महिनो-महिने किंवा वर्षानुवर्षे चालत राहणा-या टीव्हीवरल्या मेलोड्रामॅटिक मालिका मी इमानदारीने नियमितपणे पाहू शकत नाही. पण घरातला टीव्ही चालू असतांना मुद्दाम उठून दुस-या खोलीत जाऊन बसत नाही. त्यामुळे कधी कधी त्या सीरीयल्यमधले काही प्रसंग नजरेसमोर येतात आणि हळू हळू त्यातील मुख्य पात्रे ओळखीची वाटायला लागतात. 'शुभंकरोती' या नावाची एक मराठी मालिका मागल्या वर्षी येऊन गेली होती. तिची अशीच तोंडओळख झाली होती. चाकोरीबाहेरच्या आणि काहीशा अवास्तव अशा तिच्या कथाभागात चमत्कार, भुताटकी, करणी, कुंडली, भविष्यवाणी असले अतार्किक प्रकार नव्हते, अवास्तव वाटणा-या व्यक्तीरेखासुध्दा सपाट किंवा उथळ वाटत नव्हत्या. त्यांच्या अंगात वेगवेगळ्या प्रमाणात असलेले गुणदोष एकमेकांशी सुसंगत वाटायचे. वेळोवेळी बसणारे धक्के सुसह्य असायचे. घरातले चित्रण दाखवणारे सेट्स उघडउघडपणे कृत्रिम वाटत नव्हते. अशा कारणांमुळे ही मालिका एका बाजूने कुठे तरी वास्तवाला धरून चालली आहे असे मला वाटत होते.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तिची कथा उत्कंठेच्या शिगेला (क्लायम्रक्सला) पोचली होती. आठवडाभरात ती संपणार असे मला वाटू लागले होते. नेमक्या त्याच वेळी आजारपणामुळे मी आठवडाभर टीव्ही पाहूच शकलो नाही. हॉस्पिटलमध्ये करमणुकीचे दुसरेही कोणतेच साधन नसल्यामुळे अंथरुणावर पडल्या पडल्या विचारचक्र फिरवीत राहणे एवढेच करणे शक्य होते. वेळ घालवण्यासाठी मी त्या मालिकेत आता पुढे काय झाले असेल याचा विचार करू लागलो. असे झाले असेल की तसे घडले असेल असे करता करता माझ्यापुरती मीच त्या मालिकेची सूत्रे हातात घेतली आणि माझ्या कल्पनेनुसार तिचा शेवट करून टाकला. विस्कळित झालेले सारे धागे जुळून यावेत यासाठी प्रसंग मोजके टाकून सर्व मुख्य पात्रांना त्यात ओढून आणले. मला समजलेल्या त्यांच्या व्यक्तीरेखांनुसार संवाद त्यांच्या तोंडी घातले. मनातल्या मनात केलेला असा हा एक प्रयत्न घरी आल्यानंतर मी टंकन करून '***** कल्याणम्' या मथळ्याखाली ब्लॉगवर चढवून दिला.
हॉस्पिटलमधून घरी परत आल्यावर मी पाहिले होते की ती मालिका अजून संपलेली नव्हती, तर एक विचित्र वळण घेऊन वेगळ्याच दिशेने चालली होती. पण त्या मार्गाने ती फार लांबवर गेली नाही. महिनाभरातच वेगळ्या प्रकारे तिचा शेवट केला गेलाच. असे असले तरी मी केलेला शेवट आणि मालिकेत झालेला शेवट यात काही साम्यस्थळे दिसली. हा योगायोग होता की कथेची तशी मागणी होती ते माहीत नाही. पण आपण केलेला प्रयत्न अगदीच चुकीचा नव्हता याचे मला समाधान वाटले.
मी लिहिलेल्या कथेतली चिन्मयी घरीच बेशुध्द होऊन पडते, तिची मैत्रीण कौमुदी आणि भाऊ प्रशांत तिला कँसर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. मालिकेतली किमया वेगळ्या जागी बेशुध्द होऊन पडते, आणि तिची तीच मैत्रीण, प्रियकर आणि तोच भाऊ तिला दवाखान्यात नेतात. माझ्या गोष्टीतला ऋषी आणि त्याची आई यांच्या मनातला चिन्मयीबद्दलचा गैरसमज दूर होतो आणि ते तिचा मनापासून पूर्णपणे स्वीकार करतात. तिला उपचारासाठी परदेशी पाठवायचे ठरवतात इथे माझी गोष्ट संपते. सीरीयलमध्ये त्यांचे झटपट लग्न लागते आणि त्यांना परदेशी घेऊन जाणारे विमान आकाशात उडते. चिन्मयीचे आजोबा अप्पासाहेब मनाचे पुरेसे खंबीर आहेत, ते चिन्मयीच्या आजाराचा धक्का सहन करू शकतील असे मी दाखवले होते, मालिकेत अखेर तसेच झाले. माझ्या कथेतल्या चिन्मयीची वहिनी स्वाती सोडून सुभेदारवाड्यातील इतर सारी मंडळी एकत्र येऊन चिन्मयीच्या पाठीशी उभे राहतात. त्यांना आपल्या वाईट वागणुकीचा पश्चात्ताप होतो असे माझ्या गोष्टीत दाखवले होते. मालिकेमध्ये ते तर होतेच, शिवाय त्या कपटी वहिनीलासुध्दा तिने केलेल्या अपराधांची खंत वाटते आणि तीसुध्दा पश्चात्ताप करण्यात इतरांमध्ये सामील होते. त्यामुळे शेवटी घरात कोणी व्हिलन रहात नाही.
मात्र मी रंगवलेला सस्पेन्स आणि पोलिसतपासणी वगैरे प्रकार मालिकेत घडत नाहीत. तिथेही पोलिस येतात, पण ते फारच वेगळ्या कारणासाठी. मालिकेतल्या काकाला कोर्टाकडून न्याय मिळतो आणि त्याचे गेलेले सगळे पैसे त्याला एकगठ्ठा परत मिळाल्यामुळे सुभेदारांचा आर्थिक प्रश्न सुटतो. त्याऐवजी आधीपासूनच गडगंज श्रीमंत असलेल्या ऋषीच्या बापाला उपरती होते आणि त्यानेच निर्माण केलेला आर्थिक पेचप्रसंग तोच स्वतः होऊन सोडवतो असे मी दाखवले होते. दोन्ही जागी त्यांच्या विवंचना दूर होतातच.
एकूण काय, तर या मालिकांमधल्या कथा अखेर कुठे जाऊन पोचतील याचा साधारण अंदाज घेता येतो आणि तो बराचसा बरोबर ठरतो.
No comments:
Post a Comment