Sunday, January 20, 2013

पंच लाईन

पंचमहाभूते, पंचप्राण, पंचपरमेश्वर, पंचांग वगैरेंमधल्या पंचांचा प्रपंच मला या लेखात करायचा नसून इंग्रजी भाषेमधल्या 'पंच' या शब्दाचा थोडासा पंचनामा करायचा विचार आहे. हा शब्द पहिल्यांदा ऐकला तेंव्हा मी प्राथमिक शाळेत शिकत होतो. माझ्या मोठ्या भावासोबत गणपतीच्या मखराची सजावट करतांना त्यावर काढलेल्या एका डिझाईनला मी ठिपक्याठिपक्यांची बॉर्डर काढली. पण ते ठिपके नीटपणे वर्तुळाकार आले नाहीत आणि शिवाय ते एकसारखे न आल्यामुळे चित्राची शोभा वाढण्याऐवजी कमी झाली असे वाटले. ते ठिपके कसे झाकता येतील असा विचार करतांना माझ्या भावाला एक युक्ती सुचली. त्याने वडिलांच्या कपाटातून पकडीसारखे दिसणारे एक हत्यार आणले आणि त्यात एक कागद सरकवून जोराने दाबले. कट्ट असा आवाज आला आणि कागदाला लहानसे गोल भोक पडले आणि पकड सैल करताच तेवढ्या आकाराची कागदाची चकती बाहेर पडली. ते पाहून मला खूप मजा वाटली आणि निरनिराळ्या रंगाच्या कागदांना त्या यंत्राने चावे घेऊन मी खूप रंगीबेरंगी चकत्या पाडल्या. त्यातली एक एक चकती गोंदाने मखराला चिकटवून आम्ही ते खूप सजवले. कोणाला न विचारता त्या औजाराला हात लावला आणि कागदांची नासाडी केली म्हणून आम्ही बोलणी खाल्ली, पण एक नव्या प्रकारची सजावट केल्याचे समाधान मिळाले आणि त्याचे थोडे कौतुकसुध्दा झाले. त्या औजाराला 'पंच' म्हणतात असे समजले, पण फक्त एकच भोक पाडणा-या यंत्राला पंच असे का म्हणायचे हे समजले नाही आणि ते समजून घेण्याचा प्रयत्नही करावा असे तेंव्हा वाटले नाही. त्यामुळे 'पंच' हा एक इंग्रजी भाषेतला शब्द आहे हे सुध्दा मला त्या वेळी कळले नाही. माझ्या दृष्टीने ते भोक पाडणे मुळी महत्वाचे नव्हतेच, त्यातून पडलेल्या टिकल्या उपयोगाच्या होत्या. माझ्यासाठी ते कागदाला छिद्र पाडण्याचे यंत्र नसून कागदाच्या टिकल्या तयार करण्याचे साधन होते. त्या साधनाला 'सिंगल पंच' असे म्हणतात आणि बरेच कागद एकत्र बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या वरच्या कोप-यात त्या पंचने भोके पाडली जातात, त्याशिवाय ठराविक अंतरावर एकाच वेळी दोन भोके पाडणारे 'डबल पंच' सुध्दा असते, त्याचा उपयोग कागदांना फाईलमध्ये अडकवून ठेवण्यासाठी होतो वगैरे ज्ञान त्यानंतर कित्येक वर्षांनंतर झाले.

इंग्लिश भाषा शिकतांना 'पंच' म्हणजे 'जोराचा ठोसा मारणे' हा अर्थ समजला. 'चलतीका नाम गाडी' सिनेमातल्या अशोककुमारापासून ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणा-या मेरी कोमपर्यंत अनेक मुष्टीयौध्द्य़ांनी मारलेले जबरदस्त ठोसे आणि त्या खेळामधली गुद्दागुद्दी पाहतांना 'पंच' या शब्दाचे प्रात्यक्षिक पहायला मिळाले. या बॉक्सर लोकांना सराव करण्यासाठी डाव्याउजव्या हातांनी एका मागोमाग एक ठोसे भराभर मारून पाहणे आवश्यक असते, पण त्यांच्यासाठी आपले थोबाड सुजवून घ्यायला कोण तयार होईल? त्यांचे ठोसे खाण्यासाठी एक पंचिंग बॅग समोर टांगून ठेवतात आणि हे वीर त्यावर 'दे दणादण' करतात. यावरून 'पंचिंग बॅग' असा एक वाक्प्रचार तयार झाला आहे. एकादा गरीब बिचारा सोशिक माणूस भेटला तर इतर लोक त्याच्यावर डाफरून आपला राग काढून घेतांना त्याचा वापर 'पंचिंग बॅग' सारखा करतात.

मेकॅनिकल इंजिनियरिंग शिकतांना वस्तूंना आकार देण्यासाठी (मेटल वर्किंगमध्ये) 'डाय आणि पंच' या अवजारांचा वापर करायला शिकायला मिळाले. तापवलेल्या लोखंडाच्या गोळ्यापासून हातोडा, क्रँकशाफ्ट यासारख्या किंवा पातळ पत्र्यामधून चमचा, झाकण अशासारख्या वस्तू तयार करण्यासाठी त्यांना डाय आणि पंच या जोडीमध्ये ठेवून जोरात ठोकले जाते. एका पत्र्यामधून लहान लहान आकाराच्या अनेक वस्तू काढण्यासाठी किंवा त्या पत्र्याला विविध आकाराची अनेक छिद्रे पाडून त्याची जाळी किंवा चाळण बनवण्यासाठी पंचिंग मशीने असतात. कागदाला भोके पाडायच्या पंचचेच हे मोठे अवतार असतात. मोटारीच्या सांगाड्याला दारे, खिडक्या, दिवे वगैरे भाग बसवण्यासाठी पोकळ्या करण्याचे कामसुध्दा पंच करून केले जाते. अर्थातच या सगळ्या कामांमध्ये जोर लावून ठोकणे अथवा दाबणे येते.

मी नोकरीला लागल्यानंतर अनेक कारखान्यांना भेटी देतांना त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी (मेन गेटपाशी) असलेले टाईम ऑफीस दिसले. पूर्वीच्या काळी तिथे काम करणारे टाईमकीपर प्रत्येक कामगाराच्या नावाचे एक कार्ड बनवून ती सगळी कार्डे एका बोर्डावर लावून ठेवत असत. प्रत्येक कामगाराने कारखान्यात प्रवेश करतांना आणि कारखान्याच्या बाहेर पडतांना आपापले कार्ड तिथल्या पंच कार्ड मशीनवर पंच करून घ्यावे लागत असे. बसचा कंडक्टर जसा तिकीट देतांना त्याला पंच करून देतो तसे सुरुवातीच्या काळात कदाचित कारखान्यातल्या कार्डावरसुध्दा फक्त एक भोकच पडत असेल. तंत्रज्ञानात सुधारणा होत गेल्यावर रेल्वे तिकीटावर छापतात त्याप्रमाणे त्या कार्डावर तारीख, वेळ वगैरे छापले जाऊ लागले. कामगारांच्या शिफ्टची वेळ संपून गेल्यानंतर टाईमकीपर सर्व कार्डे पाहून कोण कोण कामावर आले, वेळेवर आले की उशीराने आले वगैरे माहिती ऑफीसला कळवीत असत. आता सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक झाल्या असल्यामुळे कामगार आपल्याकडे असलेले 'स्मार्ट कार्ड' तिथल्या यंत्राला फक्त दाखवतात. ते पाहून सगळी माहिती आपोआप कारखान्यातल्या मुख्य संगणकात नोंदली जाते. ते काम करण्यासाठी आता वेगळा टाईमकीपर लागत नाही. असे असले तरीसुध्दा या प्रणालीला अजूनही 'कार्डपंचिंग'च म्हणतात, सहसा कोणी त्याला 'कार्ड रीडिंग' म्हणत नाही.

मोठ्या हॉटेलात किंवा पार्टीजमध्ये दिल्या जाणा-या पेयांमध्ये अनेक वेळा 'फ्रूटपंच' या पेयाचा समावेश असतो. यात फळांना ठोसे मारून किंवा ठेचून ते काढले जाते की काय असे वाटेल. या पंचमध्ये मद्यार्कयुक्त पेयेसुध्दा असतात, त्यात कशाला ठोकले असेल? ही बहुतेक पेये कॉकटेल्स म्हणजे मिश्रपेये असतात. याच्या नावाचा उगम संस्कृतमधल्या पंचवरून पाच पेयांचे मिश्रण असा झाला असे समजते.

