आदिमानवापासून आतापर्यंत माणसाचा कसा विकास होत गेला हे सांगणारे पाश्चात्य विद्वानांनी तयार केलेले मानववंशशास्त्र साफ खोटे आणि दिशाभूल करणारे आहे असे आपल्याकडले कांही लोक नेहमी सांगत असतात. ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली तेंव्हाच अचाट सामर्थ्य, बुध्दीमत्ता आणि नीतीमत्ता यांनी युक्त असे महर्षी निर्माण केले आणि आपल्या चार मुखाद्वारे त्यांना चार वेद सांगितले. त्यात जगातील यच्चयावत सर्व ज्ञानाचा समावेश होता असे त्यांचे म्हणणे असते. हे ज्ञान संस्कृत भाषेमध्ये आहे आणि वैदिक वाङ्मय अपौरुषेय आहे. ते कोणा मर्त्य मानवाने लिहिले नसून साक्षात ब्रह्मदेवाने मौखिक रूपाने सांगितले आहे. अर्थातच त्यांच्या मते संस्कृत भाषेच्या बाबतीत उद्गम, विकास वगैरे टप्पे संभवत नाहीत. ब्रह्मदेवाने आपल्या देववाणीमध्ये सारे काही ज्ञान एकदम सांगितले, महर्षींना ते लगेच समजले आणि त्यांनी ते आपल्या शिष्यांना दिले. आजतागायत लागत असलेले सारे नवे शोध या महर्षींना आधीपासून अंतर्ज्ञानाने माहीत होते आणि त्यांनी संस्कृत भाषेत ते कुठेतरी लिहून ठेवलेले आहेत अशी काही लोकांची नितांत श्रध्दा असते आणि त्यावर कोणी शंका घेतलेले त्यांना खपत नाही.
संस्कृत ही भाषा संगणकप्रणालीसाठी सर्वोत्तम आहे असे प्रशस्तीपत्रक फोर्बस या जागतिक संस्थेने दिले असल्याची अफवा मध्यंतरी पसरली होती आणि तसा उल्लेख आजसुध्दा वेळोवेळी केला जात असतो. आजच्या सुपरकाँप्यूटरपेक्षा अनेकपटीने प्रभावी संगणक आपल्या पूर्वजांकडे असले पाहिजेत असा अंदाज त्यावरून व्यक्त केला जात असतो. प्रत्यक्षात मात्र संस्कृतमध्ये प्रणाली असलेला संगणक अजूनपर्यंत जागतिक बाजारपेठेत आलेला नाही. त्या कामासाठी या दिव्य भाषेचा नेमका कसा उपयोग करून घ्यावा हे त्या क्षेत्रांमधील विशारदांना अजून समजले नसावे. पण यासाठी आता अमेरिका, जर्मनी वगैरे देशातल्या शाळाकॉलेजांमध्ये संस्कृत भाषेचा कसून अभ्यास चालला आहे असेही वारंवार सांगितले जाते. निदान मला तरी माझ्या लहानशा जगप्रवासात तशी माहिती कोठे मिळाली नाही.
काही लोकांना मात्र संस्कृत भाषेच्या भविष्याबद्दल आता चिंता वाटायला लागली आहे असे दिसते. त्यांच्या मनात निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनांचे दर्शन खाली दिलेल्या परिपत्रकात दिसून येते. निदान दहा बारा मित्रांकडून मला ईमेलने हा संदेश मिळाला आहे. त्यातले काही जण उच्चविद्याविभूषित तसेच परदेशभ्रमण करून आलेले सुजाण आणि संतुलित विचार करणारेसुध्दा आहेत. त्यामुळे मी ते पत्रक स्पॅममध्ये न ढकलता लक्षपूर्वक वाचून पाहिले.
"अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत. हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल. तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही.
जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा"
हजार वर्षांचा मुसलमानी अंमल आणि दीडदोनशे वर्षांचे इंग्रजांचे राज्य या अत्यंत प्रतिकूल काळात टिकून राहिलेली प्राचीन संस्कृत भाषा आज केवळ सरकारी निधीच्या आधारावर जीवंत असावी, जनगणनेमध्ये ही भाषा अवगत असलेल्या लोकांची संख्या कमी झाली की सरकार तिला मृत घोषित करेल आणि त्यानंतर ती कायमची नष्ट होईल. वगैरे जे चित्र यात सूचित केले आहे त्यातले मला तरी काहीही तर्कसंगत वाटत नसल्यामुळे मी त्या पत्रकाचा पुढे प्रसार केला नाही. संस्कृत भाषेच्या प्रेमापेक्षा अवांतर मुद्दे उपस्थित करून राज्यकर्ते आणि काही इतर लोक यांच्याबद्दल लोकांच्या मनात अढी निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश असावा असे दिसते. संस्कृत भाषा खरोखरच नष्ट होण्याची भीती ज्यांना वाटत असेल आणि तसे होऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी ती स्वतः शिकावी आणि इतरांना शिकवावी. पण ते काम महाकठीण आहे. अनेक लोकांनी जनगणनेत संस्कृत ही आपल्याला अवगत असलेली भाषा आहे असे (ती नसतांना जाणूनबुजून चुकीचे) लिहिले की काम झाले असे नाही. ती भाषा शिकवणारे आणि शिकण्याची इच्छा बाळगणारी माणसे त्यासाठी असायला हवीत. ती आता झपाट्याने कमी होत चाललेली आहेत. भविष्यकाळात पुन्हा एकदा संस्कृत ही सर्वसामान्य दैनिक संभाषणाची भाषा बनण्याची शक्यता दिसत नाही. एक प्राचीन भाषा हीच तिची ओळख राहणार आहे. आज ती किती लोकांना अवगत आहे याचा त्यात कुठे संबंध येत नाही. भविष्यकाळातील लोकांना प्राचीन काळाबद्दल आस्था उरली नाही तर त्याला काही इलाज नाही. समाजाच्या ज्या वर्गामध्ये या परिपत्रकाचा प्रसार होत आहे त्यातील काही जणांची मुले परदेशात स्थाईक झाली आहेत. त्यांच्या बाबतीत ही आशंका खरी ठरण्याची भीती अधिक प्रमाणात असणार.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment