Saturday, July 14, 2012

चातुर्मास

चातुर्मास म्हणजे चार महिने. पण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ किंवा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशा कुठल्याही चार महन्यांच्या काळाला चातुर्मास असे म्हणत नाहीत. आषाढी शुध्द एकादशीपासून ते कार्तिकी शुध्द एकादशीपर्यंत महाराष्ट्रातला चातुर्मास असतो. त्यात आषाढातले वीस दिवस, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्यातले अकरा दिवस येतात. अशा प्रकारे तो पाच महिन्यांत पसरलेला असतो. उत्तर भारतातला चातुर्मास आषाढातील गुरु पौर्णिमेपासून कार्तिकातील त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत असतो. तिकडच्या पंचांगांतले महिने कृष्ण प्रतीपदेपासून सुरू होऊन पौर्णिमेपर्यंत असतात. त्यामुळे त्यांच्या चातुर्मासात आषाढ महिना येत नाही, श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या चारच महिन्यांचा त्यांचा चातुर्मास असतो.


माझ्या लहानपणी आमच्या घरात चातुर्मासाचे मोठे प्रस्थ होते. त्या काळात लग्नमुंजी वगैरेंचे मुहूर्त येत नसल्यामुळे हे समारंभ त्यापूर्वी उरकून घेतले जात किंवा लांबणीवर टाकले जात असत. याचा आम्हा मुलांना काही उपसर्ग नव्हता. आमच्या दृष्टीने महत्वाचा एवढाच भाग होता की चार महिने कांदा व लसूण हे पदार्थ घरात आणायलादेखील बंदी असे. एकादशीच्या दिवशी तोंडालासुध्दा त्यांचा वास येऊ नये किंवा त्याची ढेकरही येऊ नये अशा विचाराने ही बंदी एक दिवस आधीपासून अंमलात आणली जात असे. त्याच्याही आदल्या दिवशीची कांदेनवमी उत्साहाने साजरी केली जात असे आणि कांद्याची थालीपीठे, झुणका, भजी वगैरे करून घरातला कांद्याचा सगळा स्टॉक संपवला जात असे.

घरातली मोठी माणसे, विशेषतः स्त्रीवर्ग चातुर्मासासाठी एकादा 'नेम' धरत असे. चार महिने एकादा अन्नपदार्थ खायचा नाही, एका वेळीच जेवण करायचे, रोज एकादे स्तोत्र म्हणायचे, एकाद्या देवळात दर्शनाला जायचे, तिथे जाऊन दिव्यात चमचाभर तेल घालायचे, सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करायचे अशा असंख्य प्रकारचे नेमधर्म असत. चार महिने मौनव्रत धरणे हे सर्वात कठीण व्रत होते. पुरुषवर्गामध्ये एकच नेम काही लोकांना करतांना मी पाहिला. तो म्हणजे चार महिने दाढीमिशा वाढवणे. चातुर्मासात असले नेम करण्यामुळे त्यापासून मिळणारे पुण्य अनेक पटीने वाढते असे समजले जात असे. "असे का?" या प्रश्नाला "आपल्या आ़जोबा, पणजोबांपासून हे चालत आले आहे, ते लोक मूर्ख होते का?" अशा प्रतिप्रश्नातूनच उत्तर मिळत असे आणि चुकून कोणी "कदाचित असतील." असे प्रत्युत्तर दिले तर त्याची धडगत नसे. असा नेम पाळण्यापासून जेवढे पुण्य मिळेल त्यापेक्षाही जास्त पाप हा नेम मोडल्यामुळे मिळेल अशा भीतीमुळे हे नेम जरा घाबरत घाबरतच धरले जात आणि भक्तीभावापेक्षा भीतीपोटीच त्यांचे पालन होत असे. लहान मुलांना मात्र कांदालसूण न खाण्याव्यतिरिक्त कसले नेम करायला लावत नव्हते.

शिक्षणासाठी घर सोडून बाहेर पडल्यानंतर माझा चातुर्मासाशी दूरान्वयेही कसलाच संबंध राहिला नव्हता. या वर्षी एकादशीच्या दिवशी आलेल्या एका ढकलपत्राने चातुर्मास सुरू झाल्याची वर्दी दिली. आता निवांत वेळ मिळाल्यावर त्याबद्दल आंतर्जालावर थोडी विचारपूस केली. त्यातून असे समजले की आषाढ शुध्द एकादशीला ‘देवशयनी‘ असे नाव आहे. क्षीरसागरात शेषनागाने वेटोळे घालून बनवलेल्या शय्येवर त्या दिवशी श्रीविष्णूभगवान निद्रिस्त होतात आणि चार महिने झोपून झाल्यानंतर कार्तिक महिन्यातल्या प्रबोधिनी एकादशीला ते जागे होतात. माणसांचे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस असतो आणि चातुर्मास म्हणजे त्यांचे रात्रीतले आठ तास होतात. तेवढी निद्रा घेऊन ते भल्या पहाटे उठून कामाला लागतात. "देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते." अशी माहिती सनातन संस्था या स्थळावर दिली आहे. "मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. ‘जसजसे एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात जावे, तसतसे काळाचे परिमाण पालटते’, हे आता अंतरिक्षयात्री चंद्रावर जाऊन आले, तेव्हा त्यांना आलेल्या अनुभवावरून सिद्धही झाले आहे." असे सांगून त्यांनी आपल्या कथनाला आधुनिक विज्ञानाची कुबडी देण्याचा दुबळा प्रयत्नही केला आहे. आपल्या पृथ्वीतलाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरच सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते हे मी पन्नास वर्षांपूर्वी एका खेडेगावात शिकत असतांना भूगोलाच्या पुस्तकातून शिकलो होतो. पण उत्तर ध्रुवाजवळील आर्ट्रिक प्रदेशात एस्किमो नावाची माणसे आणि दक्षिण ध्रुवाजवळील अँटार्क्टिक प्रदेशात पेन्ग्विन नावाचे पक्षी राहतात असेही शिकलो होतो. तेंव्हा माणूस पृथ्वीच्या कक्षेबाहेरसुध्दा गेला नव्हता.

"चातुर्मासात सण आणि व्रते अधिक प्रमाणात असण्याचे कारण : श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या चार मासांत (चातुर्मासात) पृथ्वीवर येणार्‍या लहरींत तमोगुण अधिक असलेल्या यमलहरींचे प्रमाण अधिक असते. त्यांना तोंड देता यावे; म्हणून सात्त्विकता वाढवणे आवश्यक असते. सण आणि व्रते यांद्वारे सात्त्विकता वाढत असल्याने चातुर्मासात जास्तीतजास्त सण आणि व्रते आहेत. शिकागो मेडिकल स्कूलचे स्त्रीरोगतज्ञ प्रोफेसर डॉ. डब्ल्यु. एस्. कोगर यांनी केलेल्या संशोधनात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार मासांत विशेष करून भारतामध्ये, स्त्रियांना गर्भाशयासंबंधी रोग चालू होतात किंवा वाढतात, असे आढळले." असे चातुर्मासामधील व्रतांसाठी एक 'शास्त्रीय' वाटणारे कारणसुध्दा दिले आहे. असल्या मिथ्याविज्ञानापासून (सुडोसायन्सपासून) परमेश्वराने या देशाला वाचवावे अशी प्रार्थना नास्तिकांनासुध्दा करावी वाटेल.

वैद्य बालाजी तांबे आजकाल प्रसिध्दीच्या प्रखर झोतात दिसतात. चातुर्मासात पावसाळा असतो आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरातील अग्नी मंदावलेला असतो. चेतनाशक्‍ती, वीर्यशक्‍ती इतर ऋतूंच्या मानाने कमी झालेली असते. यावर उपाय म्हणून लंघन, मौन वगैरेंचे पालन करावे आणि तुळस, पिंपळ आदि वनस्पतींच्या औषधी उपयुकिततेचा लाभ घ्यावा यासाठी चातुर्मासात व्रतवैकल्ये सांगितली आहेत, असे ते म्हणतात. शिवाय सामाजिक आरोग्यासाठीही...
- आरोग्यरक्षणाबरोबर व्रतवैकल्यांच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ शकतात, त्यातून सामाजिक आरोग्य सुधारते.
- दैनंदिन व्यवहारापेक्षा काही तरी वेगळे करण्याची संधी मिळाल्याने मनाला विरंगुळा मिळतो.
- एकंदरच उत्सवाचे वातावरण अनुभवता येते.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे हलक्‍या फुलक्‍या तऱ्हेने मनावर निर्बंध घालण्याचा, शिस्त लागण्याचा सराव होऊ शकतो.
वगैरे लाभ त्यांनी सांगितले आहेत. अर्थातच हे सगळे लाभ वर्षाच्या बाराही महिन्यात आपण घेऊ शकत असल्यास त्यासाठी चातुर्मासच कशाला हवा?

प्रत्यक्षात चातुर्मासात इतके सण येतात आणि त्या निमित्याने गोडधोड खाणे चालले असते की लंघनाऐवजी अतिभोजनच होते. तसेच या काळात जास्तच जनसंपर्क होत असल्यामुळे मौनाच्या ऐवजी जास्तच बोलणे होते.



1 comment:

वैद्य प्र. प्र. व्याघ्रसुदन said...

आपण आपले बालपणीचे अनुभव दिलेत त्यांबद्दल अनेक धन्यवाद ॰!