चाळीस वर्षांपूर्वी भारतातील उद्योगव्यवसायात काँप्यूटरचा वापर सुरू झाला तेंव्हा ते काम फक्त मेन फ्रेम काँप्यूटरवर होत असे. आज सर्वत्र दिसणारे पीसी, हार्ड ड्राइव्ह, फ्लॅश ड्राइव्ह, सीडी, डीव्हीडी वगैरेतले काहीसुध्दा नव्हते. काँप्यूटरला माहिती पुरवण्यासाठी पंच्ड कार्डांचा उपयोग होत असे. त्यासाठी एबीसीडी सारखी अक्षरे आणि १२३४ सारखे अंक यांसाठी ठरलेल्या कोडनुसार एका कार्डावर निरनिराळ्या अंतरावर चौकोनी आकाराचे लहान लहान स्लॉट्स पाडत असत. अशा कार्डांचा गठ्ठा काँप्यूटरमध्ये घातल्यावर त्यातले एक एक कार्ड त्यातल्या प्रकाशझोतात आले की छिद्रांमधून पलीकडे गेलेल्या प्रकाशावरून ती माहिती संगणकाला मिळे आणि त्याचे सॉर्टिंग, बेरजा, वजाबाक्या वगैरे करून प्रिंटआउटमधून औटपुट मिळत असे. त्यावेळी आमच्या ऑफीसात काँप्यूटर आला नसला तरी आमचे काम टीआयएफआर मध्ये होत असे त्याची जुजबी माहिती मला होती.

त्या काळात एक लहानशी घटना घडली. माझ्यापेक्षा सर्वच दृष्टीने फार मोठ्या असलेल्या माझ्या नात्यातल्या एका बुजुर्ग व्यक्तीला भेटायला मी गेलो होतो. देशकार्यासाठी ते सारखे भ्रमण करत असत आणि घरी आलेल्या वेळीसुध्दा त्यांना भेटायला आलेल्या लोकांचा वेढा त्यांना पडलेला असे. मी त्यांच्याकडे गेलो होतो त्यावेळीसुध्दा त्यांचा दरबार भरलेलाच होता. मला दारात पाहताच त्यांनी हाक मारून बोलावले आणि समोर बसवून घेतले. चहापान करता करता हवापाणी, तत्कालीन घटना वगैरे सामान्य विषयावर त्यांच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या. या वार्तालापात बहुतेक वेळा तेच बोलत होते, त्यांनी विनोद केला की इतरांनी खिदळायचे, ते गंभीर झाले की गंभीर चेहरा करून "आता कसे होईल?, आता काय करायचे?" वगैरे म्हणायचे, त्यावर त्यांनी काही मार्गदर्शन केले की सगळ्यांनी माना डोलवायच्या असे चालले होते. त्या वेळातच आमचे आणखी एक नातेवाईक आत आले, अत्यंत आदरपूर्वक रीतीने एक आमंत्रणपत्रिका आणि अक्षता नेताजींच्या हातात ठेऊन म्हणाले, "आपल्या --- रावांच्या मुलाचे लग्न ठरले आहे. खरे तर आमंत्रण देण्यासाठी ते स्वतःच येणार होते, पण आता त्यांना लांबचा प्रवास झेपत नाही म्हणून त्यांनी हे काम माझ्याकडे सोपवले आहे. तरी आपण सर्वांनी या लग्नाला अवश्य यावे."
पत्रिका उघडून पाहता पाहता नेताजींनी विचारले, "हा नवरा मुलगा म्हणजे लहान असतांना आपल्याकडे यायचा तो चंदूच ना? आता तो काय करतो आहे?"
"तो एलआयसीम्ध्ये पंचऑपरेटर आहे."
"म्हणजे...? " असा क्षणभर स्वतःशीच विचार करत आणि इतर कोणालाही त्यावर बोलण्याची संधी न देता ते उद्गारले, "त्या एलआयसीच्या नोटिशींना दोन्ही बाजूने रांगेत भोके पाडलेली असतात ना? ते करायचे काम असेल."
पंच ऑपरेटर असलेला तो नवरदेव काय काम करतो हे बहुधा त्या नातेवाईकांना ठाऊक असेलही, पण ते त्यावर काही बोलले नाहीत. मी काही बोललो असतो तर "एवढ्या मोठ्या माणसाला शहाणपणा शिकवणारा हा चोंबडा कोण आला?" असेच सर्वांना वाटले असते म्हणून मीही गप्प राहिलो. त्यनंतर दोन तीन वर्षांनी मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे गेलेलो असतांना कुणाच्या तरी बोलण्यामधून त्या मुलाचा विषय निघाला.
"म्हणजे एलआयसीच्या नोटिशींना भोके पाडतो तोच ना?" ते पटकन उद्गारले. त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती आणि त्यांनी पूर्वी करून घेतलेला पूर्वग्रह अजून सुटला नव्हता. पंच ऑपरेटरचे काम काय असते? हे त्यांना कोणी सांगितलेले दिसत नव्हते आणि काँप्यूटर प्रिंटआउटच्या कागदांना दोन्ही बाजूने भोकांच्या रांगा कशासाठी असतात? किंवा ती भोके कुठल्या कारखान्यात पाडली जातात? वगैरे माहितीही त्यांना कुणीच दिली नव्हती.
"आता तो ब्रँच मॅनेजर झाला आहे." हे उत्तर थोडे धक्कादायक होते. कागदाला भोके पाडायचे साधे काम करणारा मजूर एकदम ब्रँच मॅनेजर कसा झाला?
"पुरुषस्य भाग्यम् देवो न जानाति .." किंवा "काँग्रेसच्या राज्यात काय काय होईल काही सांगता येत नाही." अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दरबारी मंडळींमधून आल्या.
आता कार्डपंचिंगचे कामही शिल्लक राहिले नाही. पंच ऑपरेटरच्या जागी डाटा एन्ट्री ऑपरेटर्स आले आहेत.

व्यंगचित्रांना वाहून घेतलेले पंच नावाचे एक साप्ताहिक १८४२ पासून १९९२ पर्यंत दीडशे वर्षे चालले होते. या दीर्घ कालावधीत व्यंगचित्रकारांच्या कित्येक पिढ्यांनी त्या साप्ताहिकाची पाने चित्रांनी भरली होती. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधला ढोंगीपणा व्यंगचित्रामधून दाखवतांना त्यांनी केलेल्या पंचिंगमुळे ढोंगीपणाचे अनेक फुगे फुटले होते. या पंचवरून प्रेरणा घेऊन शंकर्स वीकली आणि मार्मिक यासारखी साप्ताहिके देशोदेशी निघाली. मार्मिककर्त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांमध्ये जसा पंच होता तसाच किबहुना त्याहूनही जबरदस्त पंच त्यांच्या लेखनात आणि वक्तृत्वातही होता. ."जब तोप मुकाबिल है तो अखबार निकालो।." असे सांगत मार्मिक सुरू करून त्यांनी पुढे सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि जनमानसात उच्च स्थान पटकावून तोफखानाच आपल्या ताब्यात घेऊन दाखवला.

लेखनामध्ये, विशेषतः विनोदामध्ये पंचलाईन फार महत्वाची असते. पहिल्या सगळ्या मजकुरामधल्या अर्थाला शेवटच्या एका ओळीने एकदम वेगळे वळण लागते आणि त्यातून हास्याचा स्फोट कसा होतो याचे एक उदाहरण खाली दिले आहे.
ती धावत धावत गच्चीवर गेली. तिला धाप लागल्यामुळे गच्चीवर गेल्यावर ती उभी राहिली. तिच्या पाठोपाठ तोही धावत वर गेला. त्याने भराभरा शर्टपँट काढली, साडी, ब्लाऊज, पेटीकोट आणि इतर सगळे कपडेही काढले.
.
.
.
दोरीवर वाळत घातलेले सारे कपडे घेऊन पावसाची सर यायच्या आत दोघेही खाली उतरले.

पंचलाईन अशी असते.

No comments: