आपल्या डोळ्यावर माणसाचा प्रचंड विश्वास असतो. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या घटनेचे आपल्याला पूर्ण आकलन झाले आहे असे त्याला वाटते आणि ते बव्हंशी बरोबर असते. ऐकीव गोष्टींची खातरजमा डोळ्यांनी पाहून केली जाते. 'आय विटनेस' किंवा 'प्रत्यक्षदर्शी' साक्षीदाराच्या सांगण्याला न्यायालयात महत्व दिले जाते. "चक्षुर्वै सत्यम्" असा संस्कृतमध्ये वाक्प्रचारसुध्दा आहे. आपल्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी डोळा हे सर्वाधिक महत्वाचे आहे आणि आपल्याला क्षणोक्षणी मिळत असलेल्या माहिती आणि ज्ञानाचा अर्ध्याहून जास्त भाग दृष्टी या माध्यमामधून मिळतो असे म्हणतात.
वाचनाची क्रिया डोळ्याकडून होत असल्यामुळेच कदाचित लिखित माहितीला खूप महत्व दिले जाते. हस्तलिखित लिखाणापेक्षाही छापलेल्या मजकुरावर लोकांचा जरा जास्तच भरवसा असतो. त्यातले अक्षर अन् अक्षर खरेच असणार असे कित्येक लोकांना वाटते. कथा, कादंब-या आदि ललित वाङ्मय काल्पनिक असते हे सुजाण वाचकांना ठाऊक असते. तरीसुध्दा ऐतिहासिक कादंब-यांनाच इतिहास समजणारी माणसे मी पाहिली आहेत. पौराणिक वाङ्मयाबद्दल तर विचारायलाच नको. पोथ्यापुराणात वर्णिलेल्या अशक्य घटनासुध्दा पुराणकालात नक्कीच प्रत्यक्षात घडून गेल्या असल्याचा दावा शहाणी सुरती सुशिक्षित माणसे सुध्दा करतांना दिसतात.
पण 'दिसतं तसं नसतं' असा अनुभव कधी कधी येतो. 'तसं असतं म्हणून जग फसतं' हे देखील जाणवते. सिनेमा आणि टीव्हीवर दाखवण्यात येणाच्या कार्यक्रमांच्या सुरुवातीलाच "ही कथा आणि यातली सर्व पात्रे काल्पनिक आहेत" असा खुलासा केलेला असतो. तरीसुध्दा तो 'वास्तववादी' असावा अशी अपेक्षा असते आणि त्या बनावटी कथानकात तात्पुरत्या काळासाठी सहभागी होऊन त्यामधील पात्रांसोबत प्रेक्षकसुध्दा हंसतो, रडतो, बावरतो किंवा आक्रोश करतो. हे सगळे खोटे आहे याचे भान तो विसरतो.
या पार्श्वभूमीवर पाहता वर्तमानपत्रात आलेल्या मजकुराबद्दल सत्यनिष्ठेची जास्त अपेक्षा असते. छापील वृत्तपत्रांचा प्रसार सुरू झाल्यापासूनच त्याची विश्वासार्हता हा मोठा गुण मानला गेला आहे. रोजच्या रोज घडत असलेल्या घटनांची माहिती करून घेण्याचे कुतूहल प्रत्येकाला असते आणि ती माहिती खोटी ठरली तर त्याची फसवणूक झाल्यामुळे त्याला राग येतो. असा अनुभव पुनःपुन्हा येऊ लागला तर तो बातम्यांचा स्रोत म्हणजे वर्तमानपत्रच बदलतो. त्यामुळे मोठा खप असलेली प्रमुख वर्तमानपत्रे धादांत खोट्या बातम्या न देण्याची काळजी घेतात. पण आपसातील स्पर्धेमुळे ताज्या ताज्या बातम्या लवकरात लवकर वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न प्रत्येक वृत्तपत्र करत असते. त्यामुळे तिच्या खोलात जाऊन पूर्ण चौकशी करण्यासाठी वेळ मिळत नाही. वरवर पाहता जेवढी माहिती विश्वसनीय वाटेल तेवढी पुरवली जाते.
वाचकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काही खास बातम्या मोठे मथळे देऊन, चौकट घालून ठळक अक्षरात छापल्या जातात. बहुतेक वृत्तपत्रांचा एक खास वाचकवर्ग असतो. त्याला सांभाळण्यासाठी त्याला रुचतील अशा बातम्यांना प्राधान्य दिले जाते. 'सत्यम् ब्रूयात' या बरोबरच 'प्रियम् ब्रूयात' याचासुध्दा विचार केला जातो. पण त्याखेरीज इतर वाचकांचा विचार करून आणि नवे वाचक मिळवण्याच्या दृष्टीने बातम्यांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्नसुध्दा होत असतो. काही नियतकालिके मात्र एकाद्या राजकीय पक्षाचा, धार्मिक किंवा जातीय संघटनेचा, विशिष्ट विचारसरणीचा प्रचार करण्यासाठीच प्रसारित होत असतात. त्यांचा समावेश मी 'वर्तमानपत्र' या संज्ञेखाली करत नाही. कारण जाणून बुजून खोटा प्रचार करणे आणि मूढ किंवा संभ्रांत लोकांची दिशाभूल करणे एवढाच त्यांचा उद्देश असतो.
टेलिव्हिजन आणि इंटरनेट या माध्यमांमधून बातम्यांच्या प्रसरणाचे नवे मार्ग उपलब्ध झाले आहेत. वृत्तपत्रांसंबंधी वर जे जे काही लिहिले आहे ते सारे या नव्या माध्यमांनासुध्दा बहुतांश प्रमाणात लागू पडते.
पण प्रतिष्ठित आणि विश्वसनीय अशा वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या आणि वृत्तवाहिन्यांवर दाखवल्या गेलेल्या वार्तासुध्दा कधी कधी गोंधळात टाकतात. आरुषी प्रकरण हे याचेच एक उदाहरण आहे. दररोज येणा-या वर्तमानपत्रात कुठे ना कुठे कुणाची हत्या झाल्याच्या बातम्या येत असतात. मृत व्यक्ती जितकी प्रसिध्द किंवा उच्चपदस्थ असेल तेवढे जास्त महत्व त्या बातमीला दिले जाते. अशा वेळी त्या बातम्या मोठ्या आणि ठळक मथळ्यासह वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर देतात. किरकोळ लोकांच्या खुनाच्या बातम्या गौण असतात आणि आतल्या पानावर लहान अक्षरात दिल्या जातात, या दृष्टीने पाहता आरुषी अगदीच अज्ञात मुलगी होती, पण तिची हत्या ही एक धक्कादायक घटना होती तसेच ती रहस्यमय होती यामुळे त्या बातमीला मोठे वृत्तांतमूल्य प्राप्त झाले. दोन अडीच वर्षांपूर्वी ही घटना घडली त्या काळात काही दिवस रोजच्या रोज या संबंधी वेगवेगळा धक्कादायक मजकूर वाचायला मिळत होता.
एकाद्या रहस्यमय मालिकेला लाजवेल अशा प्रकारे रोज नवा धक्का तेंव्हा मिळत गेला होता. आरुषी नावाच्या बालिकेचा मृतदेह तिच्याच घरात तिच्या बिछान्यावरच पडलेला सापडला. राहत्या घरी झालेल्या या हत्याकांडाचा कसला आवाजसुध्दा शेजारच्या खोलीत झोपलेल्या तिच्या आईवडिलांना ऐकू गेला नाही म्हणे. बाहेरचा मजबूत मुख्य दरवाजा बंद होता आणि तो उघडून कोणी आत आला असण्याची शक्यता नव्हती. घरातला एक नोकर बेपत्ता झाला होता, पण त्याने कुठलीही वस्तू चोरली नव्हती, की आरुषीवर जबरदस्ती केल्याच्या खुणा नव्हत्या मग या निष्पाप जीवाला मारून त्याला काय मिळाले? तो नोकर रेल्वे स्टेशनकडे जातांना त्याला कोणीतरी पाहिल्याचे सांगितले गेले, पण तो त्याच्या गावी गेला नव्हता. आणखी कुठे गेला असेल याचा तपास चालला. दोन तीन दिवसानंतर त्या नोकराचा मृतदेह रहस्यमय रीत्या त्याच इमारतीच्या टाकीत सापडला. आता हे दोन खून एकाच व्यक्तीने केले होते की वेगवेगळ्या, तसेच ते एकाच वेळी झाले होते की एकानंतर एक, तसे असल्यास त्यात आधी कोणाचा आणि नंतर कोणाचा, त्या दोन अपराधांचा एकमेकांशी संबंध असणारच, पण तो कशा प्रकारचा होता, की काही संबंधच नव्हता असे अगणित प्रश्न निर्माण झाले आणि त्यावर अनेक दिशांनी तर्ककुतर्क होत राहिले.
आरुषीच्या घरातल्या आणि वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात त्यांच्याशी संबंधित असलेल्य़ा काही लोकांच्या चारित्र्याबद्ल संशय घेतला गेला. त्याबद्दल पसरलेल्या अफवा. संबंधित लोकांनी केलेला त्यांचा इन्कार आणि त्यामुळे झालेल्या त्यांच्या चारित्र्यहननाविरुध्द केलेल्या कारवाया यांच्या बातम्या येत गेल्या. आरुषीच्या वडिलांना अटक करून त्यांची चौकशी झाली. तपास करण्याचे काम एका सरकारी खात्याकडून दुस-या खात्याकडे सोपवण्यात आले. आणखी काही लोकांना अटक आणि त्यांची चौकशी झाली. दरम्यान ही बातमी शिळी झाल्यामुळे मागे पडली आणि लोकांच्या स्मरणातूनही गेली असेल.
मध्यंतरीच्या काळात काय झाले ते माहीत नाही. पण काही दिवसांपूर्वी अशी एक लहानशी बातमी आली होती की ही चौकशी बंदच करण्याची शिफारस केली गेली आहे. त्याला आक्षेप घेऊन तपास चालू ठेवावा आणि गुन्हेगाराला शोधून काढून त्याला शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आरुषीच्या वडिलांनी केली असे त्यानंतर समजले. खटला भरण्याइतका भक्कम पुरावा आपल्यापाशी नसला तरी अजूनही तेच मुख्य संशयित आहेत असे स्पष्टीकरण त्यावर देण्यात आले आणि जमा झालेला परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून हा खटला चालवणे शक्य आहे असा त्यावर निर्वाळा दिला गेला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आता त्यावर कोणीही आपले मत मांडू शकत नाही. पण आतापर्यंत छापून आलेल्या बातम्यांमधली विसंगती पाहता नक्की काय काय घडले ते देवच जाणे असाच विचार मात्र मनात येतो.
No comments:
Post a Comment