Monday, January 07, 2013

रक्ताभिसरण आणि रक्तदाब

आपल्या रक्तात काय काय असते असे लाक्षणिक अर्थाने बोलले जाते आणि ते प्रयोगशाळेत तपासून पाहिले जातांना त्यात काय पाहिले जाते किंवा सापडते हे मी या पूर्वी दोन लेखात लिहिले होते. ही रक्ताची केमिस्ट्री (रसायनशास्त्र) झाली. पदार्थविज्ञान (फिजिक्स) या शास्त्राच्या दृष्टीकोनातून रक्ताचा अभ्यास करतांना त्यात काय दिसते हे या लेखात पाहू.


तळपायापासून मस्तकापर्यंत आपल्या शरीरात असलेली हाडे, मांस, कातडी, दात, केस, नखे वगैरे बाकीचे सर्व घटक ठरलेल्या जागीच असतात आणि आयुष्यभर त्या जागीच राहतात, पण रक्त मात्र सतत इकडून तिकडे फिरत असते. या क्षणी करंगळीत असलेल्या रक्तातला एकादा कण पुढल्या क्षणी पायात किंवा मेंदूत गेलेला असेल किंवा करंगळीतच परत आलेला असेल. शरीराच्या सर्वच भागातल्या रक्ताचा काही भाग दर सेकंदाला हृदयाकडे जातो आणि तिथून तो फुफ्फुसात जाऊन प्राणवायू घेऊन येतो आणि पुन्हा शरीरभर पसरत असतो. या क्रियेला रक्ताभिसरण असे म्हणतात. हे साध्य करण्यासाठी आपले हृदय सतत धडधडत असते.

हृदयाचे चार कप्पे असतात. त्याच्या धडधडण्याच्या क्रियेत हे चारही कप्पे एका अत्यंत सुसंबध्द अशा क्रमाने आणि नियमितपणे आकुंचन व प्रसरण पावत असतात. पहिला कप्पा प्रसरण पावताच त्याला जोडलेल्या मोठ्या रक्तवाहिनीतून शरीरातले थोडे रक्त त्या कप्प्यात येते. तिथून ते दुस-या कप्प्यात जाते, तिथून फुफ्फुसाकडे जाऊन परत येतांना मात्र ते तिस-या कप्पात येते, तिथून आधी चौथ्या कप्प्यात जाऊन तिथून तीन मोठ्या रक्तवाहिन्यांमधून शरीरात पसरते. या प्रत्येक कप्प्यांना विशिष्ट प्रकारच्या झडपा असतात. त्यांमधून रक्ताचा प्रवाह फक्त एकाच दिशेने वाहू शकतो. उंदराच्या पिंज-याचे दार उघडून तो आत प्रवेश करू शकतो पण आतल्या बाजूने तेच दार उघडून तो बाहेर येऊ शकत नाही. याचप्रमाणे आपल्या शरीरातले रक्त चित्रात दाखवल्याप्रमाणे आधीच्या कप्प्यामधून पुढच्या कप्प्यात ठराविक मार्गानेच वाहू शकते.

जेंव्हा ते चौथ्या कप्प्यामधून शरीरात ढकलले जाते त्या वेळी त्या कप्प्याच्या आकुंचनक्रियेने रक्ताला एक दाब मिळतो. हा रक्ताचा जास्तीत जास्त किंवा वरचा दाब (Systolic pressure) झाला. त्या दाबामुळे ते शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये पसरते आणि सगळीकडून गोळा होत हृदयाकडे जाणा-या रक्तवाहिन्यांध्ये शिरून हृदयाकडे परत जाते. अर्थातच या वेळी त्याचा दाब कमी झालेला असतो. हृदयाकडून निघालेला रक्ताचा लोंढा संपला तरी रक्तवाहिन्यामधील रक्तावर कमीत कमी म्हणजे खालचा दाब (Dystolic pressure)  असतोच. रक्तावरला दाब या दोन मर्यादांमध्ये सारखा बदलत असतो. हृदयामधून जोरात बाहेर पडतांना तो सर्वात जास्त असतो आणि कमी होत सर्वात कमी पातळीवर येतो तोपर्यंत हृदयाचा पुढचा ठोका पडतो आणि त्याबरोबर रक्ताचा दाब पुन्हा वाढतो. हे सगळे एका सेकंदाच्या आत घडते.




रक्तदाबासाठी तपासणी करतांना हृदयामधून बाहेर पडणा-या रक्तवाहिनीमधील (Arteries) हे दोन्ही रक्तदाब मोजतात. त्यासाठी एका खास उपकरणाचा उपयोग केला जातो. यातला पोकळ पट्टी (कफ) दंडाभोवती घट्ट गुंडाळून त्यात हवा भरतात आणि फुगवत नेतात. या हवेच्या दाबामुळे दंडामधील रक्तवाहिनी चेपली जाते आणि तिच्यामधून हाताकडे जात असलेला रक्ताचा प्रवाह पूर्णपणे थांबतो. व्हॉल्व्ह उघडून हवा बाहेर सोडली तर हवेचा दाब कमी होतो. हवेचा दाब हळू हळू कमी करत आणला तर एका अवस्थेत हातात जाणारा रक्तप्रवाह हळू हळू सुरू होतो आणि हवेचा दाब आणखी कमी झाल्यानंतर रक्तप्रवाह पूर्ववत होतो. या तपासणीचे वेळी कानाला स्टेथास्कोप लावून हातात होत असलेल्या रक्तप्रवाहाचा आवाज ऐकतात. हवेचा दाब मोजण्यासाठी पारा भरलेली एक उभी नळी या यंत्राला जोडलेली असते. एका हाताने व्हॉल्व्ह उघडून हवा बाहेर सोडायची, त्याच वेळी कानाने स्टेथॉस्कोपमधला आवाज ऐकायचा आणि खाली जात असलेली पा-याची पातळी डोळ्याने पहायची अशी तीन कामे लक्षपूर्वक करायची असल्यामुळे ही तपासणी तज्ज्ञ डॉक्टर किंवा नर्सच करू शकतात. ही तीन्ही कामे यंत्राकरवी करवून घेऊन रक्ताचा दाब काट्याने डायलवर दाखवणारी यंत्रे निघाली आहेत आणि आता ती डिजिटल पध्दतीने आकड्यात दाखवणारी उपकरणेसुध्दा उपलब्ध झाली आहेत. पण भारतातले डॉक्टर त्यांवर फारसा भरोसा न ठेवता जुन्या उपकरणांचाच उपयोग करतात.

रक्तदाब मोजणारी उपकरणे फक्त वरचा दाब (Systolic pressure) आणि खालचा दाब (Dystolic pressure) मोजतात. पण त्यांच्या दरम्यानच्या काळात हे कशा रीतीने वाढत किंवा कमी होतात हे समजण्यासाठी अधिक सेंसिटिव्ह इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता असते. ईसीजीमध्ये याचा आलेख (ग्राफ) मिळतो. हृदयाच्या एकामागोमाग पडणा-या ठोक्यांमध्ये रक्तावरचा दाब कशा प्रकारे बदलत असतो तसेच हे ठोके किती काळानंतर पडतात, ते एकसारखे असतात किंवा त्यात काही फरक असतो वगैरे सविस्तर माहिती त्यात मिळते. याच्याही पुढची पायरी आयसीसीयूमधील यंत्रात असते. त्यातल्या मॉनिटरवर हे ग्राफ सतत येत राहतात आणि रुग्णाचे हृदय कशा प्रकारे काम करत आहे हे डॉक्टरला समजते.  

ही सरळी यांत्रिक उपकरणे यंत्रयुगामध्ये तयार झाली. त्यापूर्वीच्या काळात अशी साधने नसल्यामुळे नाडीचे ठोके पाहिले जात. प्राचीन काळापासून चालत आलेल्या आयुर्वेदामध्ये नाडीपरीक्षा अत्यंत महत्वाची समजली जाते. फक्त नाडीच्या ठोक्यांचा लक्षपूर्वक अभ्यास करून शरीरातील सगळ्या इंद्रियांचे काम कसे चालले आहे हे निष्णात वैद्य जाणत असत. इंग्लिशमध्येसुध्दा परिस्थिती समजून घेणे या अर्थाने फीलिंग द पल्स असा वाक्प्रचार आहे. "तुम्ही काल दिवसभर काय काय खाल्ले आणि रात्री काय केले हे सगळे आमचा वैद्य नाडी बघून अचूक ओळखतो." असे एका बुजुर्ग माणसाने मला एकदा सांगितले होते. कदाचित हा त्याच्या गप्पिष्टपणाचा भाग असेल किंवा रोग्याने आपल्यापासून काही लपवून ठेऊ नये म्हणून त्या वैद्याने असा समज पसरवून ठेवला असेल. अशा प्रकारे नाडीपरीक्षेमधून सबकुछ जाणणारे वैद्य आजकाल सहजासहजी पहायला मिळत नसले तरी एका मिनिटात नाडीचे ठोके किती पडतात हे मात्र सगळे डॉक्टर आणि वैद्य मोजतातच. हे काम करणारी यंत्रेसुध्दा आता अनेक ठिकाणी पहायला मिळतात. एका मिनिटाला नाडीचे ठोके पडण्याचा वेग सतत दाखवत राहणारी उपकरणेसुध्दा आयसीसीयूमध्ये असतात. मिनिटाला जेवढे नाडीचे ठोके पडतात तितक्या वेळा हृदयाकडून शरीराला रक्तामधून नवा प्राणवायू मिळतो. झोपेत असतांना किंवा निपचित पडून राहिलेल्या वेळी शरीराला जेवढा प्राणवायू लागतो त्यापेक्षा कष्टाचे काम करत असतांना किंवा धावतांना जास्त प्राणवायूची गरज पडते. तो पुरवण्यासाठी नाडीचे ठोके तात्पुरते वाढतात आणि गरज कमी झाली की ते पुन्हा कमी होतात. मानसिक धक्का किंवा भीतीमुळे सुध्दा छाती धडधडते तेंव्हा नाडीचे ठोके जलदगतीने पडतात. पण या सगळ्या गोष्टी कमाल आणि किमान मर्यादांमध्येच घडतात.. 

थोडक्यात सांगायचे झाल्यास एका मिनिटात हृदयाच्या कार्याच्या चक्राची किती आवर्तने होतात, त्याची गती सारखीच राहते की त्यात बदल होतात, रोग्याच्या रक्ताचा कमाल आणि किमान दाब किती असतो. तोसुध्दा स्थिर पातळीवर असतो किंवा बदलत राहतो, या दोन्हींमध्ये होणारे बदल परिस्थितीनुसार असतात की नाही. वगैरे अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्याचा उपयोग रोग्याच्या शरीराची अवस्था समजून घेऊन त्याच्या व्याधीचे निदान करण्यात केला जातो.



No comments: