संस्कृत ही जीवंत भाषा आहे की मृत भाषा आहे असा वाद मी शाळेत असल्यापासून चालत आलेला मी ऐकला आहे आणि त्यात दोन्ही बाजूंनी भागसुध्दा घेतला आहे. घरात चाललेल्या चर्चांपासून ते वर्तमानपत्रात आणि आता आंतर्जालावर चालत असलेल्या वादविवादात हिरीरीने भाग घेणा-यांसाठी हा एक आवडता विषय आहे. त्यात दोन्ही बाजूंनी पटतील असे चांगले मुद्दे असले तरी ते वरवर राहतात आणि भाषा बाजूला राहून अवांतर छुपे उद्देश समोर येतात हे पाहिल्यानंतर मी त्यात भाग घेणे सोडून दिले आहे.
माणसे तसेच कुत्रीमांजरे किंवा कावळेचिमण्या यासारखे पशुपक्षी हे सजीव आहेत आणि दगड, माती, लाकूड वगैरे निर्जीव वस्तू आहेत हे सगळ्यांना ठाऊक असते. त्यासाठी त्यांना कोणतीही व्याख्या करावी लागत नाही. हालचाल करणारे, बोलणारे ते सजीव आणि ते न करणारे निर्जीव असे अगदी सोपे निकष मानले तर त्याला अनेक अपवाद निघतात. सजीवांचे चालणेबोलणे निद्रावस्थेत, बेशुध्दावस्थेत आणि कोमात गेल्यानंतर कमीकमी होत जाते व जवळजवळ थांबल्यात जमा होते. तरीही ते जीवंत असतात. हालचाल आणि संभाषण न करणारे वनस्पतींचे प्रचंड विश्व सचेतन असते. उलटपक्षी पाहता निर्जीव असा लोखंडाचा तुकडासुध्दा सतत स्पंदन करत असतो असे सूक्ष्म निरीक्षणातून समजते. त्याच्यावर प्रहार केला तर त्यातून ठराविक प्रकारचा नाद निर्माण होतो आणि त्याचा तुकडा मोडतांना वेगळे आवाज निघतात. तरी तो मात्र अचेतनच असतो. सजीव प्राणी श्वासोच्छ्वास करतात, त्यांचे शरीरात रक्ताभिसरण सुरू असते, ते जन्माला येतात, अन्नग्रहण करतात, काही काळ वाढतात आणि अखेर मृत्यू पावतात वगैरे त्यांचे इतर काही गुणविशेष आहेत. पण त्यांनासुध्दा अपवाद दाखवता येतील. अनेक प्रकारची स्वयंचलित यंत्रे हवेमधील प्राणवायूचे शोषण करून कर्बद्विप्राणील वायूंचे उत्सर्जन करत असतात. त्यांची संख्या आता इतकी वाढली आहे की त्यांच्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यांनासुध्दा इंधन लागते. अनेक संयंत्रांमध्ये पाणी किंवा विशिष्ट तेलाचे सतत अभिसरण होत असते. जगातल्या एकूण एक जड आणि अचेतन वस्तूसुध्दा केंव्हातरी निर्माण झालेल्या असतात तसेच त्या नष्टसुध्दा होत असतात. फक्त त्या बाबतीतल्या प्रक्रिया निराळ्या असतात.
सजीवांमध्ये प्राण असतो आणि निर्जीवांमध्ये तो नसतो हा खरे तर त्यांच्यामधला सर्वात जास्त महत्वाचा, कदाचित एकमेव निश्चित असा फरक असतो, पण प्राण या संकल्पनेचे अस्तित्व मात्र अद्याप अगम्यच आहे. ते कशा प्रकारचे आहे हे डोळ्यांना दिसणा-या किंवा हाताने स्पर्श करता येणा-या अशा जड वस्तूंच्या उदाहरणातून दाखवता येत नाही आणि पाहताही येत नाही.
सजीव प्राण्याच्या शरीरात असतो तशा प्रकारचा प्राण भाषांमध्ये असणार नाही. वर दिलेल्या जीवंतपणाच्या इतर व्याख्या भाषांना कशा लावता येतील याचे मापदंड स्थळकाळानुसार वेगवेगळे असतात. एकादी भाषा बोलता येणे, ती वाचता येणे आणि लिहिता येणे ही एकाद्या माणसाला ती भाषा येत असल्याची ठळक लक्षणे समजली जातात. निरक्षर लोकांना ती भाषा फक्त बोलता येते, काही साक्षर लोकांना लिहिलेले वाचता येते पण स्वतः मजकूर रचून तो लिहिता येत नाही. काही लोकांना या तीनही गोष्टी करता येतात. पण त्यासाठी त्या भाषेमध्ये लिहिण्यावाचण्याची सोय असायला हवी. सुरुवातीला माणसांनी एकमेकांबरोबर संवाद साधण्याच्या प्रयत्नांमधून वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये निरनिराळ्या भाषांचा जन्म झाला. आदिम काळात त्यांचा उपयोग फक्त बोलण्यात होत असणार. आजही दुर्गम अशा रानावनात राहणारे निरक्षर वनवासी, आदिवासी, ट्रायबल वगैरे लोक आपापसात त्यांच्या बोलीमधून बोलत असतात. त्यांच्या दृष्टीने पाहता त्या त्यांच्या भाषाच असतात आणि रोजच्या वापरात असल्यामुळे त्यांना जीवंतच म्हणायला हवे. पण त्यांना अधिकृत भाषा म्हणून सुशिक्षित लोकांच्या जगात मान्यता प्राप्त झाली नसेल, कदाचित त्या भाषेला विशिष्ट नावसुध्दा नसण्याची शक्यता आहे.
प्राचीन काळापासून जगाच्या निरनिराळ्या भागात काही प्रगत अशा संस्कृती उदयाला आल्या, कालांतराने त्यातल्या काही अस्तालासुध्दा गेल्या. बहुतेक ठिकाणी संस्कृतीच्या सोबतीने लेखनकलेचा उदय आणि विकास होत गेला. तो होत असतांना त्या लोकांच्या वापरात असलेल्या भाषांचे व्याकरण तयार झाले, त्यांच्यासाठी लिपी तयार होत गेली आणि त्यात लिखित वाङ्मयाची, ग्रंथांची निर्मिती होत गेली. त्या भाषांचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्याची व देण्याची व्यवस्था झाली. मानवांच्या जीनवात त्यांना अधिकाधिक महत्वाचे स्थान प्राप्त होत गेले. त्या भाषांच्या सहाय्याने मानवाने अनेक विषयांचा अभ्यास केला आणि त्यातून त्याची प्रगती होत गेली. अशा प्रकारे ज्या बोलीभाषा अक्षरांमध्ये लिहिल्या व वाचल्या जात त्यांना प्रतिष्ठा, लोकप्रियता आणि राजमान्यता मिळत गेली.
प्राचीन काळात, बहुधा हजारो वर्षांपूर्वीच्या काळातल्या सर्वात जास्त प्रगत विश्वात संस्कृत या भाषेला सर्वमान्यता व मोठी प्रतिष्ठा मिळाली होती. त्या भाषेत लिहिल्या गेलेल्या अप्रतिम साहित्यकृती अजरामर होऊन राहिल्या. संस्कृत भाषासुध्दा प्रदीर्घ काळापर्यंत आर्य लोकांची बोलीभाषा राहिली असावी. कालांतराने वेगवेगळ्या भागांमध्ये तिच्या स्वरूपात स्थानिक बदल होत गेले, शब्दांचे अपभ्रंश होऊन नवे शब्द तयार होऊन ते रूढ झाले. परकीय भाषांमधील काही शब्दांचा उपयोग होऊ लागला आणि त्यातून मराठी, हिंदी, बांगला आदि आजच्या भाषा आणि त्यातील प्रत्येकीच्या अनेक उपभाषा तयार होत गेल्या. तरीदेखील भारतातील विद्वान लोकांना संस्कृत भाषा शिकून त्या भाषेमधील ज्ञानाचे संपादन करण्याची आणि साहित्याचा आस्वाद घेण्याची इच्छा होत राहिली, आयुर्वेद, ज्योतीर्विद्या आणि मुख्य म्हणजे हिंदू धर्म यांचे अध्ययन करण्यासाठी संस्कृत भाषा शिकून आत्मसात करणे अत्यावश्यक होते. या कारणांमुळे ती भाषा रोजच्या संभाषणामध्ये वापरली जात नसतांनासुध्दा तिचे अध्ययन आणि अध्यापन चालत राहिले. हजारो वर्षे हे काम गुरूशिष्यपरंपरेतून होत राहिले. इंग्रजांचे राज्य आल्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या शाळांमधील शिक्षणातदेखील संस्कृतचा अंतर्भाव करण्यात आला. आधीच्या लेखात मी लिहिले होते त्याप्रमाणे आधुनिक काळातल्या भारतीय भाषांवर संस्कृतचा इतका मोठा प्रभाव आहे की त्यांचा अभ्यास करतांनासुध्दा संस्कृत भाषेची थोडी ओळख असणे आवश्यक असते.
. . . . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment