लेफ्ट राइट की डावा उजवा - भाग १
परवाच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी आपल्या राजधानीमध्ये दरवर्षीसारखा जंगी कार्यक्रम झाला. सैनिक आणि पोलिसदलांच्या अनेक तुकड्या मोठ्या ऐटीत "लेफ्ट राइट", "लेफ्ट राइट" करत परेड करतांना पहायला मिळाल्या. सर्वांचे उजवे आणि डावे पाय एका लयीत पडत असतांना आणि हात एकासारखे एक वर खाली होत असतांना त्यातून अद्भुत दृष्य निर्माण होत होते. त्यात 'उजवा' आणि 'डावा' या दोन्हींचा समान वाटा होता, किंवा त्यांच्या लयबध्द हालचालींमध्ये अणुमात्र फरक वाटत नव्हता. आपल्या जीवनात मात्र आपण नेहमी डावे, उजवे असे करत असतो. 'डावे' म्हणजे कमी दर्जाचे आणि 'उजवे' तेवढे चांगल्या प्रतीचे समजले जाते. हा फरक निसर्गानेच करून ठेवला आहे असेही त्यावर सांगितले जाते.असमानता किंवा विविधता तर निसर्गामध्ये सगळीकडे भरलेली असतेच. एका झाडाला हजारो पाने असली तरी त्यातली तंतोतंत सारखी अशी दोन पानेसुध्दा शोधून सापडत नाहीत, हाताची पाचही बोटे सारखी नसतात हे उदाहरण नेहमी दिले जाते. त्यांच्यामधील प्रत्येकाची लांबी आणि जाडी निरनिराळी असते. उजवा आणि डावा हात आकाराने सारखे असले तरी ते एकमेकांच्या प्रतिबिंबांसारखे (मिरर इमेजेस) असतात, शरीराला सिमेट्रिकल असतात. हे दोन्ही हात सारख्या प्रकारे हालचाली करू शकत असल्यामुळे एका हाताने आपण जे काम करतो तेच काम प्रयत्न केल्यास दुसऱ्या हातानेसुध्दा करू शकतो. तसे करणारे इतर लोक आपल्याला भेटतात. पण कुठलेही काम करण्यासाठी बहुतेक लोकांचा उजवा हात पटकन पुढे येतो. आनुवंशिक किंवा उपजत आलेले गुण, कळायला लागण्याच्याही आधीपासून करत आलेले अनुकरण, लावली गेलेली शिस्त अशा अनेक कारणांमुळे शरीराला तशी सवय लागते आणि नकळत ते होते. वारंवार उपयोग करण्यामुळे बहुसंख्य लोकांचा उजवा हात अधिक बलवान होतो, त्यात जास्त कौशल्य येते हे दिसतेच. सगळी कामे करणारा किंवा कोणतेही काम करायला सज्ज असलेला सहकारी बॉसचा 'उजवा हात' असतो आणि अगदी सोपे काम असले तर त्याला 'बायेँ हाथका खेल' म्हणतात.
आपल्या जगण्यातल्या बारीक सारीक बाबतींसाठीसुध्दा पूर्वजांनी असंख्य नियम करून ठेवले आहेत आणि त्यांचे अतीशय कडक पालन केले जात असे. कुठलेही चांगले काम नेहमी उजव्या हातानेच करायचे असा त्यातलाच एक नियम आहे. देवाची पूजा करतांना त्याच्या मूर्तीवर अभिषेक करणे, त्याला गंध, फूल, हळद, कुंकू, अक्षता वगैरे वाहणे, उदबत्ती किंवा निरांजन ओवाळणे, नैवेद्य दाखवणे हे सगळे फक्त उजव्या हातानेच करायचे असते, एवढेच नव्हे तर कोणाला तीर्थ आणि प्रसाद उजव्या हातानेच द्यायचा आणि त्यानेही तो उजव्या हातानेच घेतला पाहिजे. यात कुठेही डावा हात आला तर लगेच ते मोठे पाप होईल, त्याने देवाचा कोप होईल, तो त्याची शिक्षा देईल वगैरे धाक घातला जात असे. खुद्द आपले देवाधिकसुध्दा थोडे डावे उजवे करतच असत. भगवान श्रीरामाचे वर्णन "दक्षिणे लक्ष्मणोर्यस्य वामेतुजनकात्मजा" असे केले जाते. म्हणजे पराक्रम करण्यासाठी रामाचा उजवा हात असलेला लक्ष्मण उजव्या बाजूला आणि सीतामाई मात्र नेहमी डाव्या बाजूला. विठ्ठलाचे वर्णनसुध्दा "वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा" असेच.
रोजचे जेवण करतांना ताटात वाढलेल्या अन्नाला कोणीही डाव्या हाताने स्पर्श करणे खपवून घेतले जात नसे. त्याने त्या अन्नाचा अपमान वगैरे होत असे. शहरातल्या हॉटेलमध्ये काटा आणि सुरी यांच्या सहाय्याने खातांना डाव्या हातात धरलेल्या फोर्कने उचललेला घास तोंडात घालतांना आपण चूक करत आहोत अशी अपराधीपणाची भावना मनात येत असे. यातला निरर्थकपणा समजल्यावर अजूनसुध्दा मी घरी उजव्याच हाताने जेवण करतो, इतके हे संस्कार अंगात भिनलेले आहेत.
उजवा हात 'खाण्या'साठी आणि डावा हात 'धुण्या'साठी अशी त्यांच्या कामांची वाटणी करून ठेवलेली होती. ती आरोग्याच्या दृष्टीने किती योग्य आहे आणि त्यावरून आपल्या पूर्वजांचा महानपणाच कसा सिध्द होतो वगैरे त्यांचे खंदे समर्थक सांगत असतात. पण डावा हात धुवून स्वच्छ करूच नये किंवा करता येणारच नाही असे का समजायचे हे मला समजत नाही.
पण क्रीडाक्षेत्रात, विशेषतः क्रिकेटच्या खेळात लेफ्ट हँडर बॅट्समन किंवा बोलर डाव्या हाताने जी किमया करून दाखवतात ती काही वेळा इतर खेळाडूंच्या उजव्या हाताने केलेल्या कामगिरीपेक्षाही सरस असते. त्यांच्या बाबतीत डाव्या हाताची कामगिरी 'उजवी' असते असे म्हणता येईल. बहुतेक सर्व हार्मोनियमवादक डाव्या हाताने भाता भरतात आणि उजव्या हाताची बोटे पट्ट्यांवर फिरवून त्यामधून सुरांची जादू निर्माण करतात. भात्याने पेटीत हवा भरण्याचे काम तुलनेने सोपे असावे म्हणून ते डाव्या हाताने करून उजव्या हाताच्या बोटांनी जास्त कौशल्याचे काम केले जाते. पण काही डावखोरे वादक याच्या बरोबर उलट करतात. चांगले वादन करण्यासाठी दोन्ही हात तितकेच 'तयार' असावे लागतात असे एका प्रसिध्द हार्मोनियमपटूने मात्र त्याच्या मुलाखतीत सांगितले होते.
आपल्या हृदयात दोन उजवे आणि दोन डावे असे चार कप्पे असतात, त्यातल्या वरील उजव्या कप्प्यामध्ये शरीरामधले रक्त येते आणि खालच्या डाव्या कप्प्यामधून ते शरीरभर पसरते. हे काम व्यवस्थितपणे होत राहण्यासाठी चारही कप्प्यांचे काम सुरळीतपणे चालणे आवश्यक असते, पण रक्ताला शरीरात पसरून पुन्हा हृदयात परत येण्यासाठी पुरेसा दाब डाव्या कप्प्यामधून मिळतो. हा कप्पा जास्त बलवान असावा लागतो. आपल्या मेंदूचेही उजवा आणि डावा असे दोन भाग असतात आणि त्यांच्यामधली कामाची वाटणी खाली दिल्याप्रमाणे असते. डावा मेंदू किती महत्वाचा असतो हे यावरून समजते.
डावा मेंदू तर्कशुद्ध विचार करतो आणि उजवा भावनांचा.
डावा मेंदू तपशीलात जातो आणि उजवा सम्यक दृष्य पाहतो
डावा मेंदू वस्तुस्थिती पाहतो आणि उजवा कल्पनाविलास करतो
डावा मेंदू शब्द व भाषा जाणतो आणि उजवा खुणा व चित्रे
डावा मेंदू गणित व विज्ञान समजून घेतो आणि उजवा तत्वज्ञान आणि धर्म
डावा मेंदू आकलन करतो आणि उजवा ग्रहण करतो
डावा मेंदू जाणतो आणि उजवा विश्वास ठेवतो
डावा मेंदू पोच देतो आणि उजवा दाद देतो
डाव्या मेंदूला पॅटर्न समजतात तर उजव्याला ठिकाण
डावा मेंदू वस्तूचे नांव जाणतो आणि उजवा तिचे गुणधर्म
डावा मेंदू वस्तुनिष्ठ विचार करतो आणि उजवा कल्पनारम्य
डावा मेंदू धोरण ठरवतो आणि उजवा शक्यता आजमावतो
डावा मेंदू प्रॅक्टिकल असतो उजवा मनस्वी
डावा मेंदू सुरक्षितता पाहतो आणि उजवा धोका पत्करतो.
. . . . .. ................................... (क्रमशः)
----------------------------------------------------------------------------------------
लेफ्ट राइट की डावा उजवा - भाग २
"लेफ्ट राइट", 'डावे', 'उजवे' या गोष्टी फक्त आपले हात, पाय, हृदय, मेंदू वगैरे शरीरामधील भागांपुरत्या मर्यादित नाहीत. जीवनात पदोपदी त्या आपल्यासमोर येत असतात. आपल्या शिक्षणाची सुरुवात अक्षर आणि अंक यांच्या ओळखीने होते. अक्षरे, शब्द, वाक्ये यामधून भाषा शिकल्यानंतर त्या भाषेमधून आपण इतर विषय शिकतो. पण त्यासाठी ती अक्षरे एका ओळीत लिहावी लागतात. कागदावर इतस्ततः पसरलेल्या अक्षरांमधून काही बोध होणार नाही. इंग्लिश, फ्रेंच यासारख्या युरोपियन भाषा 'लेफ्ट टु राईट' लिहितात, तसेच मराठी, कानडी वगैरे भारतीय भाषासुध्दा डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात. मध्यपूर्वेमधल्या अरबी, फारशी आणि भारतातल्या काश्मीरी, उर्दू वगैरे भाषा मात्र उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. यावर अनेक विनोदही केले जातात. त्यातला एक असा आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शीत पेयांची विक्री वाढवण्यासाठी एका कंपनीने एक आकर्षक चित्रमय जाहिरात तयार केली. भाषेचा प्रश्न न पडता जगभरातील सर्वांना ती समजावी आणि तिने त्यांचे लक्ष वेधून घ्यावे असा हेतू त्या मागे होता. या जाहिरातीत तीन चित्रांचा संच होता. उन्हाने म्लान होऊन अर्धमेला झालेला एक माणूस डाव्या बाजूच्या पहिल्या चित्रात दाखवला होता, दुस-या चित्रात त्या शीतपेयाची बाटली त्याच्या तोंडाला लावली होती आणि तिस-या चित्रात तो माणूस अदम्य उत्साहाने 'याहू' करून उडी मारण्याच्या मूडमध्ये दाखवला होता. ही जाहिरात जगभरातील सर्व प्रदेशांमध्ये दाखवून झाल्यानंतर काही दिवसांनी केलेल्या सर्वेक्षणात असे दिसले की त्या काळात इतर सर्व भागात त्या शीत पेयाचा खप वाढला असला तरी मध्यपूर्वेत मात्र ते पेय प्यायला कोणीच तयार नाही. त्या लोकांनी ती जाहिरात उजवीकडून डावीकडे वाचली असेल तर त्यांना असेच वाटले असणार की एक चांगला हट्टाकट्टा नौजवान हे पेय पिऊन झाल्यावर गलितगात्र होतो. यावर हे पेय टाळण्याखेरीज ते तरी आणखी काय करतील?
अंकांची ओळख करून घेतांना १, २, ३ ..... वगैरे ९ पर्यंत सुटे अंक झाले की १०, ११ वगैरेंमध्ये डावीकडील १ या आकड्याचे मूल्य १० इतके असते आणि उजवीकडल्या आकड्याची किंमत ०, १ वगैरेसारखी कमी असते. १ या आकड्याच्या पुढे एकापुढे एक शून्ये लिहित गेल्यावर १०, १००, १०००, १००००, १००००० वगैरे करता करता डावीकडल्या १ या आकड्याची किंमत दहा दहा पटीने वाढत जाऊन कोटी, अब्ज, परार्ध वगैरे होते, पण उजवीकडल्या ० चे मूल्य मात्र शून्यावरच राहते. अंकांचा अर्थ समजायला लागताच त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार वगैरे सुरू होतात. २+३ = ५, ३ x ४ = १२ अशासारख्या समीकरणांमधून ते मांडले जातात. बीजगणितांध्ये अंकांऐवजी क्ष, य यासारखी अक्षरे आणि भूमितीमध्ये परीघ, क्षेत्रफळ वगैरेंची सूत्रे (फॉर्स्यूले) समीकरणांमधून असतात. त्रिकोणमिती (ट्रिगनॉमेट्री) आणि कॅल्क्युलसमध्ये ही सूत्रे आणि समीकरणे अधिकाधिक जटिल होत जातात. पदार्थविज्ञानामधले (फिजिक्समधले) नियमही अशा प्रकारच्या निरनिराळ्या सूत्रांमधून मांडले आणि सिध्द केले जातात. या सगळ्या समीकरणांमध्ये डावी (लेफ्ट हँड साईड) आणि उजवी (राईट हँड साइड) अशा दोन बाजू असतात आणि दोन्हींचे मूल्य समान असते. या विषयांमधली गणिते सोडवतांना समीकरणे मांडून जितकी माहिती उपलब्ध असते ती त्यांमध्ये मांडली जाते. त्यानंतर त्या समीकरणांची पुनर्रचना करून माहीत नसलेल्या किंवा अज्ञात बाबी (अननोन एंटिटीज) डावीकडे आणि माहीत असलेल्या उजवीकडे आणतात. त्यांची मूल्ये घालून ती समीकरणे सोडवल्यानंतर आपल्याला जे शोधायचे असते ते म्हणजे विचारलेला प्रश्न अखेरीस डाव्या बाजूला येतो आणि त्याचे उत्तर उजव्या बाजूला मिळते. 'डावीकडून उजवीकडे' या भाषेतल्या नियमानुसार आधी प्रश्न आणि नंतर उत्तर हा क्रम बरोबरच आहे.
रसायनशास्त्रात (केमिस्ट्रीमध्ये) सुध्दा रासायनिक क्रियांची समीकरणे असतात, पण त्यांचे स्वरूप थोडे वेगळे असते. दोन रसायनांचा संयोग होऊन त्यातून तिसरे रसायन तयार होत असेल (उदाहरणार्थ C+ O2 = CO2) तर संयोग पावणारी (रिअॅक्टंट) रसायने डाव्या बाजूला आणि त्यातून निर्माण झालेले उत्पादन (प्रॉडक्ट) उजव्या बाजूला लिहिले जाते. एका रसायनाच्या विघटनातून अनेक द्रव्ये बाहेर पडत असतील तर ते मूळ रसायन डाव्या बाजूला आणि त्यातून निघालेली द्रव्ये (Daughter products) उजव्या बाजूला मांडतात. थोडक्यात म्हणजे ही क्रिया होऊन गेलेली असल्यास भूतकाळ डाव्या बाजूला आणि वर्तमानकाळ उजव्या बाजूला आणि होणार असल्यास वर्तमानकाळ डाव्या बाजूला आणि भविष्यकाळ उजव्या बाजूला दाखवतात. डाव्या आणि उजव्या बाजूच्या रसायनांमधील अणूंची संख्या समान असावी एवढेच यातले 'समीकरण' असते.
विज्ञानाच्या क्षेत्रामधून बाहेर पडून वाणिज्यशाखेकडे पाहिले तर तिथेसुध्दा "लेफ्ट राइट", 'डावे', 'उजवे' या गोष्टी येतातच. त्यातल्या जमाखर्चाचा उगम अंकगणितामधूनच झाला आहे. माझ्या लहानपणी घरातला साधा जमाखर्च लिहितांना त्या वहीच्या प्रत्येक पानावर उभी रेघ मारून त्याचे डावा व उजवा असे दोन भाग केले जात असत किंवा वहीतल्या डाव्या व उजव्या पानांमध्ये मिळून महिन्याचा जमाखर्च लिहीत असत. तो लिहितांना बाहेरून घरात आलेली सारी जमा रक्कम किंवा 'आवक' डाव्या बाजूच्या पानावर लिहीत आणि खर्च झालेली किंवा 'जावक' रकम उजव्या बाजूच्या पानावर लिहिली जात असे. पण घरात आलेले सगळे धन म्हणजे उत्पन्न नसते, तसेच बाहेर गेलेले सगळे पैसे खर्च झालेले नसतात. उदाहरणार्थ बँकेमधल्या आपल्याच खात्यात पैसे ठेवले किंवा त्यातून पैसे काढून घरी आणले तर ते पहिल्यांदाही आपलेच असतात आणि नंतरही आपलेच असतात, तसेच आपण उसने घेतलेले पैसे आपल्याला परत करायचे असतात आणि कुणा विश्वासू माणसाला उसने दिले असले तर ते परत येणार असतात. चेक पेमेंट्स, क्रेडिट कार्डे, डेबिट कार्डे, ईबँकिंग, हायर परचेस वगैरेंमुळे आता रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत आणि घरखर्चाचा जमाखर्च लिहिणे तर फारच कमी झाले आहे. ते काय असायचे हे पुढच्या पिढ्यांना बहुधा माहीतही असणार नाही.
लहान दुकानाचा हिशोब ठेवतांना सामानाच्या विक्रीमधून आलेले पैसे डाव्या बाजूला आणि खरेदीसाठी केलेला खर्च उजव्या हाताला मांडत असत. पण अशा एका पानावरून त्या दुकानाला कितपत नफा किंवा तोटा होत आहे हे सांगता येणार नाही कारण त्या दिवशी झालेली विक्री आणि खरेदी ही बहुधा निरनिराळ्या मालाची असू शकते. महिन्यातला जमाखर्च पाहिला तरी त्या कालावधीत जेवढे सामान दुकानात आले तेवढेच किंवा ते सगळे त्याच महिन्यात विकले गेले असे सहसा होत नाही. सामान आणि पैसे यांची सतत अदलाबदल चाललेली असते. महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या तुलनेत अखेरच्या दिवशी गल्ल्यात जास्त पैसे असले आणि दुकानातल्या सामानाचा स्टॉकसुध्दा वाढला असला तर ते दुकान फायद्यात चालले आहे आणि दोन्ही गोष्टी कमी झाल्या असल्या तर ते नुकसानीत चालले आहे असे म्हणता येईल पण त्यातली एक वाढली आणि दुसरी कमी झाली असली तर त्यांची तुलना करून पहावी लागेल. हा गोंधळ टाळण्यासाठी व्यावसायिक जमाखर्च 'डबल एंट्री बुक कीपिंग' या वेगळ्या प्रकारे लिहिला जातो. यात पैशाचा हिशोब ठेवणारे कॅशबुक असते, त्या शिवाय सामानाचा हिशोबही वेगळा ठेवला जातो. खरेदी करतांना किती सामान दुकानात आले ते डाव्या बाजूला मांडतात आणि विकले गेल्यावर त्यातले किती कमी झाले ते उजव्या बाजूला लिहिले जाते. दोन्ही पुस्तकांमधल्या डाव्या बाजूंची एकूण बेरीज केली की त्यातून जमा समजते आणि उजव्या बाजूच्या बेरजेमधून खर्च. तो कमी असला तर अर्थातच नफा झाला आणि जास्त झाला तर तोटा.
मोठा व्यवसाय किंवा कारखाना उभा करण्यासाठी जमीन, इमारती, यंत्रसामुग्री वगैरेंवर मोठा भांडवली स्वरूपाचा खर्च होतो आणि तो चालवण्यासाठी कच्चा माल, इंधन, वीज, नोकरांचे पगार वगैरेंवर खर्च होत राहतो. भांडवली खर्च (कॅपिटल) भागवण्यासाठी भाग भांडवल, दीर्घ मुदतीची कर्जे वगैरेंमधून पैसे उभे केले जातात तर चालवण्यासाठी (रनिंग एक्स्पेन्स) तात्पुरत्या मार्गांचा अवलंब केला जातो. यामुळे अशा उद्योग व्यवसायांचा 'इनकम अँड एक्स्पेंडिचर अकौंट' वेगळा असतो आणि 'बॅलन्स शीट' वेगळा काढला जातो. इनकम अँड एक्स्पेंडिचर अकौंट एक वर्ष किंवा तीन वा सहा महिने अशा विशिष्ट कालावधीसाठी असतो आणि बॅलन्स शीट एका विशिष्ट तारखेला असलेली परिस्थिती दाखवतो. दोन्हींमध्ये डावी बाजू (लेफ्ट हँड साईड) आणि उजवी बाजू (राईट हँड साइड) असतातच. याशिवाय सर्वाच महत्वाची बॉटमलाईन असते. इनकम अँड एक्स्पेंडिचर अकौंटमधली बॉटमलाईन पाहून त्या कालावधीत किती नफा किंवा तोटा झाला हे समजते आणि बॅलन्स शीटमधली बॉटमलाईन पाहून त्या तारखेला त्या कंपनीची एकंदर आर्थिक परिस्थिती कशी आहे ते कळते. कर्जे आणि इतर देणी वगळून जर तिच्याकडे भरपूर स्थावर आणि जंगम मालमत्ता असली तर एकाद्या वर्षी तोटा झाला तरी तिची परिस्थिती मजबूत असते आणि ती तग धरू शकते. याउलट तिची संपत्ती कमी होत होत शून्यावर आली तर तिचे दिवाळे निघते.
. . . . . . . . .............. . . . . (क्रमशः)
--------------------------------------------------------------------------
लेफ्ट राइट की डावा उजवा (भाग - ३)
शिक्षण संपवून नोकरीला लागल्यानंतर अनेक लोकांचा गणित वा विज्ञान या विषयांशी संबंध रहात नाही. ते घरचा जमाखर्च ठेवत नाहीत किंवा कोणता व्यवसाय करत नाहीत. पण ते एकाद्या चांगल्या नोकरीमध्ये असतील तर त्यांना दर महिन्याला एक वेतनपत्रक (पेबिल) मिळते त्यातसुध्दा डावी बाजू (लेफ्ट हँड साईड) आणि उजवी बाजू (राईट हँड साइड) असतातच. मूळ वेतन (बेसिक पे), महागाई भत्ता, शहर भत्ता, प्रकल्प भत्ता, घरभाडे भत्ता, वाहन भत्ता, गणवेश भत्ता, प्रवास भत्ता, प्रोत्साहन भत्ता, कुटुंब नियोजन भत्ता, जादा कामाचा पगार (ओव्हरटाईम), बोनस, आणखी काही खास वेतन किंवा भत्ते (स्पेशल पे) अशा निरनिराळ्या मथळ्यांखाली त्यांना देण्यात येणारी रकम या पत्रकात डाव्या बाजूला मांडली असते. भविष्यनिर्वाहनिधी (प्रॉव्हिडेंट फंड), आयकर (इन्कम टॅक्स), त्यावर सरचार्ज, क्वार्टरमध्ये रहात असल्यास त्याचे भाडे, वीजबिल, पाणीपट्टी, मेंटेनन्स फी, टेलीफोन बिल, त्यांनी घर, मोटार, फर्नीचर, घरातली मंगलकार्ये वगैरेंसाठी कर्जे घेतली असल्यास त्यांचे हप्ते, विम्याचा हप्ता, ऑफीसातल्या सहकारी संस्था, रिलीफ फंड, म्यूच्युअल बेनेफिट फंड वगैरेंचे हप्ते अशा अनेक कारणांसाठी पगारामधून कापून घ्यायच्या रकमा उजव्या बाजूला दाखवल्या असतात. त्या सगळ्या कपातींची बेरीज करून ते पैसे त्यांना मिळणार असलेल्या डाव्या बाजूच्या एकूण रकमेमधून कमी केल्यानंतर उरलेला पगार त्या नोकराच्या बँकेतील खात्यात जमा होतो. कधी कधी तर तो अर्धामुर्धाच असतो. या सगळ्या बाबींमध्ये नेहमी बदल होत असतात. सलग तीन महिने माझ्या खात्यात पगाराची समान रकम जमा झाली असे कधी झाल्याचे मला तरी आठवत नाही. त्यामुळे आपल्याला नेमका किती पगार मिळतो हे सांगणे कठीण असते. जेवढी रकम मी पत्नीला सांगेन ती सगळी खर्च करण्याच्या योजना तिला सुचत असल्यामुळे मी तिला प्रत्यक्ष बँकेत जमा होणारी रकमच सांगू शकत होतो. कोणाचा पगार विचारणे आजकाल सभ्यपणाचे समजले जात नाही, पण लहान गावामधून जुन्या पिढीतला कोणी आला तर तो हमखास हा प्रश्न विचारीत असे, एवढेच नव्हे तर त्याच्या भाच्याला इतका किंवा जावयाला तितका पगार मिळतो हे देखील सांगत असे. मी त्याला पेबिलमधल्या लेफ्ट हँड साईडचा एकूण पगार सांगितला तर उरलेल्या पैशाचे मी काय करतो अशा संशयाच्या नजरेला तोंड द्यावे लागत असे. माझ्या ऑफीसात काम करणारे मित्र घरी आले तर त्यांच्याबरोबर बोलतांना पे स्केल्स, पे कमिशन वगैरेंची चर्चा झाली तर त्यात येणारे 'बेसिक पे'चे आकडे वेगळेच असत.माझ्या लहानपणी आमच्या गावाच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत चालत जायला पाच मिनिटे लागत असत आणि तिथल्या लोकांकडे भरपूर वेळ असे. गावातल्या गावात कुठेही जायचे म्हणजे पायीच जायचे. गावातले मातीचे रस्ते वाहनांसाठी योग्य नव्हतेच. त्यांच्या कडांना असलेली उघडी गटारे, त्यांच्या काठाला पडलेली घाण आणि त्यामधून वावरणारे घाणेरडे प्राणी यांना टाळण्यासाठी सगळे लोक रस्त्यांच्या मधोमध चालत असत. समोरून येणारे कोणी भेटले तर रस्त्याच्या मधोमध उभे राहून त्यांच्याशी बोलत आणि जरासे बाजूला होऊन एकमेकांना पुढे जाण्यासाठी वाट देत असत. एकादी बैलगाडी किंवा सायकल आली तर ती जाईपर्यंत थोडे बाजूला सरकून उभे रहात असत. क्वचित केंव्हातरी दोन बैलगाड्या अमोरसमोरून आल्या तरी बैलांनासुध्दा थोडी बुध्दी असल्यामुळे ते एकमेकांना टक्कर न देता थांबत असत. शहरात आल्यानंतर तिथले प्रशस्त रस्ते आणि त्यावरून दोन्ही दिशांनी लागलेली वाहनांची रांग पाहून माझ्या आश्चर्याला सीमा राहिली नव्हती. माणसांना चालण्यासाठी वेगळे पदपथ (फूटपाथ) असायचे. तरीही काही लोक रस्त्यावरून चालायचे, पण बहुधा डाव्या कडेने.
आजकाल वाशीमध्ये जागोजागी काही फलक लावलेले दिसतात. "उजव्या बाजूने चालण्याचे फायदे - चेनचोरांपासून बचाव आणि अपघातांपासून सुरक्षा" अशा अर्थाचे काही तरी त्यावर लिहिले असते. मी लहान असतांना कर्नाटकामधल्या एका गावातले पोलिस सगळ्या पादचा-यांना "बलगडीयिंद नडियिरी (उजव्या बाजूने चाला)" असे सांगत असतांना आठवले. आपण रस्त्याच्या उजव्या बाजूला असल्यास समोरून डाव्या बाजूने येणारे वाहन आपल्याला दिसते आणि त्याच्या वाहनचालकाचे आपल्याकडे लक्ष नसले किंवा दुचाकीवरील चेनचोराचे लक्ष असले तरी आपण काही हालचाल करून बाजूला होऊ शकतो असा उद्देश त्यामागे असावा.
रस्त्यावरील वाहतूक सुरळीतपणे चालावी यासाठी नियम करून त्यांचे सर्वांनी पालन करणे महत्वाचे आहे. इंग्लंड आणि भारतासारख्या त्यांच्या साम्राज्यातील देशांमध्ये सारी वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवतात आणि युरोप अमेरिकेसह जगाच्या इतर भागांमध्ये वाहनचालकांनी आपल्या गाड्या रस्त्याच्या उजव्या अंगाने चालवाव्यात असे नियम आहेत. वाहतूक वाढत गेल्यानंतर मोठ्या रस्त्यांमध्ये दुभाजक घालून त्यांचे दोन वेगळे भाग करण्यात आले. आता तर दोन जवळजवळ स्वतंत्र रस्तेच बांधले जातात. इंग्लंड आणि फ्रान्स यांना जोडणारा भुयारी मार्ग झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी येणारी वाहने एकमेकांच्या समोर येऊन धडकतील अशी काळजी काही लोकांना वाटत होती. एक जास्तीचे भुयार करून उजव्या बाजूच्या रस्त्याला डावीकडे आणि डाव्या बाजूच्या रस्त्याला उजवीकडे आणले गेले.
वाहतुकीच्या या नियमांनुसार ड्राइव्हिंग करणे सोयीचे व्हावे म्हणून लेफ्ट हँड ड्राइव्ह आणि राईट हँड ड्राइव्ह अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोटारगाड्या बनवल्या जातात. त्या चालवतांना चालकांना त्या गाड्या चालवण्याची सवय होते. दुस-या प्रकारची गाडी चालवतांना त्याचे भान ठेवावे लागते. एकाच रस्त्यावरून परस्परविरुध्द दोन्ही दिशांनी जाणा-या गाड्या रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत राहिल्या तर त्यांची टक्कर होणार नाही, पण एकाद्या चौकात एका गाडीला समोर जायचे असेल आणि विरुध्द दिशेने येणा-याला उजव्या हाताला वळायचे असेल तर त्याला पहिल्या गाडीला आडवे जाऊन तिचा मार्ग ओलांडून पुढे जावे लागते. यात त्यांनी धडकण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पूर्वीच्या काळी गावांमधल्या मुख्य चौकांमध्ये ट्रॅफिक पोलिस उभे असत, अजूनही काही ठिकाणी असतात. ते आपला उजवा किंवा डावा हात कधी उभा धरून एका बाजूने येणा-या गाड्यांना थांबवून ठेवत आणि आडवा धरून त्या दिशेने जायची परवानगी देत असत. वाहतुकीत वाढ झाल्यानंतर हे काम करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल आले. त्यातल्या हिरव्या सिग्नल्समधून समोर, डाव्या किंवा उजव्या बाजूला जाण्याची अनुमती दिली जाते आणि लाल रंगाच्या दिव्याने त्यांना थांबून रहायची आज्ञा मिळते. सिग्नल्सपाशी गाड्या थांबून राहिल्यामुळे वेळेचा खोळंबा होऊ लागला हे पाहून उड्डाणपूल (ओव्हरब्रिज) किंवा भूमीगत रस्ते (सबवे) बांधण्यात आले. तरीसुध्दा मुख्य प्रवाहातून बाहेर पडून त्यांवर जाण्यासाठी रस्त्यातल्या डाव्या किंवा उजव्या लेनमध्ये जावे लागते. यातली गंमत किंवा विसंगती अशी आहे की मुंबईमधल्या रस्त्यावर गाडी चालवतांना उजव्या बाजूला वळायचे असेल तर आधी रस्त्याच्या डाव्या बाजूला राहून पुलावर जाणे टाळायचे आणि अर्धा पूल झाल्यानंतर त्याच्या खालून उजवीकडे जायचे असे करावे लागते. अमेरिकेत याच्या नेमके उलट असते. आपले वाहन रस्त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला न्यायचे असल्यास आपल्या मागे असलेल्या वाहनाच्या चालकाला ते कळणे आवश्यक असते. त्यासाठी आपल्या वाहनाच्या मागच्या बाजूला असलेला डावा किंवा उजवा दिवा लावून तसा संदेश देणे आवश्यक असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास रस्त्यावरून वाहन चालवतांना आपल्याला सतत लेफ्टराईट, डावेउजवे यांचेकडे लक्ष द्यावे लागते.
'रस्ता', 'मार्ग', 'दिशा' वगैरे शब्दांच्या अर्थांची व्याप्ती वाढत जाऊन त्याने जीवनाला व्यापून टाकले. कोणत्याही प्रकारचा चांगला उपदेश किंवा सल्ला म्हणजे 'मार्गदर्शन' झाले आणि तो वाईट असल्यास 'वाकडी वाट दाखवणे' झाले. जगभरातली राजेशाही नष्ट किंवा निष्प्रभ होऊन तिचे जागी आलेल्या पर्यायी राजकीय व्यवस्थांमुळे सत्तेसाठी राजकारण सुरू झाले. त्यात विभिन्न प्रकारचे मतप्रवाह आले. औद्योगिक क्रांतीनंतर बदललेल्या सामाजिक स्थितीमध्ये सुस्थितीत असलेले 'कारखान्यांचे मालक' आणि पिळवणूक सहन करणारे 'मजूर' असे वर्ग निर्माण झाले. परंपरागत व्यवस्थेतसुध्दा सरदार, इनामदार, जमीनदार, सावकार वगैरे धनाढ्य वर्ग आणि त्यांचे गुलाम, नोकर, वेठबिगारी सेवक यांच्यामध्ये पराकोटीचे अंतर होतेच. "यातला श्रीमंत वर्ग गरीबांचे शोषण केल्यामुळेच बलवान झाला आहे. समाजातली विषमता हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू आहे, त्याचे पारिपत्य करणे अत्यावश्यक आहे" असे समजणारा एक वर्ग आणि "ही विषमता नैसर्गिक असते, मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन आणि प्रयत्न करून स्वतःची अनेक प्रकारे प्रगती करून प्रत्येक माणूस पुढे जात असतो" असे मानणारा दुसरा गट असे दोन परस्परविरोधातले मुख्य गट झाले. यातला पहिला गट भांडवलदारांच्या जिवावरच उठलेला असल्यामुळे दुस-या गटाला पाठिंबा देणे त्यांच्या फायद्याचे होते. फ्रान्समध्ये झालेल्या रक्तरंजित क्रांतीनंतर जी अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली होती त्या काळात तिथल्या लोकप्रतिनिधींच्या सभेत समाजवादी विचार करणारे लोक सभागृहातल्या डाव्या बाजूला बसायचे आणि परंपरागत रीतींचा पाठपुरावा करणारे किंवा "असल्या क्रांतीकारकांपेक्षा राजेशाहीच बरी होती" असे मानणारे सदस्य उजव्या बाजूला बसत असत. त्यामुळे राजकारणामध्ये 'डावी' आणि 'उजवी' विचारसरणी असा शब्दप्रयोग रूढ झाला. मार्क्स आणि एंजल्स यासारख्या विचारवंत लेखकांनी डावे तत्वज्ञान उभे केले. ते मान्य असणारे लोक स्वतःला 'पुरोगामी' म्हणवून घेऊ लागले आणि त्यांच्या मते विरुध्द बाजूचे लोक 'प्रतिगामी' ठरले.
पुढील कालावधीत या दोन्हींमध्ये मवाळ, मध्यममार्गी, जहाल, अतीजहाल असे अनेक पंथ उदयाला आले. साम्यवादी किंवा कम्यूनिस्टांनी रशियात रक्तरंजित क्रांती घडवून आणली आणि नावापुरती 'दीनदुबळ्यांची हुकुमशाही' आणली. त्यात आधीच्या धनाढ्य लोकांची पुरती वाट लागली पण गोरगरीबांचे जीवन सुखाचे झाले असे म्हणता येणार नाही. 'सर्व मालमत्ता समाजाच्या संयुक्त मालकीची असावी' हे तत्व यशस्वी झाले नाहीच. अखेर तिथली कम्युनिस्ट राजवट बाजूला सारली गेली, सोव्हिएट युनियनची शकले झाली आणि त्यातून निघालेल्या रशियासह सगळ्या देशांमध्ये निराळ्या प्रकारची लोकशाही आली. व्यक्तीगत मालमत्ता कमावणे आणि जमवणे परत सुरू झाले. ऱशियानंतर चीनमध्येही राज्यक्रांती होऊन माओझेदोंग याने साम्यवादी राजवट सुरू केली, ती आजतागायत चालू आहे, पण पुढील काळातल्या नेत्यांनी लोकांचा कल आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये घडत असलेल्या सुधारणांचा विचार करून आपली धोरणे बदलली. तिथेही काही प्रमाणात आणि निराळ्या रूपाने भांडवलशाही परत आली. अमेरिका हे सुरुवातीपासूनच भांडवलदारांचे नंदनवन म्हणून जगासमोर आहे. तिथेही डावी आणि उजवी विचारसरणी असली तरी त्यातला डावा डेमॉक्रॅटिक पक्षसुध्दा व्यक्तीस्वातंत्र्य आणि भांडवलशाहीलाच मानणारा आहे. त्याबरोबर सामाजिक बांधीलकी, समानता वगैरे गोष्टीही तो करतो. उजवा रिपब्लिकन पक्षसुध्दा फार वेगळी भाषा बोलत नाही. "सरकारने फक्त देशाचे संरक्षण, अर्थकारण आणि कायदा व सुव्यवस्था सांभाळावी, समाजाने काय करायचे ते समाज बघून घेईल." अशी अमेरिकन लोकांची सर्वसाधारण विचारसरणी आहे. दोन्ही पक्ष त्याच्या तपशीलात थोडा फरक करतात एवढेच. 'युनायटेड किंग्डम' असे मोठे नाव धारण करणा-या इंग्रजांच्या देशातसुध्दा उजव्या मताचा काँझर्व्हेटिव्ह आणि डाव्या मताचा लेबर असे दोन मुख्य राजकीय पक्ष झाले आणि आलटून पालटून ते सत्तेवर आले. लेबर पक्षाने उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण वगैरे काही समाजवादाचे प्रयोग करून पाहिले, पण ते फसल्यामुळे त्याची डावी विचारसरणी थोडी मागे पडली.
या जागतिक घटनांचे परिणाम भारतातल्या राजकीय परिस्थितीवर होत गेलेच. इथेही डावे आणि उजवे राजकीय पक्ष स्थापन झालेच, शिवाय इथल्या स्थानिक वैशिष्ट्यांमुळे त्यात जास्त रंग मिसळत गेले. कम्युनिस्ट या मूळच्या मुख्य डाव्या पार्टीमधून मार्क्सिस्ट बाहेर पडले, अतिरेकी डाव्यांची नक्षलवादी चळवळ सुरू होऊन ती फोफावत गेली. साम्यवादाचा सोज्ज्वळ लोकशाहीतला पर्याय म्हणून समाजवाद आला. त्याचे अनेक ब्रँड झाले. 'फ्री एंटरप्राईज'चा पुरस्कार करणारी उजव्या गटाची स्वतंत्र पार्टी निर्माण झाली आणि लयालाही गेली. सर्वसमावेशक काँग्रेस पक्षाने सगळ्याच विचारसरणींचा आधार घेऊन निरनिराळ्या काळात निरनिराळी धोरणे सांगितली. 'भारतीय' आणि 'जनता' या दोघांच्या नावाने उभा केलेला 'भाजप'ही आपला 'अजेंडा' बदलत राहिला. घर्म, भाषा, प्रांत वगैरेंचा स्वाभिमान सांगणारे इतर अनेक पक्ष अस्तित्वात आले, ते ढोबळपणे उजव्या बाजूचे किंवा प्रतिगामी समजले जातात. येनकेन प्रकारे जनतेमध्ये लोकप्रिय होऊन निवडणुकीमध्ये यश मिळवायचे आणि सत्ता काबीज करून ती टिकवून धरायची हा सर्वच राजकीय पक्षांचा म्हणण्यापेक्षा त्यातल्या नेत्यांचा मुख्य उद्देश दिसतो. त्यासाठी डाव्या किंवा उजव्या विचारांचा सोयिस्करपणे आधार घेतला जातो. असेच चित्र सध्या तरी दिसते. त्यांच्यात काय डावे उजवे करावे याच संभ्रमात सामान्य मतदार सापडलेला किंवा हरवलेला दिसतो.
अशा प्रकारे डावे आणि उजवे हा फरक आपल्याला पदोपदी दिसतो. इंग्रजी भाषेतल्या 'लेफ्ट' आणि 'राइट' या शब्दांना दुसरेही अर्थ आहेत. 'राइट' या शब्दाचा अर्थ 'बरोबर' असाही होतो, पण राजकारणातले 'राइट विंगर' नेहमी 'बरोबरच' असतात असे नाही. 'लेफ्ट'चा अर्थ 'गेलेले' असा होतो, पण डावे राजकारणी जायला तयार होणार नाहीत आणि जोपर्यंत समाजात असमानता आहे तोपर्यंत ते जाणार नाहीत. शरीरामधले हात, पाय आणि विज्ञान, गणित, वाणिज्य वगैरे विषयांमधील डावी बाजू (लेफ्ट हँड साईड) आणि उजवी बाजू (राईट हँड साइड) सारख्याच महत्वाच्या असतात आणि एकमेकांना पूरक असतात. त्यामुळे डावे किंवा उजवे असे म्हणण्याऐवजी डावे आणि उजवे असे म्हणायला हवे.
. . . . ..... . . . . . . . . . (समाप्त)