Sunday, July 22, 2012

नागपंचमी गाणी


खानदेशातल्या शंभर वर्षांपूर्वीच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी तिकडच्या अहिराणी बोलीत अप्रतिम काव्यरचना केली आहे. "माझी माय सरसोती, माले शिकयते बोली।" असे त्यांनीच स्वतःबद्दल लिहिले आहे. त्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त होता. शालेय शिक्षण घेतले नसले तरी त्यांना सणवार आणि देवदेवतांची खूप माहिती होती. त्यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या एका नाजुक प्रसंगाचे सुरेख चित्रण त्यांनी खाली दिलेल्या ओव्यांमध्ये केले आहे. बहिणाबाई शेतात काम करायला जात असत. तान्ह्या सोपानदेवांना आंब्याच्या झाडाखाली एका टोपलीत निजवून त्या उसाच्या मळ्यात कामाला लागल्या असतांना एक नाग त्या मुलाच्या जवळ आला. ते पाहून लोकांनी ओरडा केला. बहिणाबाई येऊन पाहते तर लहानगा सोपान टोपलीच्या बाहेर येऊन त्या नागाबरोबर खेळत होता. तिने नागोबाला दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि शंकराची शपथ घालून सोपानदेवाला दंश न करण्याची विनंती केली शिवाय कृष्णाचा धांवा करून सांगितले की आपली बांसुरी वाजवून नागोबाची समजूत घाल. तेवढ्यात गुराख्यांनी वाजवलेले पाव्याचे सूर ऐकून नाग तिकडे निघून गेला. बहिणाबाईने नागोबाचे आभार मानून त्याला नागपंचमीच्या दिवशी दुधाची वाटी देईन असे आश्वासन दिले. ते तिने नक्कीच पाळले असणार.


उचलला हारा, हारखलं मन भारी ।
निजला हार्‍यात, तान्हा माझा शिरीहारी ।।

डोईवर हारा, वाट मयाची धरली ।
भंवयाचा मया, आंब्याखाले उतरली ।।

उतारला हारा, हालकलं माझं मन ।
निजला हार्‍यात, माझा तानका 'सोपान' ।।

लागली कामाले, उसामधी धरे बारे ।
उसाच्या पानाचे, हातीपायी लागे चरे ।।

ऐकूं ये आरायी, धांवा धांवा घात झाला ।
अरे, धांवा लव्हकरी, आंब्याखाले नाग आला ।।

तठे धांवत धांवत, आली उभी धांववर ।
काय घडे आवगत, कायजांत चरचर ।।

फना उभारत नाग, व्हता त्याच्यामधीं दंग ।
हारा उपडा पाडूनी, तान्हं खेये नागासंगं ।।

हात जोडते नागोबा, माझं वांचव रे तान्हं ।
अरे, नको देऊं डंख, तुले शंकराची आन ।।

आतां वाजव वाजव, बालकिस्ना तुझा पोवा ।
सांग सांग नागोबाले, माझा आयकरे धांवा ।।

तेवढ्यांत नाल्याकडे, ढोरक्याचा पोवा वाजे ।
त्याच्या सूराच्या रोखानं, नाग गेला वजेवजे ।।

तव्हां आली आंब्याखाले, उचललं तानक्याले ।
फुकीसनी दोन्हीं कान, मुके कितीक घेतले ।।

देव माझा रे नागोबा, नही तान्ह्याले चावला ।
सोता व्हयीसनी तान्हा, माझ्या तान्ह्याशीं खेयला ।।

कधीं भेटशीन तव्हां, व्हतील रे भेटी गांठी ।
येत्या नागपंचमीले, आणीन दुधाची वाटी ।।


ग्रामीण भागातल्या बायका नागपंचमीचा सण वटपौर्णिमेप्रमाणे सार्वजनिक रीत्या साजरा करतात. कोणत्याही मुलीला एकटीने रानात जाऊन नागोबाच्या वारुळापाशी जायला भीती वाटणारच. त्यामुळे सगळ्या सख्या मिळून नागोबाची पूजा करायला जात असतील. कवीवर्य स्व.ग.दि,माडगूळकरांनी या प्रसंगावर एक छान चित्रपटगीत लिहिले आहे. त्यात शेषशायी विष्णूभगवानाच्या शेषाचा उल्लेख आहे. त्याचेच पृथ्वीवरील रूप असलेल्या नागोबाची पूजा करून या मुली त्याच्याकडे मागण्या करतात. कुमारिकांना चांगला नवरा मिळावा, त्यांनी राजाची राणी बनावे आणि सौभाग्यवतींच्या कुंकवाच्या धन्यांना दीर्घायुष्य मिळावे अशा प्रार्थना त्या करतात.


चल ग सखे वारुळाला, वारुळाला, वारुळाला ग ।
नागोबाला पूजायाला, पूजायाला, पूजायाला ग ।।

नागोबाचे अंथरूण निजले वरी नारायण ।
साती फडा ऊभारून धरती धरा सावरून ।

दूध लाह्या वाहू त्याला, वाहू त्याला, नागोबाला ।।
बारा घरच्या बाराजणी, बाराजणी, बाराजणी ।

रूपवंती कुवारिणी, कुवारिणी, कुवारिणी ।
नागोबाची पुजू फणी, कुंकवाचा मागू धनी ।

राजपद मागू त्याला, मागू त्याला, नागोबाला ।।
बाळपण त्याला वाहू, त्याला वाहू, त्याला वाहू ग ।

नागिणीचा रंग घेऊ. रंग घेऊ, रंग घेऊ ग ।
नागोबाला फुलं वाहू, लालमणी माथी लेवू ग ।
औक्ष मागू कुंकवाला, कुंकवाला, बाई कुंकवाला ।।स्व. ग. दि. माडगूळकर यांनीच लिहिलेले दुसरे एक सुंदर गीत स्व.गजानन वाटवे यांनी अजरामर केले आहे. एका मुलाखतीमध्ये वाटवे यांनी सांगितले होते की त्यांच्या काळात चांगल्या स्त्रीगायिका होत्या तरीसुध्दा त्यांनीच स्त्रियांची गाणी म्हणावीत आणि पुरुष गायकांनी फक्त पुरुषांचीच गाणी म्हणावी असा लोकांचा आग्रह नव्हता. कवितेमधल्या भावना लोकांपर्यंत पोचवणे एवढे काम स्व. गजानन वाटवे करत होते. मग त्या भावना स्त्रीमनातील असतील तर त्यानुसार त्या कवितेला चाल लावून आणि आवाजात मार्दव आणून ती कविता पुरुषाने सादर केली तरी श्रोते त्या गाण्याला डोक्यावर घेत असत. नागपंचमीच्या सणानिमित्याने जमलेल्या सगळ्या मुली झाडांच्या फांद्यांना झोपाळे बांधून खेळत आहेत, श्रावणमासातल्या आनंदी वातावरणाने सगळे जग उल्हसित झाले आहे, पशूपक्षी, वनस्पती, नदीनाले सगळे सगळे आनंदात आहेत, नायिका तिच्या पतीची आतुरतेने वाट पाहते आहे, पण तो घरी आला नाही म्हणून तिला प्रियाविना उदासवाणे वाटते आहे, तिच्या मनात कुशंकेची पाल चुकचुकते आहे. अशा अर्थाचे हे एक सुंदर विरहगीत आहे.


फांद्यांवरी बांधिले ग मुलिंनि हिंदोळे ।
पंचमिचा सण आला डोळे माझे ओले ।।

श्रावणाच्या शिरव्यांनी, आनंदली धराराणी ।
माझे पण प्राणनाथ घरी नाही आले ।।

जळ भरे पानोपानी, संतोषली वनराणी ।
खळाखळा वाहतात धुंद नदीनाले ।।

पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात ।
भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले ।।

आरशात माझी मला, पाहू बाई किती वेळा ।
वळ्‌चणीची पाल काही भलेबुरे बोले ।।

No comments: