुध्दा शोधून सापडत नाहीत, हाताची पाचही बोटे सारखी नसतात हे उदाहरण नेहमी दिले जाते. त्यांच्यामधील प्रत्येकाची लांबी आणि जाडी निरनिराळी असते. उजवा आणि डावा हात आकाराने सारखे असले तरी ते एकमेकांच्या प्रतिबिंबांसारखे (मिरर इमेजेस) असतात, शरीराला सिमेट्रिकल असतात. हे दोन्ही हात सारख्या प्रकारे हालचाली करू शकत असल्यामुळे एका हाताने आपण जे काम करतो तेच काम प्रयत्न केल्यास दुस-या हातानेसुध्दा करू शकतो. तसे करणारे इतर लोक आपल्याला भेटतात. पण कुठलेही काम करण्यासाठी बहुतेक लोकांचा उजवा हात पटकन पुढे येतो. आनुवंशिक किंवा उपजत आलेले गुण, कळायला लागण्याच्याही आधीपासून करत आलेले अनुकरण, लावली गेलेली शिस्त अशा अनेक कारणांमुळे शरीराला तशी सवय लागते आणि नकळत ते होते. वारंवार उपयोग करण्यामुळे बहुसंख्य लोकांचा उजवा हात अधिक बलवान होतो, त्यात जास्त कौशल्य येते हे दिसतेच. सगळी कामे करणारा किंवा कोणतेही काम करायला सज्ज असलेला सहकारी बॉसचा 'उजवा हात' असतो आणि अगदी सोपे काम असले तर त्याला 'बायेँ हाथका खेल' म्हणतात.

आपल्या जगण्यातल्या बारीक सारीक बाबतींसाठीसुध्दा पूर्वजांनी असंख्य नियम करून ठेवले आहेत आणि त्यांचे अतीशय कडक पालन केले जात असे. कुठलेही चांगले काम नेहमी उजव्या हातानेच करायचे असा त्यातलाच एक नियम आहे. देवाची पूजा करतांना त्याच्या मूर्तीवर अभिषेक करणे, त्याला गंध, फूल, हळद, कुंकू, अक्षता वगैरे वाहणे, उदबत्ती किंवा निरांजन ओवाळणे, नैवेद्य दाखवणे हे सगळे फक्त उजव्या हातानेच करायचे असते, एवढेच नव्हे तर कोणाला तीर्थ आणि प्रसाद उजव्या हातानेच द्यायचा आणि त्यानेही तो उजव्या हातानेच घेतला पाहिजे. यात कुठेही डावा हात आला तर लगेच ते मोठे पाप होईल, त्याने देवाचा कोप होईल, तो त्याची शिक्षा देईल वगैरे धाक घातला जात असे. खुद्द आपले देवाधिकसुध्दा थोडे डावे उजवे करतच असत. भगवान श्रीरामाचे वर्णन "दक्षिणे लक्ष्मणोर्यस्य वामेतुजनकात्मजा" असे केले जाते. म्हणजे पराक्रम करण्यासाठी रामाचा उजवा हात असलेला लक्ष्मण उजव्या बाजूला आणि सीतामाई मात्र नेहमी डाव्या बाजूला. विठ्ठलाचे वर्णनसुध्दा "वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा" असेच.

रोजचे जेवण करतांना ताटात वाढलेल्या अन्नाला कोणीही डाव्या हाताने स्पर्श करणे खपवून घेतले जात नसे. त्याने त्या अन्नाचा अपमान वगैरे होत असे. शहरातल्या हॉटेलमध्ये काटा आणि सुरी यांच्या सहाय्याने खातांना डाव्या हातात धरलेल्या फोर्कने उचललेला घास तोंडात घालतांना आपण चूक करत आहोत अशी अपराधीपणाची भावना मनात येत असे. यातला निरर्थकपणा समजल्यावर अजूनसुध्दा मी घरी उजव्याच हाताने जेवण करतो, इतके हे संस्कार अंगात भिनलेले आहेत.

उजवा हात 'खाण्या'साठी आणि डावा हात 'धुण्या'साठी अशी त्यांच्या कामांची वाटणी करून ठेवलेली होती. ती आरोग्याच्या दृष्टीने किती योग्य आहे आणि त्यावरून आपल्या पूर्वजांचा महानपणाच कसा सिध्द होतो वगैरे त्यांचे खंदे समर्थक सांगत असतात. पण डावा हात धुवून स्वच्छ करूच नये किंवा करता येणारच नाही असे का समजायचे हे मला समजत नाही.

पण क्रीडाक्षेत्रात, विशेषतः क्रिकेटच्या खेळात लेफ्ट हँडर बॅट्समन किंवा बोलर डाव्या हाताने जी किमया करून दाखवतात ती काही वेळा इतर खेळाडूंच्या उजव्या हाताने केलेल्या कामगिरीपेक्षाही सरस असते. त्यांच्या बाबतीत डाव्या हाताची कामगिरी 'उजवी' असते असे म्हणता येईल. बहुतेक सर्व हार्मोनियमवादक डाव्या हाताने भाता भरतात आणि उजव्या हाताची बोटे पट्ट्यांवर फिरवून त्यामधून सुरांची जादू निर्माण करतात. भात्याने पेटीत हवा भरण्याचे काम तुलनेने सोपे असावे म्हणून ते डाव्या हाताने करून उजव्या हाताच्या बोटांनी जास्त कौशल्याचे काम केले जाते. पण काही डावखोरे वादक याच्या बरोबर उलट करतात. चांगले वादन करण्यासाठी दोन्ही हात तितकेच 'तयार' असावे लागतात असे एका प्रसिध्द हार्मोनियमपटूने मात्र त्याच्या मुलाखतीत सांगितले होते.

आपल्या हृदयात दोन उजवे आणि दोन डावे असे चार कप्पे असतात, त्यातल्या वरील उजव्या कप्प्यामध्ये शरीरामधले रक्त येते आणि खालच्या डाव्या कप्प्यामधून ते शरीरभर पसरते. हे काम व्यवस्थितपणे होत राहण्यासाठी चारही कप्प्यांचे काम सुरळीतपणे चालणे आवश्यक असते, पण रक्ताला शरीरात पसरून पुन्हा हृदयात परत येण्यासाठी पुरेसा दाब डाव्या कप्प्यामधून मिळतो. हा कप्पा जास्त बलवान असावा लागतो. आपल्या मेंदूचेही उजवा आणि डावा असे दोन भाग असतात आणि त्यांच्यामधली कामाची वाटणी खाली दिल्याप्रमाणे असते. डावा मेंदू किती महत्वाचा असतो हे यावरून समजते.
डावा मेंदू तर्कशुद्ध विचार करतो आणि उजवा भावनांचा.
डावा मेंदू तपशीलात जातो आणि उजवा सम्यक दृष्य पाहतो
डावा मेंदू वस्तुस्थिती पाहतो आणि उजवा कल्पनाविलास करतो
डावा मेंदू शब्द व भाषा जाणतो आणि उजवा खुणा व चित्रे
डावा मेंदू गणित व विज्ञान समजून घेतो आणि उजवा तत्वज्ञान आणि धर्म
डावा मेंदू आकलन करतो आणि उजवा ग्रहण करतो
डावा मेंदू जाणतो आणि उजवा विश्वास ठेवतो
डावा मेंदू पोच देतो आणि उजवा दाद देतो
डाव्या मेंदूला पॅटर्न समजतात तर उजव्याला ठिकाण
डावा मेंदू वस्तूचे नांव जाणतो आणि उजवा तिचे गुणधर्म
डावा मेंदू वस्तुनिष्ठ विचार करतो आणि उजवा कल्पनारम्य
डावा मेंदू धोरण ठरवतो आणि उजवा शक्यता आजमावतो
डावा मेंदू प्रॅक्टिकल असतो उजवा मनस्वी
डावा मेंदू सुरक्षितता पाहतो आणि उजवा धोका पत्करतो.

.  . . . .. ................................... (क्रमशः)

No comments: