Wednesday, June 06, 2012

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (भाग ३)

माझे शालेय शिक्षण संपेपर्यंत म्हणजे ज्या कालावधीत मी मराठी भाषा शिकून आत्मसात केली त्या काळात 'पर्यावरण' हा शब्द अजून प्रचलित झाला नव्हता. त्याचा उद्भव किंवा उद्गम नक्की कधी झाला हे मला माहीत नाही, पण त्याचा प्रसार मात्र नक्कीच अलीकडच्या काळात झाला आहे. मला कळायला लागल्यापासून निसर्ग, सृष्टी वगैरे शब्द ओळखीचे झाले होते. ग्रामीण भागात रहात असल्यामुळे घराबाहेर पडून कोणत्याही दिशेने दहा पंधरा मिनिटे चालत गेल्यावर पुढे नजर पोचेपर्यंत निसर्गाचेच साम्राज्य असे. किंबहुना चहूकडे वाढलेल्या वनस्पतींनी झाकलेल्या नैसर्गिक भूमीवर अधूनमधून तुरळक अशी मानवनिर्मित वस्ती दिसत असे. निसर्गाकडून मिळत असलेल्या ऊन, पाऊस, थंडी, वारा वगैरे गोष्टी जशा प्रकारे मिळतील त्यांच्याशी सलोखा करून त्यानुसार आपली राहणी ठेवली जात असे. अचानक उद्बवणा-या नैसर्गिक आपत्तींपासून आपला बचाव करणे हे सर्वात मोठे दिव्य असायचे. आपल्यासारख्या यःकश्चित प्राण्याकडून एवढ्या भव्य आणि बलवान निसर्गाला कसलाही धोका पोचू शकतो असे तिथे कोणी सुचवले असते तर इतरांनी त्याला नक्कीच वेड्यात काढले असते. त्या काळात परदेशातलीच काय पण भारतातील शहरांमधील परिस्थिती कशी आहे याची मला सुतराम कल्पना नव्हती. मानव प्राणी हा 'अनंत हस्ते' आपल्याला जीवनावश्यक गोष्टी पुरवणा-या 'विपुला च पृथ्वी' वर सर्वस्वी अवलंबून असलेला एक क्षुद्र जीव आहे अशी माझी पक्की धारणा झाली होती.

इंग्रजी भाषेतला 'एन्व्हायरनमेंट' हा शब्द त्या काळात निराळ्या अर्थाने ओळखीचा झाला होता. 'घर, शाळा वगैरे ज्या ठिकाणी आपण काही वेळ घालवत असू त्याच्या सभोवतालचे वातावरण' हा त्याचा अर्थ आजसुध्दा प्रचलित आहे. आजूबाजूची माणसे, त्यांचे आचार, विचार वगैरेंचा देखील यात समावेश होतो. 'एन्व्हायरनमेंट' या शब्दाचा 'आसपासची जमीन, हवा, पाणी' असा दुसरा संकुचित अर्थ आणि या अर्थाने 'पर्यावरण' हा या शब्दाचा नवा प्रतिशब्द आजकाल रूढ झाला आहे. निदान एकदा तरी हा शब्द वाचनात आला नाही किंवा कानावर पडला नाही असा एकही दिवस जात नाही इतका तो वापरून गुळगुळीत झाला आहे. पण त्या बरोबरच काही विपर्यस्त कल्पना किंवा माहिती पसरवली जात आहे.

'मानवाने निसर्गावर विजय मिळवला आहे' अशा प्रकारच्या वल्गना जितक्या पोकळ आहेत तितकीच माणसाने केलेली 'पर्यावरणाची चिंता' निरर्थक आहे. आजच्या जगामधील सात अब्ज माणसे आणि दोन तीनशे देश या सर्वांनी त्यांची सारी ताकत एकवटली तरीही निसर्गाची रूपे असलेल्या पंचमहाभूतांच्या सामर्थ्याच्या पुढे ती नगण्य ठरेल. सागराच्या लाटा किंवा सूर्यप्रकाश यातून क्षणाक्षणाला प्रकट होत असलेली किंवा धरणीकंपामध्ये काही सेकंदात बाहेर टाकलेली प्रचंड ऊर्जा पाहता हे लक्षात येईल. तेंव्हा आपल्यापेक्षा अनंतपटीने सामर्थ्यवान असलेल्या निसर्गाची आपण काळजी करतो असे म्हणणे हास्यास्पद आहे. पर्यावरणप्रेमी खरे तर त्यांच्या स्वतःच्या किंवा फार तर त्यांच्या वंशजांच्या चिंतेने व्याकूळ झाले आहेत असे म्हणता येईल.
बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यात सारखे बदल होत असतात. सकाळ, दुपार, संध्याळ, रात्र असे रोज होणारे बदल, उन्हाळा, पावसाळा, हिंवाळा असे ऋतूंमधले बदल आणि भूपृष्ठात हळू हळू होत असलेले दीर्घकालीन बदल हे सारे निसर्गच घडवून आणतो. एका काळी ज्या ठिकाणी समुद्र होता तिथे हिमालयाची शिखरे झाली आहेत आणि एका काळी गर्द वनराई असलेला भूभाग आज वाळवंट झालेला किंवा समुद्राच्या तळाशी गेला आहे. डायनोसॉरसासारखे महाकाय प्राणी निर्माण झाले तसेच नामशेष होऊन गेले. इतर किती प्रकारचे जीव पृथ्वीवर राहून नष्ट झाले याची गणतीच करता येणार नाही. या सगळ्यांच्या तुलनेत पाहता मानवाच्या मूर्खपणामुळे किंवा हावरटपणामुळे आज पर्यावरणात पडत असलेला बदल अगदी मामूली म्हणता येईल.

निसर्ग हा नेहमी रम्यच असतो असे नाही. तो विध्वंसक रूपसुध्दा धारण करतो. दुसरी गोष्ट म्हणजे तो न्याय अन्यायाचा विचार करत नाही. एकाने त्याच्यावर आक्रमण केले तर तो त्याची शिक्षा त्यालाच करेल असे नाही. अगदी साधी गोष्ट पहायची झाली तर एका ठिकाणी समुद्रात भर टाकली तर दुसरीकडे कोठे तरी त्याचा परिणाम दिसेल. नदीच्या वाहत्या पात्रात घाण मिसळणारा वेगळाच असतो पण त्याचे वाईट परिणाम खालच्या अंगाला राहणा-या लोकांना भोगावे लागतात. हवेचे प्रदूषण करणारे एक असतात आणि त्याचा त्रास इतरांनाही झाल्याशिवाय रहात नाही. 'कराल तसे भराल' हा न्याय निसर्गाच्या बाबतीत नीटसा लागू होत नाही. यामुळे पर्यावरणाची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी ठरते.
यंत्रयुगाच्या आधी माणसाची विध्वंस करण्याची क्षमता अगदी कमी होती. त्याने दोन हाताने केलेल्या लहान सहान नुकसानाची भरपाई निसर्ग आपल्या अनंत हस्तांनी सहजपणे करत होता. त्यामुळे निसर्गात होणारे बदल हे त्याच्याच नियमानुसार घडत असत आणि त्यात एक नियमितता होती. मानवांची उत्पत्ती आणि विनाश यातसुध्दा नैसर्गिक समतोल पाळला जात असल्यामुळे जगाची लोकसंख्यासुध्दा जवळजवळ स्थिर होती. गेल्या शतकात यात मोठा फरक पडला. लोकसंख्या वाढतच गेली, तसेच प्रत्येक माणसाच्या गरजा वाढत गेल्या. यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्या भागवल्या जाऊ लागल्या, तसेच निरनिराळ्या प्रकारच्या नवनव्या वस्तूंचे उत्पादन होऊ लागले आणि त्यांचा उपभोग घेण्याचा हव्यास वाढत गेला. यासाठी लागणारा कच्चा माल जमीन, पाणी आणि हवा यातून काढून घेतला जाऊ लागल्यामुळे त्यांचे साठे कमी होत चालले आणि यांत्रिक क्रियांमधून निर्माण होणारा कचरा निसर्गाच्या स्वाधीन केला जात असल्यामुळे त्यांचा उपसर्ग होणे सुरू झाले. यातून होणा-या समस्यांवर निसर्ग आपल्या परीने मार्ग काढत असतो, पण तो माणसांच्या फायद्याचा नसल्यामुळे किंवा आपल्याला त्रासदायक वा धोकादायक असल्यामुळे आपण हैराण होतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास मिठी नदीच्या किनारी राहणा-या लोकांनी तिच्या पात्रात टाकलेल्या कच-यामुळे ते अरुंद झाले म्हणून पावसाचे पाणी मुंबईच्या अन्य भागात पसरले आणि यापूर्वी कधीही जिथे पाणी तुंबत नव्हते तेथील लोकांना जलप्रलयाचा अनुभव घ्यावा लागला.



. . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)



No comments: