प्रत्येक जीव त्याच्या आधीच्या अनेक जन्मांमध्ये केलेल्या कृत्यांपासून मिळवलेल्या पापपुण्याचे 'पूर्वसंचित' बरोबर घेऊन येतो आणि त्याचा प्रभाव त्याच्या सध्याच्या जीवनावर पडतो असे म्हणतात. काही अगम्य, अनाकलनीय अशा गोष्टींचे स्पष्टीकरण त्यावरून दिले जाते. एकाद्या माणसाला अमूक एक गोष्ट का मिळाली किंवा दुस-या एकाद्याचे कशामुळे नुकसान झाले याचे नक्की कारण कधी कधी समजत नाही. अशा वेळी "पहिल्याने पूर्वजन्मात काहीतरी चांगले करून ठेवले असावे" किंवा "दुस-याने काहीतरी वाईट कृत्य केले असेल" असे कधी गंभीरपणे किंवा कधी विनोदाने सांगितले जात असते. याला हिंदूधर्मशास्त्राची मान्यता असेल, पण वैज्ञानिक दृष्ट्या पूर्वसंचिताच्या संकल्पनेला कसलाही शास्त्रीय आधार नाही.
आईवडिलांचे काही गुण त्यांच्या अपत्यांमध्ये येतात असे दिसते. यावरून "खाण तशी माती" अशी म्हणसुध्दा पडली आहे. जनुकांच्या माध्यमातून हे गुणदोष पुढील पिढीला दिले जातात हे शास्त्रीय संशोधनातूनसुध्दा सिध्द झाले आहे. पण आई किंवा बापाकडून कोणती आणि किती गुणसूत्रे, जनुके वगैरे त्यांच्या अपत्यांकडे जावीत आणि त्यांचे नेमके कोणते गुण किंवा दोष त्यांच्या मुलांनी किती प्रमाणात उचलावे वगैरे गोष्टी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. हे सगळे कसे आणि कशामुळे ठरते ते समजलेले नाही. शास्त्रज्ञांना या बाबतीत अजून फारसे सविस्तर ज्ञान प्राप्त झालेले नाही.
वरील दोन गोष्टी वगळता जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाच्या मनाची पाटी पूर्णपणे कोरी असते. आजूबाजूला दिसत असणारे आकार, त्यांच्या हालचाली ते पहात असते, ध्वनी ऐकत असते आणि त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते. जसजशी त्याची आकलनशक्ती वाढत जाते, तसतसा त्याला त्या गोष्टींचा बोध होत जातो. ते त्यातून भराभरा शिकत जाते, चालायला, बोलायला लागते, प्रश्न विचारू लागते. लिहायला, वाचायला शिकल्यानंतर ते पुस्तकातले ज्ञान मिळवायला लागते. लहान मुलांची वाढ होत असतांना अधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न ती मुले करत असतातच, शिवाय त्यांचे पालक, शिक्षक आणि इतर वडीलधारी मंडळी त्यांना काही गोष्टी समजावून सांगतात, शिकवतात, त्यांच्याकडून करवून घेतात. या सगळ्यांमधून त्यांच्यात जो फरक पडत असतो त्याला 'संस्कार' असे नाव दिले गेले आहे.
'निसर्गनिर्मित गोष्टींचे मूळ स्वरूप कायम ठेवून त्यात माणसाने केलेले बदल' म्हणजे त्यावर केले गेलेले 'संस्कार' असे समजले जाते. उदाहरणार्थ शेंगदाणे भाजले किंवा तळले तर ते संस्कार झाले. त्याची कुटून तिखट चटणी किंवा गोड वड्या केल्या तर ते संस्कारामध्ये येत नाही, त्याच्या पलीकडे जाते अशी माझी समजूत आहे. माणसाच्या बाबतीत त्याच्या मनावर संस्कार केले जातात. त्यातून त्याचा स्वभाव, त्याची वागणूक वगैरेवर प्रभाव पडतो. हुषार माणूस गरज पडेल तेंव्हा ठरवून कृत्रिम रीतीने वेगळे वागू शकतो किंबहुना तो तसे करतच असतो, पण ज्या गोष्टी त्याच्या नकळत तो करत असतो त्यांच्या मुळाशी त्याच्या अंगातले उपजत गुण असतात, तसेच त्याच्या मनावर झालेले संस्कार असतात. लहानपणी मनावर झालेले संस्कार इतके खोलवर रुजलेले असतात की ते त्या माणसाच्या व्यक्तीमत्वाचा भाग बनून जन्मभर त्याच्या सोबत राहतात. ते पुसण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागतात.
संस्कार हा शब्द सर्वसाधारणपणे चांगल्या अर्थाने वापरला जातो. कोणतेही पालक किंवा शिक्षक सहसा मुद्दामहून मुलांना वाईट मार्गाला लावणार नाहीत. पण ती लागली तर बहुतेक वेळी त्यालासुध्दा वाईट संगत हे कारण दाखवले जाते. 'चांगले' आणि 'वाईट' या शब्दांचे अर्थ निरनिराळ्या परिस्थितींमध्ये वेगळे निघतात. खूप श्रीमंत कुटुंबांकडे स्वयंपाकपाणी करण्यासाठी नोकरचाकर असतात. घरातल्या प्रत्येक माणसाने त्याला आवडेल तो पदार्थ यथेच्छ खावा आणि त्याला तो कमी पडता कामा नये असा हुकूम असल्यामुळे ढीगभर अन्न शिजवले जाते आणि घरातल्या माणसांची जेवणे झाल्यानंतर उरलेल्या अन्नाचे काय होत असेल याची फिकीर कोणीही करत नाही. अशा वातावरणात वाढलेल्या मुलांच्या मनावर तसेच संस्कार होतात, त्यांना तशाच संवयी लागतात. याउलट दरिद्री माणसांच्या घरात अन्नाचा प्रत्येक कण मोलाचा समजला जातो आणि वाया जाऊ दिला जात नाही. मध्यमवर्गीयांची अन्नान्नदशा नसली तरी ती होऊ नये म्हणून "पानात वाढलेले अन्न संपवलेच पाहिजे", "शिजवलेले सारे अन्न खाल्ले गेले पाहिजे" वगैरे शिकवण दिली जाते. शरीराला आवश्यकता नसतांना खाल्ले गेलेले जास्तीचे अन्न अपायकारक असते आणि तेसुध्दा एक प्रकारे वायाच जाते हे अनेक लोकांना कळले तरी वळत नाही. याला कारण लहानपणी मनावर झालेले संस्कार ! यातले कोणते संस्कार चांगले आणि कोणते वाईट याबद्दल वेगवेगळी मते असू शकतात.
पूर्वीच्या काळी रूढ असलेल्या एकत्र कुटुंबांमध्ये आजोबापणजोबा आणि आज्यापणज्यांपासून नातवंडे पणतवंडांपर्यंत खूप माणसे एकत्र रहात असत. त्यांनी आपसात भांडणतंटा न करता सामंजस्याने रहावे यासाठी घराघरात एक प्रकारची शिस्त पाळली जात असे. लहानपणापासूनच प्रत्येकाने ती अंगात भिनवावी या दृष्टीने मुलांच्या व मुलींच्या मनावर विशिष्ट प्रकारचे संस्कार प्रयत्नपूर्वक केले जात असत. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करायचे आणि ते कसे करायचे याचे नियम असत. परवचे आणि श्लोक वगैरेचे पाठांतर करून घेतले जात असे. प्रामाणिकपणा, विनम्रता, आज्ञाधारकपणा वगैरेंसारखे गुण शिकवले जात असत. त्यात आज्ञाधारकपणा हा सर्वात मोठा गुण समजला जात असे. मोठ्या माणसांनी सांगितलेले सर्व काही निमूटपणे ऐकून घ्यायचे, वर तोंड करून त्यांना उलट उत्तरे द्यायची नाहीत, त्यांची चूक काढायची नाहीच, त्यांच्या सांगण्याबद्दल शंकासुध्दा व्यक्त करायची नाही वगैरे बाबींचा थोडा अतिरेक होत असावा असे मला आता वाटते. सुमार वकूब असलेल्या मुलांसाठी ते ठीक असेलही, पण स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आणि कल्पकता यांच्या वाढीमध्ये त्या प्रकारच्या संस्कारांचा अडथळा येत असे. संयुक्त कुटुंब पध्दतीच आता मोडीत निघाली आहे आणि टेलिव्हिजनच्या प्रसारामुळे मुलांना लहानपणापासूनच बाहेरच्या जगात काय चालले आहे हे समजू लागले आहे. त्यामुळे कळत नकळत त्यांच्या मनावर होणारे संस्कार आता बदलले आहेत.
माणसाच्या जन्माच्याही आधीपासून ते मृत्यू होऊन गेल्यानंतरसुध्दा त्याच्यासाठी काही धार्मिक विधी केले जात असत. गर्भसंस्कारांपासून ते अंत्यसंस्कारापर्यंत करण्यासाठी अनेक संस्कार सांगितले गेले आहेत. जीवनाच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर परमेश्वराचे स्मरण करून त्याचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुढील गोष्टी सुरळीतपणे पार पडोत अशी प्रार्थना त्या संस्कारांच्या प्रसंगी उच्चारण्यात येणा-या मंत्रांमध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्याबरोबर विशिष्ट विधी करण्याची रूढी पडली होती. ते संस्कार केल्यामुळे काही प्रमाणात त्या व्यक्तीच्या ऐहिक किंवा पारलौकिक जीवनात चांगला फरक पडतो असे समजले जात असे. पण बदललेल्या परिस्थितींमध्ये त्यांना अर्थ उरला नाही आणि श्रध्देची जागा ब-याच प्रमाणात तर्कसंगत विचाराने घेतली गेली असल्याने या परंपरा आता मागे पडत चालल्या आहेत.
संस्कार हा प्रकार वैश्विक आहे. स्थळकाळानुसार त्यांचा तपशील वेगळा असतो. चांगले संस्कार लाभलेला भारतीय मुलगा आल्यागेल्या मोठ्या माणसाच्या पाया पडून त्याला नमस्कार करेल, इंग्रज मुलगा हस्तांदोलन करून त्याची विचारपूस करेल किंवा "त्याची सकाळ, संध्याकाळ, किंवा रात्र चांगली जावो" अशी लांबण न लावता फक्त "गुड मॉर्निंग, गुड ईव्हनिंग, गुड नाईट" असे काही तरी उच्चारेल. जाता येता सारखे "थँक्यू, सॉरी" वगैरे म्हणणे हा देखील संस्कारांचाच भाग आहे. आधुनिक काळात हे संस्कारसुध्दा आपल्याकडील मुलांवर केले जात आहेत. कधी कधी ज्या स्वरांमध्ये ते शब्द म्हंटले जातात त्यात तो भाव मुळीसुध्दा दिसत नाही. कारण ते शब्द केवळ संवयीने उच्चारलेले असतात. त्यांचा अर्थ त्यात अपेक्षित नसतो आणि कोणी तो लावायचा प्रयत्नसुध्दा करत नाही.
. . . . . . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment