सत्तर ऐंशी वर्षापूर्वीच्या काळातल्या मध्यम वर्गीय घरांमधले वातावरण आजच्या मानाने खूप रूढीग्रस्त आणि काहीसे असहिष्णु होते. घरातल्या वडीलधारी माणसांनी सांगायचे आणि लहानांनी ते निमूटपणे ऐकायचे असा दंडक होता. मोठ्या मंडळींच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग त्यात होत असे आणि त्यांच्या दृष्टीने कुटुंबासाठी जे चांगले असेल तेच ते सांगत असत. त्यात सर्वांचा फायदा असायचा हे खरे असले तरी लहानांच्या मनात काही वेगळा विचार आला तरी तो व्यक्त करायला ते घाबरत असत, कोणी धीटपणाने तो बोलून दाखवला तर इतर मंडळी त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचे सांगणे ऐकून घेत नसत आणि ऐकून घेतल्यानंतर त्यात काही गैर दिसत नसले तरीसुध्दा, "ते ठीक आहे, पण लोक आमच्या तोंडात शेण घालतील त्याचं काय?" असे म्हणून त्याला उडवून लावत असत. स्वतंत्रपणे विचार करू शकणा-या ज्या व्यक्तींना हा मनाचा कोंडमारा असह्य होत असे त्यांना निमुटपणे बाहेरची वाट धरावी लागत असे. देशभक्ती किंवा समाजसेवा यासारख्या उदात्त कारणासाठीसुध्दा कुटुंबातून बाहेर पडावे लागलेल्या लोकांची उदाहरणे आहेत.
आजकाल मुंबईसारख्या शहरातल्या सेल्फकंटेन्ड फ्टॅटमध्ये (बंद दरवाजाच्या संस्कृतीत) राहणारे लोक काय करतात ते इतरांना समजत नाही, कोणी त्याची चौकशी करत नाही की त्यांना काही म्हणत नाही. त्यामुळे व्यक्तीस्वातंत्र्यात अनेकपटीने वाढ झाली आहे आणि लोकापवादाचा धाक उरलेला नाही. सिनेमा आणि टेलीव्हिजनच्या माध्यमातून पाश्चात्य संस्कृती आणि त्यातली मुक्त विचारसरणी या गोष्टी आज घराघरात जाऊन पोचल्या आहेत. कला आणि क्रीडा या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणा-या लोकांना लहान वयातच अमाप प्रसिध्दी, गडगंज पैसा आणि भरपूर मानसन्मान मिळतात त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलली आहे. झटपट यशाच्या आशेमुळे त्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणा-यांची गर्दी वाढत आहे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कोचिंग क्लासेस गल्ल्या गल्ल्यात उघडले आहेत. खेळ किंवा गाण्याची उपजत आवड असली तरी त्यात प्रगती करून प्राविण्य मिळवण्याची सुलभ सोय पूर्वीच्या काळी नसायची. आताच्या काळात त्यात यत्किंचित रस किंवा गती नसलेल्या मुलांनासुध्दा आजकालचे पालक जबरदस्तीने त्यांच्या क्लासला पाठवतांना दिसतात. त्याच्यामधील स्पर्धा अनेकपटीने वाढल्यामुळे त्या क्षेत्रांमध्ये पुढे येण्यासाठी आजसुध्दा जबरदस्त संघर्ष करावा लागतोच पण या कारणासाठी आता कोणाला घर सोडून जाण्याची गरज उरली नाही.
दुस-या बाजूने विचार केला तर असे दिसते की पूर्वीच्या काळातला असहिष्णू वाटणारा समाज बराच सहृदय होता. माझ्या लहानपणी आमच्या घरातले रोजचे जेवण अतीशय साधे असायचे. कित्येक दिवस त्यात फक्त एकच कालवण असे. पण रोजचे साधे जेवण असो किंवा सणासुदीचे पंचपक्वान्नांचे असो, ठराविक दिवशी वार लावून जेवायला येणारा एकादा गरीब विद्यार्थी पंगतीला असायचा. बदाम पिस्ते. मनुका, बेदाणे वगैरेंनी भरलेल्या बरण्या आमच्या स्वयंपाकघरातल्या फडताळांमध्ये नसायच्या, पण माधुकरी मागायला आलेल्या कोणाच्याही झोळीमध्ये सढळ हाताने ओंजळभर जोंधळे घातले जात असत. एकाद्या सधन कुटुंबाच्या आधारावर मोठी झालेली माझ्या पिढीमधली काही आश्रित माणसे मला माहीत आहेत. लहानपणीच घर सोडून कर्नाटकातून बाहेर पडलेले भीमसेन महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब वगैरे अनेक भागांमध्ये जाऊन पुन्हा कर्नाटकात परत आले. या सगळ्या ठिकाणी त्यांना अन्नदाते आणि आश्रयदाते लाभले. सद्गुणी, कष्टाळू आणि गरजू लोकांना त्या काळातला समाज अनेक हातांनी आधार देत असे.
आजचे दृष्य वेगळे दिसते. 'वार लावून जेवणे', 'माधुकरी'. 'आश्रित' यासारखे शब्द आता मराठी भाषेतून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. नव्या पिढीमधल्या मुलांना त्याचा अनुभव नसल्याने अर्थ लागत नसेल. आजचे लोक सुध्दा उदारहस्ताने मदत करतात, म्हणजे समाजसेवी संस्थांना देणग्या देतात, पण फ्लॅटमध्ये राहणा-या कोणाच्याही घरात त्याच्या कुटुंबाच्या बाहेरच्या मुलाला रहाण्याजेवण्यासाठी आणून ठेवल्याचे एकही उदाहरण मला दिसत नाही. आपल्या मुलांना सर्व काही उत्कृष्ट आणि जास्तीत जास्त द्यावे अशी धडपड आजचे पालक करत असतात आणि ते करण्यासाठी आपल्या मुलांची संख्या एक किंवा दोनवर मर्यादित ठेवतात. कुटुंबनियोजनाच्या प्रसारामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे "दुस-यांच्या मुलांना पोसण्यापेक्षा आपल्याच मुलांना जन्म दिला नसता का?" किंवा "त्यांना जर मुलांना पोसण्याची ऐपत नव्हती तर त्यांना जन्म कशाला दिला?" अशा स्वरूपाचे प्रश्न कोणाच्याही मनात उठणे साहजीक आहे. पूर्वीच्या काळात हे देवाच्या मर्जीनुसार ठरत असे आणि देवाने या जगात पाठवलेल्या जीवाला आधार देणे हे आपले कर्तव्य आहे अशी भावना लोकांच्या मनात असे. ते चित्र आता बदलले असल्यामुळे एकाद्या गुरूच्या घरी राहून आणि त्याची सेवा करून शिक्षण मिळवणे ही गोष्ट आता बहुधा संभवत नाही. असा भाबडा विचार करून एकादा मुलगा घर सोडून परागंदा झाला तर आता तो समाजकंटकांच्याच हातात सापडण्याचा मोठा धोका आहे.
पूर्वीचा काळ चांगला होता की आताचा असा प्रश्न विचारून त्याचे उत्तर मला द्यायचे नाही. त्या काळात काही जटिल समस्या होत्या, आताच्या काळातही कसोटी पाहणा-या वेगळ्या अडचणी आहेत. त्या काळात वेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध होत्या, आता निराळ्या स्वरूपाचे मार्ग निर्माण झाले आहेत. अलौकिक गुणवत्ता, अदम्य उत्साह आणि पडतील तेवढे सारे कष्ट सहन करण्याची तयारी असेल तर तशा असामान्य व्यक्ती पूर्वीच्या काळातही सगळ्या अडचणी बाजूला सारून पुढे आल्या आणि यशाच्या शिखरापर्यंत पोचल्या, भविष्यातसुध्दा तसे होणारच अशी माझी श्रध्दा आहे.
. . . . . . . . . . . . (समाप्त)
No comments:
Post a Comment