Sunday, July 08, 2012

पावसाची गाणी - भाग ३

आधीचे भाग
पावसाची गाणी १
पावसाची गाणी २

'आषाढस्य प्रथमदिवसे' आभाळात 'मेघमाला' दिसायला लागतात आणि पाहता पाहता त्याला झाकोळून टाकतात, टप टप, रिमझिम करता करता मुसळधार पाऊस पडायला लागतो, नदी नाले पाण्याने दुथडी भरून वाहू लागतात. आषाढ संपून श्रावणमास सुरू होईपर्यंत त्याचा जोर जरा ओसरू लागलेला असतो, पण त्याने निसर्गात घडवलेली जादू बहराला आलेली असते. निसर्गकवी म्हणून प्रख्यात झालेले बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी या श्रावणमासाचा महिमा एका सुंदर कवितेत सांगितला आहे. याची परंपरागत चालीमध्ये ध्वनिफीतपण निघाली आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।।
    वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे ।
    मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे ।।
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा ! तो उघडे ।
तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ।।
    उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा ।
    सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा ।।
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।।
   फडफड करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती ।
   सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ।।
खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे ।
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे ।।
   सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला ।
   पारीजातही बघता भामारोष मनीचा मावळला ।।
एके काळी मराठी चित्रपटगीतांच्या क्षेत्रात स्व.ग.दि.माडगूळकरांचे एकछत्र साम्राज्य होते आणि त्याच काळात गीतरामायणाची रचना करून आधुनिक वाल्मिकी अशी ख्यातीही त्यांना प्राप्त झाली होती. अशा शब्दप्रभू गदिमांनी वरदक्षिणा या चित्रपटासाठी लिहिलेले हे पर्जन्यराजाचे गाणे इतके गाजले की पावसाळा म्हंटले की या गाण्याचेच शब्द चटकन ओठावर येतात. संगीतकार वसंत पवार यांनी वर्षाकालाला अनुरूप अशा मेघमल्हार रागात याची सुरावट बांधली होती आणि हिंदी चित्रपटसंगीतीत शास्त्रीय संगीतावर आधारलेली गीते गाण्यात हातखंडा असलेल्या मन्ना डे यांच्याकडून ते गाऊन घेतले होते.


घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा ।
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ.।।
   कालिंदीच्या तटी श्रीहरी ।
    तशात घुमवी धुंद बासरी ।
     एक अनामिक सुगंध येतो, ओल्या अंधारा ॥१॥
             कोसळती धारा ।।
वर्षाकालिन सायंकाली ।
  लुकलुक करिती दिवे गोकुळी ।
    उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा ॥२॥
          कोसळती धारा ।।
कृष्णविरहिणी कोणी गवळण ।
   तिला अडविते कवाड, अंगण ।
     अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा ॥३॥
        कोसळती धारा ।।
पुराणकालीन श्रीकृष्ण, राधा, गोपी, यमुनातट वगैरेंचा संबंध हिंदी किंवा मराठी गीतांमध्ये अनेक वेळा येत असतो, तसाच या गाण्यातसुध्दा गदिमांनी दाखवला आहे. पण आजच्या काळातल्या गोष्टीवर आधारित मुंबईचा जावई या सिनेमासाठी गदिमांनीच लिहिलेल्या एक गाण्यातसुध्दा पावसाचा उल्लेख येतो आणि स्व.सुधीर फडके यांनी मल्हार रागावर याची संगीतरचना करून वर्षाकालाचे वातावरण निर्माण केले आहे. यौवनात पदार्पण केलेल्या मुलीच्या मनात वयानुसार निसर्गाने निर्माण केलेल्या नाजुक भावना यात व्यक्त होतात. आशा भोसले यांनी त्या भावनांना छान उठाव दिला आहे.
आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे ।।
    जशी अचानक या धरणीवर ।
      गर्जत आली वळवाची सर, तसे तयाने गावे ।।
विचारल्याविण हेतू कळावा ।
     त्याचा माझा स्नेह जुळवा, हाती हात धरावे ।।
सोडुनिया घर, नाती-गोती ।
      निघून जावे तया संगती, कुठे तेही ना ठावे ।।

जेंव्हा स्व.ग.दि.माडगूळकरांचे नाव चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात गाजत होते त्याच काळात सुप्रसिध्द कवयित्री शांताबाई शेळके यांनी काही चित्रपटांसाठी उत्कृष्ट गीतरचना केली आहे. जैत रे जैत या आदीवासींच्या जीनवावरील एका वेगळ्या प्रकारच्या चित्रपटासाठी त्यांनी ग्रामीण भाषेत हे गीत लिहिले होते किंवा त्यांनी लिहिलेल्या या सुरेख कवितेचा उपयोग केला गेला होता. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या आगळ्या प्रकारच्या चालींमुळे या सिनेमातली सारीच गाणी तुफान गाजली होती. आशा भोसले यांच्याच स्वरातले हे गाणे सुध्दा सुगमसंगीताच्या कार्यक्रमांमध्ये आजही ऐकायला मिळते.
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं ।
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ।।
     अशा वलंस राती, गळा शपथा येती ।
       साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात ।।
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा ।
    तसा तुझा उबारा, सोडून रीतभात ।।
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू ।
    गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा ।।


पं. हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी लतादीदी यांनी एकत्र येऊन आणि स्व.हेमंतकुमारांनाही साथीला घेऊन तीन कोळीगीतांची एक अप्रतिम ध्वनिमुद्रिका काढली होती. त्या गीतांची रचनासुध्दा शांता शेळके यांनीच केली होती. श्रावण महिन्यात पावसाचा जोर ओसरू लागतो, खवळलेला समुद्र आपले रौद्ररूप सोडून शांत होऊ लागतो. नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करून कोळी बांधव मासेमारीचे काम पुनः सुरू करतात. पण कधी कधी निसर्ग अवचितपणे वेगळे रूप दाखवतो आणि त्याला न जुमानता निधड्या छातीचे वीर आपली नौका पाण्यात घेऊन जातात. अशा वेळी घरी राहिलेल्या त्याच्या सजणीचे मन कसे धास्तावते तसेच त्याच्यावर तिचा भरंवसाही असतो याचे सुंदर वर्णन शांताबाईंनी या कवितेत केले आहे.

वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो ।
भिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात,
सजनानं होडीला पान्यात लोटलंय् ।।
वादलवारं सुटलं गो !

     गडगड ढगांत बिजली करी ।
       फडफड शिडात धडधड उरी ।
         एकली मी आज घरी बाय ।
          संगतीला माझ्या कुनी नाय ।
           सळसळ माडांत, खोपीच्या कुडात,
           जागनाऱ्या डोल्यांत सपान मिटलं ।।
             वादलवारं सुटलं गो !

सरसर चालली होडीची नाळ ।
  दूरवर उठली फेसाची माळ ।
    कमरेत जरा वाकूनिया ।
      पान्यामंदी जालं फेकूनिया ।
       नाखवा माजा, दर्याचा राजा,
        लाखाचं धन त्यानं जाल्यात लुटलं ।।
            वादलवारं सुटलं गो !


शांताबाईंनी लिहिलेल्या कित्येक कवितांना बाबूजींनी म्हणजे स्व.सुधीर फडके यांनी चाली लावलेल्या आहेतच, पण त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी नव्या को-या पध्दतीच्या संगीतरचना करून गाणी बसवली, त्यांच्यासाठी देखील शांताबाईंनी गीते रचली. श्रावणाचा महिमा सांगणारे हे आणखी एक गाणे. यालाही आशाताईंनीच स्वर दिला आहे.


ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा ।
युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा ।। ऋतु हिरवा ।।

भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती ।
    नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा ।।
 मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण ।
      भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण ।।
         थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा ।।
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू ।
    गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा ।।
शांता शेळके यांनी पावसावर प्रेमगीते लिहिली, कोळीगीते लिहिली, तशीच बालगीतेही लिहिली. असेच एक गोड गाणे त्या काळातील बालगायिका सुषमा श्रेष्ट हिच्या आवाजात संगीतकार स्व.श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केले होते.

पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू ।
थेंब टपोरे गोरे गोरे, भर भर गारा वेचू ।।

गरगर गिरकी घेते झाड, धडधड वाजे दार कवाड ।
अंगणातही बघता बघता, पाणी लागे साचू ।।

अंगे झाली ओलीचिंब, झुलू लागला दारी लिंब ।
ओली नक्षी, पाऊसपक्षी, कुणी पाहतो वाचू ।।

ओसरुनी सर गेली रे, उन्हे ढगांतुन आली रे ।
इंद्रधनुष्यामध्ये झळकती, हिरे माणके पाचू !



. . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)


पुढील भाग
पावसाची गाणी - भाग ४

No comments: