Thursday, June 28, 2012

पावसाची गाणी - भाग १


ये रे ये रे पावसा,
तुला देतो पैसा ।
पैसा झाला खोटा,
पाऊस आला मोठा ।।

ये गं ये गं सरी,
माझं मडकं भरी ।
सर आली धाऊन,
मडकं गेलं वाहून ।।

पाऊस पडतो रिम झिम,
अंगण झालं ओलं चिंब ।
पाऊस पडतो मुसळधार,
रान झालं हिरवंगार ।।

हे गाणे कोणी आणि कधी लिहिले हे मला ठाऊक नाही, पण मला बोबडे बोलता येऊ लागल्यानंतर आणि लिहिण्यावाचण्याच्या किंवा अर्थ समजू लागण्याच्या आधी या मधल्या शैशवकाळात केंव्हा तरी ऐकून ऐकून ते पाठ झाले आणि आजतागायत ते स्मरणात राहिलेले आहे. लहानपणी शिकलेल्या बडबडगीतांचा उगम कधीच माहीत नसतो आणि तो शोधावा अशी कल्पनाही सहसा कधी मनात येत नाही. 'येरे येरे पावसा' या गाण्याच्या मुळाचा गूगलवर शोध घेण्यचा प्रयत्न इतक्या वर्षांनंतर मी आता करून पाहिला. त्यात हे गाणे मला चक्क विकीपीडियावर सापडले, पण त्याच्याबद्दल कुठलीच माहिती मात्र मिळाली नाही. पण गंमत म्हणजे हेच्या हेच गाणे गेली निदान साठ वर्षे तरी असंख्य मराठी घरांमध्ये लहान मुलांना जसेच्या तसे शिकवले जात आहे. 'पैसा' हे नाणे तर कधीच चलनामधून हद्दपार झालेले आहे, माझ्या लहानपणीसुध्दा त्याला काहीच विनिमयमूल्य नव्हते. त्यामुळे हे गाणे रचले जाण्याचा काळ खूप पूर्वीचा असला पाहिजे. कदाचित माझ्या आजोबा आजींच्या काळात सुध्दा पावसाचे हे गाणे लहानग्यांना असेच शिकवले गेले असेल.
या गाण्याच्या पहिल्या दोन ओळींचा सुसंगत अर्थ लावणे कठीण आहे. "पावसाला पैसा कसा देणार?", "खोट्या पैशाला दुकानदार सुध्दा काही सामान देत नाही, मग तो घेऊन मोठ्ठा पाऊस कसा येईल?" असले प्रश्न बालगीतांबद्दल विचारायचे नसतात. तरीही असले निरर्थक वाटणारे गाणे अजरामर कसे काय झाले असेल? काव्य, संगीत वगैरेंचा विचार केला तर काही क्ल्यू सापडतील. या गाण्यात एकसुध्दा जोडाक्षर नाही किंवा बोजड शब्द नाही. लहान मुलांना ऐकून लगेच उच्चारता येतील असे मुख्यतः दोन तीन अक्षरांचे आणि सोपे असे शब्द आणि प्रत्येकी फक्त तीनच शब्द असलेली सोपी वाक्ये त्यात आहेत. हे गाणे 'एक दोन तीन चार' अशा चार चार मात्रांच्या ठेक्याच्या चार चार ओळींच्या कडव्यांमध्ये असल्यामुळे त्याला एक सिमेट्री आहे आणि कोणालाही ते ठेक्यावर म्हणतांना मजा येते. गाण्याच्या प्रत्येक दोन ओळींमध्ये यमक साधले आहे. किंबहुना या शब्दांची निवड बहुधा यमक साधण्यासाठीच केली आहे. कडव्यांच्या शेवटच्या ओळीत अनपेक्षित कलाटणी देणारे असे काही सांगून धक्का दिला जातो, त्यामुळे ते मनोरंजक वाटते.

लहानपणी अनेक वेळा ऐकून तोंडपाठ झालेले आणखी एक गाणे आहे,
नाच रे मोरा, अंब्याच्या बनात,
नाच रे मोरा नाच ।।

ढगांशि वारा झुंजला रे,
काळा काळा कापूस पिंजला रे,
आता तुझी पाळी, वीज देते टाळी,
फुलव पिसारा नाच ।।

झरझर धार झरली रे,
झाडांचि भिजली इरली रे,
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ,
करुन पुकारा नाच ।।

थेंबथेंब तळ्यात नाचती रे,
टपटप पानांत वाजती रे.
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत,
निळ्या सौंगड्या नाच ।।
पावसाचि रिमझिम थांबली रे,
तुझि माझि जोडी जमली रे,
आभाळात छान छान, सात रंगी कमान,
कमानीखाली त्या नाच ।।

या गाण्यातला मुखडा सोडला तर संपूर्ण गाणे पावसावरच आहे. आमच्या गावाला लागूनच आंबराई होती आणि त्यातल्या 'आम्रतरूंवर वसंतवैभवाचे कूजन' करणारे कोकीळ पक्षी आपले मधुर संगीत ऐकवायचे, पण मोर हा पक्षी मात्र त्या काळात फक्त चित्रातच पाहिला होता आणि आभाळात ढग आले की खूष होऊन तो आपला पिसारा फुलवून नाचतो असे ऐकले होते. त्याचे प्रत्यक्ष दर्शन मोठेपणीच झाले. ढग, वारा, पाऊस, तळे, झाडे वगैरे ओळखीचे असल्यामुळे त्यांचे संदर्भ समजत आणि आवडत होते. त्यामुळे मला तरी हे गाणे मोराबद्दल वाटायच्या ऐवजी पावसाचेच वाटायचे. अत्यंत लोकप्रिय गायिका आशा भोसले यांनी गायिलेले हे मजेदार गाणे महाकवी स्व.ग.दि.माडगूळकर यांनी देवबाप्पा या चित्रपटासाठी लिहिले आणि चतुरस्र प्रतिभेचे धनी असलेले स्व.पु. ल. देशपांडे यांनी याला चाल लावली वगैरे तपशील नंतर समजत गेले. माझ्या लहानपणीचे हे गाणे रेडिओ, टेलिव्हिजन, मुलांचे कार्यक्रम वगैरेंवर आजतागायत अधूनमधून ऐकायला येत राहिले आहे.
संथ लयीवर बराच काळ पडत राहणा-या पावसाला 'रिमझिम' असे विशेषण बहुधा 'येरे येरे पावसा' या गाण्यामधून पहिल्यांदा मिळाले असावे. कदाचित 'चिंब' या शब्दाशी यमक जुळवण्याच्या दृष्टीने 'रिमझिम' हा शब्द आणला गेला आणि तो कायमचा त्याला चिकटून राहिला. त्यावरूनच लिहिलेले माझ्या लहानपणच्या काळात गाजलेले एक गाणे खाली दिले आहे.

रिमझिम पाऊस पडे सारखा,
यमुनेलाही पूर चढे,
पाणीच पाणी चहूकडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।

तरुवर भिजले भिजल्या वेली,
ओली चिंब राधा झाली,
चमकुन लवता वरती बिजली,
दचकुन माझा ऊर उडे ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।


हाक धावली कृष्णा म्हणुनी,
रोखुनी धरली दाही दिशानी,
खुणाविता तुज कर उंचावुनी,
गुंजत मंजुळ मुग्ध चुडे ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।

जलाशयाच्या लक्ष दर्पणी,
तुझेच हसरे बिंब बघुनी,
हसता राधा हिरव्या रानी,
पावसातही ऊन पडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।


पहिल्या कडव्यात दिल्याप्रमाणे यमुनेला पूर येऊन सगळीकडे पाणीच पाणी झाले असतांना कृष्ण कुठेच दिसत नाही म्हणून यशोदेलाच त्याची काळजी वाटत असेल, कारण वेळी अवेळी यमुनेच्या काठी जायची खोड त्याला होती. यामुळे 'गेला मोहन कुणीकडे?' हा प्रश्न नक्की यशोदामैयालाच पडला असणार अशी माझी लहानपणी खात्री झाली होती. पुढल्या कडव्यांचा अर्थ समजायला मध्यंतरी बरीच वर्षे जावी लागली. गीतकार स्व.पी. सावळाराम, संगीतकार स्व.वसंत प्रभू आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या त्रयींनी मराठी रसिकांना दिलेली अनेक अप्रतिम गाणी अजरामर झाली आहेत. पी.सावळाराम यांनी वसंत प्रभू यांच्याच या गाण्यासाठी मात्र आशा भोसले यांची निवड केली होती हे विशेष.


. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पुढील भाग
पावसाची गाणी - भाग २

No comments: