Saturday, July 07, 2012

पावसाची गाणी - भाग २

पूर्वीचा भाग
पावसाची गाणी - भाग १

निसर्गामधील बदलांचे परिणाम माणसांच्या मनावरसुध्दा होत असतात. पर्जन्य आणि प्रणयभावना यात तर एक जवळचा संबंध आहे. रिमझिम पाऊस पडू लागल्यावर कृष्णाला भेटण्याची अतीव ओढ राधेला लागली आणि ओली चिंब होऊनसुध्दा ती यमुनेच्या किनारी जाऊन त्याला शोधत राहिली हे वर दिलेल्या गाण्यात आपण पाहिलेच. आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघांनी आकाश झाकून टाकलेले पाहता मेघदूतामधील यक्षाला त्याच्या प्रियतमेची अत्यंत तीव्रतेने आठवण येते. विरहाचा आवेग असह्य होतो. अशा वेळी प्रियकराशी मीलन झाले तर होणारा आनंदसुध्दा अपूर्व असतो. या भावना व्यक्त करणारे पूर्वीच्या काळातले एक लोकप्रिय गाणे होते.
झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम ।
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात ।।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

प्रासादी या जिवलग येता, कमळमिठीमधि भृंग भेटता ।
बरस असा की प्रिया न जाइल माघारी दारात ।।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

मेघा असशी तू आकाशी, वर्षातुन तू कधी वर्षसी ।
वर्षामागुन वर्षति नयने, करिती नित बरसात ।।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

अत्यंत भावपूर्ण असे हे गाणे रचतांना कवी मधुकर जोशी यांनी 'रिमझिम' या नेहमीच्या विशेषणाऐवजी 'झिमझिम' हा वेगळा शब्द योजून कदाचित 'झिमझिम झरती' असा अनुप्रास साधला असावा. पण अनेक लोक हे गाणे 'रिमझिम झरती ....' आहे असेच समजतात. एकदा टेलीव्हिजनवरील गाण्यांच्या भेंड्यांच्या एका प्रसिध्द कार्यक्रमात यावर वाद झाला होता, तसेच एका प्रमुख दैनिकाच्या वाचकांच्या पत्रव्यवहारावरसुध्दा यावर चर्चा झाली होती असे मला आठवते. भावपूर्ण शब्दरचना, स्व.दशरथ पूजारी यांनी दिलेली अत्यंत सुरेल जाल आणि सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज यांचा सुरेख त्रिवेणी संगम या गाण्यात झाला आहे. हे गाणे अनेकांच्या आवडत्या 'टॉप टेन' मध्ये असेल.

पर्जन्य आणि विरहामधून येणारी व्याकुळता यांचा संबंध प्राचीन कालापासून आहे. शंभराहून जास्त वर्षांपूर्वी नाट्याचार्य कै.अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेल्या संगीत सौभद्र या नाटकामधील प्रसिध्द पदात देखील त्यांनी याचा उल्लेख केला आहे.

नभ मेघांनीं आक्रमिलें ।
तारांगण सर्वहि झांकुनि गेले ॥

कड कड कड कड शब्द करोनी ।
लखलखतां सौदामिनी ।
जातातचि हे नेत्र दिपोनी ।
अति विरही जन ते व्याकुळ झाले ॥
प्रजन्यराजा जसा विरहाची व्यथा वाढवतो तसाच मीलनाची गोडीसुद्धा जास्त मधुर करतो. दुसरे आद्य नाट्याचार्य कै.गोविंद बल्लाळ देवल यांनी 'संगीत मृच्छकटिक' या शंभरी ओलांडलेल्या अजरामर नाटकामधील एका पदात ही गोष्ट काहीशा सोप्या भाषेत थेट सांगितली आहे.

तेचि पुरुष दैवाचे । धन्य धन्य जगिं साचे ॥
अंगें भिजली जलधारांनीं । ऐशा ललना स्वयें येउनी ।
देती आलिंगन ज्यां धांवुनि । थोर भाग्य त्यांचें ॥

नवकवितेच्या आधुनिक काळामधील कवी ग्रेस यांचे काव्य जरासे दुर्बोध किंवा अस्पष्ट असते. वाचकाने किंवा श्रोत्याने त्यातून आपापल्या परीने अर्थ काढून घ्यायचा असतो. त्यांनी लिहिलेल्या एका प्रसिध्द कवितेच्या ओळी अशा आहेत.

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने ।
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुराने ।।

डोळ्यांत उतरते पाणी, पाण्यावर डोळे फिरती ।
दु:खाचा उडला पारा, या नितळ उतरणीवरती ।।
       पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला ?
       ताऱ्यांच्या प्रहरापाशी, पाऊस असा कोसळला ।।

संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा ।
माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा ।।

कवी ग्रेस यांच्या पुढे दिलेल्या कवितेत त्यांनी आपल्या वेदना जास्त स्पष्ट केल्या आहेत. कदाचित या दुःखदायी आठवणींमुळेच त्यांना पाऊस कष्टदायी वाटत असावा.


ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ।
मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता ।।

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो ।
त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता ।।

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे ।
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता ।।

. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पुढील भाग

No comments: