Monday, January 14, 2013

भगवान परशुराम



यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

"जेंव्हा जेंव्हा धर्माला ग्लानी येईल तेंव्हा त्याला प्रस्थापित करण्यासाठी मी जन्म घेईन" असे स्वतः विष्णूचा आठवा अवतार असलेल्या कृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश करतांना सांगितले होते. श्रीकृष्णाच्या काळात हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन वगैरे नावांचे धर्म अस्तित्वात नव्हते. त्यामुळे गीतेमधल्या 'धर्म' या शब्दाचा अर्थ वेगळा असणार. समाजातील दुष्ट प्रवृत्तींचा पाडाव करून त्यात चांगुलपणा आणावा असा बहुधा त्याचा आशय असेल. निरनिराळ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी प्रबळ आणि उन्मत्त झालेल्या दुष्ट असुरांना नष्ट करण्यासाठी देव आणि देवतांनी अवतार घेतल्याच्या असंख्य कथा पोथ्यापुराणात आहेत, तसेच भारतभरातल्या गावोगावी असलेल्या देवस्थानांविषयी अशा आख्यायिका सांगितल्या जातात. विष्णूच्या प्रसिध्द दशावतारातल्या मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह आणि वामन या पहिल्या पाच अवतारात आवश्यक त्या क्षणी तो अवतार प्रगटला आणि अवतारकार्य संपल्यानंतर अंतर्धान पावला. राम आणि कृष्ण या दोन अवतारात मात्र त्यांच्या जन्माच्याही आधीपासून ते अवतारसमाप्तीपर्यंत सुसंगत अशी चरित्रे उपलब्ध आहेत. बौध्द धम्मातील पुराणानुसार बुध्दानेच अनेक अवतार घेतले आणि गौतम हा त्यातला अखेरचा होता. त्याने स्थापन केलेल्या धर्माला वैष्णवपंथी आचार्यांनी हिंदू धर्मामधून बाहेर ढकलले. त्यामुळे कट्टर हिंदू लोक त्याला विष्णूचा अवतार मानायला तयार होतील यात शंका आहे. शिवाय पंढरपूरचा विठोबा हाच विष्णूचा नववा अवतार आहे असेही महाराष्ट्रातले काही लोक मानतात. इतर प्रांतात अशाच प्रकारच्या समजुती असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे दशावतारातल्या बुध्द या नवव्या अवताराबद्दल मतभेद आहेत. दहावा कल्की अवतार अजून कधी येणार आहे कोण जाणे. सहावा परशुराम अवतार या सर्वांहून वेगळा आहे. त्याचे सुसंगत असे चरित्र सापडत नाही, पण अनेक तुटक तुटक कथांमध्ये त्याचा उल्लेख येतो. आमच्या शाळेचेच नाव परशुरामभाऊ हायस्कूल असे असल्यामुळे परशुराम हे नाव चांगलेच परिचयाचे होते आणि त्याच्या कथांबद्दल उत्सुकताही वाटत होती. तरीही संस्कृत भाषेतल्या कुठल्याच पुराणाचा अभ्यास मी केलेला नाही. लहानपणापासून कानावर पडलेल्या आणि वाचनात आलेल्या गोष्टींवरून परशुरामाबद्दल मला समजलेल्या चार ओळी लिहिल्या आहेत.

मी शाळेत असतांना बसच्या एका प्रवासात आमची गाडी कर्नाटकातल्या संवदत्ती नावाच्या गावी बराच वेळ थांबली होती. त्या ठिकाणी यल्लम्मा देवीचे मुख्य मंदिर आहे. ही यल्लम्मा म्हणजेच रेणुका ही जमदग्नी ऋषीची पत्नी होती. रोज पहाटे उठून नदीकाठी जायचे, तिथल्या रेतीचा घ़डा तयार करायचा आणि तो पाण्याने भरून घरी न्यायचा असा तिचा दिनक्रम होता. तिच्या ठायी असलेल्या पातिव्रत्याच्या अद्भुत शक्तीमुळे तिला हे शक्य होते. एकदा ती रोजच्याप्रमाणे नदीवर गेली असतांना गंधर्वांचा राजा तिथे आपल्या राण्यांसमवेत जलक्रीडा करत होता. हे दृष्य पाहून तिचे मन विचलित झाले आणि ती रेतीपासून घडा तयार करू शकली नाही. अनुष्ठानाला बसलेल्या जमदग्नी ऋषींना त्यासाठी हवे असलेले उदक मिळाले नाही. रेणुकेला रिकाम्या हाताने घरी परत आलेले पाहून जमदग्नी ऋषी कृध्द झाले आणि या पातकासाठी त्यांनी तिला देहांताची शिक्षा सुनावली. ती शिक्षा अंमलात आणण्याची आज्ञा आपल्या पुत्रांना केली. एकामागोमाग एका मुलाने मातेचा वध करण्यास नकार दिल्यामुळे त्यांनाही मृत्यूदंड फर्मावला. अखेर परशुरामाने पित्याची आज्ञा शिरोधार्य मानून आई आणि भावांचा शिरच्छेद केला. जमदग्नींनी त्यावर प्रसन्न होऊन परशुरामाला एक वर मागायला सांगितले. त्याने आपल्या आई आणि भावांना पुन्हा जीवंत करण्याचा वर मागून त्यांना जीवनदान दिले. ही सगळी कथा संवदत्ती येथे मलप्रभा नदीच्या किनारी घडली अशी तिथल्या लोकांची समजूत आहे. ती गंगा नदीच्या किनारी घडली असेही नंतरच्या काळात माझ्या वाचण्यात आले. 

"विनाशाय च दुष्कृताम् ।" हे परशुरामाचे मुख्य अवतारकार्य होते. त्या काळातल्या सहस्त्रार्जुन राजाने तपश्चर्या करून हजार बाहू प्राप्त केले होते. त्यामुळे तो अतीशय उन्मत्त झाला होता आणि त्या गुर्मीमध्ये प्रजेवर अत्याचार करत होता. एकदा तो आपल्या सैन्यासह शिकारीला निघाला असतांना जमदग्नी मुनींच्या आश्रमात जाऊन पोचला. तिथे त्या सर्वांचा आदरसत्कार झाला आणि त्यांना भोजनही मिळाले. पण ज्या कपिला गायीच्या सहाय्याने हे साध्य झाले होते तिलाच तो राजा बळजबरीने आपल्यासोबत घेऊन गेला. परशुरामाला हे समजल्यावर त्याला राजाच्या या कृत्याचा संताप आला आणि त्याला त्याचा जाब विचारायला गेला. त्या दोघांमध्ये तुंबळ युध्द झाले आणि परशुरामाने आपल्या परशूने सहस्रार्जुनाचे हजार हात कापून त्याला ठार मारले. याचा सूड घेण्यासाठी त्याच्या पुत्रांनी ध्यानस्थ बसलेल्या जमदग्नीची हत्या केली. यामुळे परशुरामाचा राग अनावर झाला आणि त्याने सहस्रार्जुनाचा निर्वंश करण्याची प्रतिज्ञा करून एकवीस वेळा त्याच्या कुळामधील सर्व पुरुषांचा संहार केला. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वीला निक्षत्रिय बनवले असे सांगण्यात येते, पण ते बरोबर वाटत नाही. कारण जनक हा परशुरामाचा मित्र क्षत्रिय राजाच होता. विष्णूचा पुढचा अवतार क्षत्रियांच्या रघुवंशातच झाला.

परशुरामाने कठोर तपश्चर्या करून अनेक देवांना प्रसन्न करून घेतले होते. शंकराकडून त्याला परशू हे शस्त्र मिळाले आणि त्याने त्याचा उपयोग अनेक वेळा केला म्हणून त्याला परशुराम हे नाव मिळाले. याशिवाय भृगू ऋषींच्या कुलातला म्हणून भार्गव किंवा भार्गवराम असेही संबोधले जाते. शंकराकडूनच शिवधनुष्य आणि विष्णूकडून वैष्णव धनुष्यसुध्दा परशुरामाला मिळाले होते. परशुराम हा शस्त्रांस्त्रांच्या विद्येत पारंगत होता. त्याने एकट्याने सर्व भूमी जिंकून घेतली, पण त्याला सत्तेचा किंवा संपत्तीचा लोभ नसल्यामुळे त्याने ती कश्यप ऋषींना दान करून टाकली. त्यानंतर समुद्राला मागे हटवून तयार झालेली कोकणची नवी किनारपट्टी त्याच्याकडून घेतली आणि त्यातल्या महेंद्र पर्वतावर जाऊन एका कुटीत राहू लागला. चिपळूणजवळ हा डोंगर आहे. तिथे परशुरामाचे पुरातन देऊळ आहे. एकदा कारवारला जात असतांना आम्ही वाटेत चिपळूणला मुक्काम केला होता. तेंव्हा सकाळी लवकर उठून त्या मंदिरातही जाऊन आलो होतो. केरळमध्येसुध्दा अशाच प्रकारची आख्यायिका प्रचलित आहे आणि परशुरामाचे मंदीरही आहे.

रामचंद्र हा विष्णूचा सातवा अवतार पृथ्वीवर अवतरला होता तरीही परशुराम हा अवतारही तेंव्हा भूतलावर होताच. पण त्याला आता युध्द करण्याची गरज वाटत नसल्यामुळे त्याने आपले शिवधनुष्य मिथिलेच्या जनक राजाकडे ठेवायला दिले होते. या धनुष्याला प्रत्यंचा चढवणे हा पण जनकाने सीतेच्या स्वयंवरासाठी लावला होता. तो प्रयत्न करतांना रामाकडून त्या धनुष्याचे दोन तुकडे झाले. हे वृत्त समजताच परशुराम तिथे येऊन पोचले आणि त्याचे रामाबरोबर वाद विवाद आणि युध्द झाले. दोघेही तुल्यबळ होते. अखेर दोघांनीही आपण विष्णूचे अवतार असल्याचे ओळखले आणि त्यांच्यात समेट झाला. परशुराम आता तपश्चर्येच्या मार्गाला लागलेला असल्यामुळे त्याने आपल्याकडचे वैष्णवी धनुष्य श्रीरामचंद्राला दिले.

रामायणातला रामावतार संपून मध्ये काही काळ गेल्यानंतर महाभारतातला कृष्णावतार झाला. तरीही परशुराम होतेच. भीष्म, द्रोण आदींना परशुरामानेच शस्त्रास्त्रविद्या शिकवली. त्यांचे शिष्य असलेले द्रोणाचार्य पांडव आणि कौरवांचे शिक्षक झाले. त्यांनी अर्जुनासारखा धनुर्धर आणि.भीम व दुर्योधनासारखे गदायुध्दपटु तयार केले. पण कर्ण हा सूतपुत्र आहे असे म्हणून त्यांनी कर्णाला धनुर्विद्या द्याला नकार दिला तेंव्हा तो सरळ परशुरामाकडे गेला आणि खोटे नाव सांगून त्यांचा पट्टशिष्य बनला. त्यानेही धनुर्विद्येत प्राविण्य मिळवले होते आणि तो अर्जुनाला तुल्यबळ ठरला असता पण इथेही त्याचा घात झाला. एकदा त्याचे गुरू परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेऊन झोपलेले असतांना एका भुंग्याने त्याची मांडी पोखरायला सुरुवात केली. गुरूची निद्रा भंग पावू नये या विचाराने कर्णाने त्याला प्रतिकार न करता मांडीला पोखरू दिले. परशुरामांची झोप झाल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला, पण कर्णाचे कौतुक करण्याऐवजी त्यांनी त्याच्या कुलाबद्दल शंका घेतली आणि त्याने खोटे सांगितल्याचे समजल्यावर त्याला शाप दिला की "तुझ्या अंतकाळी ही धनुर्विद्या तुला उपयोगी पडणार नाही." पुढे महाभारतातल्या युध्दात कुरुक्षेत्रावर कर्णाचा अखेर असाच झाला.

माझ्या लहानपणी मुलांनी संस्कृत श्लोक पाठ करणे आवश्यक असायचे. मी असाच पाठ केलेला एक श्लोक असा होता.
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनूमांश्च विभीषणः ।
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविता:।।
अश्वत्थामा, बलि, व्यास, हनूमान, विभीषण, कृप आणि परशुराम हे सातजण चिरंजीव आहेत असा याचा अर्थ आहे. "हे सगळेजण अजून जीवंत आहेत तर ते कुठे रहातात?" असा बालसुलभ प्रश्न मी तेंव्हा विचारला होता. "ते हिमालयातल्या गुहेत बसून तपश्चर्या करतात." असे उत्तर त्यावर मिळाले होते. यापेक्षा चांगले उत्तर अजून मिळालेले नाही. हजारो वर्षे तपश्चर्या करत जीवंत राहणे याला काय उच्च स्वरूपाचा अर्थ आहे हे ही समजले नाही.

तर परशुरामाबद्दल अशी तुटक तुटक माहिती मिळाली, पण त्यामधून सुसंगत असे चित्र तयार होत नाही आणि जे काही दिसते ते उदात्त वाटत नाही. राम आणि कृष्ण यांच्याविषयी जो आदरभाव वाटतो तो मनात उठत नाही. यामुळे परशुराम हे नाव माझ्या दैनंदिन जीवनात कधी येत नव्हते. परवा चिपळूण इथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात परशुरामावरून वाद झाला आणि त्याला जातीय स्वरूप देण्यात आलेले ऐकून आश्चर्य वाटले. सर्व विश्वाचा कर्ता करविता समजला जाणारा विष्णू भगवान आणि त्याने घेतलेले अवतार हे सगळ्या जगासाठी होते अशीच धार्मिक कल्पना आहे. ते खरोखर अस्तित्वात होते की नव्हते हा आस्तिक नास्तिकांमधला वाद आहे. पण त्यांनासुध्दा जातीनुसार वाटून घेणे दुर्दैवी आहे.

No comments: