Thursday, July 26, 2012

दारासिंग, मृणाल गोरे, राजेश खन्ना आणि अमावास्या



यांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे पहिल्या तीघांचा मृत्यू मागच्या महिन्यातल्या अमावास्येच्या सुमाराला झाला. अमावास्या म्हणजे अशुभ दिवस असे समीकरण ठरून गेले आहे. त्या दिवशी काही चांगले घडणारच नाही, व्हायचे ते वाईटच होईल अशी ठाम समजूत करून घेतल्यामुळे काही भोळसट लोक त्या दिवशी कोणतेही काम करायला कचरतात, अगदी दाढीसुध्दा करत नाहीत. असल्या आचरट समजुतींना माझ्या मनात थारा नसल्यामुळे मला तरी वर्षातले अमावास्येसकट सगळे दिवस सारखेच वाटतात आणि दर महिन्याला येणारी अमावास्या कधी येऊन गेली ते मला सहसा समजतसुध्दा नाही. पण या वेळेला येऊन गेलेली अमावास्या मात्र वेगळी होती. ती दिव्याची अंवस आहे तसेच पुढे श्रावण महिना येत असल्यामुळे तो दिवस गटारी अमावास्या म्हणून साजरा केला जात आहे वगैरेंच्या बातम्या आधीच येऊन पोचल्या होत्या. त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योग येणार असल्यामळे त्या दिवशी सोने खरेदी करण्याची हौस बाळगणा-यांना मात्र तो दिवस कदाचित तितकासा अशुभ वाटला नसावा. त्या दिवशीची वर्तमानपत्रे सराफांच्या मोठमोठ्या जाहिरातींनी भरली होती. त्या वाचून ग्राहकांनी त्यांच्या दुकानात गर्दी केली होती असेही ऐकण्यात आले. यामुळे हा गुरुपुष्यामृतयोग अमावास्येपेक्षा जास्त शक्तीशाली असावा असे वाटून गेले. पण काळापुढे या अमृताचेही काही चालले नाही आणि एकापाठोपाठ तीन महत्वाच्या व्यक्तींना काळाने ओढून गेले.
यातल्या दारासिंग यांचा जन्म पंजाबातल्या एका गरीब कुटुंबात झाला होता आणि लहान वयातच त्यांना पोटासाठी वणवण करीत परदेशी जावे लागले होते. तिकडेच त्यांना मल्ल व्हावेसे वाटले आणि त्यांनी त्या विद्येत प्राविण्य मिळवले. त्या क्षेत्रात त्यांनी इतकी प्रगती केली की विश्वविजेत्या किंगकाँगलाही चारी मुंड्या चीत केले. दारासिंग यांनी पाचशे मोठ्या कुस्त्या केल्या आणि त्यात एकदाही त्यांचा पराजय झाला नाही. ही फार पूर्वीची गोष्ट झाली. पण कुस्तीगीर म्हणून मिळालेला नावलौकिक आणि कमावलेली शरीरयष्टी यांचा उपयोग करून ते सिनेमातील अभिनयाच्या क्षेत्रात आले आणि अनेक देमार चित्रपटांचे नायक बनले. त्यांच्या शरीरसौष्ठवामुळे त्यांना रामायण या अतीशय गाजलेल्या मालिकेमध्ये महाबली हनुमानाची भूमिका मिळाली आणि त्यातून ते घराघरात पोचले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काही चांगल्या भूमिका वठवल्या. काही वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या जब वुई मेट या चित्रपटातली किंचित विनोदी झालर असलेली एका प्रेमळ सरदारजीची त्यांची भूमिका लक्षात राहण्यासारखी होती.

मी मुंबईला आलो त्या काळात मृणाल गोरे या नावाचा खूप मोठा दबदबा होता. गोरेगावच्या नागरिकांचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न धशाशी लावून त्यांनी यशस्वी रीत्या सोडवल्यानंतर तिथे त्या 'पाणीवाली बाई' झाल्या होत्या आणि त्यानंतर निदान मुंबईत तरी जिथे कुठे समाजावर अन्याय होत असतांना दिसेल तिथे त्याविरुध्द आवाज उठवण्यासाठी लोकांना संघटित करण्यासाठी त्यांना पाचारण केले जाऊ लागले किंवा त्या स्वतः तिथे पोचून जात होत्या. त्यांच्यात सारे नेतृत्वगुण होतेच, शिवाय स्वच्छ प्रतिमा, निर्भय आणि तेजस्वी व्यक्तीमत्व, कष्टाळू व अभ्यासू वृत्ती यामुळे सर्वांनाच, अगदी त्यांच्या विरोधकांनासुध्दा त्यांच्याविषयी आदरभाव वाटत होता. मी त्यांना टेलीव्हिजनवर पहात होतो आणि त्यांची वक्तव्ये व त्यांच्यावर आलेले लेख वर्तमानपत्रात वाचत होतो त्यावरून मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटत असे. त्यांनी चालवलेल्या कोठल्याही आंदोलनात सामील होणे मला शक्य नव्हतेच, त्यांच्या एकाद्या सभेला जाऊन त्यांचे ओजस्वी भाषण प्रत्यक्ष ऐकण्याची संधीसुध्दा मला कधी मिळाली नाही. फक्त एकदा विमानात त्यांच्याच रांगेत शेजारच्या सीटवर मला बसायला जागा मिळाल्यामुळे त्यांना जवळून पहायला मिळाले. प्रवासात त्या कसल्या तरी वाचनात मग्न होत्या आणि कोणाशी बोलायचा त्यांचा मूड दिसला नाही. उतरायच्या वेळी त्यांची बॅग डोक्यावरील रॅकवरून काढून देऊन मी थोडासा आदरभाव व्यक्त केला आणि त्यांनी त्याबद्दल माझे औपचारिक आभार मानले. त्यांच्याशी साधलेला एवढासाच संपर्क मात्र आयुष्यभर लक्षात राहिला. पुढे आणीबाणीनंतर जनता पक्षाची स्थापना झाली तेंव्हा त्यांचा प्रजासमाजवादी पक्ष त्यात विलीन झाला. काही काळानंतर या दोन्ही पक्षांचे मुंबईतून पार उच्चाटन झाले आणि मृणालताईंना राजकीय मंच असा उरला नाही. कदाचित वयोमानानुसार त्यांच्या व्यक्तीमत्वामधली धग थंड होऊन गेली असावी. गेल्या दहा पंधरा वर्षात तरी मी त्यांचे नाव वाचले किंवा ऐकले नव्हते.
राजेश खन्ना तसा संपन्न घरामधून आला होता. मुंबईतच त्याचे शिक्षण झाले. सिनेमासृष्टीमधील सर्वांनी मिळून घेतलेल्या एका टॅलंट सर्चमध्ये तो सर्वप्रथम आला. त्याला कदाचित सर्व निर्मात्यांनी मिळून वर्षभरासाठी करारबध्द केले गेले असावे. कारण पहिले वर्षभर तरी तो असंख्य चित्रपटांमध्ये लहानसहान भूमिकांमध्ये दिसायचा आणि त्याच्या सहज सुंदर अभिनयामुळे लक्षात रहायचा. त्यानंतर त्याच्या एकापाठोपाठ एकाहून एक यशस्वी सिनेमांची लाट आली आणि लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होऊन तो महानायक बनला. चार पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर ती लाट ओसरत चालली. राजेश खन्ना याने तो स्वतःच नायक असलेल्या अवतार सारख्या चित्रपटात वृध्द गृहस्थाच्या भूमिका केल्या होत्या, पण इतर कोणा नायकाच्या सहाय्यक भूमिकेत मी तरी त्याला कधी पाहिले नाही. त्यामुळे अनेक वर्षे तो नजरेआडच झाला होता. त्याला जीवनगौरव पुरस्कार प्रदान केले तेंव्हा कित्येक वर्षांनंतर तो छोट्या पडद्यावर दिसला होता तेंव्हा किती वेगळा वाटला होता.

या तीन्ही व्यक्ती त्यांच्या मरणापूर्वीच प्रसिध्दीपासून दूर गेल्या होत्या. त्यांची आठवणसुध्दा येत नव्हती आणि त्याशिवाय रोजचे सगळे व्यवहार सुरळीतपमे चालले होते. त्यांच्या जीवंत असण्याने जसा काहीच फरक पडत नव्हता, तसा त्यांच्या जाण्यानेही पडला नाही. तरीही काही काळ तरी मन विषण्ण झालेच. त्यांना भावपूर्ण आदरांजली.

No comments: