इसवी सन १९३०-३५ चा काळ आजच्यापेक्षा खूप वेगळा होता. त्या काळात देशांतर्गत दूरच्या प्रवासासाठी रेल्वे हे बहुधा एकमेव साधन होते. त्यातसुध्दा लांब पल्ल्याच्या गाड्या अगदी कमी होत्या. स्लीपर कोचची कल्पनासुध्दा निघालेली नव्हती. बहुतेक प्रवासी जवळपासच्या गावांना जाणारे असल्यामुळे गाडीत झोपायची आवश्यकता भासत नव्हती. कोळशाच्या इंजिनावर चालणा-या त्या काळातल्या झुक झुक झुक झुक अगीनगाडीच्या डब्यात प्रवाशांना बसण्यासाठी लाकडाच्या फळकुट्यांची बाकडी असत. त्यात बोट बोट भर रुंदीच्या फटी असत आणि रोज नवनव्या माणसांच्या रक्ताची चव चाखायला चटावलेल्या ढेकणांच्या फौजा त्या फटींमध्ये दडलेल्या असायच्या. हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा झाली नव्हती. हिंदी बोलपट अद्याप बाल्यावस्थेत होते. त्यातली गाणी लोकांच्या तोंडात बसली नव्हती. त्यामुळे दक्षिण भारतातल्या लोकांसाठी हिंदी ही काहीशी अनोळखी भाषा होती.
अशा काळात दहा बारा वर्षे वयाचे भीमसेन दक्षिण भारतातून निघून एकट्याने प्रवास करीत उत्तर भारतात जाऊन पोचले होते. या काळात ते आजूबाजूच्या लोकांबरोबर कोणत्या भाषेत कशा प्रकारचा संवाद साधत होते ते तेच जाणो. त्यांनी आपल्या गोड आवाजात खड्या सुरात गायिलेले एकादे भजन किंवा पद ऐकल्यानंतर अधिक काही सांगायची त्यांना गरज पडत नसावी आणि कानावर पडलेल्या शब्दांवरून ते नवी भाषा लगेच शिकून घेत असावेत.
त्या दहा बारा वर्षाच्या मुलाकडे उपजीविकेचे कोणते साधन असणार? गुणग्राही आणि दयाळू लोकांच्या औदार्यावरच त्यांची गुजराण होणे शक्य होते. मिळेल ते अन्न पूर्णब्रह्म मानून गिळणे आणि जमेल तिथे हातपाय पसरून झोपणे त्यांना भाग होते. पण ते काही उपजीविकेच्या शोधार्थ घराबाहेर पडले नव्हते. हक्काचा अन्नवस्त्रनिवारा आणि मायेची पाखर देणारे आईवडिलांचे घर, जिवलग सखे या सर्वांचा त्याग करून त्यांनी हा मार्ग एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन पत्करला होता. त्यामुळे संगीताचे शिक्षण घेणे हा उद्देश सतत नजरेसमोर ठेवून जातील त्या जागी चौकशी करून आणि त्यासाठी मिळेल ती माहिती काढून जिवाचा आटापिटा करून ते प्रयत्न करत राहिले, सतत त्या मार्गावर पुढे जात राहिले आणि अखेर कुंदगोळला सवाई गंधर्वांकडे जाऊन पोचले.
शिष्यांची निवड करण्याच्या बाबतीत पं.सवाई गंधर्व अत्यंत चोखंदळ होते. योग्यता आणि निष्ठा यांची कसोशीने पारख करून घेतल्यानंतरच ते कोणाला आपले शिष्यत्व देत असत. पहिले काही महिने त्यांनी भीमसेनांना काहीच शिकवले नाही. तरीही ते त्यांच्याकडे राहून पडेल ते काम करून आणि श्रवणभक्तीमधून शास्त्रीय संगीताचे कण वेचत राहिले. अखेरीस गुरूंनी त्यांच्यावर खूष होऊन त्यांना गायनकला शिकवायला सुरुवात केल्यानंतरदेखील ते आठवड्यातून फक्त एक दिवस प्रत्यक्ष थोडेसे शिकवत असत. त्यानंतर आठवडाभर शिष्याने ते स्वर पुन्हा पुन्हा घोटून घोटून आपल्या गळ्यावर चांगले बसवले आणि गुरूला व्यवस्थितपणे गाऊन दाखवले तरच पुढचे शिकवत असत. अशा प्रकारे सुरुवातीला एकेक रागाचे शिक्षण महिनोगणती चालत असे. पं.भीमसेन जोशी यांनीच याबद्दल अनेक वेळा त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते.
असे असले तरी कधीसुध्दा अगदी चुकूनही त्यांच्या बोलण्यात त्याबद्दल तक्रारीचा किंचितसा सूर देखील आला नव्हता. नेहमी त्यांच्या गुरूंबद्दल त्यांचे मन अतीव आदरानेच भरलेले असायचे. त्यांच्या काळात आजच्यासारखी यांत्रिक साधने नव्हती आणि घरकामासाठी गडीमाणसे, नोकरचाकर वगैरे ठेवणे श्रीमंतांनाच परवडत असे. त्यामुळे पाणी भरणे, झाडलोट करणे यासारखी कामे घरातले लोकच करत असत आणि घरातल्या मुलांचा त्यात सहभाग असणे साहजीक असे. माझ्या लहानपणी आमच्या घरी मी ही सगळी कामे आनंदाने केली आहेत. त्याचे श्रम वाटत नव्हते की त्यात कमीपणा वाटत नसे. उलट अभिमान वाटायचा. पं.भीमसेन जोशी यांनी लहानपणी सवाई गंधर्वांच्या घरी असली तथाकथित हलकी कामे केली असली तर त्यात काहीच जगावेगळे नव्हते. उलट ते त्यांच्या घरी मुलासारखे राहिले ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.
. . . . . . . . . . . क्रमश: . . . . .
No comments:
Post a Comment